रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 28/2014
तक्रार दाखल दि. 29/03/2014
तक्रार निकाली दि. 14/01/2015
श्री. पोपट राजाराम नलावडे,
रा. मु. पो. वेटणे, ता. खटाव, जि. सातारा. ..... तक्रारदार.
विरुध्द
इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि.,
ए. एफ. एल. हाऊस, दुसरा मजला,
लोकभारती कॉम्प्लेक्स, मरोळ मरोशी रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई – 400059. ..... सामनेवाले
समक्ष - मा.श्री. उमेश वि. जावळीकर अध्यक्ष.
मा.सदस्या श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
उपस्थिती- तक्रारदारतर्फे वकील – ॲड. जितेंद्र लेले
सामनेवाले तर्फे ॲड. सुयोग बारटके
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणांमुळे नाकारल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी बोलेरो जीप क्र. एम.एच.11/टी/5712 सामनेवाले यांचेकडे कॉम्प्रेहेन्सीव्ह स्वरुपाचा विमा संरक्षण करार दि. 26/11/10 ते 25/11/11 पर्यंत करुन खरेदी केली होती. सदरहू गाडी दि. 26/04/11 रोजी 00.30 वाजता तक्रारदारांचे ड्रायव्हर श्री. विक्रम नलावडे यांनी कळंबोली, ता. पनवेल येथे तो रहात असलेल्या घरासमोरील मोकळया जागेत पार्क करुन ठेवली होती. सकाळी 6.00 वाजता श्री. विक्रम नलावडे सदर गाडी घेऊन गांवी जाण्यास निघाले असता गाडी त्यांस घरासमोरील मोकळया जागेतून चोरीस गेल्याचे आढळून आले. त्यामुळे तात्काळ दि 27/04/11 रोजी सकाळी 8.00 वाजता कळंबोली पोलिस स्टेशन येथे त्यांनी वाहन चोरीबाबत तक्रार नोंदविली. त्यानंतर दि. 30/04/11 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा, महिंद्रा वित्तीय कंपनीस सामनेवाले यांस वाहन चोरीची बाब लेखी स्वरुपात कळविली.
3. सामनेवाले विमा कंपनीने तात्काळ चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करुन चौकशी केली. सदर चौकशीनंतर वाहन किंवा विमा रक्कम यापैकी एक बाब मिळणार याची खात्री तक्रारदारांस होती. परंतु सामनेवाले यांनी दि. 09/12/12 रोजी पत्र पाठवून तक्रारदारांस असे कळविले की, आपण दूरध्वनीद्वारे दि. 20/09/11 रोजी सदरील वाहन गुजरात पोलिसांना सापडले असून ते त्यांच्या ताब्यात आहे, असे सांगितले. त्यामुळे आपला विमा दावा अमान्य करण्यात येतो. सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सामनेवाले यांना सदरची बाब असत्य असून वर नमूद केल्यानुसार कोणतेही विधान तक्रारदार यांनी केलेले नाही अथवा वाहन गुजरात पोलिसांना सापडले नाही ही बाब सांगितली. तरीही सामनेवाले यांनी तक्रारदारास प्रतिउत्तर न दिल्याने व निर्णय कायम ठेवल्याने, तक्रारदारांचा विमा दावा मंजूर करावा व नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती प्रस्तुत तक्रारीत तक्रारदारांनी केली आहे.
4. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाले यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. सामनेवाले यांनी जबाबात तक्रारीमधील मुद्दयांचे खंडन करुन तक्रारदार यांनी वाहन चोरी झाल्यानंतर विमा अट क्र. 1 प्रमाणे तात्काळ विमा कंपनीस सदर बाब कळविली नाही. तसेच दि. 20/09/11 रोजी विमा प्रतिनिधी व पाहणी तज्ञ यांचेसोबत दूरध्वनीद्वारे झालेल्या संभाषणात तक्रारदारांनी सदर वाहन गुजरात पोलिसांना सापडले असल्याची बाब सामनेवाले यांस सांगितली होती, त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा दावा उचित कारणामुळे नाकारला असून सदर बाब दि. 09/12/12 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांस कळविली आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार विहीत कालमर्यादेत दाखल केली नसून कालबाह्यतेच्या मुद्दयावर तक्रार अमान्य करण्यात यावी असे कथन केले आहे.
7. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले यांचा लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा | निष्कर्ष |
1. प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण अधिनियम कलम 24 (अ) अन्वये विहीत मुदतीत दाखल केली आहे काय ? 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणामुळे नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात काय ॽ | होय. होय. |
3. सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ? 4. आदेश ? | होय. तक्रार अंशत: मान्य |
कारणमीमांसा
8. मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारांस दि. 09/12/12 रोजी विमा दावा नाकारल्याबाबत लेखी कळविले आहे. प्रस्तुत तक्रार दि. 29/03/14 रोजी दाखल करुन घेतली आहे. दाखल सुनावणीचे वेळी तक्रार मुदतीत दाखल केली असल्याबाबत आदेश नमूद आहेत. सबब, प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम कलम 24 (अ) अन्वये विहीत मुदतीत दाखल केली असल्याबाबत निष्कर्ष निघतो. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
9. मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले यांनी, तक्रारदारांनी वाहन चोरीची बाब तात्काळ न कळविल्याने व दि. 20/09/11 रोजी दूरध्वनीद्वारे चोरी गेलेले वाहन गुजरात पोलिसांना सापडल्याबाबत सांगितल्याची बाब नमूद करुन, तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केला नाही असे कथन केले आहे. परंतु तक्रारदारांनी दि. 20/09/11 रोजी सामनेवाले सोबत कोणतेही संभाषण झाले नसून चोरी गेलेले वाहन सापडले नसल्याबाबत कथन केले आहे. सामनेवाले यांनी दि. 20/09/11 रोजी झालेल्या संभाषणाबाबत कोणताही सबळ पुरावा मंचासमक्ष दाखल केला नाही. तसेच चोरी झालेले वाहन तक्रारदारांकडे असल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.
विमा संरक्षण कराराच्या अटींप्रमाणे सामनेवाले यांनी, तक्रारदारांचा विमा दावा, तक्रारदारांनी वाहन चोरीची बाब निव्वळ विलंबाने कळविली या कारणास्तव अमान्य करणे न्यायोचित नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांस चोरीस गेलेले वाहन दि. 20/09/11 रोजी सापडल्याने व तक्रारदारांस विमा रक्कम प्राप्त करण्यात स्वारस्य नसल्याबाबत नमूद करुन, विमा दावा नाकारल्याचे कळविले आहे. परंतु सदर बाबींची पडताळणी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना सामनेवाले यांनी केली नसल्याने तक्रारदारांस सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. तक्रारदारांनी वाहन चोरीबाबत फिर्याद दिली असून, त्याप्रमाणे सामनेवाले यांनाही कळविले होते. तरीदेखील सामनेवाले यांनी तक्रारदारांस विमा रक्कम न देऊन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
10. मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदारांचे वाहन अद्याप पोलिस तपासात आढळून आले नाही. तसेच सामनेवाले यांनी सदर वाहन तक्रारदारांच्या ताब्यात असल्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले सोबत केलेल्या विमा करारातील अटी व शर्तींचे अवलोकन केले असता, वाहन चोरीची बाब विमा संरक्षणात येते. त्यामुळे सामनेवाले हे तक्रारदारांस न्यायोचित नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत. परिणामी वाहन चोरी दिनांकापासून आजतागायत झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रासासाठी सामनेवाले यांनी तक्रारदारांस नुकसानभरपाई देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
11. उपरोक्त निष्कर्षांवरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 28/2014 अंशत: मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांचा वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणामुळे नाकारुन तक्रारदारांस सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांस वाहन चोरी विमा प्रतिपूर्ती रक्कम रु. 4,99,000/- (रु. चार लाख नव्व्याण्ण्ाव हजार मात्र) आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांचे आत द्यावेत.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारांस मानसिक व शारिरिक त्रासाच्या नुकसानभरपाईपोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. 30,000/- (रु. तीस हजार मात्र) आदेशप्राप्ती पासून 30 दिवसांचे आत द्यावेत.
5. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 14/01/2015
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.