निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश 1. सा.वाले की विमा कंपनी आहे. व तक्रारदारांनी सा.वाले याचे सोबत त्यांचे घरगुती साहित्य, सोन्या चांदीचे अलंकार, मौल्यवान वस्तु इ.विमा उतरविण्याचा करार केला होता. तक्रारदार यांचे बँक ऑफ बडोदा, सायन शाखा, येथे लॉकर होते व त्यामध्ये तक्रारदारांनी दागिने ठेवले होते. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदाराची मुलीच्या नातेवाईकांकडे लग्न होते व त्याकामी तक्रारदारांचे मुलीला अलंकाराची गरज होती. तक्रारदारांनी दिनांक 22.1.2008 रोजी बँक ऑफ बडोदाचे लॉकरमधुन दागिने काढले व ते एका हॅन्डबॅगमध्ये ठेवून ते टॅक्सीने आपले मुलीकडे जात होते. वाटेमध्ये तक्रारदारांना जोराई लगवी होऊ लागली व तक्रारदारांनी टॅक्सीवाले यांना विनंती करुन न.ची केळकर रोड, दादर येथील सुलभ सौचालयासमोर टॅक्सी थांबविली. तक्रारदारांनी दागिन्याची पिशवी टॅक्सीमध्ये ठेवली व ते सौचालयात गेले परंतु दरम्यान टॅक्सीवाला दागिन्याचे पिशवीसह पसार झाला होता. तक्रारदारांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनकडे पोलीस तक्रार दिली. तथापी टॅक्सीचा नंबर नोंदविलेला नसल्याने तपासाचे दरम्यान फारसी प्रगती होऊ शकली नाही. 3. तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनीकडे विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईची मागणी केली. तथापी विमा कंपनीने तक्रारदारांचा निष्काळजीपणा होता असे उत्तर देऊन तक्रारदारांना नुकसान भरपाई दिण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले विमा कंपनी यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम रु.1,60,000/- वसुल होणेकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. 4. सा.वाले यांनी आपली कैफियत दाखल केली व त्यामध्ये विमा करारातील शर्ती व अटींचा उल्लेख करुन असा पवित्रा घेतला की, तक्रारदार यांचा निष्काळजीपणा असल्याने विमा कराराचे शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. 5. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले व असे कथन केले की, दागिन्याचे पिशवीला घाण लागू नये या उद्देशाने त्यांनी सौचालयामध्ये दागिन्याची पिशवी नेली नव्हती व त्यामध्ये तक्रारदारांचा निष्काळजीपणा नव्हता. 6. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. सा.वाले यांनी विमा कराराची प्रत दाखल केली. त्यावरुन तक्रार निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देऊन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. प्रस्तुतचे प्रकरणात घडलेल्या घटनाक्रमाबद्दल फारसा वाद नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफियतीसोबत सा.वाले यांनी नियुक्त केलेले विमा कंपनीचे तपासणी अधिकारी यांच्या अहवालाची प्रत हजर केली आहे. त्यावरुन असे दिसते की, तक्रारदारांनी दि.12.1.2008 रोजी दुपारी 11.45 वाजता लॉकर उघडले होते ही बाब लॉकर रजिस्ट्रर नोंदणीवरुन सिध्द झाली होती. विमा निरीक्षक यांनी सुलभ सौचालयाचे कामगार यांचेकडे चौकशी केली व त्या कामगारांनी देखील तक्रारदारांनी तक्रारीत वर्णय केल्याप्रमाणे घटना घडली होती असे विमा निरीक्षकांना सांगीतले होते. तक्रारदारांनी या घटनेच्या संदर्भात शिवाजी पार्क पोलीस स्टेशन येथे दि.12.1.2008 रोजी दिलेल्या पोलीस तक्रारीची नक्कल हजर केलेली आहे. त्यातील कथन देखील तकारदारांच्या कथनास पुष्टी देते. 8. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादात असे कथन केले की, तक्रारदारांचा निष्काळजीपणा असल्याने तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. सा.