(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 29 मार्च 2017)
1. सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये, तक्रारकर्त्याच्या विमा दावा संबंधी इफ्को टोकीओ जनरल इन्शुरंस कंपनी लिमिटेड व्दारे अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याने दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याने त्याच्या दुचाकी हिरोहोंडा मोटार-सायकल MH 31- CU – 8133 साठी विरुध्दपक्षाकडून विमा काढला होता, ज्यामध्ये वैयक्तीक विम्याचा सुध्दा अंतरभाव होता. दिनांक 29.11.2009 ला तो त्याच्या सासु सोबत मोटार-सायकलने बाहेर गांवी जात असतांना एका ट्रकने धडक दिली, ज्यामुळे अपघात होऊन त्याला आणि सासुला गंभीर जखमा झाल्या. त्यासंबंधी पोलीसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. तक्रारकर्त्याला जखमी अवस्थेत नागपूरच्या दवाखाण्यामध्ये हलविण्यात आले होते आणि तेथे उपचार सुरु असतांना त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला होता, त्यामुळे त्याला नेहमीकरीता अपंगत्व आले. तक्रारकर्त्याने स्वतःच्या उपचाराकरीता रुपये 2,59,000/- खर्च केला. तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झाल्यावर जानेवारी 2010 मध्ये विमा दावा दाखल केला आणि त्याच्या गाडीच्या नुकसानीसाठी आणि स्वतःच्या वैयक्तीक अपघातासाठी विमा राशी मागितली. तक्रारकर्त्याने त्यावेळी वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी आणि वैयक्तीक नुकसान भरपाईसाठी अर्ज मागितला असता, विरुध्दपक्षाच्या कर्मचा-यांनी एकाच प्रकारचे दोन अर्ज दिले. तक्रारकर्त्याने दोन्ही अर्ज दुस-याचे मदतीने भरुन विरुध्दपक्षाकडे दाखल केले. त्याशिवाय वैद्यकीय बिल प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्षाकडे सादर करण्यात आले. विरुध्दपक्षाने गाडीला झालेल्या नुकसानीची रक्कम तक्रारकर्त्याला त्वरीत दिली, परंतु त्याच्या वैयक्तीक दुखापतीच्या नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही व अशाप्रकारे अनुचित व्यापारी पध्दतीचा वापर केला. म्हणून या तक्रारीव्दारे त्याने त्याच्या उपचाराचा व झालेला खर्च 2,59,000/- रुपये 20 टक्के व्याजाने मागितली असून, ञासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 13,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मागितला आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली, त्यानुसार विरुध्दपक्षाने प्रकरणात हजर होऊन लेखी जबाब सादर केला व तक्रार नामंजूर केली. तक्रारकर्त्याचा गाडीचा विमा, तसेच गाडीला झालेला अपघात विरुध्दपक्षाने मान्य केले आहे. परंतु, हे नाकबूल केले की, तक्रारकर्त्याला नागपूर येथील दवाखाण्यात भरती करण्यात आले आणि तेथे त्याचा उजवा पाय कापण्यात आला आणि त्यामुळे त्याला अपंगत्व आले. तसेच, त्याच्या उपचारासाठी रुपये 2,59,000/- खर्च हे सुध्दा नाकबूल केले. तक्रारकर्ता जानेवारी 2010 मध्ये कार्यालयात आला होता हे कबूल करुन पुढे असे नमूद केले आहे की, त्याने गाडीला झालेल्या अपघातासाठी नुकसान भरपाईसाठी विमा दावा दिला होता आणि तो मंजूर करुन गाडीच्या दुरुस्तीचा खर्च गॅरेजवाल्याला देण्यात आला होता. परंतु, तक्रारकर्त्याने त्याच्या वैयक्तीक दुखापतीसाठी विमा दावा कधीच केला नाही, त्यामुळे त्या खर्चाची परिपुर्तता केली नाही म्हणून अनुचित व्यापार पध्दतीचा वापर केला हा प्रश्न उद्भवत नाही. तक्रारकर्त्याची मागणी अवास्तव असून तक्रार खोटी आहे म्हणून ती खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्त्याने केवळ त्याच्या उपचारासाठी जो खर्च आला त्याची परिपुर्तता विमा पॉलिसीच्या शर्तीनुसार करुन देण्यास विनंती केली आहे. विरुध्दपक्षाच्या लेखी जबाबावरुन असे म्हणता येईल की, त्या पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्त्याचा वैयक्तीक विमा सुध्दा अंतर्भूत होता. ही बाब विमा पॉलिसीच्या दस्ताऐवजावरुन सुध्दा सिध्द होते. तक्रारकर्त्याला आणि त्याच्या गाडीला विमा अस्तित्वात असतांना अपघात झाला, ही बाब नाकबूल करण्यात आली नाही. विरुध्दपक्षाने गाडीच्या दुरुस्तीचा खर्च दिला असून तक्रारकर्त्याने त्यासंबंधी पुर्तता झाली म्हणून व्हॉऊचरवर स्वाक्षरी सुध्दा केली आहे आणि त्याबद्दल कुठलाही वाद नाही.
6. विरुध्दपक्षाने हे नाकबूल केले आहे की, त्या अपघातामध्ये तक्रारकर्त्यास काही दुखात झाली होती आणि त्याचा उजवा पाय कापावा लागला होता. तक्रारकर्त्याने पोलीस चौकशीचे कागदपञ, दोषारोप पञ, वैद्यकीय दस्ताऐवज दाखल केले आहे. ज्यावरुन हे निर्विवादपणे स्पष्ट होते की, अपघातामध्ये तक्रारकर्ता आणि त्याच्या सासुला दुखापत झाली होती आणि तक्रारकर्त्याचा उजवा पायाला मल्टीपर फॅक्चर झाले होते, पुढे त्याला मल्टीस्पेशॉलिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले जेथे त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला होता. हे सर्व दस्ताऐवजावरुन सिध्द होते की, तक्रारकर्त्याला अपघातामध्ये दुखापत झाली होती आणि त्याचा उजवा पाय कापावा लागला होता. त्याशिवाय त्याने स्वतःचे छायांकीत प्रत सुध्दा तक्रारीसोबत लावलेले आहे, ज्यामध्ये त्याला गुडघ्यापासून उजवा पाय नसलेले दिसते. विरुध्दपक्षाने यासर्व दस्ताऐवजाला आव्हान दिलेले नाही किंवा ते दस्ताऐवज खोटे व बनावटी असल्याचा आरोप सुध्दा केला नाही. त्यामुळे आम्ही हे सर्व दस्ताऐवज स्विकारुन त्यावर आपली भिस्त ठेवत आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या ईलाजासंबंधीचे कागदपञ सुध्दा दाखल केलेले आहे, त्यामुळे ह्या सर्व कागदपञाचे अवलोकन केल्यावर याबद्दल कुठलिही शंका राहात नाही की, तक्रारकर्त्याला त्या अपघातामध्ये दुखापत होऊन त्याचा उजवा पाय कापावा लागला होता, ज्यासाठी त्याला खर्च करावा लागला होता. पॉलिसीच्या शर्तीनुसार त्याला स्वतःच्या वैयक्तीक आलेल्या उपचाराच्या खर्चाच्या परिपुर्तता मागण्याचा अधिकार आहे. परंतु, प्रश्न असा आहे की, त्यासाठी त्याने विरुध्दपक्षाकडे दावा केला होता की नाही आणि केला असल्यास विरुध्दपक्षाने तो नामंजूर केला होता की काय ?
7. तक्रारकर्ता स्वतः सांगतो त्याच्या वैयक्तीक अपघाताच्या खर्चासंबंधी विमा दाव्याचा फॉर्म विरुध्दपक्षाला देण्यात आला नाही. कारण, त्याच्या म्हणण्यानुसार त्याला एकाच प्रकारचे दोन फॉर्मस देण्यात आले होते. परंतु, दोघांपैकी एक सुध्दा फॉर्म वैयक्तीक अपघाताच्या उपचाराच्या खर्चाच्या परिपुर्ततेसाठी नव्हता. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने त्याचा उपचराच्या खर्चासाठी फॉर्म दिला नसल्याने खर्चाची परिपुर्तता करण्याचा प्रश्न येत नाही. दोन्ही पक्षांनी या संबंधी जे आरोप-प्रत्यारोप केले आहे, त्यासंबंधी किंवा त्याच्या बयाणाशिवाय इतर कुठलाही ठोस पुरावा नाही. परंतु, आम्हांला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, जेंव्हा विरुध्दपक्षाला त्याची माहिती होती की, तक्रारकर्त्याचा अपघात झाला असून दुखापत झाली आहे, तेंव्हा विरुध्दपक्षाकडून स्वतःहून तक्रारकर्त्याला वैयक्तीक उपचाराच्या खर्चाची परिपुर्ततेसाठी दावा करावयास सांगावयास हवे होते. ही विरुध्दपक्षाची जबाबदारी आहे की, त्याने विमाधारकाला दावा करण्यासाठी योग्य तो फॉर्म देण्यास हवा होता. तक्रारकर्त्याला स्वतःच्या उपचाराच्या खर्चाची पुर्तता मागण्यासाठी विमा दावा दाखल न करण्याचे कुठलेही कारण नव्हते, जेंव्हा की त्याने गाडीला झालेल्या नुकसानीसाठी विमा दावा केला होता. त्यामुळे, तक्रारकर्त्याच्या या म्हणण्याला सहमती दाखवीता येते की, त्याला एकाच प्रकारचे दोन विमा दावा फॉर्म देण्यात आले होते जे गाडीच्या नुकसान भरपाई मागण्यासाठी होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कागदपञावरुन त्याला झालेल्या दुखापतीविषयी दुमत असणे शक्य नाही. त्यामुळे, मंचाच्या मते पॉलिसी विरुध्द विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा वैयक्तीक उपचाराच्या खर्चाचा विमा दावा विचारात घ्यावयास हवा होता, परंतु विरुध्दपक्षाने तसे न केल्याने ही त्याच्या सेवेतील कमतरता ठरते. या सर्व कारणास्तव ही तक्रार मंजूर होण्यालायक आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश देण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष इफ्को टोकीओ जनरल इन्शोरन्स कंपनी लिमिटेड यांना आदेश देण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्याच्या उपचाराच्या खर्चाची परिपुर्तता रक्कम रुपये 2,59,000/- द.सा.द.शे. 7 % टक्के व्याजदराने जानेवारी 2010 पासून द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासाबद्दल रुपये 10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशची पुर्तता निकलप्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आंत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.