-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक-14 सप्टेंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर न केल्या संबधाने दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा MH-31/CZ-1500 या दुचाकी वाहनाचा मालक असून सदर वाहनाचा मालक असून ते वाहन त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) मे.कुसुमगर एन्ड कंपनी, नागपूर यांचे कडून विकत घेतले. विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता यांनी त्या वाहनाचा विमा विरुध्दपक्ष क्रं-1) इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी कडून काढला होता आणि त्या विम्याचा कालावधी हा दिनांक-23.10.2009 ते दिनांक-22.10.2010 असा होता. दिनांक-27.11.2009 रोजी तक्रारकर्ता व त्याचा मित्र पियुष त्या दुचाकी वाहनाने जात असताना एकाएकी वाहन घसरुन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर आदळल्याने अपघातग्रस्त झाले, अपघाताचे वेळी तक्रारकर्त्याचा मित्र पियुष हा वाहन चालवित होता. सदर अपघातामध्ये तक्रारकर्त्याला गंभिर दुखापत झाल्याने त्याला ऑरेंज सिटी हॉस्पीटल, नागपूर येथे भरती करण्यात आले परंतु त्याचा मित्र पियुष याला किरकोळ जखमा झाल्यात. सदर अपघाता विषयीची सुचना पोलीस स्टेशनला दिली नाही. सदर अपघातामध्ये दुचाकी वाहनाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. दुस-या दिवशी तक्रारकर्त्याचे नातेवाईकानीं विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला त्या बाबतची तोंडी सुचना दिली असता, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे सर्व्हेअरची नेमणूक करण्यात आली व त्याचे वाहनाची पाहणी विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता यांचे गॅरेज मध्ये करण्यात आली. सर्व्हेअरने काही फॉर्मसवर व को-या कागदपत्रांवर तक्रारकर्त्याच्या सहया घेतल्यात व त्याचे जवळ असलेला शिकाऊ परवाना आपल्या ताब्यात घेतला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे त्याचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहनाचे दुरुस्ती बाबत सर्व्हेअरने काढलेल्या अंदाजपत्रकाची मागणी केली असता ते पुरविण्यास विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने नकार दिला परंतु त्याला स्वखर्चाने विरुध्दपक्ष क्रं-2) कडून क्षतीग्रस्त वाहन दुरुस्त करुन घेण्या बाबत व त्यानंतर खर्चाचा दावा दाखल करण्याची सुचना दिली. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) यांचे कडून वाहनाची दुरुस्ती केली. वाहनाचे दुरुस्तीसाठी रुपये-22,899.26 पैसे एवढा खर्च आला व तो तक्रारकर्त्याने केला. त्यानंतर तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीसाठी आलेल्या खर्चाचा दावा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे केला. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने या कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला की, तक्रारकर्त्याचा मित्र पियुष याचे वैद्दकीय उपचाराचे कागदपत्र तक्रारकर्ता दाखल करु शकला नाही. वास्तविक पाहता अपघातामध्ये त्याचा मित्र पियुष याला फारशी दुखापत झाली नसल्याने त्याने वैद्दकीय उपचार घेतले नसल्याने त्याचे वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज उपलब्ध नव्हते. तसेच विरुध्दपक्षाने आणखी एक कारण असे दिले आहे की, अपघाताचे वेळी तक्रारकर्ता शिकाऊ परवान्यावर वाहन रस्त्यावर चालवित होता, या कारणास्तव फेटाळण्यात आलेला दावा सेवेतील कमतरता आहे म्हणून तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने आपला लेखी जबाब नि.क्रं 11 खाली दाखल करुन दुचाकी वाहनाची तक्रारकर्त्याची मालकी आणि वाहनाचा विमा मान्य करुन पुढे हे नाकबुल केले आहे की, घटनेच्या वेळी तक्रारकर्त्याचा मित्र पियुष हा वाहन चालविता होता. तसेच त्या अपघातात तक्रारकर्त्याचा मित्र पियुष यास काही दुखापत झाली नाही आणि म्हणून पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नाही हे म्हणणे सुध्दा नाकबुल केले. तसेच वाहनाला अपघात झाला होता, सर्व्हेअरची नेमणूक करण्यात आली होती व तक्रारकर्त्याने स्वखर्चाने वाहन दुरुस्त केले या सर्व बाबी नाकबुल केलेल्या आहेत. तक्रारीतील सर्व मजकूर नामंजूर करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं-7 खाली दाखल केला. त्यांचे विरुध्द काहीही कारण घडलेले नसताना विनाकारण त्यांना या तक्रारीत गोवले आहे कारण त्यांचे विरुध्द कुठलीही विनंती करण्यात आलेली नाही म्हणून तक्रार खारीज करण्याची विनंती त्यांनी केली.
05. उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन खालील प्रमाणे मंचाचा निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष क्रं-1) ही एक विमा कंपनी आहे, त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा या कारणास्तव नाकारला की, अपघाताचे वेळी त्याचेकडे शिकाऊ वाहन परवाना होता आणि तरी सुध्दा तो रस्त्यावरुन स्वतः एकटा वाहन चालविता होता, तक्रारकर्त्याची ही कृती मोटर वाहन कायद्दाचे नियमाचे विरुध्द होती. तसेच तो त्याचा मित्र पियुष याचे वैद्दकीय उपचारा संबधीचे कागदपत्र दाखल करु शकला नाही.
07. तक्रारकर्त्याचे म्हणण्या नुसार घटनेच्या वेळी त्याचा मित्र पियुष हा वाहन चालवितहोता व तो वाहनाच्या मागील सिटवर बसला होता आणि अपघाता मध्ये त्याच्या मित्राला फारशी दुखापत झाली नव्हती म्हणून त्याचे मित्राने वैद्दकीय उपचार घेतले नसल्याने त्याचे मित्राचे वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज दाखल करण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता.
08. असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने विमा दावा फेटाळताना आणखी एक कारण असे दिले आहे की, तक्रारकर्त्याने केलेल्या अपघाताच्या वर्णनामध्ये तफावत आढळून आली होती. आम्ही तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला दिलेले पत्र आणि क्लेम फॉर्मचे अवलोकन केले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-25.12.2009 रोजीचे दिलेल्या पत्रात असे नमुद केलेले आहे की, रोडवर ऑईल (तेल) सांडलेले होते, त्यामुळे त्याचे वाहन त्यावरुन घसरले आणि झाडावर जाऊ आदळले, त्यावेळी वाहन त्याचा मित्र पियुष चालवित होता आणि तो मागील सिटवर बसलेला होता. याउलट, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे सादर केलेल्या क्लेम फॉर्म मध्ये असे लिहिलेले आहे की, तक्रारकर्ता गाडी चालवित असताना अचानक त्याच्या डोळया समोर अंधारी आली व त्यामुळे गाडी झाडावर जाऊन आदळली. तक्रारकर्त्याच्या अपघाता संबधीच्या वर्णनातील तफावतीमुळे
विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्या कडून दिनांक-05/01/2010 रोजीचे पत्रान्वये स्पष्टीकरण मागविले परंतु स्मरणपत्र देऊनही तक्रारकर्त्याने स्पष्टीकरण दिले नाही आणि म्हणून त्याचा विमा दावा बंद करण्यात आला व त्याची सुचना दिनांक-07/05/2010 रोजीचे पत्रान्वये विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिली.
09. वरील परिस्थितीचा विचार करता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने मंचा समोर अपघाताचे घटने संबधाने खरी वस्तुस्थिती मांडलेली नाही. एकदा तो म्हणतो की, त्याचा मित्र अपघाताचे वेळी गाडी चालवित होता व दुस-यांदा तो म्हणतो की, तो स्वतः गाडी चालविता होता. ज्याअर्थी या अपघाती घटनेची सुचना पोलीसांना देण्यात आली नाही, जरी अपघाताचे स्वरुप गंभिर होते, त्याअर्थी असे दिसते की, तक्रारकर्त्याने काही बाबी पोलीसां पासून लपवून ठेवल्या आहेत. तक्रारकर्त्याचा मित्र जर अपघाताचे वेळी गाडी चालवित होता तर त्याला सुध्दा नक्कीच दुखापत झाली असती आणि यासाठी त्याने काही तरी वैद्दकीय उपचार नक्कीच घेतले असते कारण अपघात एवढा गंभिर होता की, तक्रारकर्त्याला दवाखान्यात भरती करुन त्याचा “3D CT SCAN” केला होता. यावरुन असे म्हणता येणार नाही की, त्याचा मित्र जो गाडी चालवित होता त्याला काहीच दुखापत झाली नाही. म्हणून आम्ही तक्रारकर्त्याच्या या म्हणण्याशी सहमत नाही की, घटनेच्या वेळी त्याच्या मित्राला काहीच दुखापत झाली नसल्याने त्याचे वैद्दकीय उपचाराचे दस्तऐवज त्याचे जवळ नव्हते. उलटपक्षी असे दिसून येते की, तक्रारकर्ता स्वतःच अपघाताचे वेळी गाडी चालवित होता.
10. तक्रारकर्त्या जवळ शिकाऊ वाहन परवाना होता व मोटर वाहन कायद्दाचे नियमातील तरतुदीं नुसार त्याला एकटयाने रस्त्यावर गाडी चालविण्यास मनाई होती. त्याच्या क्लेम फॉर्म वरुन हे स्पष्ट होते की, तो स्वतः गाडी चालवित होता व अपघातामुळे त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे पुढील संभाव्य परिणामा पासून बचाव करण्यासाठी आणि विमा दावा मिळण्यासाठी त्याने अपघाताचे वेळी त्याचा मित्र पियुष गाडी चालवित होता अशी खोटी कहाणी समोर आणलेली आहे.
11. सबब या तक्रारी मध्ये आम्हाला गुणवत्ता व तथ्य दिसून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं-2 एन.के.कुसुमगर आणि कंपनी यांचा या तक्रारीशी काहीही संबध नाही, त्यांचे विरुध्द कुठलीही मागणी केलेली नाही, त्यामुळे केवळ या कारणास्तव विरुध्दपक्ष क्रं-2 विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता ही तक्रार दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि क्रं-(2) विरुध्दची तक्रार खारीज
करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.