वाले यांनी त्यांची नुकसान भरपाई नाकारण्याचे पत्र दि.7.3.2008 यामध्ये विमा निरीक्षकांनी नोंदविलेला घटनाक्रमाचा उल्लेख केला व घटनेमध्ये तक्रारदारांचा निष्काळजीपणा असल्याने तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असे कथन केले. 9. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादात विमा कराराचे सर्वसाधारण अटी व शर्ती यामधील कलम 1 उधृत केले. व त्यामध्ये असे ठरले होते की, तक्रारदारांनी विमा काढलेल्या वस्तुंच्या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी व त्या वस्तु सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात व जतन कराव्यात. विमा कराराचे कलम 3 मधील अलंकाराचे संदर्भात जो भाग आहे त्यातील उप कलम 7 नुसार विमा काढलेल्या वस्तु जर वाहनामधून चोरीस गेल्यास तर ती बाब विमा करारातुन वगळण्यात आली होती. त्यास अपवाद फक्त त्या वाहनाचे दारे खिडक्या व्यवस्थित बंद केल्या असतील तरच होतात. या तरतुदीवरुन असे दिसते की, तक्रारदारांनी विमा काढलेल्या वस्तुंची योग्य काळजी घ्यावयाची होती व त्या वस्तु सुरक्षित ठिकाणी ठेवावयास पाहिजे होत्या व प्रवासाचे दरम्यान देखील त्या वस्तुंची/दागिन्यांची सुरक्षिततेच्या संदर्भात आवश्यक ती काळजी घ्यावयास हवी होती. 10. तक्रारदाराचे तक्रारीतील व शपथपत्रातील कथनावरुन असे दिसते की, तक्रारदार यांनी बँक ऑफ बडोदा मधील लॉकरमधुन दागिने काढल्यानंतर ते दागिने एका पाऊच/पिशवीत ठेवले. व त्यानंतर टॅक्सीत बसून ते मुलीकडे निघाले. तक्रारदारांना तीव्र लधूशंकेची जाणीव झाल्याने तक्रारदारांनी टॅक्सी सौचालयासमोर थांबविण्याची विनंती केली. तथापी टॅक्सीमधून उतरताना तक्रारदारांनी दागिन्याची पीशवी टॅक्सीतच सोडून दिली व ते सौचालयास गेले. या संबंधात तक्रारदारांचा खुलासा असा आहे की, दागिन्याचे पिशवीस लांब बंद नव्हता त्यामुळे ही पिशवी खांदयास अडकविता येत नव्हती. तसेच तक्रारदारांना अशी शंका आली की, सौचालयात फर्शीवर पिशवी ठेवल्यास त्यास ओल किंवा घाण लागेल व पिशवी खराब होईल. तक्रारदारांचा वरील स्वरुपाचा खुलासा हा सर्वसामान्य व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची वर्तणूक करेल या बाबीवर पडताळून पहावी लागेल. कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती दागिन्याचे बॅगेस घाण लागेल किंवा ती ओली होईल या भितीपोटी दागिन्याची पिशवी टॅक्सीमध्ये सोडून सौचालयात जाणार नाही. पिशवीची किंमत फारतर रु.100/-असेल परंतु त्यामध्ये एक लाखाचेवर किंमतीचे दागिने होते. त्यामुळे पिशवीपेक्षा दागिन्याचे सुरक्षिततेला महत्व देणे हे तक्रारदारांकडून अपेक्षित होते. तक्रारदार यांनी टॅक्सीमध्ये पिशवी ठेवून सौचालयाकडे जाताना टॅक्सीचा नंबर देखील नोंदवून घेतला नाही किंवा टॅक्सीड्रायव्हरचे नांव देखील लिहून घेतले नाही. साहाजिकच त्यामुळे पोलीस तपासामध्ये फारशी प्रगती होऊ शकली नाही. वरील सर्व परिस्थितीत घटना जरी दुदैवी असली व तक्रारदाराबद्दल आम्हाला सहानुभूती असलीतरी करारातील अटी व शर्ती प्रमाणे तक्रारदारांचे प्रस्तुतचे घटनेतील वर्तन निष्काळजीपणाचे होते असे दिसून येते. विमा करार हा दोन पक्षकारांतील करार असल्याने त्यातील शर्ती व अटी पक्षकारांवर बंधनकारक असतात. व त्यामध्ये फेरबदल करण्याचा किंवा नविन शर्ती अटी घुसविण्याचा न्यायालयास किंवा मंचास अधिकार नसतो. प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदारांचे वर्तन निर्दोष नसल्याने व त्यांचा निष्काळजीपणा निसत असल्याने सा.वाले विमा कंपनी यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली असा निष्कर्ष काढणे शक्य होत नाही. 11. वरील विवेचनावरुन पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 423/2008 रद्दबातल करण्यात येते. 2. खर्चाबद्दल काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |