Dated the 08 Sep 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्य)
सामनेवाले ही सर्वसाधारण विमा कंपनी आहे. तक्रारदार हे ठाणे येथील रहिवासी आहेत. तक्रारदार ह दुचाकीचे मालक असल्याने त्यांनी सामनेवाले यांच्या ठाणे शाखेतून दुचाकी वाहनाबाबत वैयक्तीक अपघात विमा योजना घेतली. तक्रारदार सदरील वाहन चालवत असतांना वाहन घसरुन पडून झालेल्या अपघातामध्ये तक्रारदारांना शारिरीक इजा झाली. त्याबाबतचा दाखल केलेला प्रतिपूर्ती दावा नाकारल्याच्या बाबीमधून प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार तक्रारदार हे हिरो होंडा, स्प्लेन्डर प्लस या दुचाकी क्र. एम.एच. झीरोफोर सी आर नाईन एट फोर(MH 04-CR-984) या वाहनाचे मालक असून त्यांनी या वाहनाची वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी सामनेवाले यांजकडून घेतली. सदर पॉलिसी दि. 02/03/2006 ते दि. 01/03/2007 दरम्यान वैध असतांना दि. 22/02/2007 रोजी तक्रारदार आपल्या दुचाकीवरुन जात असता, डी.एन. रोड, मुंबई येथील टाईम्स ऑफ इंडिया बिल्डींगसमोर त्यांचे वाहन घसरल्याने ते दुचाकीवरुन दुपारी 3.30 वाजता पडल्यामुळे त्यांच्या शरीरावर इजा झाली व काही फ्रॅक्चर झाले. त्याचदिवशी तक्रारदारांना ऑर्थो नोव्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सदर रुग्णालयात तपासणीअंती तक्रारदारांना फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर दि. 22/02/2007 ते दि. 26/02/2007 दरम्यान भरती होऊन शस्त्रक्रिया करावी लागली व त्यासाठी रु. 75,000/- इतका खर्च आला. तसेच जखम बरी झाल्यानंतर रॉड काढावयाच्या शस्त्रक्रियेसाठी रु. 25,000/- अशी एकूण रु. 1 लाख रक्कम खर्चाचे अंदाजपत्रक रुग्णालयाने दिले. तक्रारदारांनी वैयक्तीक अपघाताची विमा पॉलिसी रु. 1 लाखाची घेतली असल्याने, त्याअंतर्गत तक्रारदारांनी झालेला खर्च रु. 75,000/- व पुढील अंदाजित खर्च रु. 25,000/- अशी एकूण रु. 1 लाख रक्कम मिळावी अशी तक्रारदारांनी मागणी केली आहे. तक्रारदारांनी दि. 22/02/2007 रोजी झालेल्या अपघाताची सूचना आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये दि. 16/04/2007 रोजी दिली. त्यानंतर दि. 24/04/2007 रोजी सदर अपघाताची माहिती सामनेवाले यांचे कार्यालयात दिली. तक्रारदारांनी त्यानंतर औषधोपचारावर झालेल्या खर्चाचा तपशिल पाठवून रु. 1 लाख रकमेचा दावा मंजूर करण्याची विनंती केली. पंरतु सामनेवाले यांना अनेकवेळा नोटीस पाठवून, विनंती करुनही कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु. 1 लाख 12% व्याजासह मिळावी, रु. 10,000/- मानसिक त्रासासाठी व रू. 30,000/- तक्रार खर्चासाठी मिळावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन प्रामुख्याने असे नमूद केले आहे की, तक्रारदारांचे वाहनास अपघात विमा संरक्षण प्राप्त होते. दुर्दैवाने वाहन चालवित असतांना अपघात झाल्यास वाहन चालक/मालक यांना नुकसान भरपाई ही खालीलप्रमाणे देण्यात येते
(1) वाहन मालक/चालकाचा मृत्यू झाल्यास 100 % नुकसान भरपाई
(2) शरीराचे दोन अवयव गमवावे लागल्यास किंवा दोन्ही डोळयांची दृष्टी गेल्यास किंवा 1 अवयव व 1 डोळयाची दृष्टी गमवावी लागल्यास. 50%
(3) जर, उपरोक्त हानीव्यतिरिक्त वाहन चालक/मालक यांस कायमचे अपंगत्व आल्यास 100%
सामनेवाले यांचे कथनानुसार वाहन अपघात विमा पॉलिसीमध्ये नुकसान भरपाई ही अपंगत्वअनुरुप दिली जात असल्याने, तक्रारदारांना आलेले 12% परमनन्ट डिसेअबलमेंट हे वरील नियमानुसार देय होत नसल्याने तक्रारदारांचा दावा तसेच तक्रार चुकीची असल्याने ती फेटाळण्यात यावी.
अ. तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडून आपल्या दुचाकी क्र. एम.एच. झीरो फोर सी आर नाईन एट फोर (MH 04-CR-984) चा अपघात विमा सामनेवाले यांजकडून घेतला होता व सदर पॉलिसी दि. 02/03/2006 ते दि. 01/03/2007 या कालावधीमध्ये वैध होती ही बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. तक्रारदार सदरील दुचाकीवरुन प्रवास करत असतांना तक्रारदारांच्या वाहनास अपघात झाल्याची बाबही सामनेवाले यांनी मान्य केली आहे.
- तक्रारदार व सामनेवाले यांनी आपला वाद, प्रतिवाद, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने त्यांचे वाचन केले. त्यावरुन प्रकरणामध्ये खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः
ब. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या अपघातानंतर घेतलेल्या औषधोपचाराचा संपूर्ण तपशिल देऊन खर्चाचा दावा प्रतिपूर्तीसाठी सामनेवाले यांजकडे पाठविला. परंतु सामनेवाले यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून त्यांना दि. 24/09/2007 रोजी नोटीस पाठविली परंतु सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
क. तक्रारदारांनी त्यांना झालेल्या अपघातानंतर घेतलेल्या औषधोपचार खर्चाची प्रतिपूर्ती मिळावी म्हणून सामनेवाले यांजकडे दावा पाठविल्याचे तक्रारीचे परिच्छेद क्रमांक 9 मध्ये नमूद केले आहे. यासंदर्भात असे नमूद करावेस वाटते की, कोणतेही वाहन रस्त्यावर चालविण्यापूर्वी मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 147 मधील तरतुदीनुसार अपघाताअंती दायित्वासाठी संरक्षण मिळावे या हेतूने अपघात विमा पॉलिसी घेणे अनिवार्य आहे. वाहन चालक/मालक यांस वाहन चालवितांना अपघात झाल्यास, जनरल रेग्युलेशन 36 अनुसार खालीलप्रमाणे नुकसान भरपाई मिळतेः
(1) वाहन मालक/चालकाचा मृत्यू झाल्यास 100% नुकसान भरपार्इ
(2) वाहन चालक/मालक यांस अपघात झाल्यानंतर
शरीराचे दोन अवयव गमवावे लागल्यास किंवा दोन्ही
डोळयांची दृष्टी गेल्यास किंवा 1 अवयव व 1 डोळयाची
दृष्टी गमवावी लागल्यास. 50%
(3) जर, उपरोक्त हानीव्यतिरिक्त वाहन चालक/मालक यांस
कायमचे अपंगत्व आल्यास 100%
उपरोक्त नमूद नुकसान भरपाई ही जनरल रेग्युलेशनप्रमाणे देय आहे व तक्रारदारांना दिलेली पॉलिसी ही उपरोक्त नमूद तदतूदीस अधीन राहून दिलेली आहे. त्यामुळे या पॉलिसीअंतर्गत आर्थिक लाभ हे वरीलप्रमाणेच मिळतात. सदर पॉलिसीअंतर्गत वैदयकीय प्रतिपूर्ती मिळण्याची तरतूद कुठेही नसल्याने तक्रारदारांनी वैदयकीय खर्चासाठी प्रतिपूर्ती मिळणेबाबत केलेली मागणी देय होत नाही.
ड. सामनेवाले यांनी कैफियत दाखल करतांना शपथपत्रावर कागदपत्रेही दाखल केली आहे. त्यामध्ये पॉलिसीच्या शर्ती व अटी तसेच तक्रारदाराच्या पॉलिसीसंबंधी देय असलेली देय रकमेबाबतचा तपशिल दाखल केला आहे.
तक्रारदारांनी सदरील कागदपत्रांस आक्षेप घेऊन असे नमूद केले आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना पॉलिसी सोबतच्या शर्ती व अटी या पॉलिसी घेतेवेळी दिल्या नव्हत्या त्या पहिल्यांदाच तक्रार दाखल केल्यानंतर मंचापुढे सादर केल्या आहेत व त्यामुळे सदर शर्ती व अटी विचारात घेता येणार नाहीत.
यासंदर्भात असे नमूद करावेसे वाटते की तक्रारदार हे सुविदय व व्यवसायाने अॅडव्होकेट आहेत. त्यामुळे वैयक्तीक विमा अपघात पॉलिसी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या शर्ती व अटी स्वतःहून बघणे किंवा मिळाल्या नसल्यास त्याची मागणी करणे हे त्यांचेही कर्तव्य होते. त्यामुळे केवळ सामनेवाले यांना दोष देणे योग्य होणार नाही.
इ. वर नमूद केल्याप्रमाणे वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी ही मेडीक्लेम पॉलिसीपेक्षा वेगळी आणि स्वतंत्र आहे. दोन्ही पॉलिसीच्या शर्ती व अटी भिन्न आहेत. वैयक्तीक विमा अपघात पॉलिसींना देय असणारे लाभ हे जनरल रेग्युलेशन 36 प्रमाणे आहेत. तक्रारदारांना झालेली शारिरीक इजा म्हणजे 12% परमनन्ट पार्शियल डिसेबलमेंट, उपरोक्त नमूद जनरल रेग्युलेशनच्या नमूद शर्ती व अटींमध्ये येत नसल्याने तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात येते.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
तक्रार क्र. 628/2009 फेटाळण्यात येते.
खर्चाबाबत आदेश नाही.
आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य विनाविलंब पाठविण्यात याव्यात.
4. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदारास परत करावेत.