निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने दि.03.11.2003 रोजी मारुती व्हॅगन R LXI ची चार चाकी गाडी खरेदी केली. ही गाडी तक्रारदाराचा मेव्हणा चालवित असताना दि.07.11.2007 रोजी गाडीला अपघात झाला. त्या दिवशी आवश्यक ते सर्व दस्तऐवज सामनेवाले यांच्या सर्व्हेअरला प्रकरण मार्गी लावण्यासाठी देण्यता आले. परंतु सामनेवाले यांचेकडून त्या प्रमाणे, भरपाईची रक्कम तक्रारदाराला देण्यात आलेली नाही, यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 2 तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेल्या विमा पॉलीसीचा क्र.36636232 असा आहे. ही गाडी दि.03.11.2003 रोजी नवनित मोटार मारुती उद्योग, तळोजा, जि.रायगड यांचेकडून खरेदी करण्यात आली. श्री.बी.आर.कदम यांनी Ownes Corning India Limited ही कंपनी सोडताना कंपनीच्या धोरणानुसार, सदरहू गाडीची उर्वरित खरेदीची किंमत एचडीएफसी बँकेला अदा करुन गाडीचा ताबा घेतला आणि ही गाडी त्याने तक्रारदाराचे नावे हस्तांतरीत केली. ही गाडी गरजेच्या वेळेला तक्रारदार यांच्याकडून वापरण्यात येत होती. जून-2007 मध्ये ही गाडी तक्रारदाराने दैनंदिन वापरासाठी त्याचे मेव्हणे- श्री.बी.आर.कदम यांना दिली. त्यामुळे या गाडीच्या मालकीच्या नावामध्ये फेर फार करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं करावी लागली. त्याकरिता ते अशी कामे करणा-या एजंटला भेटले. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ही गाडी श्री.बी.आर.कदम यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आली. या गाडीला पूर्व महामार्गावर सायन, चुनाभट्टी येथे दि.07.11.2007 ला अपघात झाला. त्यानंतर, या घटनेची माहिती पोलीसांना फोन क्र.100 वरुन दिली. त्यानंतर 15 मिनीटांनी पोलीस आले. त्यानंतर, नेहरुनगर पोलीस स्टेशन, कुर्ला येथील पोलीसांनी पंचनामा केला आणि प्रथम खबरी अहवाल (F.I.R.) श्री.बी.आर.कदम यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी देण्यात आला. त्यानंतर, गाडीची दुरुस्ती करण्याकरिता गाडी Towing Van ने साई सर्व्हिस, लोअर परेल येथील मारुती अधिकृत गॅरेजमध्ये नेण्यात आली. 3 श्री.बी.आर.कदम यांनी मागणी दावा नोंदविला. वरील घटनेनंतर, सामनेवाले यांचे सर्व्हेअर लोअर परेल येथे येऊन गाडीची तपासणी व पाहणी केली, गाडीची आवश्यक ती छायांचित्रं घेतली. तसेच गाडी संबंधी दस्तऐवजाच्या प्रतीं घेतल्या. तसेच गॅरेजकडून गाडी दुरुस्तीचे दस्तऐवज करून घेतले व विमा पॉलीसीच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम देण्यात येणार नाही असे सांगितले. त्यानंतर, नोव्हेंबर, 30 तारखेला गाडी दुरुस्त करुन तयार झाली. त्यासाठी दुरुस्तीसाठी रक्कम रु.39,266/- निश्चित करण्यात आली. दुरुस्त करण्यात आलेल्या गाडीची पाहणी व तपासणीकरिता सर्व्हेअरला बोलविण्यात आले. त्यावेळी आवश्यक ते दस्तऐवज गॅरेजकडून त्यांना देण्यात आले आणि त्याप्रमाणे, गाडी संबंधीचा अहवाल सामनेवाले यांना परस्पर पाठविण्यात आल्याचे गॅरेजकडून तक्रारदार याला सांगण्यात आले व त्यानुसार, विम्याची रक्कम महिन्याभरात मिळेल असेही सांगण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत श्री.बी.आर.कदम यांना सामनेवाले यांचेकडे त्यांची मागणी मार्गी लावण्याच्या दृष्टीने चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यावेळी त्यांचा मालकी हक्क संपुष्टात आलेला आहे असे सांगितले. सामनेवाले यांनी सदरहू गाडीच्या विमा पॉलीसीची किंमत फारच नगन्य असल्यामुळे आयआरडीए च्या धोरणानुसार, नुकसान भरपाईची रक्कम किती द्यावी, याबाबतचा निर्णय संबंधीत कंपनीला घ्यावा लागतो असे सामनेवाले यांचेकडून सांगण्यात आले. अपघाताची घटना घडल्यानंतर दोन महिन्यानंतर सदरहू गाडीचा मालकी हक्कम श्री.बी.आर.कदम यांचेकडे दिला. सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारदार यांनी एजंट क्र.4600016 श्री.अंकुर पांडे यांची मदत घेतली आणि त्यांनी आवश्यक ती कागदपत्रं सामनेवाले यांना सादर केली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आरसी बुकावर नोंदविलेल्या पत्त्यानुसार सामनेवाले यांचेकडून तक्रारदाराच्या निवासी पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात आला. बदललेल्या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा असे त्याना सांगण्यात आले होते परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गाडीच्या दुरुस्तीचे बिल हे श्री.कदम यांच्या नांवे होते ते श्री.पाटील यांचे नांवे नसल्यामुळे सामनेवाले यांना प्रस्तुत विम्याचे भरपाईचे प्रकरण मार्गी लावता आले नाही. 4 जी गाडी मूळतः Ownes Corning India Limited यांचे नांवे होती आणि या वाहनाचा वापरदार म्हणून श्री.पाटील यांच्या नावाची नोंद होती. त्यामुळे गाडीचा ताबा श्री.पाटील यांचेकडे होता, त्यामुळे सर्व्हिस स्टेशन येथे गाडीची नोंदणी वापरदाराच्या नावे म्हणजे –श्री.पाटील यांच्या नावे होती. परंतु त्यामुळे गाडीच्या दुरुस्तीचे बिल श्री.कदम यांच्या नावे देण्यात आले होते असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने खालीलप्रमाणे विनंत्या केल्या आहेत. अ दुरुस्तीची रक्कम रु.39,266/- मिळावी ब नुकसानभरपाईची रक्कम रु.60,000/- मिळावा. क या अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावा. 5 सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशीर व गैरसमजुतीवर आधारलेली असून ती या मंचासमोर चालणारी नाही, म्हणून ती खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सामनेवाले यांची विनंती आहे. तक्रारदार यांनी महत्त्वाचे मुद्दे मंचासमोर मांडलेले नाहीत. तक्रारदार हे पारदर्शकपणे मंचासमोर आलेले नाहीत. तक्रारदार यांनी गाडीचा अपघात होण्यापूर्वी सदरहू वाहन तक्रारदार यांनी श्री.कदम यांच्या नावे हस्तांतर केले. हे वाहन श्री.कदम हे वापरत होती. ते वापरत असताना दि.07.11.2007 रोजी अपघात झाला. वाहनाची पॉलीसी मात्र श्री.कदम यांचे नावे हस्तांतरण झाली नव्हती. वाहनाच्या मालकी हक्कांबाबत फेरफार करण्याबाबतची बाब आरटीओ यांचेकडे प्रलंबित होती. परंतु विमा रक्कमेची मागणी श्री.कदम यांचेकडून करण्यात आली म्हणून विमा रक्कमेची मागणी श्री.पाटील यांचेकडून करण्यात आल्यामुळे त्यांची मागणी नाकारण्यात आली. विमा कंपनीच्या नियमानुसार नुकसानभरपाईची मागणी श्री.पाटील यांनी करायला हवी होती, त्यामुळे सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 6 वाहन मूळात Owners Corning India Limited तळोजा, जि.रायगड यांनी खरेदी केली होता. हे वाहन 2005 च्या दरम्यान तक्रारदाराच्या नावे करण्यात आले. तक्रारदाराने वाहन जून-2007 च्या दरम्यान श्री.कदम यांच्या नावे हस्तांतरीत केले. याबाबतचा पत्रव्यवहार व अनुषांगिक दस्तऐवज श्री.कदम यांचे नावे करण्याकरिता आरटीओच्या स्तरावर प्रलंबित केले. त्या दरम्यानच्या कालावधीत दि.07.11.2007 रोजी अपघात झाला. तक्रारदाराला अपघाताचे वेळी ते वाहन वापरण्याचा अधिकार नव्हता. त्यांच्याकडे क्लेमही-श्री.