निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदारांनी मारुती स्विफ्ट ही गाडी जून-2006 मध्ये खरेदी केली. तिचा नोंदणी क्रमांक –एम 06 एएफ 8037 असा आहे. या गाडीचा सर्वसमावेशक असा विमा सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 कडून जून-2006 मध्ये घेतला. या विम्याचे नूतनीकरण जून-2007 व जून- 2008 मध्ये करण्यात आले. दि.07.07.2008 रोजी गाडी सोसायटीच्या आवारात चालवित असताना गाडी संरक्षण कुंपन भिंतीला लागून गाडीचे नुकसान झाले. या घटनेची माहिती सामनेवाला क्र.1 – यांच्या कस्टमर केअर यांना दिली. त्यांच्याकडील श्री. संजय कुमार यांनी तक्रारदाराला असे सांगितले कि, या घटनेची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये करावी व त्यानंतर, सर्व्हेअर येऊन अपघात झालेल्या गाडीची पाहणी व तपासणी करील. तक्रारदारांनी दि.10.07.2008 रोजी अन्टाव्हिल पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची तक्रार नोंदविली. सामनेवाला यांनी विमा पॉलीसीच्या संदर्भात जी कव्हर नोट दिली होती, त्यानुसार, विमा पॉलीसी दि.11.06.2008 ते दि.10.06.2009 या कालावधीकरिता वैध होती. तक्रारदारांने वरीलप्रमाणे तक्रार नोंदविल्यानंतर कस्टमर केअरशी संपर्क साधला परंतु गाडीची पाहणी व तपासणी करण्याकरिता सर्वेअरची सेवा उपलब्ध झाली नाही, ही बाब त्यांनी सामनेवाला क्र.2 यांचे लक्षात आणून दिली. तक्रारदाराचे म्हणणे कि, सामनेवाला क्र.1 यांना तक्रारदारांचा क्लेम नंबर मिळूनदेखील त्यांच्याकडून गाडी तपासणीसाठी सर्वेअरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली नाही, यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता आहे. सामनेवाला क्र.1 यांचेकडून गाडी अपघाताच्या प्रकरणी काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना गाडीची दुरुस्ती करुन घेणे भाग पडले व त्यासाठी रक्कम रु.18,000/- इतका खर्च आला. 2 दि.10.07.2008 ते दि.01.08.2008 या कालावधीत तक्रारदाराला गाडीचा वापर करता आलेला नाही, त्यामुळे या कालावधीमध्ये नुकसान भरपाईची रक्कम रु.15,400/- सामनेवाला क्र.1 यांचेकडून 18% व्याजाने मिळणे आवश्यक आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, विमा पॉलीसीनुसार, तक्रारदाराचे जे नुकसान झाले, त्यापोटी नुकसानीची रक्कम व विमा पॉलीसीची रक्कम सामनेवाला क्र.1 यांचेकडून मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणी, तक्रारदाराला जो मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच सामनेवाला यांचेकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे त्यांना ग्राहक मंचात तक्रार दाखल करावी लागली, त्यासाठी जो आर्थिक भुर्दंड सोसावा लागला, त्याचीही भरपाई मिळावी अशी तक्रारदाराची विनंती आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्ज दाखल करुन खालीलप्रमाणे विनंत्या केलेल्या आहेत. अ तक्रारदाराच्या गाडीला अपघात झाल्याप्रकरणी नुकसान भरपाईची रक्कम रु.18,000/- व्याजासह मिळावी. ब तक्रारदाराला दि.10.07.2008 ते दि.01.08.2008 या कालावधीत गाडीचा वापर करता आला नाही, म्हणून रक्कम रु.15,400/-, 18% व्याजाने मिळावी. क मानसिक त्रास, छळ यापोटी रक्कम रु.50,000/- व या अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- व अन्य दाद मिळावी. 3 सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणणे दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशीर व गैरसमजुतीवर आधारलेली असल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सामनेवाला यांची विनंती आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कस्टमर केअर एझयुकिटिव्ह हे मागणीची नोंदणी करुन घेण्यासाठी जबाबदार आहेत. तक्रारदारांनी त्यांनी त्यांची मागणी विहीत नमुन्यात, विहीत कालावधीत सामनेवाला क्र.1 यांचेकडे दाखल करणे ही त्यांची जबाबदारी होती. सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणे कि, सामनेवाला क्र.2 हे त्यांचे एजंट आहेत. तक्रारदारांनी त्यांची मागणी विहीत नमुन्यात सामनेवाला क्र.1 यांचेकडे दाखल करावयाची होती, त्यानुसार, तक्रारदारांनी कृती केली नाही. तक्रारदारांने त्यांच्या गाडीच्या अपघाता संबंधात माहिती दिल्याशिवाय व मागणीपत्रक दाखल केल्याशिवाय सर्वेअर सर्वेक्षणाच्या कामासाठी पाठविला जात नाही अशी कृती तक्रारदारांनी केलेली नसल्यामुळे सामनेवाला क्र.1 यांचेकडून सर्वेअर पाठविला नाही, यामध्ये सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारदार दि.10.07.2008 ते दि.01.08.2008 या कालावधीतील रक्कम रु.15,400/- वरील परिस्थितीत मागू शकत नाहीत. तक्रारदाराने तक्रारी संदर्भात कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांने विमा पॉलीसीनुसार सामनेवाला यांचेशी पत्रव्यवहार केलेला नाही व घडलेल्या घटनेचा वृतांत लेखी स्वरुपात त्यांचेकडे दाखल केलेला नाही, त्यामुळे तक्रारदारांची मागणी सामनेवाला यांनी मान्य करण्याचा प्रश्न उदभवत नाही. त्याचे म्हणणे कि, तक्रारदाराच्या गाडी अपघातीची माहिती नाही. कारण त्यांचेकडून त्यांना कळविण्यात आलेले नाही. 4 सामनेवाला यांनी तक्रारदारांची मागणी नियमानुसार नाकारलेली नाही. त्यांचे म्हणणे कि, तक्रारदारांने त्यांच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर विमा पॉलीसीच्या नियमावलीनुसार विहीत नमुन्यातील मागणी अर्ज विहीत कालावधीत सामनेवाला क्र.1 यांना आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करणे ही तक्रारदारांची जबाबदारी होती. परंतु तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडे दाखल केलेला नाही, यामध्ये सामनेवाला क्र.1 यांच्या सेवेत कमतरता नाही असे असून सदरहू तक्रार खोटी, बिनबुडाची असल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सामनेवाला यांची विनंती आहे. 5 सामनेवाला क्र.2 त्यांना मंचाची नोटीस मिळून देखील ते मंचासमोर हजर राहिलेले नाहीत किंवा त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केलेले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले. 6 तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांची कैफियत व लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 7 तक्रारदारांनी मारुती स्विफ्ट ही गाडी जून-2006 मध्ये खरेदी केली, तिचा नोंदणी क्रमांक –एम 06 एएफ 8037 असा आहे. हि गाडी त्यांच्या इमारतीच्या आवारात गाडी चालवित असताना आवाराच्या भिंतीला धक्का लागून गाडीला अपघात झाला. तक्रारदारांनी गाडी खरेदी केल्यानंतर जून, 2006 मध्ये सामनेवाला क्र.1 यांचेकडून गाडीची विमा पॉलीसी घेतली होती, तिचे नूतनीकरण जून-2007 व जून-2008 मध्ये केले होते, त्यामुळे ही बाब लक्षात घेता, गाडीला दि.07.07.2008 रोजी अपघात होऊन जे नुकसान झाले त्यावेळी विमा पॉलीसी अस्तित्वात होती. त्या पॉलीसीनुसार तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणे आवश्यक आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे परंतु पॉलीसीनुसार तक्रारदारांना नुकसान भरपाई मिळाली नाही, यामध्ये सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या पृष्ठर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येत नाही. 8 तक्रारदाराच्या गाडीला इमारतीच्या आवारात भिंतीवर आदळून अपघात झाल्याचा अन्टॉव्हिल पोलीस ठाण्याचा अहवाल दाखल केला आहे, त्या अर्थी ही घटना घडली असल्याचे दिसून येते. सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदारांने गाडीचा विमा उतरविला होता, त्याची प्रत सोबत जोडण्यात आली आहे परंतु तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर, विमा पॉलीसीच्या नियमावलीनुसार तक्रारदाराने विहीत कालावधीत अपघातामध्ये जे नुकसान झाले त्याप्रकरणी, तत्काळ सामनेवाला यांना कळविल्याचे दिसून येत नाही, तसा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही तसेच या अपघाताप्रकरणी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज तक्रारदाराने केल्याबाबतचा कागदोपत्रीं पुरावा दाखल केला नाही. तक्रारदारांनी त्यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर गाडीच्या दुरुस्तीसाठी रक्कम रु.18,000/- चा खर्च करावा लागला असे कथन केले आहे. परंतु ज्या गॅरेजकडून गाडीची दुरुस्ती करुन घेण्यात आली, त्यांच्या बिलाची प्रत सोबत दाखल केलेली नाही, त्यामुळे या प्रकरणाची ग्राहय-अग्राहयता तपासण्याबाबतचा पुरावा तक्रारदारांकडून दाखल करण्यात आलेला नाही. उलटपक्षी, सामनेवाला यांनी त्यांच्या कैफियतीच्या परिच्छेद क्र.15 मध्ये तक्रारदारांनी विहीत कार्यपध्दतीनुसार त्यांचा मागणी अर्ज दाखल करण्याचे कष्ट घेतलेले नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तक्रारदारांच्या अपघाताच्या प्रकरणी त्याची मागणी सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. थोडक्यात, तक्रारदारांने विमा पॉलीसीच्या नियमावलीनुसार, त्यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी मागणी अर्ज दाखल केल्याचे दिसून येत नाही. कैफियतीच्या परिच्छेद क्र.15 मधील नमूद बाब लक्षात घेता, सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे दिसून येत नाही. 9 तक्रारदारांना कागदोपत्री पुराव्यानिशी सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करता आलेले नाही, त्यांनी तक्रार अर्जामध्ये ज्या मागण्या केल्या आहेत, त्याच्या पृष्ठर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कोणतीही मागणी मागता येणार नाही. तक्रारीमध्ये काही तथ्य असल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे तक्रार अर्जातील सर्व मागण्या वरील परिस्थितीत अमान्य करण्यात येतात. उक्त विवेचन लक्षात घेता, या प्रकरणी मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.169/2011 (421/2008) रद्दबातल करण्यात येते. (2) या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |