निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
आदेश
1. तक्रारदार ही वाहनांना लागणारे इंधन विक्री करणारी कंपनी असून ती इंडीयन ऑईल कार्पोरेशनची एजंट आहे. तक्रारदारांचे मुख्य कार्यालय खार (पश्चिम) मुंबई येथे असून तक्रारदारांचे विक्री केंद्र मे.लक्ष्मी पेट्रोलियम या नांवाने धिलाड,सारीगाम रस्ता, गुजरात येथे आहे. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी असून सा.वाले क्र.2 त्यांचे एजंट आहेत. तक्रारदारांनी त्यांचे गुजरातमधील विक्री केंद्राचे संदर्भात सा.वाले यांचेकडून विमा पॉलीसी घेतली होती व ती ऑगस्ट,2006 मध्ये वैध होती. पॉलीसीची पूर्ण रक्कम रु.58 लाख होती.
2. तक्रारदाराचे तक्रारीतील कथनाप्रमाणे दि.6 ऑगस्ट, 2006 ते 8 ऑगस्ट, 2006 दरम्यान गुजरातमध्ये अतिवृष्टी झाली व तक्रारदारांचे विक्री केंद्रावर जमीनीखाली असलेल्या तेलाच्या टाक्यामध्ये पाणी गळती झाली व तेल टाक्यामधील तेलात पाणी मिसळले. परीणामतः तिनही तेल टाक्यातले तेल वाया गेले व तक्रारदारांचे नुकसान झाले. या व्यतिरिक्त तक्रारदारांनी त्यांचे ग्राहकांना भेसळीचे तेल विक्री केले होते त्याचेही पैसे परत द्यावे लागले. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई मागीतली. सा.वाले यांनी विमा निरीक्षक, श्री.परीमल शहा आणि कंपनी (सा.वाले क्र.2 ) यांची नियुक्ती केली. विमा निरीक्षकांनी तक्रारदारांचे विक्री केंद्रावरील जमीनीखालील तिन्ही टाक्यांचे निरीक्षण केले व आपला अहवाल सा.वाले कंपनी क्र.1 कडे दिला. तथापी सा.वाले क्र.1 कंपनी यांनी त्यांचे पत्र दिनांक 16 डिसेंबर, 2006 अन्वये तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा करण्यास नकार दिला. व त्याकामी असे कारण दर्शविले की, अतिवृष्टीमुळे जर टाक्यामध्ये पाण्याची गळती झाली तर ती बाब विमा करारात अंतर्भुत नव्हती. सबब सा.वाले क्र.1 नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही असे कळविले. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईपोटी दोन तेलाच्या टाक्याचे तेलाची किंमत तसेच ग्राहकांना परत केलेले पैसे असे एकूण रु.5,79,000/- व नुकसान भरपाई रक्कम रु.2 लाख अशी दाद मागीतली.
3. सा.वाले क्र.2 विमा निरीक्षक हजर झाले नाहीत. व त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी आपली कैफियत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, अतिवृष्टीमुळे गळती होऊन टाकीच्या झाकणातून अथवा अन्य मार्गाने पाणी टाकीमध्ये पोहोचले तर होणा-या नुकसानीची जबाबदारी विमा कराराप्रमाणे सा.वाले यांनी नव्हती. सा.वाली यांनी असेही कथन केले की, तेल टाक्यामध्ये पाणी गळती टाळण्याचे दृष्टीने तक्रारदार यांनी कुठलीही काळजी घेतली नाही. याप्रमाणे सा.वाले यांनी नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदाना देण्यास नकार देण्याच्या कृतीचे समर्थन केले.
5. तक्रारदारांनी त्यावर प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले व तक्रारीतील कथनाचा पुर्नउच्चार केला.
6. तक्रारदाराचे वतीने त्यांचे मुखत्यार श्री.लखोटीया यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांचे वतीने त्यांचे अधिकारी श्री.किशोर अग्रवाल यांनी शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी प्रकरणाशी संबंधीत कागदपत्र व पत्र व्यवहाराच्या प्रती हजर केल्या. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रारदार व सा.वाले यांची कथने, त्यांनी दाखल केलेली शपथपत्र व कागदपत्र व लेखी युक्तीवाद याचे वाचन केले. या वरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई देण्यास नकार देऊन सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. रु.3,69,934/- 9 टक्के व्याजासह. |
2 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे त्यांचे गुजरातमधील तेल विक्री केंद्रावरील तेल साठयाचे संदर्भात विमा करार केला होता व विमा करार ऑगस्ट, 2006 मध्ये वैध होता ही बाब मान्य आहे. तेल टाक्यामध्ये पाणी गळती झाल्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रारदारांचे विनंतीप्रमाणे श्री.मरीमल शहा आणि कंपनी, मुंबई यांची विमा निरीक्षक म्हणून नेमणूक केली होती ही बाब देखील मान्य आहे. तक्रारदारांनी विमा निरीक्षकाकडे आवश्यक ती कागदपत्र हजर केली. व आवश्यक ते सहकार्य केले. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादासोबत सचिकेचे पृष्ठ क्र.170 वर विमा निरीक्षक यांचा दि.23 नोव्हेबर, 2006 चा अहवाल दाखल केला आहे. प्रस्तुत मंचाने त्या अहवालाचे सखोल वाचन केलेले आहे. त्यावरील अहवालावरुन असे दिसते की, तक्रारदरांचे सारीगाम, गुजरात येथील तेल विक्री केंद्रावर जमीनीखाली तिन मोठया टाक्या होत्या. ज्यामध्ये तेल साठविण्यात येत होते. त्यापैकी टाकी क्र.1 व टाकी क्र.3 यामध्ये अतिवृष्टीमुळे 6 ते 8 ऑगस्टचे दरम्यान जमीनीखालील तेलाच्या टाक्यामध्ये गळती होऊन पाणी झिरपले व त्यामुळे टाक्यामधील तेलामध्ये पावसाचे पाणी मिसळले व दोन्ही टाक्यातील संपूर्ण तेल दुषीत झाले. टाकी क्रमांक 1 मध्ये 6,649 लिटर तर टाकी क्र.5,263 लिटर तेल साठविलेले होते. टाकी क्र.2 मध्ये गळती झालेली नव्हती. जवळपास किंवा तेल विक्री केंद्राचे जवळपास पाणी व तेल वेगळी करणारी यंत्रणा उपलब्ध नव्हती. विमा निरीक्षकांनी दोन्ही टाक्यामध्ये टाकीच्या झाकणातुन किंवा अन्य मार्गाने पावसाचे पाणी झिरपले व दोन्ही टाक्यातील संपूर्ण तेल साठा दुषीत झाला होता ही बाब मान्य केली. तथापी विमा निरीक्षकांनी असे मत नोंदविले की, तेल व पाणी वेगवेगळे करण्याचे दृष्टीने तक्रारदारांनी काही कार्यवाही केली नाही. तथापी तशी यंत्रणा अस्तित्वात होती, उपलब्ध होती असा पुरावा सा.वाले यांनी दिला नाही. तसेच टाकीची झाकणे उघडी होती किंवा काही अन्य निष्काळजीपणा झाला असे दिसून येत नाही. एकूणच विमा निरीक्षकांचे अहवालावरुन असे दिसून येते की, 6 ते 8 ऑगस्टचे दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीनीमधुन किंवा अन्य मार्गाने पावसाचे पाणी टाकी क्र. 1 व 3 मध्ये झिरपले व संपूर्ण तेल दुषीत झाले.
9. विमा निरीक्षकांनी आपल्या अहवालात हे मान्य केले आहे की, पुराने किंवा पाणी घुसल्याने नुकसान झाले तर नुकसान भरपाईची तरतुद विमा करारात होती. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, पाणी गळतीमुळे तेल टाक्यामध्ये पाणी गेले व पुरामुळे नाही. सबब विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईची जबाबदारी नाही.
10. विमा कराराची प्रत तक्रारीचे सोबत निशाणी अ वर त्यामध्ये आग किंवा इतर कारणाने नुकसान झाल्यास नुकसान भरपाई रु.14 लाख देय होती. विमा निरीक्षकाचे अहवालाप्रमाणे पुर किंवा पुराचे पाण्यामुळे पाणी घुसल्यास नुकसान भरपाई देय होती. विमा निरीक्षकाच्या अहवालाचे पृष्ठ क्र.5 प्रमाणे विमा करारात flood/Inundetion या बाबीकरीता नुकसान भरपाई देय होती. येथे इंग्रजी शब्द Inundetion या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीप्रमाणे अर्थ एखाद्या जमीनीचा भाग पाण्याने व्यापने किंवा वेढला जाणे असा दिला आहे. त्याच प्रमाणे श्री. वसंत भणगे यांच्या इंग्रजी मराठी शब्दकोषात Inundetion या शब्दाचा अर्थ पूर, जलमयता असा दिला आहे. थोडक्यात पावसाचे पाण्याने पाणी साठल्यास वरील परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रस्तुतचे प्रकरणात पुर परिस्थिती नव्हती तथापी जलवृष्टीमुळे तेलाच्या टाक्यात पाणी झिरपले व त्यामुळे वरील परिस्थिती निर्माण झाली. तक्रारदाराचे विक्री केंद्रावर पुराचे पाणी घुसले नव्हते ही बाब मान्य असली तरीही प्रस्तुतचे विमा करारामध्ये नुकसान भरपाई ही "आग किंवा इतर नुकसान" या कारणाने देय होती. तसेच पुर किंवा पावसाचे पाणी घुसल्याने ती देय होती. विमा करारातील तरतुदी त्याचप्रमाणे निरीक्षकांनी नोंदविलेल्या तरतुदी हया मर्यादित अर्थाने नव्हत्या, तर व्यापक अर्थाने पावसाचे पाण्यामुळे होणारे नुकसान त्यात अंतर्भुत होते असे दिसून येते. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी त्यांचे लेखी युक्तीवादासोबत दाखल केलेले न्यायनिर्णय प्रस्तुतचे प्रकरणात लागू होत नाहीत. सबब विमा कराराप्रमाणे व निरीक्षकांनी नोंदविलेल्या मता प्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान विमा करारामध्ये समाविष्ठ होते असा निष्कर्ष काढावा लागतो.
11. विमा निरीक्षकांनी आपल्या अहवालाचे पृष्ठ क्र.4 वर टाकी क्र.1 व टाकी क्र.3 यामध्ये साठविलेल्या तेलाची एकूण मात्रा नोंदविली आहे. त्यावरुन असे दिसते की, टाकी क्र.1 मध्ये 6,649 लिटर डिझेल व टाकी क्र.3 मध्ये 5,263 लिटर डिझेल साठविलेले होते. त्याची किंमत रु.2,46,943/- व 2,67,991/- एकूण 5,14,934/- अशी होती. तक्रारदारानी आपल्या तक्रारीत असे कथन केली की, त्या साठयापैकी काही साठा त्यांनी किरकोळ विक्री केला होता परंतु किरकोळ ग्राहक यांना भेसळीचे तेल विक्री केल्यामुळे त्यांना तेलाची किंमत परत द्यावी लागली. तक्रारदारांचे कथनाप्रमाणे किरकोळ ग्राहकांना तक्रारदारांनी 1,45,000/- रुपये परत केले. तथापी तक्रारदारांनी किरकोळ ग्राहकांना 1,45,000/- रुपये परत केल्याबद्दल कुठलाही पुरावा हजर केला नाही. त्या प्रकारचा पुरावा विमा निरीक्षकाकडे किंवा प्रस्तुत मंचासमक्ष दाखल नाही. सबब तक्रारदारांना तेल विक्रीची रक्कम रु.1,45,000/- ग्राहकांना परत करावी लागली असा निष्कर्ष नोंदविता येत नाही. विमा निरीक्षकांनी एकूण तेलाचे किंमतीतुन 1,45,000/- रुपये कमी केले जी बाब योग्य दिसते. त्यानंतर विमा निरीक्षकांनी नुकसानीची रक्कम रु.369,934/- ती निच्छित केली. तथापी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय विमा कंपनीवर सोपविला.
12. वरील भागात चर्चा केल्याप्रमाणे सा.वाले यांनी पुराचे पाण्याने गळती झाली नाही. यावर बोट ठेवून तकारदारांची मागणी नाकारली परंतु विमा करारातील तरतुदी तसेच विमा निरीखकांनी उल्लेख केलेल्या तरतुदी लक्षात घेता गळतीमुळे होणारी नुकसान भरपाई करारामध्ये अंतर्भुत होती असे दिसून येते. सबब सा.वाले यांनी 16 डिसेंबर, 2006 च्या पत्रान्वये तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. त्यावरुन मुद्दा क्र.1 चे उत्तर तक्रारदाराचे बाजुने द्यावे लागते.
13. तक्रारदारांनी नुकसान भरपाई रक्कम रु.2 लाख मागीतली आहे. तथापी नुकसान भरपाईची रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारांना 9 टक्के व्याजाने द्यावी असा आदेश देणे योग्य राहील असे मंचाचे मत झाले आहे. सदरील 9 टक्के व्याज हे नुकसान भरपाईबद्दल असल्याने वेगळी नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे असे मंचास वाटत नाही. सबब वेगळया नुकसान भरपाईची मागणी फेटाळण्यात येते.
14. वरील चर्चेवरुन व निष्कार्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 473/2007 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान
भरपाईची रक्कम रु.3,69,934/- दिनांक 16 डिसेंबर, 2006 पासून
9 टक्के व्याजाने देय करावी असा आदेश देण्यात येतो.
3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना तक्रारीचे खर्चाबद्दल रु.10,000/-
द्यावेत.
4. सामनेवाले क्र.2 यांचेविरुध्द तक्रार रद्द करण्यात येते.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.