2. गैरअर्जदार ही इंश्युरंस कंपनी असून वाहन व वस्तु करीता विमासेवा पुरवितात. अर्जदाराने दि. 31/01/2017 रोजी गैरअर्जदार सॅमसंग कंपनीचा GS 610 (J7) मॉडेलचा मोबाईल हॅंडसेट ज्याचा IMEI No.352335089085280 आहे, मराठा मंदीर या दुकानातून रु.16,900/- ला विकत घेतला. अर्जदाराने वरील किमतीचे रकमेपैकी डाऊनपेमेंटपोटी रू.4829/- नगदी दिले व उर्वरीत रक्कम रू.12,071/- करिता बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. अर्जदाराने सदर मोबाईलचा गैरअर्जदाराकडे 1 वर्षासाठी विमा उतरविला होता. अर्जदाराने बजाज फायनान्सच्या संपूर्ण कर्जाची परतफेड केली असून त्याबाबत त्यांनी अर्जदारांस नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. अर्जदाराचा सदर मोबाईल दिनांक 9/8/2017 रोजी दुपारी 5ते 5.30 च्या सुमारास बाजार परिसरातून चोरी गेला. अर्जदाराने मोबाईल शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु तो न मिळाल्यामुळे त्याच दिवशी शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. पोलीसांनी देखील मोबाईलचा शोध घेतला परंतु तो न मिळाल्यामुळे दिनांक 18/8/2017 रोजी एफआयआर क्र.1218/17 अन्वये भा.द.वी. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदविण्यांत आला. अर्जदाराने घटनेची माहिती व दस्तावेज गैरअर्जदाराला दिल्यावर गैरअर्जदाराने मोबाईलच्या किमतीच्या 20 टक्के रक्कम कपात करून मोबाईलचा विमा लाभ अर्जदाराला मिळणार असे अर्जदारांस सांगीतले. त्यानंतर गैरअर्जदाराने एक महिन्यानंतर पुन्हा अर्जदाराला एफ आय आरची सत्यप्रत व स्टॅम्प प्रतीची मागणी केली व ती अर्जदाराने दिनांक 18/9/2017 रोजी पूर्ण केली. मात्र त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराशी संपर्क करणे सोडले व विचारणा केली असता प्रकरण सेकंड पार्टनरकडे पाठविले आहे असे सांगितले. मात्र गैरअर्जदार हे अर्जदारांस विमा रक्कम देण्यांस टाळाटाळ करीत असून त्यांनी न्युनतापूर्ण सेवा दिली असून ते अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करीत आहेत. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदारांस न्युनतापूर्ण सेवा देवून अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे अर्जदारांस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 50,000/-, मोबाईल इंश्युरंसची रक्कम रू.13,520/-व्याजासकट गैरअर्जदाराकडून मिळावी तसेच तक्रारखर्चापोटी रक्कम रु. 20,000/- आणी नोटीस चार्जेस रू.3000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारांस देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 4. अर्जदाराची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदाराविरुध्द मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार यांनी मंचासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील कथन नाकबुल करुन पुढे नमुद केले कि, अर्जदाराने जाणूनबुजून खोटी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने मुद्दाम खोटया पत्त्यावर गैरअर्जदारांस नोटीस पाठविली व त्यामुळे ती गैरअर्जदारांस मिळाली नाही. त्यानंतर अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केली. दिनांक 31.3.2018 रोजी गैर अर्जदाराने अर्जदाराच्या बँक खात्यात रुपये 12270/- जमा केले व सदर रक्कम अर्जदारास मिळाली. असे असूनही अर्जदाराने सदर खोटी तक्रार दाखल करून सुनावणीदरम्यान दि.13.4.2018 रक्कम न मिळाल्याबद्दल मंचास खोटे सांगितले. अर्जदाराच्या खोट्या तक्रारी मुळे गैर अर्जदाराला मंचासमोर हजर होऊन विनाकारण मामल्याचा खर्च करावा लागला. सबब अर्जदारावर रुपये 15000/- दंड बसवून अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी त्यांनी मंचास विनंती केली. 5. अर्जदाराची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष 1. गैरअर्जदार यांनी विमा कराराप्रमाणे सेवा देण्यांत कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? नाही २. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत ः-
अर्जदाराने दिनांक 31.1 .2017 रोजी तक्रारीत नमूद मोबाईल खरेदी केला व त्यावर गैरअर्जदार यांनी मोबाईल विम्याची सोय अर्जदारास करून दिली. त्यानुसार अर्जदाराने मोबाईलचे डाऊन पेमेंट करून बाकीची रक्कम बजाज फायनान्स करून कर्जरूपाने घेऊन भरली आणि सदर कर्जाची परतफेडही केली ही बाब विवादित नसून त्याबद्दल अर्जदाराने तक्रारी दस्तावेज दाखल केलेले आहेत. अर्जदाराचा मोबाईल दिनांक 9.8.2017 रोजी चोरीला गेल्यावर अर्जदाराने त्याबद्दल FIR देऊन दस्तावेजांसह माहिती गैरअर्जदार यांना पुरविली व विम्याच्या लाभाची मागणी केली. अर्जदाराने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे गैर अर्जदाराने अर्जदाराच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. परंतु गैरअर्जदाराच्या तक्रारीत दाखल उत्तराचे तसेच अर्जदारांनी तक्रारी दाखल केलेल्या निशाणी क्रमांक 15 वरील अर्जदाराच्या बँक स्टेटमेंटचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येत आहे की गैरअर्जदार यांनी दिनांक 31 .3 .2018 रोजीच अर्जदाराच्या मोबाईलच्या विमा लाभाची अटी व शर्ती प्रमाणे रक्कम रुपये 12270/- अर्जदाराच्या खात्यात जमा केली होती व त्याबद्दल अर्जदाराला कल्पना दिली होती. याबद्दल अर्जदाराने दिनांक 15.11.2018 रोजी मंचात दाखल केलेल्या शपथपत्रात उल्लेखही केलेला आहे. सबब मंचाच्या मते अर्जदाराला त्याच्या चोरी गेलेल्या मोबाईलची विमा लाभ रक्कम नियमाप्रमाणे मिळालेली असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदार प्रति कोणतीही दोषपूर्ण सेवा वा अनुचित व्यापार पद्धती चा अवलंब केलेला नाही ही बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्रमांक दोनचे उत्तर नकारार्थी देण्यात येते. मुद्दा क्रमांक 2 बाबत ः- मुद्दा क्र. १ च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतिम आदेश 1. तक्रार क्रमांक 41/2018 खारीज करण्यात येते . 2 उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. 3 उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी . चंद्रपूर दिनांक – 17/01/2019 (श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |