द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(03/05/2013)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांची विमा कंपनी व सर्व्हेअरविरुद्ध सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे वडगावशेरी, पुणे – 14 येथील रहिवासी असून त्यांनी यामाहा कंपनीची मोटारसायकल खरेदी केली होती. त्या वाहनाचा विमा जाबदेणार क्र. 1 यांच्याकडे उतरविला होता. दि. 09/09/2009 रोजी तक्रारदार यांची गाडी त्यांचा पुतण्या कु. अमोल चंद्रकांत कामथे व मुलगा कु. चेतन मोहन कामथे हे जेजुरी येथून पुण्याकडे घेऊन येत असताना, ज्यावेळी ते जेजुरी येथील लवथळेश्वर येथे पोहचले त्यावेळी सदर वाहनाचा अपघात झाला. सदर अपघाताची माहिती त्यांनी जाबदेणार क्र. 1 यांना त्वरीत दिली. जाबदेणार क्र. 1 यांनी जाबदेणार क्र. 2 यांना सदर वाहनाचा सर्व्हे करण्यासाठी पाठविले. सदर वाहन इन्शुरन्स कंपनीने टेम्पोमध्ये घालून त्यांच्या ताब्यात घेतले. तक्रारदार यांनी सदर वाहन हे भुषन ऑटो फायनान्स कंपनीकडून कर्जाऊ घेतलेले होते. इन्शुरन्स कंपनीने रक्कम रु. 36,917/- भुषन ऑटो फायनान्स कंपनीकडे जमा करुन त्या संबंधीची पावती तक्रारदारांकडून घेतली. त्याचप्रमाणे तक्रारदारांकडून रक्कम रु. 50/- च्या स्टॅम्प पेपरवर “मोटार सायकल विकण्यास हरकत नाही” असा करार लिहून घेतला व पूर्ण मोटारसायकलपोटी केवळ रक्कम रु. 9,000/- चेकद्वारे मिळाले, असे लिहून घेतले. अशाप्रकारे इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांच्या वाहनाची किंमत रक्कम रु. 66,000/- असताना कर्ज खात्यामध्ये केवळ रक्कम रु. 36,917/- भरले व रक्कम रु. 9,000/- चेकद्वारे देण्याची तयारी दर्शविली. इन्शुरन्स कंपनीने वाहनाची किंमत रक्कम रु. 66,000/- असूनसुद्धा केवळ रक्कम रु. 45,917/- तक्रारदारांना देऊ केलेले होते. इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांना वाहनाची संपूर्ण रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी वाहनाची किंमत रक्कम रु. 66,000/-, मानसिक त्रासपोटी रक्कम रु. 15,000/-, कोर्ट खर्च, रिक्षा प्रवास खर्च, टायपिंग, झेरॉक्स, पोस्टेज व इतर खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- ची मगणी केलेली आहे.
2] जाबदेणार यांनी या प्रकरणी हजर होऊन लेखी कैफियत दाखल केली आणि तक्रारदार यांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. जाबदेणारांच्या कथनानुसार, सर्व्हेअरनी सदर वाहनाची पाहणी करुन त्याचा अहवाल दिला. सर्व्हेअरनी वाहनाची एकुण किंमत रक्कम रु. 45,917/- अशी निश्चित केली होती. तक्रारदार यांच्या विनंतीनुसार त्यांनी रक्कम रु. 36,917/- तक्रारदार यांच्या कर्ज खात्यामध्ये भरले आहेत आणि रक्कम रु. 9,000/- चा चेक तक्रारदार यांना पाठविला होता. परंतु तक्रारदार यांनी सदरचा चेक स्विकारण्यास असमर्थता दर्शविली. या सर्व बाबींकरीता तक्रारदार यांनी लेखी संमती दिली होती, म्हणून जाबदेणार इन्शुरन्स कंपनीने या प्रकरणामध्ये सेवेमध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणारांतर्फे करण्यात आली आहे.
