View 46125 Cases Against General Insurance
Shri Ravindra Prakash Mahadik filed a consumer case on 13 Jan 2016 against Ifko Tokyo, General Insurance Co. Ltd in the Satara Consumer Court. The case no is cc/14/219 and the judgment uploaded on 21 Jan 2016.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी असून त्यांनी त्यांचे कुटूंबीयांचे वापराकरीता महिंद्रा झायलो डी-4 चा रजि. नं. एम.एच.11 ए.डब्ल्यू 6210 हे वाहन घेतले होते. प्रस्तुत वाहनाचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेला होता व आहे. त्याचा विमा पॉलीसी क्रमांक 78509211 असा असून त्याचा कालावधी दि.8/12/2011 ते दि.7/12/2012 पर्यंत होता. प्रस्तुत वाहनाचे व त्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे अपघात अगर त्या अनुषंगिक नुकसानीची संपूर्ण जबाबदारी जाबदार यांनी स्विकारलेली होती व आहे. प्रस्तुत विमा पॉलसीतील अटी व शर्थीप्रमाणे तक्रारदार सदर वाहनाचा वापर खाजगी वापरासाठी करत होते. दि.27/4/2012 रोजी तक्रारदार यांचे सदरचे वाहन चालक महादेव शिवाजी खुळे हे प्रस्तुत वाहन त्यांचा मित्र निलेश विजय शिवदास यांचे घरगुती कारणाकरीता घेऊन मुंबई येथे निघाले होते. त्यावेळी प्रस्तुत वाहनाचा अपघात सी.बी.डी. बेलापूर येथे दि. 28/4/20112 रोजी पहाटे 3.30 वाजता झाला होता व आहे. सदर अपघाताचेवेळी वाहनचालक सर्व रस्त्याचे परिस्थितीकडे लक्ष देऊन, काळजीपूर्वक वाहन चालवित होते. परंतू मुंबई येथील सी.बी.डी. बेलापूर शेजारुन जाणारे ट्रकने अचानक उजव्या बाजूला गाडी घेतल्याने गाडीतील व्यक्तीला वाचविणेसाठी गाडी तातडीने बाजूला घ्यावी लागली व गाडी बाजूला घेत असताना पुलाच्या कठडयाला धडकून अपघातग्रस्त झाली होती. प्रस्तुत अपघात हा शेजारुन येणा-या ट्रक चालकाच्या चूकीमुळे झालेला होता व आहे. प्रस्तुत अपघातात वाहन चालक व सदर वाहनातील इतर 5 जण जखमी झाले होते. अपघातानंतर तक्रारदाराने दि. 30/4/2012 रोजी जाबदार यांना अपघाताची कल्पना देऊन योग्य त्या कागदपत्रांसह क्लेम फॉर्म सादर केला होता व आहे. सदरचा क्लेम फॉर्म भरल्यानंतर जाबदार यांनी त्यांचेकडील ब्राईट अँन्ड कंपनी या कंपनीस अपघाताची चौकशी करणेचे निर्देश दिले. सदर कंपनीचे सूचनेनुसार तक्रारदाराने दि. 22/8/2012 रोजी रजि. पोष्टाने अपघातासंदर्भातील सर्व कागदपत्रे पाठविली होती. तसेच त्यानंतरही दि. 5/10/2012 रोजी वाहनाचा वापर व अपघातासंदर्भात सर्व माहिती देणारी व क्लेम मंजूर करणेबाबत नोटीस तक्रारदाराने त्यांचे वकीलांमार्फत जाबदाराला दिली होती. परंतू जाबदाराने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर पुन्हा दि. 4/12/2012 रोजी तक्रारदाराने जाबदाराला पुन्हा एकदा नोटीस पाठवून क्लेम मंजूर करणेबाबत कळविले होते. प्रस्तुत तक्रारदाराने अपघातानंतर जाबदार यांचेकडे अपघातासंबंधी सूचना दिली होती. तसेच अपघातग्रस्त वाहनासंबंधीचे व त्याचे अपघातासंबंधीची सर्व कागदपत्रे संबंधीत कार्यालयात देवून वेळेत क्लेमफॉर्म भरुन दिला होता. अपघातावेळी तक्रारदाराचे ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचे लायसन्स होते व ते वैध मुदतीत होते. प्रस्तुत तक्रारदाराने जाबदाराचे विमा पॉलीसीप्रमाणे अपघातानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही तक्रारदाराचे आर्थिक नुकसान करणेच्या हेतूने तक्रारदार यांचेकडून कोणत्याही तरतूदींचा भंग झाला नसताना तक्रारदार यांचा प्रस्तुत क्लेम नं.33260690 दि.2/3/2013 रोजीचे पत्राने कोणतेही संयुक्तिक कारण नसताना चूकीच्या आधारे चूकीचा निष्कर्ष काढून नाकारला आहे व त्याबाबतचे क्लेम नाकारलेचे पत्र जाबदाराने तक्रारदाराला पाठविले आहे. त्यामुळे तक्रारदाराला दिले सेवात्रुटीसाठी व तक्रारदाराचे वाहन महिंद्रा झायलो डी-4 रजि. नं. एम.एच.11 ए डब्ल्यू 6210 चा ओन डॅमेज क्लेम मिळण्यासाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रार अर्ज कलम 3 प्रमाणे महिंद्रा झायलो डी-4 रजि.नं. एम.एच.11 ए डब्ल्यू 6210 चा रक्कम रु.7,50,000/- ओन डॅमेज क्लेम जाबदार यांचेकडून मिळावा, प्रस्तुत रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत देणेबाबत जाबदारांना हुकूम व्हावा. तक्रारदाराला झाले मानसिक त्रास व जाणेयेणेसाठी झालेला खर्च रक्कम रु.1,00,000/- जाबदारकडून मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.50,000/- जाबदारकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहेत.
3. तक्रारदाराने याकामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/13 कडे अनुक्रमे तक्रारदाराचे वाहनाची स्मार्ट कार्डची झेरॉक्स प्रत, टॅक्स भरलेच्या पावत्या, वाहन चालकाचे ड्रायव्हींग लायसन, विमा पॉलीसी प्रत, जाबदाराने ब्राईट अँन्ड कंपनीतर्फे तक्रारदाराला पाठवलेले पत्र, जाबदाराने तक्रारदाराला पाठवलेले पत्र, जाबदाराने तक्रारदाराला क्लेम नाकारलेचे पाठवलेले पत्राचा लखोटा, जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसला दिलेले उत्तर, तक्रारदाराने ब्राईट अँन्ड कंपनीतर्फे तक्रारदाराला पाठवलेले पत्र, जाबदाराने तक्रारदाराला पाठविलेले पत्र, जाबदाराने तक्रारदाराला क्लेम नाकारलेचे पाठवलेले पत्राचा लखोटा, जाबदाराने तक्रारदाराचे नोटीसला दिलेले उत्तर, तक्रारदाराने ब्राईट अँन्ड कंपनीस वाहनासंदर्भात पाठविले सर्व कागदपत्रांची स्थळप्रत तक्रारदाराचे वाहनचालकाचे प्रतिज्ञापत्र, वाहनातील जखमी निलेश शिवदासचे जबाबाची प्रत, समरी केस नं.18242/2012 ची चार्जशिटची नक्कल, तक्रारदाराने दि.5/10/2012 रोजी जाबदाराला पाठविले नोटीसची स्थळप्रत, तक्रारदाराने दि. 24/1/2013 रोजी जाबदार यांना पाठविले नोटीसची स्थळप्रत, नि. 18 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.19 कडे वाहन चालक (ड्रायव्हर) चे पुराव्याचे शपथपत्र, नि. 20 कडे निलेश शिवदासचे प्रतिज्ञापत्र, नि. 22 चे कागदयादीसोबत तक्रारदाराचे बँकेचे दिनांक 27/8/2012 चे पत्र, तक्रारदाराचे कर्ज खातेचा उतारा, नि. 23 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 25 कडे लेखी युक्तीवाद, नि. 29 चे कागदयादीसोबत वरिष्ठ न्यायालयाचा न्यायनिवाडा वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांनी नि. 15 कडे कैफियत/म्हणणे नि.16 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 24 कडे जाबदार यांना कोणताही पुरावा देणेचा नाही. म्हणून पुरसीस, नि.26 कडे जाबदार यांचा लेखी युक्तीवाद, नि. 28 चे कागदयादीसोबत नि. 28/1 ते नि. 28/7 कडे अनुक्रमे निलेश शिवदास यांचे स्टेटमेंट/जबाब, रुपेश विजय शिवादासचे स्टेटमेंट, प्रियंका विजय शिवदास याचे स्टेटमेंट, छाया विजय शिवदासचे स्टेटमेंट, प्रियांका विजय शिवदास चे स्टेटमेंट व निलेश शिवदास यांची तपास टिपणे मे. मंचात याकामी दाखल केली आहेत.
प्रस्तुत जाबदाराने त्यांचे कैफियतमध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.
i. तक्रारदाराला तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ii. तक्रारदाराचे वादातीत वाहनाचे अपघातात नुकसान झालेचे मान्य व कबूल नाही.
iii. तक्रारदाराचे वाहनाचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविलेचे मान्य व कबूल नाही. प्रस्तुत वाहनाचा खाजगी वापरासाठीचे वाहन म्हणून विमा उतरविला होता व आहे. परंतू तक्रारदाराने प्रस्तुतचे वाहन हे व्यापारी हेतूने प्रवासी वाहतूकीसाठी भाडेने दिले होते. प्रस्तुत अपघातात जखमी झाले निलेश शिवदास यांनी तसे स्टेटमेंट पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे. तसेच प्रस्तुत वाहन भाडयाने घेतलेचे म्हटले आहे. तसेच अपघातानंतर झाले चार्जशीट मधेही प्रस्तुत वाहन तक्रारदार भाडेने प्रवासी वाहतूकीसाठी वापरलेचे स्पष्ट नमूद आहे व प्रवाशांकडून तक्रारदाराने भाडे घेतलेचे म्हटले आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग केला असून तक्रारदाराने व्यापारी हेतूसाठी प्रस्तुत वाहनाचा वापर केला आहे. त्यामुळे प्रस्तुत अपघातात झालेली नुकसानभरपाई देणेची कोणतीही जबाबदारी या जाबदार यांची नाही. म्हणूनच जाबदाराने दि. 19/12/2012 रोजी तक्रारदाराला विमाक्लेम योग्य कारण देऊनच नाकारला आहे. त्यामुळे जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना कोणतीही सेवा त्रुटी दिलेली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार यांनी दिले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पुराव्याची शपथपत्रे, लेखी व तोंडी युक्तीवाद या सर्वाचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन
तक्रारदाराला सेवात्रुटी दिली आहे काय? होय.
3. तक्रारदार विमाक्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी त्यांचे मालकीचे वाहन महिंद्रा झायलो डी-4 रजि. नं. एम.एच.11 ए डब्ल्यू 6210 याचा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला होता व अपघात काळात तो चालू होता. प्रस्तुत विमा पॉलीसीचा नंबर 78509211 असा असून त्याचा कालावधी दि. 8/12/2011 ते दि.7/12/2012 असा होता. प्रस्तुत जाबदार विमा कंपनीने सदर वाहनाचे व त्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे अपघात अगर इतर अनुषंगिक नुकसानीची जबाबदारी जाबदार विमा कंपनीने स्विकारलेली होती व आहे. तक्रारदार प्रस्तुत विमा पॉलीसीचा हप्ता योग्यरितीने जाबदार यांचेकडे जमा केलेला असून जाबदार यांनी तो स्विकालेला आहे. प्रस्तुत तक्रारदाराचे सदर वाहनाचा विमा जाबदाराकडे उतरविला होता व अपघात काळात तो चालू होता ही बाब जाबदार विमा कंपनीने मान्य व कबूल केली आहे. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार विमा कंपनी ही तक्रारदार यांची सेवापुरवठादार आहे ही बाब स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- दि.27/4/2012 रोजी तक्रारदाराचे प्रस्तुत वाहन तक्रारदाराचा ड्रायव्हर महादेव शिवाजी खुळे त्यांचा मित्र निलेश विजय शिवदास यांचे घरगुती कारणाकरीता घेऊन मुंबई येथे निघाले होते. त्यावेळी प्रस्तुत वाहनाचा अपघात सी.बी.डी., बेलापूर येथे दि. 28/4/2012 रोजी पहाटे 3.30 वाजता झाला. सदर अपघातात वाहन चालक व वाहनातील इतर 5 जण जखमी झालेले होते. अपघातानंतर तक्रारदारने जाबदार विमा कंपनीस दि.30/4/2012 रोजी सदर अपघाताची कल्पना देऊन योग्य त्या कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिलेला होता व आहे. सदर क्लेम फॉर्म भरुन दिलेनंतर जाबदार यांनी त्यांचेकडील ब्राईट अँन्ड कंपनी या कंपनीस सदर अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले होते. सदर चौकशी करणा-या कंपनीचे सुचनेनुसार दि.22/8/2012 रोजी रजि.पोष्टाने अपघाता- संदर्भातील सर्व कागदपत्रे पाठविली होती. तसेच सदर कंपनीचे अधिका-यांची भेट घेऊन अपघातासंदर्भात सर्व माहीती दिलेली होती. तसेच त्यानंतरही दि.5/10/2012 रोजी वाहनाचा वापर व अपघातासंदर्भातील सर्व माहिती देणारी व क्लेम मंजूर करणेबाबत नोटीस वकीलांमार्फत जाबदाराला पाठविली होती. परंतू जाबदाराने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर पुन्हा दि. 4/12/2012 रोजी तक्रारदाराने नोटीस पाठवून क्लेम मंजूर करणेबाबत जाबदाराला कळविले होते. या सर्व बाबी दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होतात. तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन क्लेम फॉर्म जाबदार विमा कंपनीकडे पाठविला होता. परंतू जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराकडून कोणत्याही तरतूदींचा भंग झालेला नसतानाही तसे चूकीचे कारण देऊन जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळला आहे. जाबदाराने बचावासाठी फक्त तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला दिलेली जखमी लोकांचे जबाबामध्ये गाडी भाडयाने ठरविली होती असे नमूद असलेने तसेच चार्जशीट मध्येही गाडी भाडयाने घेतलेचे नमूद आहे. ही सर्व कागदपत्रे जाबदाराने नि. 28 चे कागदयादीने दाखल केली आहेत. परंतू जाबदार यांनी प्रस्तुत जबाब देणा-या व्यक्तीचे अँफीडेव्हीट मे. मंचात दाखल केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वादातीत गाडी भाडयाने दिली होती ही बाब शाबीत केलेली नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे जाबदाराने तक्रारदार यांचे वाहनाचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना सेवात्रुटी दिली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. याकामी आम्ही तक्रारदाराने मे. मंचात दाखल केलेला मा. राज्य आयोग, मंबई यांच्या पुढील न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
First Appeal No. 1071/2009 Shri. Vivek Shamsundar Dabhade V/s. National Insurance Company Ltd.,
वरील न्यायनिवाडयाचा विचार करता प्रस्तुत जाबदार यांचा विमा क्लेम जाबदार विमा कंपनीने नाकारुन/फेटाळून तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहे. कारण- वरील नमूद न्यायनिवाडयात नमूद केलेप्रमाणे प्रस्तुत कामी जाबदार विमा कंपनीने ज्या चार्जशीटमधील तपास टिपणे/जबाबांचा आधार बचावासाठी घेतला आहे. प्रस्तुत जबाब देणा-या व्यक्तींची शपथपत्रे जाबदाराने मे. मंचात दाखल केलेली नाहीत. सबब प्रस्तुत जाबदाराने दाखल केले सदर जखमी व्यक्तीची तपास टिपणे/जबाब यावर अवलंबून राहून तक्रारदाराचा विमा क्लेम जाबदाराने योग्य कारणासाठी नाकारला आहे, असा निष्कर्ष काढणे न्यायोचीत होणार नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब जाबदाराने तक्रारदाराला विमा क्लेम (Own Damage Claim) नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे असे आमचे मत आहे. सबब तक्रारदार हे प्रस्तुत विमा क्लेमपोटी योग्य ती रक्कम जाबदार कडून मिळणेस पात्र आहेत असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने रक्क्म रु.7,50,000/- (रुपये सात लाख पन्नास हजार मात्र) विमाक्लेमची मागणी याकामी केली आहे. तसेच प्रस्तुत रकमेवर 12 टक्के व्याज जाबदाराकडून मागणी केले आहे. परंतू नि. 5/3 कडे दाखल विमा पॉलीसीमध्ये विमा पॉलीसीची टोटल व्हॅल्यू रक्कम रु.6,94,739/- (रुपये सहा लाख चौ-यानऊ हजार सातशे एकोणचाळीस मात्र)
असलेचे दिसून येते. सबब तक्रारदार यांना विमाक्लेम पोटी रक्कम रु.6,94,739/-(रुपये सहा लाख चौ-यानऊ हजार सातशे एकोणचाळीस मात्र) एवढीच रक्कम मंजूर करणे न्यायोचीत होणार आहे. परंतू जाबदार यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम फेटाळलेमुळे प्रस्तुत रकमेवर विमा क्लेम फेटाळले तारखेपासून रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज तक्रारदारला जाबदार विमा कंपनीकडून मिळणे न्यायोचीत होणार आहे असे आम्हास वाटते.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचा वाहनाच्या Own Damage Claim ची
रक्कम रु.6,94,739/-(रुपये सहा लाख चौ-यानऊ हजार सातशे एकोणचाळीस
मात्र) व प्रस्तुत रकमेवर विमा क्लेम फेटाळले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष
तक्रारदाराच्या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने होणारी सर्व रक्कम
जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना अदा करावी.
3. तक्रारदाराला झाले मानसिक, शारिरीक त्रासापोटी जाबदार विमा कंपनीने
तक्रारदाराला रक्कम रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) अदा करावेत.
4. जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराला तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम
रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
5. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार विमा कंपनीने आदेश पारीत
तारखेपासून 45 दिवसांचे आत करावी.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 13-01-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.