तक्रारदार यांचे वकील ः- श्री. आनंद वराडकर.
आदेश - मा. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
तक्रार दाखलकामी आदेश
1. तक्रारदार यांचे वकील श्री. आनंद वराडकर यांना तक्रार दाखल कामी ऐकण्यात आले.
2. तक्रार व त्यासोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली.
3. सदरहू तक्रारीमधील वाहन हे कंपनीच्या नावे आहे. कंपनीच्या डॉयरेक्टरपैकी एकानी दि. 24/05/2015 ला आपल्या दोन मित्रांसोबत गाडीचा वापर केला. एका ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर तिघेही दुस-या ठिकाणी गेले. परंतू तिथे यांच्या एका मित्राला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. तेव्हा तक्रारदार यांनी गाडीची चावी त्या मित्रास दिली व त्याला वाहनामध्ये थांबण्यास सांगीतले व दोघे आंतमध्ये गेले. काही वेळानी तक्रारदार बाहेर आले असतांना त्यांना वाहन व आपले दोन मित्र दिसले नाही. चौकशी केली असता ते वाहन दोन मुलानी नेल्याचे समजले. तक्रारदारांनी दुस-या दिवशी गाडीबाबत चोरीचा रिपोर्ट दिला. सदर वाहन त्यांचे मित्र त्याच्या घराकडे नेत असतांना पहाटेच्या सुमारास वाहनास अपघात झाला व त्या मित्रांनी ते वाहन तक्रारदार यांच्या घराच्या परिसरात नेऊन उभे केले. तक्रारदार यांच्या वाहनाविरूध्द दुस-या पोलीसस्टेशनमध्ये, तक्रारदारानी रिपोर्ट दाखल करण्यापूर्वीच, वाहनाबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तक्रारदारानी वाहनात झालेल्या नुकसानीकरीता दावा केला असता, सामनेवाले विमा कंपनीने तो नामंजूर केला. सबब ही तक्रार दाखल करण्यात आली.
4. उपरोक्त बाबीवरून हे स्पष्ट होते की, तक्रारदारानी आपले वाहन आपल्या मित्राच्या ताब्यात दिले त्यांनी मद्यपान केले होते. चोरीचा रिपोर्ट 24 तासापेक्षा जास्त विलंबाने देण्यात आला. तक्रारदारानी वाहन आपल्या मित्राच्या ताब्यात दिले असतांना त्यांच्याकडे चौकशी न करता प्रथम खबरी रिेपोर्ट देणे आश्चर्याचे वाटते. विशेष करून जेव्हा हया वाहनाविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. सामनेवाले यांच्या अहवालाप्रमाणे सदर गाडी तक्रारदार यांच्या परिसरात पार्कींग करण्यात आली होती व त्यानंतर तक्रारदारानी चोरीचा रिपोर्ट दाखल केला.
तक्रारदारानी आपल्या मित्रांकडे चौकशी न करता रिपोर्ट दाखल केल्यामूळे रिपोर्ट बाबत शंका निर्माण होते. वाहनाचे नुकसान चालक मद्यपान करून चालवित असल्यामूळे ते विमा कराराच्या अटींचा भंग ठरते व त्यामुळे सुध्दा तक्रारदार यांनी केलेल्या दाव्यास पात्र ठरत नाही. सामनेवाले यांचे दि. 02/02/2016 च्या पत्रातील मजकुर हा पेालीसांनी नोंदविलेल्या बयानाच्या आधारावर आहे.
5. तक्रारदारानी आपल्या वाहनाकरीता सामनेवाले यांचेकडून पॉलीसी घेतली होती व यामध्ये वाहनाकरीता रू. 31,50,000/-,चा विमा घेण्यात आला होता. ही रक्कम या मंचाच्या पिक्युनरी अधिकार क्षेत्राबाहेरील आहे. सबब, ग्रा.सं.कायदयाच्या कलम 11 प्रमाणे या मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. याकरीता आम्ही मा. राष्ट्रीय आयोगानी प्रथम अपील क्र 1194/2016 संतोष आर्या विरूध्द मे. इमार एम.जी.एफ लॅण्ड लि. निकाल तारीख 07/10/2016 चा आधार घेत आहोत.
5. उपरोक्त परिस्थितीमध्ये आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
- तक्रार क्र. 548/2016 ग्रा.सं.कायदा कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निःशुल्क पाठविण्यात याव्या.
- अतिरीक्त संच तक्रारदारांना परत करण्यात यावे.
npk/-