3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेतले असता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यास विम्याची पूर्ण किंमत न देऊन सेवेमध्ये त्रुटी केली आहे का? | होय |
2 | आदेश काय? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे
4] या प्रकरणी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेतली असता असे स्पष्ट दिसून येते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून वाहनाचा विमा उतरविला होता, ही बाब जाबदेणार यांनी नाकारलेली नाही. त्याचप्रमाणे सदरच्या वाहनाचा अपघात झाला होता व त्यासंबंधी सर्व्हेअरची नेमणुक करुन अहवाल मागितला, याबाबत कोणताही वाद नाही. तक्रारदार यांच्या कथनानुसार जाबदेणार यांनी वाहनाची किंमत रक्कम रु. 66,000/- असताना, रक्कम रु. 36,917/- कर्ज खात्यामध्ये जमा केले व रक्कम रु. 9,000/- तक्रारदार यांना देऊ केले. वाहनाची किंमत रक्कम रु. 66,000/- असून, जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सुमारे 21,000/- कमी देऊन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार, सर्व बाबी तक्रारदार यांनी लिखीत स्वरुपात मान्य केलेल्या आहेत, म्हणून तक्रारदारांना आता तक्रार करता येणार नाही. तक्रारदार व जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसून येते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम रु. 36,917/- जमा केलेले आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की, सदर वाहनाचा विमा हा दि. 25/03/2009 ते 24/03/2010 या कालावधीसाठी उतरविलेला होता. सदरचे वाहन हे सन 2009 साली खरेदी केलेले होते. या वाहनाचा अपघात सहा महिन्यांच्या आंत, म्हणजे दि. 09/09/2009 रोजी झाला होता. तक्रारदारांनी दाखल केलेल्या बीलानुसार सदर वाहनाची किंमत रक्कम रु. 66,300/- होती ही बाब स्पष्ट होती, त्यामध्ये रक्कम रु. 7,222/- व्हॅटचे आणि रक्कम रु. 1,300/- जकातीचे समाविष्ट होते. त्यामुळे वाहनाची मुळ किंमत रक्कम रु. 57,778/- होती. या गोष्टीचा विचार केला असता, असे स्पष्ट होते की, इन्शुरन्स कंपनीने सदर वाहनाची किंमत रक्कम रु. 66,300/- होती ही बाब मान्य केली होती. अपघात नवीन वाहनाचा होता व सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर सहा मह्न्यांच्या आंत अपघात झाला होता. अशा परिस्थितीमध्ये 10% घसारा वजा जाता रक्कम रु. 56,270/- अशी वाहनाची किंमत निश्चित करण्यात येते. तक्रारदारांनी सदरच्या वाहनाचा विमा हप्ता रक्कम रु. 1388/- भरलेला आहे, त्यामुळे तक्रारदार हे वाहनाची संपूर्ण किंमत मिळण्यास पात्र होते. 10% घसारा वजा जाता वाहनाची किंमत रक्कम रु. 56,270/- अशी येते. इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम रु. 36,917/- भरलेले आहेत. सदर रक्कम, रक्कम रु. 56,270/- मधून वजा केली असता रक्कम रु. 19,353/- इतकी रक्कम तक्रारदार जाबदेणारांकडून मिळण्यास पात्र आहेत. म्हणून या सर्व बाबींचा विचार केला असता जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, हे सिद्ध होते. तक्रारदार हे 50% अपंग असून त्यांना जाबदेणारांनी कोर्टात हेलपाटे घालण्यास भाग पाडले, म्हणून तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई
म्हणून रक्कम रु. 5,000/- मिळण्यास पात्र आहेत आणि या प्रकरणाच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
जाबदेणार यांच्या वतीने युक्तीवाद करतेवेळी, जाबदेणार हे तक्रारदार यांना रक्कम रु. 9,000/- देण्यास तयार होते, त्यामुळे त्या रकमेवर व्याजाची आकारणी करता येणार नाही, तक्रारदारांनी स्वत:हून ही रक्कम स्विकारलेली नाही म्हणून त्या रकमेवर व्याज मिळणार नाही, असे नमुद केले होते. यासर्व गोष्टींचा विचार करता, वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांची विम्याची रक्कम न
देऊन सेवेमध्ये कमतरता केलेली आहे, असे जाहीर
करण्यात येते.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवेतील त्रुटीपोटी
नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 19,353/-
आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या
आत अदा करावे द्यावेत.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 10,353/-
या रकमेवर द.सा.द.शे. 9% टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दिनांक 25/11/2010 पासून संपूर्ण रक्कम
अदा करेपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून
सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
5. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी
नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 5000/- व
तक्रारीचाखर्च रुपये 2000/- आदेशाची प्रत प्राप्तक्रारदार
झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
6. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.