तक्रारदार - वकील श्री.आर.सी.दुबे
सामनेवाले - वकील श्री.निखील मेहता
आदेश - मा. श्री. एम.वाय.मानकर, अध्यक्ष, ठिकाणः बांद्रा (पू.)
निकालपत्र
(दिनांक 12/04/2016 रोजी घोषित)
तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनीकडून त्यांच्या इमारती करिता, कंपाऊडवॉलसह विमा घेतला होता व विमा पॉलीसी लागू असतांना दि.06.08.2008 ला जोरदार हवा व पावसामुळे, पाणी तुंबल्यामूळे त्यांच्या कंपाऊडवॉलचा काही भाग कोसळला. सामनेवाले यांच्याकडे मोबदल्या करिता दावा केला असता, तक्रारदार संस्थेला नंतर समजले की, तो नेमलेल्या सर्व्हेयरच्या अहवालाप्रमाणे फेटाळण्यात आला. सामनेवाले यांनी नोटीस प्राप्त झाल्यानंतर, मंचात हजर झाले व आपल्या भुमिकेवर ठाम राहीले. तक्रारदारानी तक्रारी सोबत काही कागदपत्रे दाखल केली.
2. तक्रारदाराच्या म्हणण्यानूसार त्यांची संस्था ही नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहे व त्यांनी सामनेवालेकडून स्टँण्डर्ड फायर स्पेशल पेरील्स (मटेरीयल डॅमेज) नं.11245830 दि.31.01.2008 ची घेतली होती व ती दि.02.02.2009 पर्यंत लागू होती. विमा पॉलीसी अंतर्गत संस्थेच्या इमारतीचे कंपाऊडवॉल सुध्दा अंर्तभूत होती. दि.06.08.2008 ला जोरदार पावसामुळे व हवेमूळे पाणी तुबले व उत्तर पश्चिम दिशेला असलेली कंपाऊंड भिंत कोसळली. तक्रारदार संस्थेने दि.06.08.2008 ला सामनेवाले यांना कोसळलेल्या भिंतीबाबत सुचना दिली. जवळ-पास एक आठवडयानंतर सामनेवाले यांनी नेमलेल्या सर्व्हेयरने घटनास्थळी भेट दिली. तक्रारदार संस्थेने सामनेवाले यांना माहे सप्टेंबर,2008 मध्ये स्मरणपत्र दिले व त्यांना प्राप्त कोटेशनची प्रत सुध्दा सादर केली. तक्रारदार संस्थेने वारंवार पत्र देऊन सुध्दा सामनेवाले यांनी त्यांच्या दाव्याचा निकाल लावला नाही. तक्रारदार संस्थेने दि.04.02.2009 ला विमा ओम्बडसमनकडे याबाबत पत्र व्यवहार केला. तसेच दि.10.07.2009 ला आय.आर.डी.अे. ला पत्र पाठविले. आय.आर.डी.अे.नी त्यांच्या दि.18.12.2009 च्या पत्राप्रमाणे तक्रारदार संस्थेला कळविले की, सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेचा दावा ना-कबूल केला. तक्रारदार संस्थेने सामनेवाले यांना वकीला मार्फत नोटीस पाठवून रु.1,53,000/- ची मागणी केली. तक्रारदार संस्थेने पुन्हा कोटेशन्स प्राप्त करुन, त्यांना मे.मोहीत एन्टरप्राईजेस कडून रु.1,03,200/- चे कोटेशन प्राप्त झाले. त्या प्रमाणे मे.मोहीत एन्टरप्राईजेसने कंपाऊंड भिंतीचे 50 फुटाचे काम पुर्ण केले व तक्रारदार संस्थेनी रु.1,00,000/- दि.17.07.2010 ला व दि.28.07.2010 ला अदा केले. तक्रारदार संस्थेने ही तक्रार दाखल करुन रु.1,00,000/-,18 टक्के व्याजासह, सेवेमध्ये कुचराई केल्यामुळे रु.25,000/- 18 टक्के व्याजासह व मानसिक त्रासासाठी रु.25,000/- व तक्रारीचा खर्च अश्या मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार संस्था ही ग्राहक या व्याख्येमध्ये संम्मेलीत होत नाही त्यामुळे ही तक्रार या मंचात चालू शकत नाही. सामनेवाले यांनी तक्रारीच्या अटी व शर्ती प्रमाणे तक्रारदार संस्थेचा दावा फेटाळला आहे. तक्रारदार संस्थेची कंपाऊंडवॉल ही 35 वर्ष जुनी होती व बांधकाम कमकुवत झाल्यामुळे ती कोसळली. तक्रारदार यांची भिंत पाणी साचल्यामुळे किंवा पुरामूळे पडली नाही, सर्व्हेयरचा रिपोर्ट तक्रारदार संस्थेला देणे बंधनकारक नाही. सामनेवाले यांना तक्रारदार संस्थेकडून स्मरणपत्रे प्राप्त झाली नाहीत. भिंत पडल्याचे कारण पॉलीसीच्या अटी व शर्ती प्रमाणे न घडल्यामुळे तक्रारदार संस्थेचा दावा योग्यप्रमाणे फेटाळण्यात आला. सामनेवाले यांनी सर्व्हेयरचा रिपोर्ट कोसळलेल्या भिंतीचे छायाचित्र व इतर कागदपत्रासह दाखल केला.
4. उभयपक्षांनी पुराव्याचे शपथपत्र लेखी युक्तीवाद व काही कागदपत्र दाखल केली. तक्रारदार तर्फे वकील श्री.आर.सी.दुबे याचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. सामनेवाले गैरहजर राहील्यामुळे त्यांच्या प्लीडींग्स व लेखी युक्तीवाद विचारात घेऊन, अंतिम निर्णय जाहीर करण्यात येत आहे.
5. उपरोक्त बाबी विचारात घेऊन, खालील बाबी हया मान्य आहेत असे म्हणता येईल.
तक्रारदार संस्थेने सामनेवालेकडून इमारती करिता विमा पॉलीसी घेतली होती. ती घटनेच्या दिवशी लागू होती. दि.06.08.2008 ला पावसामुळे तक्रारदार संस्थेच्या भिंतीचा काही भाग कोसळला. सामनेवाले यांनी सर्व्हेयरची नेमणूक केली. सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेचा दावा पॉलीसीमधील अटी व शर्ती प्रमाणे नसल्यामुळे तो फेटाळण्यात आला. सामनेवाले यांनी सर्व्हेयरच्या रिपोर्टची प्रत तक्रारदार संस्थेला पाठविली नाही.
6. ही तक्रार निकाली काढण्याकरिता खालील मुद्दे महत्वाचे ठरतात.
अ.) तक्रारदार संस्थेच्या कंपाऊंडवॉलचा काही भाग कोसळल्याचे काय कारण आहे?
अ.1) तक्रारीमध्ये जोरदार हवा व पावसामुळे व पाणी साचल्यामुळे कंपाऊंडवॉलचा काही भाग कोसळला ही बाब स्पष्टपपणे नमुद आहे. तक्रारदार संस्थेतर्फे घटनेच्या दुस-या दिवशी सामनेवाले यांना सुचीत करण्यात आले की, जोरदार हवा व पावसामुळे भिंतीचा काही भाग कोसळला. तक्रारदारांनी ही बाब शपथेवर सुध्दा नमुद केली. सामनेवाले यांनी नेमलेल्या सर्व्हेयरने आपल्या अहवालातील परिच्छेद क्र.11 मध्ये नमुद केले की, सर्व्हे करतांना, चौकशी केली असता, जोरदार पावसामुळे कंपाऊंडवॉल पडल्याचे समजले. सबब, या पुराव्यावरुन निश्चितपणे असे म्हणता येईल की, जोरदार हवा व पावसामुळे कंपाऊंडवॉलचा काही भाग कोसळला आहे.
ब.) तक्रारदार संस्थेच्या कंपाऊंडवॉलचा काही भाग पडला त्या करिता ते मोबदला मिळण्यास पात्र आहेत का?
ब.1) सामनेवाले यांनी श्री.नविन जैन यांची सर्व्हेयर म्हणून नेमणूक केली होती. श्री.नविन जैन यांच्या अहवाला प्रमाणे इमारतीच्या आवारात पावसाचे पाणी साचले नव्हते व सदरहू भिंत 35 वर्षे जुनी होती व भिंतींचे बांधकाम कमकुवत झाल्यामुळे ती कोसळली. कंपाऊंडवॉल पुरामूळे किंवा पाणी साचल्यामुळे न पडल्यामुळे भिंत पडण्याची बाब पॉलीसीमधील अटी व शर्ती अंर्तगत येत नसल्यामुळे तक्रारदार संस्थेचा दावा मंजूर करता येत नाही.
ब.2) अशा स्थितीमध्ये पॉलीसीच्या अटी व शर्ती बघणे महत्वाचे ठरते. आमच्या मते या प्रकरणात अट क्र.VI महत्वाची असल्यामुळे आम्ही ती खाली नमुद करित आहोत.
VI. Storm, Cyclone, Typhoon, Tempest, Hurricane, Tornado, Flood And Inundation
Loss destruction or damage directly caused by Storm, Cyclone, Typhoon, Tempest, Hurricane, Tornado, Flood And Inundation excluding those resulting from earthquake, Volcanic eruption, or other convulsions of nature(Wherever earthquake cover is given as an “add on cover” all the words “excluding those resulting from earthquake volcanic eruption or other convulsions of nature” shall stand deleted).
उपरोक्त क्लॉज मध्ये फ्लड, इनअन्डेशनच्या व्यतिरीक्त “स्टॉर्म” हा शब्द आहे तेव्हा स्टॉर्मचा अर्थ पाहणे आवश्यक ठरते. द कन्साइज ऑक्सफर्ड डीक्शनरी एडीशन-8 मध्ये स्टॉर्मचा अर्थ खालील प्रमाणे दिलेला आहे.
A violent disturbance of the atmosphere with strong winds and usu.with thunder and rain or snow etc.
तक्रारदार यांनी त्यांच्या लेखी कैफीयती मध्ये व पुराव्यामध्ये हेवी रेन्स अँड गस्टी विंडस असे वर्णन केलेले आहे. त्यामुळे सर्व साधारणपणे विचार केल्यास असे म्हणता येईल की, तक्रारदार संस्थेची भिंत ही स्टॉर्ममुळे पडली व ही बाब पॉलीसीच्या अटी व शर्ती प्रमाणे आहे.
ब.3) दुसरे महत्वाचे असे की, सामनेवाले यांनी पडलेल्या भिंतीचे छायाचित्र लेखी कैफीयती सोबत दाखल केलेले आहे. ते पाहता, असे लक्षात येते की, त्या ठिकाणी बरेचशे गवत व झाडे-झुडपी दिसून येतात. जोरदार पाऊस झाल्यास पाणी तुंबने/साचणे ही एक साधारण व सहज प्रक्रीया असते. त्यामुळे त्या ठिकाणी अजिबात पाणी साचले नाही हे सामनेवाले कशाच्या आधारावर नमुद करीत आहेत हे स्पष्ट होत नाही. सर्व्हेच्या दिवशी पाणी साचलेले राहण्याची आवश्यकता नाही. सबब, आम्ही तक्रारदार संस्थेची भिंत पडण्याची बाब ही पॉलीसीशी संबंधीत असलेल्या अटी व शर्ती प्रमाणे आहे व त्यामुळे तक्रारदार यांना त्याबाबत मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे. सबब, आम्ही या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देत आहोत.
7. सामनेवाले यांचेनुसार त्यांनी दावा नाकारल्या बाबत त्याचे दि.16.09.2009 च्या पत्राप्रमाणे तक्रारदाराला कळविल्याचे नमुद केले आहे. परंतु हे पत्र तक्रारदार यांना प्राप्त झाल्याबाबत कोणताही पुरावा अभिलेखावर सादर नाही. तक्रारदार यांनी हे पत्र त्यांना प्राप्त झाले नाही असे नमुद केले आहे. त्यामुळे याबाबीस फार महत्व प्राप्त होते. तक्रारदार संस्थेने माहे सप्टेंबर,2009 नंतर सुध्दा दाव्याच्या सद्यस्थिती बाबत माहिती मिळविण्यासाठी पत्र व्यवहार केल्याचे दिसून येते. सदरहू तक्रारीतील घटना दि.06.08.2008 ची आहे. सर्व्हेयरने त्याबाबत त्याचा अहवाल माहे सप्टेंबर,2008 मध्ये सामनेवाले यांच्याकडे सादर केला व सामनेवाले यांनी माहे सप्टेंबर,2009 मध्ये तक्रारदार संस्थेला कळविल्याचे नमुद केले आहे. सामनेवाले यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जवळ-पास एकवर्षाने तक्रारदार यांना दाव्याबद्दल कळविले. सामनेवाले यांना या कार्याकरिता जवळ-पास एकवर्षाचा कालावधी लागला. ही बाब नक्कीच सेवेमध्ये कसूर म्हणता येईल.
8. तक्रारदार यांनी भिंतीला झालेल्या नुकसानी बाबत रु.1,00,000/- मागणी केली आहे व त्या करिता तक्रारदारांनी कोटेशन व रु.1,00,000/- अदा केल्याबाबत पावती अभिलेखावर दाखल केली आहे. त्याबाबत हरकत घेण्यास अभिलेखावर काही दिसून येत नाही. आमच्या मते तक्रारदार संस्थेला हा मोबदला मागण्याचा अधिकार आहे व ते त्या करिता पात्र आहेत.
9. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीच्या परिच्छेद क्र.2 मध्ये सामनेवाले संस्था ही ग्राहक नाही असे नमुद केले आहे. परंतु ते ग्राहक का नाहीत याचे काहीही कारण दिलेले नाही. सामनेवाले हे विमा संबंधीत सेवा देणारी कंपनी आहे व तक्रारदारांनी त्यांच्याकडून विमा पॉलीसी घेतली होती. ही विमा पॉलीसी घेण्यामध्ये आम्हाल कोणताही वाणिज्य हेतू दिसून येत नाही. ही विमा पॉलीसी तक्रारदार संस्थेने त्यांच्या इमारती करिता घेतली होती व सामनेवाले हे त्यांना विमा संबंधी सेवा देणारी संस्था ठरते. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा,1986 प्रमाणे ग्राहक ठरतात.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन आम्ही खालील आदेश पारित करीत आहोत.
11. या मंचाचा कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे ही तक्रार यापुर्वी निकालात काढता येऊ शकली नाही. सबब खालीलः-
आदेश
1. तक्रार क्रमांक 464/2010 बहुतांशी मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात कसूर केला असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेला भिंत पडल्याबाबत रु.1,00,000/-(रुपये एक लाख) मोबदला व त्यावर दि.01.10.2010 (तक्रार दाखल दिनांक) पासून 9 टक्के व्याजासह दि.31.05.2016 ला किंवा त्यापुर्वी अदा करावे, तसे न केल्यास त्या रक्कमेवर दि.01.06.2016 पासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज लागू राहील.
4. तक्रारीचा खर्च म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु.10,000(दहा हजार) दि.31.05.2016 पुर्वी अदा करावे, तसे न केल्यास त्या रक्कमेवर दि.01.06.2016 पासून 10 टक्के व्याज लागू राहील.
5 तक्रारदार यांच्या मंजूर न झालेल्या मागण्या फेटाळण्यात येतात.
6. आदेशाच्या प्रती उभयतांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
7. अतिरीक्त संच असल्यास, तक्रारदाराना परत करावे.
db/-