::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 24/01/2018)
१. विरुद्धपक्ष यांनी, तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने वाहन क्र.MH -३३ –A- १७१६ ही मारुती स्विफ्ट डीझायर चार चाकी वाहन खरेदी केल्यानंतर प्रथम युनायटेड इंडीया इंशुरन्स कम्पनीकडे सदर वाहन विमा कृत केले होते व सदर विमा पालीसी दि.२८.१२.२०१२ या कालावधीकरिता वैध होती. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर कार वि.प.कडे रु १०९९९.९५ रक्कम भरुन विमाकृत केले. गैरअर्जदार यांचेकडुन दिनांक २९.११.१२ ते दि.२८.११.१३ पर्यंत विमा संरक्षण घेतले. त्यानंतर विमा पालीसी दि. ३.१२.२०१३ ते दि. ०२.१२.२०१४ या कालावधी करिता नुतनीकरण केले. अर्जदाराच्या सदर कारचा दि. ०१.०६.२०१४ रोजी गडचिरोली शहराजवळ खुटगाव ते चातगाव फाट्याच्या वळणावर अपघात झाल्याने वाहनाचे नुकसान झाले. सदर घटनेची माहिती वि.प. यांना दिली असता त्यांचे निरीक्षक येऊन त्यांनी तपासणी केली व नंतर सदर वाहन हे Venus Automotive, गडचिरोली यांचेकडे दुरुस्तीकरिता नेले असता दुरूस्तीचा रु १,११,२४८/- खर्च आला. अर्जदारांने संपुर्ण दस्तावेजासह वि.प.कडे रु १,११,२४८ ची नुकसानभरपाई मागितली. परंतु वि.प. यांनी विमा दावा कोणत्याही कारणाशिवाय जुलै २०१४ मध्ये नामंजुर असे कळविल्याने तक्रारकर्त्याने वि.प.ला याबाबत विचारणा केली असता त्यांनी काहीच स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ०२.०२.२०१५ रोजी रोजी नोटीस पाठवुन देखील गैरअर्जदार यांनी विमा कराराप्रमाणे अर्जदाराचा विमा दावा मान्य न केल्याने अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीत विमा दावा मंजुर करुन नुकसान भरपाईसह तक्रार मंजुर करावी अशी विनंती केली आहे.
३. विरुद्ध पक्ष यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार मंचात उपस्थित राहुन त्यानी त्यांचे लेखी जवाबामध्ये तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन विरुद्ध पक्ष यांनी दिनांक ०३.१२.२०१३ ते दिनांक ०२.१२.२०१४ या कालावधीसाठी वाहन विमा करार केला होता, ही बाब कबुल केली. अर्जदारांनी गैरअर्जदाराकडे विमा दावा रक्कम प्राप्त होणे कामी अर्ज केला असता केलेल्या तपासणीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विमा संरक्षण घेतेवेळी मागील वर्षी कोणताही विमा दावा घेतला नसल्याचे नमूद करुन no claim bonus या सदराखाली एकूण विमा रक्कम रुपये १४१६८.०४ मधून ४८४७.२४ रु. सुट घेतली. अर्जदाराने विमा दावा घेतला असल्याची बाब अर्जदाराने दिनांक ०२.०२.२०१५ रोजी अड. प्रमोद बोरावार यांचेमार्फत पाठविलेल्या नोटीसमध्ये कबुल केले आहे. अर्जदाराने गडचिरोली शहरात कोठे अपघात घडला हे नमूद केले नाही. अपघाताच्या वेळी असलेल्या चालकाचे नाव, वाहन परवाना, उपयोग, पोलीस स्टेशनची हद्द व इतर माहिती नमूद केलेली नाही. विमा दावा असत्य माहितीच्या आधारावर घेतला असल्याने तो देय नाही. अर्जदाराचा विमा दावा व प्रस्तुत तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सबब, तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती गैरअर्जदारांनी केली आहे.
४. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशीस व गैरअर्जदारचे लेखी उत्तर, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुर्सीस दस्तावेज तसेच दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात आले.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा कराराप्रमाणे
प्रतीपुर्ती दावा रक्कमेबाबत सेवासुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्रतीपुर्ती दावा
रक्कम अदा न केल्याने नुकसान भरपाई अदा करण्यास
पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश काय ? अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत - :
५. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजावरून, वाहन खरेदी केल्यानंतर प्रथम युनायटेड इंशुरन्स कम्पनीकडे सदर वाहन विमा कृत केले होते व सदर विमा दि.२८.१२.२०१२या कालावधीकरिता वैध होते त्या नंतर तक्रार कर्त्याने विरुद्ध पक्ष यांच्याकडे रु. १०,९९९.९५/- ची रक्कम भरून सदर वाहन पुढील कालावधीकरिता विमाकृत केले. परंतु तक्रार कर्त्याने सदर वाहनाचा विमा नुतनीकरण करताना पहिले कोणतीही नुकसान भरपाई न घेतल्याची खोटी माहिती देऊन वि. प.कडून नो क्लेम सवलती खाली सुट घेतली अर्जदाराने सदर बाब लपवुन वि. प. कडून पालीसी घेतली हे दाखल दस्तावेजावरून निदर्शनास येते. तक्रारकर्त्याने गडचिरोली शहरात कोठे अपघात घडला हे नमूद केले नाही. अपघाताच्या वेळी असलेल्या चालकाचे नाव, वाहन परवाना, उपयोग, पोलीस स्टेशनची हद्द व इतर माहिती नमूद केलेली नाही तसेच रिपोर्टसुद्धा दाखल नाही. तक्रारकर्त्याने विमा करार असत्य माहितीच्या आधारावर केला असल्याने तो देय नाही असे दाखल दस्तावेजावरून सिद्ध होते. अर्जदाराचा विमा दावा व प्रस्तुत तक्रार फेटाळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. सबब, विमा करारातील अटी व शर्तीप्रमाणे अर्जदाराच्या या कृतीने विमा करार मोडीत निघाला असुन सदर अर्जदाराचा विमा दावा रद्द करण्यास पात्र आहे, हि बाब गैरअर्जदार सिध्द करतात. सबब,मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र.२३४/२०१५ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाही.
३. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)