कदमने केला होता याचा अर्थ, तक्रारदाराने गाडीचे सर्व हक्क श्री.कदमला दिले होते. या घटनेनंतर, दोन महिन्याने सदरहू वाहन आरटीओ यांचेकडे श्री.पाटील यांच्या नावे हस्तांतरीत करण्यात आले. वरील परिस्थितीत घटनेच्या वेळी तक्रारदार हे वाहनाचे मालक नसून श्री.कदम हे वाहनाचे मालक होते म्हणून त्यांची मागणी सामनेवाले यांचेकडून नाकारण्यात आली असे त्यांचे म्हणणे आहे. वाहन हस्तांतरीत केल्याने तक्रारदाराने त्यांना कळविले नाही म्हणून पॉलीसी संपुष्टात आली. वरील परिस्थितीत त्यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे आणि म्हणूनच दुरुस्तीची रक्कम रु.39,266/-, वाहनाची मालकी तक्रारदाराची नसल्यामुळे सर्व्हेअरच्या अहवालानुसार नाकारण्यात आली. 7 तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, लेखी युक्तीवाद, पुरावा शपथपत्रं, सामनेवाले यांची कैफियत व लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रांचे पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 8 तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत यादीनुसार जी अनुषांगिक कागदपत्रं दाखल केली आहेत, त्यामध्ये विमा पॉलीसीच्या प्रत, दि.29.04.2008 चा सामनेवाले यांना पाठविलेला अर्ज, गाडी बाबतच्या दस्तऐवजाच्या प्रतीं दि.07.11.2007 च्या प्रथम खबरी अहवालाची (F.I.R.) प्रत, दुरुस्ती खर्चाची प्रत, सोबत जोडण्यात आली आहे. 9 तक्रारदार यांचे मेव्हणे गाडी चालवित असताना तक्रारदाराच्या गाडीला दि.07.11.2007 रोजी अपघात झाला. त्याबाबतचा प्रथम खबरी अहवाल प्रत दाखल करण्यात आलेली आहे. त्या दिवशी तक्रारदाराचे मेव्हणे–श्री.बी.आर.कदम हे गाडी चालवित असताना ही घटना घडलेली असल्यामुळे त्यांनी या घटनेची नोंद नेहरुनगर पोलीस स्टेशन, कुर्ला, मुंबई येथे केली. त्यामध्ये श्री.बी.आर.कदम यांचा वाहन चालक परवाना क्र.60533 याची नोंद करण्यात आलेली आहे आणि वाहन चालक म्हणून श्री.बी.आर.कदम यांनी नोंद केल्याचे संबंधीत अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तसेच तक्रारदार यांच्या गाडी संबंधीची आवश्यक ती कागदपत्रं दाखल करण्यात आलेली आहेत. तक्रारदाराने विमा पॉलीसीची प्रत दाखल केलेली असून या विम्याचा कालावधी दि.12.02.2007 ते दि.14.02.2008 असा नमूद करण्यात आलेला आहे. ही विमा पॉलीसी वैद्य असताना दि.07.11.2007 रोजी श्री.बी.आर.कदम गाडी चालवित असताना गाडीला अपघात झाला. विमा पॉलीसीवर तक्रारदाराचे नाव नमूद करण्यात आले आहे. गाडी श्री.बी.आर.कदम हे चालवित होते, त्यामुळे ते गाडी दुरुस्तीकरीता साई सर्व्हिस गॅरेज, लोअर परेल येथे गॅरेजला घेऊन गेले. गॅरेजने संबंधित दुरुस्तीच्या बिलावर श्री.बी.आर.कदम यांचे नांव ग्राहक म्हणून नमूद केले आहे, त्यानुसार दुरुस्तीची रक्कम रु.39,266/- एवढी आहे. 10 या घटनेची माहिती सामनेवाले यांना दिल्यानंतर त्यांचेकडून सर्व्हेअर पाठविण्यात आला व त्यांने लोअर परेल येथे येऊन गाडीची पाहणी तपासणी केली. विमा पॉलीसीमध्ये नमूद केलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम मिळणार नाही असे त्याचेकडून सांगण्यात आले. सर्व्हेअरने पाहणी अहवाल परस्पर सामनेवाले यांना पाठविला. या अहवालानुसार, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.39,266/- ची मागणी केली. परंतु ही मागणी सामनेवाले यांचेकडून, तक्रारदार हे करु शकत नाहीत या कारणावरुन नाकारली. याकरिता सामनेवाले यांचेकडून समर्पक कारण देण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येत नाही. विमा पॉलीसीनुसार दुरुस्तीची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना देणे ही त्यांची जबाबदारी होती, त्याचे पालन सामनेवाले यांनी केलेले नाही. तसेच सामनेवाले यांच्या सर्व्हेअरने लोअर परेल येथे गॅरेजमध्ये जाऊन संबंधीत गाडी दुरुस्तीची पाहणी केल्यानंतर सामनेवाले यांना जो अहवाल सर्व्हेअरने पाठविला, त्या अहवालाची प्रत सामनेवाले यांनी मंचासमोर दाखल केलेली नाही, यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे म्हणता येईल. 11 तक्रारदाराची गाडी दि.07.11.2007 रोजी श्री.बी.आर.कदम हे चालवित होते, त्यावेळी गाडीला अपघात झाला, त्याची नेहरुनगर, कुर्ला नोंद गाडीचे वाहनचालक म्हणून श्री.बी.आर.कदम यांनी केली. याबाबतचा पोलीस नोंदणीचा अहवाल प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे. त्यामध्ये वाहन चालक म्हणून श्री.बी.आर.कदम यांच्या नावाची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये श्री.बी.आर.कदम हे गाडीचे मालक असल्याची नोंद दिसून येत नाही. अपघातानंतर सदरहू गाडी दुरुस्तीकरिता साई सर्व्हिस स्टेशन, लोअर परेल या गॅरेजकडे श्री.बी.आर.कदम यांचेकडून गाडी दुरुस्तीला देण्यात आली. त्यावेळी गाडी दुरुस्ती करुन दुरुस्तीचे बिल देण्यात आले, त्यामध्ये श्री.बी.आर.कदम यांचे नांव नमूद करण्यात आलेले आहे. या बिलात देखील श्री.बी.आर.कदम हे गाडीचे मालक असल्याची नोंद नाही. ज्याअर्थी, त्यावेळी श्री.बी.आर.कदम हे गाडी चालवित असल्यामुळे त्यांनी ही गाडी दुरुस्तीला देणे हे क्रमप्राप्त होते. त्यावेळी त्यांनी गाडी गॅरेजला घेऊन गेले, म्हणून त्या बिलावर श्री.बी.आर.कदम यांचे नाव लिहीले आहे. परंतु श्री.बी.आर.कदम हे या गाडीचे मालक आहेत असे त्या बिलावर नमूद केलेले नाही, त्याअर्थी, श्री.बी.आर.कदम हे गाडीचे मालक होऊ शकत नाहीत आणि श्री.बी.आर.कदम हे गाडीचे मालक असल्याबाबत सामनेवाले यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. आर.टी.ओ.कडे गाडी श्री.कदम यांचे नांवे हस्तांतरण करण्याबाबत प्रकरण प्रलंबित होते हे जरी मान्य केले तरी गाडी अजून श्री.कदम यांचे नांवे झाली नव्हती. त्यामुळे तक्रारदार हेच तीचे मालक होते व पॉलीसी त्यांच्याच नावाने होती, त्यामुळे क्लेम मिळण्याचा तक्रारदाराला अधिकार आहे. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे पत्र देऊन क्लेमची मागणी केली होती परंतु त्यांनी ती नाकारली. सामनेवाले यांनी तक्रारदाराची मागणी विमा पॉलीसीच्या कोणत्या नियमावलीनुसार नाकारली हे स्पष्ट केलेले नाही. थोडक्यात, त्यांनी मागणी नाकारताना कोणत्या पॉलीसीच्या नियमाचा आधार घेतला हेही स्पष्ट केले नाही म्हणून सामनेवाले यांनी गाडी दुरुस्तीची रक्कम रु.39,266/- व त्यावर योग्य दराने व्याज तक्रारदार यांना द्यावे असे मंचाचे मत आहे. तसेच या अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहे. उक्त विवेचनानुसार, या प्रकरणी मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे. आदेश (1) तक्रार क्र.166/2011 (836/2009) अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले यांनी विमा पॉलीसी क्र.36636232 नुसार गाडी दुरुस्तीची रक्कम रु.39,266/- तक्रारदाराला हा आदेश मिळाल्यापासून एक महिन्यांत द्यावी. तसेच सदरच्या रक्कमेवर द.सा.द.शे.9 दराने रक्कम अदा होईपावेतो व्याज द्यावे तसेच या अर्जाचा खर्च रु.3,000/- द्यावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |