(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 05/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 03.07.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, त्याने दि.15.10.2007 रोजी दुचराकी स्प्लेंडर प्लस गाडी कुसुमगर ऑटोमोबाईल्स येथून खरेदी केली. सदर दुचाकी गाडीचा नोंदणी क्र. एमएच-31/डीए-4345 हा असुन इंजिन क्र. 07J15E34427 व चेसिस क्र. C7J16F19791 असा असुन सदर वाहन आयसीआयसीआय बँकेकडून कर्जावर घेतले होते. वाहनावरील सर्व कर्ज आयसीआयसीआय बँकेला दिल्यामुळे दि.11.01.2009 रोजी वाहनावरील हायपोथिकेशन संपूष्टात आल्याबाबत बँकेने तक्रारकर्त्यास तसे पत्र दिले. तक्रारकर्त्याने सदर वाहन ईफको टोकियो जनरल इंश्योरंस कंपनी, नागपूर यांचेकडे विमाकृत होते व त्याचा पॉलिसी क्र.40480507 असा असुन त्याची वैधता दि.10.12.2008 ते 09.12.2009 पर्यंत होता. 3. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याचे वाहन दि.14.10.2009 रोजी सायंकाळी 5 वाजता मोहम्मद रफी चौक, जयस्वाल रेस्टॉरेंट येथे नाश्ता करण्याकरता गेला असता चोरीला गेले. तक्रारकर्त्याने वाहनाचा बराच शोध घेतल्यानंतर दि.15.10.2009 रोजी यशोधरानगर पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविली त्याचा FIR No. 178/09 असा आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे विमा दावा रु.34,282/- दाखल केला परंतु गैरअर्जदारांनी दि.09.04.2010 रोजी विमा दावा नाकारला, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली असुन त्याव्दारे गैरअर्जदाराकडून विमा दाव्याची रक्कम रु.34,182/- द.सा.द.शे. 18% व्याजासह मिळावी तसेच विमा दावा फेटाळून त्याचेवर अन्याय केल्याने व सेवेतील त्रुटीबद्दल रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याचे वाहन क्र. एमएच-31/डीए-4345 त्यांचेकडे विमाकृत होते, ही बाब मान्य केलेली असुन नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचे वाहन रस्त्याचे कडेला एकटेच ठेवले होते व कुलूपबंद केलेले नव्हते. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने अटी व शर्तींचा भंग केलेला आहे, त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी दिलेली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.23.12.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर.उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. उभय पक्षांचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याचे वाहन क्र. एमएच-31/डीए-4345 गैरअर्जदारांकडे विमाकृत होते तसेच सदर बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो, असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्त्याचे वाहनाचा विमा कालावधी हा दि.10.12.2008 ते 09.12.2009 पर्यंत गैरअर्जदारांकडे विमाकृत होता ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केलेली आहे व उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते, तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्र.3 वरुन सुध्दा स्पष्ट होते. 9. तक्रारकर्त्याचे वाहन दि.14.10.2009 रोजी सायंकाळी 5 वाजता मोहम्मद रफी चौक, जयस्वाल रेस्टॉरेंट येथून चोरीला गेले होते असे तक्रारीत नमुद केले आहे व त्याबाबतची तक्रार यशोधरा पोलिस स्टेशन येथे दि.15.10.2009 रोजी दाखल केलेली असुन सदर बाब दस्तावेज क्र. 1 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे वाहन दि.14.12009 रोजी चोरीला गेले होते ही बाब स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दस्तावेज क्र.5 गैरअर्जदारांचे तपासणी अहवाल दाखल केलेला आहे, त्यामध्ये सुध्दा तक्रारकर्त्याचे वाहन चोरीला गेल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याचे वाहन चोरीला केल्यानंतर त्याने गैरअर्जदारांकडे विमा दावा दाखल केला होता ही बाब सुध्दा उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.4 वरुन सुध्दा स्पष्ट होते. 10. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्या संबंधीचे पत्र दस्तावेज क्र.6 म्हणून दाखल केलेले आहे. त्यामध्ये तक्रारकर्त्याने अटी व शर्तींचा भंग केला असुन वाहन कुलूपबंद केले नसुन वाहना सोबतच चाबी ठेवल्याची बाब नमुद केलेली आहे. याउलट तक्रारकर्त्याने पोलिस स्टेशनमध्ये गाडीची सुचना देत असतांना FIR No. 178/09 मध्ये स्पष्टपणे नमुद केले आहे की, त्याने वाहन कुलूपबंद केले नव्हते, कारण तो फक्त थोडया वेळाकरता नास्ता करण्याकरता गेला होता. एवढया कमी अवधीत वाहन चोरीला जाण्याची त्यांना कोणतीही शक्यता नव्हती. तक्रारकर्त्याने प्रामाणिकपणे सदर वाहन कुलूपबंद केले नव्हते ही बाब FIR मधून स्पष्ट होते. परंतु वाहना सोबतच चाबी ठेवली होती, ही बाब त्यावरुन स्पष्ट होत नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दिल्ली राज्य आयोगाचा, “New India Assurance Co Ltd. –v/s- Capt. P.N. Sharma”, या न्याय निवाडयाचे अवलोकन केले असता सदर विमाकृत वाहनाबद्दल तक्रारकर्त्याने निष्काळजीपण बाळगला, असे म्हणता येत नाही. 11. गैरअर्जदारानी तक्रारकर्त्यास अटी व शर्तीं पुरविल्या होत्या असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही व ज्या अटी व शर्तींनुसार विमाकृत वाहनाची कोणकोणती काळजी घ्यावयास पाहिजे होती, ही बाब सुध्दा सुचित केल्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारणे ही सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 12. सदर वाहन विमाकृत करीत असतांना त्याची किंमत रु.34,182/- होती त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर विमाकृत रक्कम मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 13. तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- ची मागणी केलेली होती सदर मागणी ही अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास विमाकृत वाहनाच्या पॉलिसी संबंधाने रु. 34,182/- आदेश मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत अदा करावी अन्यथा सदर रकमेवर द.सा.द.शे.9% दराने व्याज रक्कम अदा होईपर्यंत देय राहील. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |