निकालपत्र (दि.26.10.2015) व्दाराः- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
1 सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत ठेवलेने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 अन्वये सेवेत त्रुटी ठेवलेने मंचात दाखल केली.
2 प्रस्तुतची तक्रार स्विकृत होऊन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाले यांना नोटीस बजावणी होऊन सदर कामी हजर झाले. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचे वकीलांचे तोंडी युक्तीवाद व सामनेवाले यांचे लेखी युक्तीवादाचा विचार करता, सदर काम हे गुणदोषावरती खालीलप्रमाणे निकाल पारीत करीत आहे.
तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
3 तक्रारदारांनी दि.17.10.2010 रोजी सामनेवाले क्र.1 व 4 या कंपनीचे अॅटोमेटीक वॉशींग मशीन कोल्हापूर येथील सामनेवाले क्र.2 यांचे दुकानामधून खरेदी केले तर सामनेवाले क्र.3 हे सामनेवाले क्र.1 कंपनीच्या वॉशिंग मशीनची कोल्हापूरात दुरुस्ती/रिपेअर करुन देणारी सेल्स अॅण्ड सर्व्हीस एजन्सी आहे. सामनेवाले क्र.4 ही सामनेवाले क्र.1 कंपनीची पुणे विभागातील सर्व जिल्हयात कंपनीच्या सर्व प्रकारची होम अप्लांयसेसची पुरवठा करणारी शाखा असून कोल्हापूर जिल्हा सामनेवाले क्र.4 यांचे कार्यक्षेत्रात आहे. सदरहू वॉशींग मशीनला 48 महिन्यांचा म्हणजे चार वर्षाचा वॉरंटी कालावधी असून त्याचे वॉरंटी कार्डही आहे. सदरहू वॉशींग मशीन खरेदी केलेपासून म्हणजे दि.17.10.2010 पासून ऑगस्ट, 2013 पर्यंत उत्तम चालले. परंतु ऑगस्ट, 2013 च्या पहिल्या/दुस-या आठवडयात वॉशींग मशीन चालू केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कंन्ट्रोल बोर्डमधून विजेचे स्पार्क येऊ लागले. त्याचप्रमाणे, वापरासाठी वॉशींग मशीन चालू केलेनंतर कपडे धुण्यासाठी वॉशींग मशीनमध्ये घातलेले पाणी, वॉशींग मशीन सुरु केल्यानंतर वॉशींग मशीनचे बाहेरील बॉडी व अॅटोमॅटीक कंट्रोल बोर्डमधून बाहेर येऊ लागले. दि.13.08.2013 रोजी आय.एफ.बी.कंपनीस तक्रारदारांनी तक्रार अ.नं.11287133 ने नोंद केली. दि.13.08.2013 रोजीनंतर सामनेवाले क्र.4 चे कर्मचारी तक्रारदारांचे घरी आले असता त्यांनी सदरहू वॉशींग मशीन सामनेवाले क्र.3 यांचे राजारामपूरी येथील वर्कशॉपमध्ये आणून देण्यास सांगितले. सदरहू मशीनमध्ये 10 दिवस ठेवून दोष दूर करुन/ दुरुस्ती झाल्यानंतर परत तक्रारदारांनी वॉशींग मशीन घरी आणले. तथापि सामनेवाले यांचे कामगार येऊन वॉशींग मशीन चालू करुन दाखवतील असे सांगितले. परंतु जेव्हा सामनेवाले यांचे कामगार वॉशींग मशीन दुरुस्ती करुन देत होते तेव्हा त्यातील दोष दुरुस्त झाले नव्हते. वॉशींग मशीन दुरुस्त करताच वॉशींग मशीनमधून पुन्हा पाणी बाहेर येऊ लागले. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.3 यांचे दुकानात व श्री.सर्व्हीसेस यांचे वर्कशॉपमध्ये जाऊन त्यांना वॉशींग मशीन दुरुस्त झालेले नाही असे सांगितले. तक्रारदारांनी दि.30.08.2013 रोजी तक्रार क्र.11385074, दि.25.09.2013 रोजी तक्रार क्र.11545500, दि.23.11.2013 रोजी तक्रार क्र.11912535 आय.एफ.बी.कंपनीकडे टोल फ्री नंबरवरुन तक्रारीं नोंदविल्या. तक्रारदारांनी सदरहू वॉशींग मशीन सामनेवाले क्र.3 यांना सांगितले असता, सामनेवाले क्र.3 यांनी सदर वॉशींग मशीनमधील काही पार्ट उपलब्ध होऊ शकत नसलेने वॉशींग मशीन दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे वॉशींग मशीन तक्रारदारांना वापरता येत नसलेने पडून राहिले आहे. सदरहू वॉशींग मशीन ऑगस्ट, 2013 पासून विनावापर नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याने सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी कोणतीही तसदी घेऊन तक्रारदाराला मशीन दुरुस्त करुन दिलेले नाही व वॉशींग मशीन दुरुस्त होणार नाही याची खात्री सामनेवाले क्र.1 ते 3 यांना आहे. म्हणून तक्रारदारांन सामनेवाले क्र.1 ते 3 यांना दि.19.03.2014 रोजी वकीलामार्फत रजिस्टर नोटीस पाठवून वॉशींग मशीन बदलून नवीन दयावे किंवा वॉशींग मशीनची किंमत रक्कम व्याजासह तक्रारदारांना परत करावी म्हणून मागणी केली. सबब, तक्रारदारांनी सदरहू मंचात तक्रार दाखल करुन तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन मिळावी तसेच सामनेवाले क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदारांना विक्री केलेले वॉशिंग मशीन नादुरुस्त झालेने नवीन वॉशींग मशीन बदलून दयावे वा नवीन देणे शक्य नसलेस खरेदी किंमत रु.33,500/-, 12 टक्के व्याजासह सामेनवाले क्र.1 ते 4 यांचेकडून वसुल होऊन मिळावेत तसेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.25,000/- तक्रारदारांना सामनेवाले यांचेकडून मिळावेत अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
4 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 11 कागदपत्रे दाखल केलेली असून ती अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 यांचे दुकानातून सामनेवाले क्र.1 कंपनीचे वॉशींग मशीन विकत घेतलेची पावती, एच.सी.उबेराय अॅन्ड कंपनी यांनी दिलेली पावती रु.33,500/-, वॉरंटी रिपोर्ट, तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 ते 3 यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाले क्र.1 यांची उलट पोहोचपावती, सामनेवाले क्र.3 यांची उलटपोहोच पावती, सामनेवाले क्र.4 यांना तक्रारदाराने वकीलामार्फत पाठविलेली रजि.पोस्टाची नोटीस, श्री.सर्व्हीसेस सामनेवाले क्र.1 साठी दुरुस्त काम करत असलेची पावती, वॉशींग मशीनचे माहितीपत्रक तसेच तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, इत्यादी कादगपत्रे तक्रार अर्जासोबत जोडलेली आहेत.
5 दि.27.11.2014 रोजी सामनेवाले यांनी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे अंतर्गत चालणेस अपात्र आहे. सदरचे तक्रारीस मुदतीची बाधा येते. वॉरंटीमधील कलम-10 प्रमाणे कलकत्ता कोर्टाचे अधिकारक्षेत्रात सदरची तक्रार येत असलेने मा. मंचास सदरची तक्रार चालणेस अपात्र आहे. तक्रारदारांचे तक्रारीतील कलम-1, 2 व 3 मधील सर्व कथने साफ, चुकीचे असून सामनेवाले यांना मान्य व कबुल नाही. दि.17.10.2010 ते ऑगस्ट, 2013 पर्यंत सदरचे वॉशींग मशीन चांगलया अवस्थेत होते. वॉरंटी कालावधीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा पुरविलेली नाही. याबाबत, तक्रारदारांची तक्रार नाही. सदरचे वॉशींग मशीन योग्य प्रकारे दुरुस्त करुन तक्रारदारांचे घरी बसविले आहे. परंतु सामनेवाले यांचेकडून नवीन वॉशींग मशीन घेण्याचे उद्देशाने दुरुस्त वॉशींग मशीन घेणेचे नाकारलेले आहे. वॉरंटी कालावधीप्रमाणे तक्रारदारांनी सदरचे मशीन 3 वर्षे पुर्णपणे वापरले असून त्यानंतर रिफंडची मागणी केलेली आहे. सामनेवाले हे आतापर्यंत तक्रारदारांना सदरचे मशीन दुरुस्त करुन देणेस तयार आहेत. परंतु तक्रारदार हे सदरचे वॉशींग मशीन सामनेवाले यांना दुरुस्ती करुन देणेसाठी सदरचे वॉशींग मशीन देत नाहीत. त्यामध्ये सामनेवाले यांची कोणतीही चुक नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार ही सदर मंचास चालणेस पात्र नसलेने तक्रार नामंजूर करणेत यावी.
6 सामनेवाले यांनी दि.03.06.2015 रोजी सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दि.29.10.2014 रोजी पाठविलेल्या पत्राची पत्र दाखल केलेली आहे.
7 तक्रारदारांचा तक्रार अर्ज, सामनेवाले यांची कैफियत/म्हणणे व उभय पक्षकारांनी दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र व उभय पक्षकारांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद यांचा विचार करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे वॉशिंग मशीनची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
4 | आदेश काय ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा:-
मुद्दा क्र.1:- तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून दि.17.10.2010 रोजी अॅटोमॅटीक वॉशिंग मशीन आय.एफ.बी.कंपनीचे खरेदी केलेले होते. सदरचे मशीनची वॉरंटी कालावधी 4 वर्षोचा होता. सदरचे वॉशींग मशीन दि.17.10.2010 ते ऑगस्ट, 2013 पर्यंत उत्तम चालले. परंतु त्यानंतर, सदरचे वॉशींग मशीनमध्ये घातलेले पाणी, वॉशींग मशीन सुरु केल्यानंतर बॉडी व अॅटोमॅटीक कंट्रोल बोर्डमधून बाहेर येऊ लागले. सदरचे मशीनबाबत वेळोवेळी दुरुस्ती करणेकरता, सामनेवाले यांना कळविले असता, सदरचे वॉशींग मशीन दुरुस्त करुन देखील वॉशींग मशीनमधील दोष दुरुस्त झालेले नाहीत. अखेर वॉशींग मशीनमधील काही पार्ट काम करत नसलेने व सदरचे पार्टस उपलब्ध होऊ शकत नसलेने सदरचे वॉशींग मशीन तक्रारदारांना आजतागायत वापारता आलेले नाही. सबब, तक्रारदारांनी सामनेवाले यांना वेळोवेळी कळवून देखील नोटीस पाठवून देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदरचे वॉशींग मशीन बदलून न देऊन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? हा वादाचा मु्द्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने या मंचाने तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडून सामनेवाले क्र.1 या कंपनीचे दि.17.10.2010 रोजी रक्कम रु.33,500/- इतक्या रक्कमेस सदरचे वॉशींग मशीन खरेदी केलेची पावती दाखल आहे. अ.क्र.3 ला वॉरंटी रिपोर्ट दाखल असून सदर वॉरंटी रिपोर्टचे या मंचाने अवलोकन केले असता, During 48 months from the date of purchase of the new angular washing machine, all the parts of the angular washing machine which prove to be defective in workmanship and / or materials shall be replaced or repaired free of charge on intimation to the Company/ company’s authorized service centre असे नमुद आहे. अ.क्र.4 ला तक्रारदारांनी दि.19.03.2014 रोजी वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसीची प्रत दाखल केलेली आहे. वरील सर्व कागदपत्रांवरुन, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदरचे वॉशींग मशीन खरेदी केलेले होते व सदरचे वॉशींग मशीन वॉरंटीचे कालावधीमध्ये असताना, सामनेवाले यांना सदरचे वॉशींग मशीनमध्ये पूर्णपणे बिघाड झालेचे कळविले होते हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच तक्रारदारांने त्यांचे पुराव्याचे शपथपत्रांमध्ये, तक्रारदारांनी दि.30.08.2013 रोजी तक्रार क्र.11385074, दि.25.09.2013 रोजी तक्रार क्र.11545500, दि.23.11.2013 रोजी तक्रार क्र.11912535 आय.एफ.बी.कंपनीकडे टोल फ्री नंबरवरुन तक्रारीं नोंदविल्या. तक्रारदारांनी सदरहू वॉशींग मशीन सामनेवाले क्र.3 यांना सांगितले असता, सामनेवाले क्र.3 यांनी सदर वॉशींग मशीनमधील काही पार्ट उपलब्ध होऊ शकत नसलेने वॉशींग मशीन दुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे वॉशींग मशीन तक्रारदारांना वापरता येत नसलेने पडून राहिले आहे असे नमुद केलेले आहे.
सामनेवाले यांनी त्यांचे म्हणणेमध्ये, दि.17.10.2010 ते ऑगस्ट, 2013 पर्यंत सदरचे वॉशींग मशीन चांगल्या अवस्थेत होते. वॉरंटी कालावधीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना सेवा पुरविलेली नाही. याबाबत, तक्रारदारांची तक्रार नाही. सदरचे वॉशींग मशीन योग्य प्रकारे दुरुस्त करुन तक्रारदारांचे घरी बसविले आहे. परंतु सामनेवाले यांचेकडून नवीन वॉशींग मशीन घेण्याचे उद्देशाने दुरुस्त वॉशींग मशीन घेणेचे नाकारलेले आहे. वॉरंटी कालावधीप्रमाणे तक्रारदारांनी सदरचे वॉशींग मशीन 3 वर्षे पुर्णपणे वापरले असून त्यानंतर रिफंडची मागणी केलेली आहे. सामनेवाले हे आतापर्यंत तक्रारदारांना सदरचे वॉशींग मशीन दुरुस्त करुन देणेस तयार आहेत. परंतु तक्रारदार हे सदरचे वॉशींग मशीन सामनेवाले यांना दुरुस्ती करुन देणेसाठी सदरचे वॉशींग मशीन देत नाहीत. त्यामध्ये सामनेवाले यांची कोणतीही चुक नाही असे नमुद केले आहे. तथापि सामनेवाले क्र.1 यांनी दि.29.10.2014 रोजी तक्रारदारांना पाठविलेल्या पत्राची प्रत मंचात दाखल केलेली आहे. सदर पत्राचे या मंचाने अवलोकन केले असता, However, there was complaint of water leakage which we are unable to plug and feel the hose pipe needs replacement. Since the supply of right quality of hose pipe is taking some time from our vendor and as you are one of our valued customers, we have as a very special case decided to refund the amount of the machine.
वरील सर्व कागदपत्रांचे व सामनेवाले यांचे म्हणणे व दाखल पत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता, तक्रारदाराने सदरचे वॉशिंग मशीन सामनेवाले यांचेकडून खरेदी केलेले असून सदरच्या वॉशींग मशीनमध्ये दोष असल्याचे व सदरच्या वॉशींग मशीनची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना दयावयाचे दि.29.10.2014 रोजीच्या पत्राने मान्य व कबुल केले आहे. तथापि सदर वॉशींग मशीनमध्ये दोष असताना देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदरचे वॉशींग मशीन वॉरंटी कालावधीमध्ये असतानादेखील तत्परतेने बदलून दिले नाही अथवा तक्रारदारांनी पाठविलेल्या नोटीसीस उत्तर दिले नाही व तक्रारदारांनी कंपनीकडे दि.30.08.2013, दि.25.09.2013 व दि.23.11.2013 रोजीच्या तक्रारीं टोल फ्री नंबरवरुन नोंदविल्या असताना देखील त्या तक्रारींची योग्य ती दखल घेतलेली नाही. कोणत्याही उत्पादनाची विक्री करत असताना विक्री पश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी Privity of Contract या तत्वानुसार विक्रेत्याची असते. तसेच सदरची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करण्यापुरती मर्यादीत नुसार विक्री पश्चात सेवा देण्याची असते. त्याकारणाने, सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी वॉशींग मशीनची सेवा वॉरंटी कालावधीमध्ये असताना देखील, तक्रारदारांना योग्यती सेवा वेळेत न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3 :- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, तक्रारदारांना सामनेवाले यांना वेळोवेळी कळवून देखील सदरचे सदोष वॉशींग मशीन बदलून दिेलेले नाही अथवा तक्रारदारांचे नोटीसीस उत्तर देखील दिलेले नाही. त्याकारणाने, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून सदरचे वॉशींग मशीनची रक्कम रु.33,500/- व सदर रक्कमेवरती तक्रार दाखल तारखेपासून दि.16.07.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदरचे सदोष वॉशिंग मशीन वेळेत बदलून न दिलेने तक्रारदारांस मानिसक त्रास झाला व सदरची तक्रार मंचात दाखल करावी लागली. त्याकारणाने तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4:- सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना सदरचे वॉशिंग मशीनची एकूण रक्कम रु.33,500/- (अक्षरी रुपये तेहतीस हजार पाचशे फक्त) व सदर रक्कमेवरती तक्रार दाखल दि.16.07.2014 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.9% प्रमाणे व्याज अदा करावे.
3 सामनेवाले क्र.1 ते 4 यांनी संयुक्तिक तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त ) अदा करावेत.
4. वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून सामनेवाले यांनी 30 दिवसांचे आत पूर्तता करावी.
5. सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.