::: आदेश :::
( पारित दिनांक : 29/01/2018 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये तक्रारकर्त्याने
ही तक्रार विरुध्द पक्षाकडून विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली असून, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे -
तक्रारकर्ते यांची तक्रार, दाखल सर्व दस्तऐवज, व तोंडी युक्तिवाद यावरुन, खालीलप्रमाणे निष्कर्ष कारणे देवून पारित केला. कारण सदर प्रकरणात विरुध्द पक्ष यांना सदर प्रकरणाची मंचातर्फे नोटीस प्राप्त होवुनही ते मंचासमोर हजर झाले नाही. सबब तक्रारकर्ते यांच्या अर्जावर मंचाने दिनांक 10/01/2018 रोजी ‘‘ विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986, कलम 28 (अ) नुसार प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. ’’
2. तक्रारकर्त्याजवळ त्याच्या मालकीचे व ताब्यातील चालु स्थितीतील वाहन ट्रक क्र. एम.एच. 37-बी-1825 हे होते. त्याचा विमा विरुध्द पक्षाकडे दिनांक 11/09/2015 रोजी काढला होता. त्या पॉलिसीचा क्र. 94025785 हा असून, ती पॉलिसी दिनांक 11/09/2015 ते 10/09/2016 पर्यंत वैध होती. या पॉलिसीचा हप्ता तक्रारकर्त्याने भरला होता व त्या ट्रकला होणा-या सर्व प्रकारच्या नुकसानाची जबाबदारी पॉलिसीमध्ये अंतर्भूत होती, असे दाखल दस्तांवरुन दिसते. म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
तक्रारकर्ता यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 17/06/2016 च्या संध्याकाळी 5.00 वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर गांव आदलूर शिवारात, कामारेड्डी मंडळ, जि. निजामाबाद (तेलंगना) येथे अपघात घडला. पोलीस स्टेशन, देवाणपल्ली येथे त्याचदिवशी दिनांक 17/06/2016 रोजी अपराध क्र. 99/2016 कलम 337 भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंदविला. ही बाब सदरचे दस्त क्र. डी-7 वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यानंतर सदर ट्रकची दुरुस्ती करण्यासाठी जायका मोटर्स लिमीटेड, अमरावती यांच्याकडे, ते वाहन नेण्यात आले. त्याठिकाणी विरुध्द पक्ष कंपनीचे सर्वेक्षण अधिकारी यांनी प्रत्यक्ष तपासणी केली व तक्रारकर्त्याकडून त्यांच्या सर्वेक्षणाकरिता लागणारे सर्व कागदपत्रे, तक्रारकर्त्याकडून घेवून त्यांचे सर्वेक्षण तयार केले. ट्रक दुरुस्तीसाठी रुपये 1,70,924/- एवढा खर्च आला. हा सर्व खर्च तक्रारकर्त्याने केला व नंतर, सदर रक्कमेची वेळोवेळी विरुध्द पक्षाकडून मागणी केली. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा क्लेम देण्यास टाळाटाळ केली. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला दिनांक 07/10/2016 रोजी (दस्त डी-3) पत्र पाठवून विमा पॉलिसी अंतर्गत मागणी केलेली रक्कम ही तक्रारकर्त्याला देण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजास्तव प्रस्तुत प्रकरण तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाविरुध्द दाखल करणे भाग पडले.
3. यावर विरुध्द पक्षातर्फे कोणतेही नकारार्थी कथन, रेकॉर्डवर ऊपलब्ध नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावरुन असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे ट्रक क्र. एम.एच. 37-बी-1825 चा विमा काढलेला आहे व सदर ट्रकचा अपघात हा पॉलिसी कालावधीत झाला आहे. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला पाठविलेले पत्र (दस्त डी-3) नुसार रेकॉर्डवर कोणताही सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाचे सदर पत्रातील कथन सिध्द होत नाही. दस्त क्र. डी-4, परफॉर्म इन्व्हॉईस व बिलानुसार रक्कम रुपये 95,462/- व दस्त क्र. डी-5 – जायका मोटर्स लिमीटेड नुसार रुपये 75,462/- असे एकूण रुपये 1,70,924/- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडून मिळण्यास पात्र आहे, असे दाखल कागदपत्रांवरुन दिसते. विरुध्द पक्षाने सदर ट्रकच्या विमा दाव्यापोटी तक्रारकर्त्यास रुपये 1,70,924/- सव्याज, ईतर नुकसान भरपाई- बद्दल व प्रकरण खर्च रुपये 5,000/- द्यावे, असे आदेश सदर मंच देत आहे.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने सदर ट्रकच्या विमा दाव्यापोटी तक्रारकर्त्यास रुपये 1,70,924/- (रुपये एक लाख सत्तर हजार नऊशे चोवीस फक्त) द्यावे तसेच त्या रक्कमेवर दरसाल, दरशेकडा 8 % दराने प्रकरण दाखल तारीख 03/10/2017 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याज द्यावे.
- विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी व प्रकरण खर्च मिळून रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त ) दयावे.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य पुरवाव्या.
( श्री.कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri