जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.27/2008. प्रकरण दाखल दिनांक – 04/01/2008. प्रकरण निकाल दिनांक – 07/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.माधव पि.शंकरराव कल्हाळे, अर्जदार. वय वर्षे 35, व्यवसाय नौकरी, रा.कल्हाळी,पोष्ट रुई ता.कंधार जि.नांदेड. हल्ली मुक्काम गोपाळचावडी,सिडको,नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, आय.डी.बी.आय.बँक(युनायटेड वेस्टर्न बँक), गैरअर्जदार. आरटी नाईक बिल्डींग, मु.पो.कुरुळा ता.कंधार जि.नांदेड. 2. शाखाधिकारी, न्यु.इंडिया इंशुरन्स कंपनी लि, लाहोटी कॉम्प्लेक्स, प्रभात टॉकीज जवळ,नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.आर.एम.डावरे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - अड.आर.एम.कनकदंडे. गैरअर्जदार क्र.2 - एकतर्फा. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार श्री.माधव शंकरराव कल्हाळे यांची थोडक्यात तक्रार अशी की, उधव शंकरराव पाटील हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत. उध्दव शंकरराव पाटील हे कर्जदार असुन अर्जदार हे सहकर्जदार आहेत त्यांनी व आय.डी.बी.आय.बँ (युनायटेड वेस्टर्न बँक) कडुन रक्कम रु.54,000/- दि.20/11/2003 रोजी कर्ज घेतले. त्यानंतर उध्दव शंकरराव पाटील यांचे नांवे थ्री व्हीलर पॅसेंजर ऑटो दि.20/11/2003 रोजी खरेदी केले त्याचा क्रमांक एमए-26/जी-1564 असा आहे. उध्दव शंकरराव पाटील हे सदरील ऑटोचे मालक आहेत. त्यांनी कर्जाच्या रक्कमेची नियमीतपणे परतफेड करीत आहेत. सदरील ऑटोचा विमा दि.20/11/2003 ते दि.19/11/2004 या कालावधीत करीता आर.सी.बुक प्रमाणे काढण्यात आले. उध्दव शंकरराव पाटील यांनी सन2004-05 या कालावधीसाठी दि.02/12/2003 रोजी पहिला विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर काढली तसेच 2005-06,2006-07 या कालावधीचे पॉलिसी सुध्दा काढली. गैरअर्जदार यांनी आर.सी.बुक न पहाता सन 2004-05 चे विमा पॉलिसी उध्दव पाटील यांचे नांवे पॉलिसी न काढता अर्जदार यांचे नांवाने चुकीची पॉसिली काढली. तसेच सन 2004-05, 2005-06 आणि 2006-07 या कालावधीसाठी सुध्दा गाडी मालकाच्या नांवे पॉलिसी न काढता अर्जदार यांचे नांवे पॉलिसी काढली. अर्जदाराने दि.03/03/2007 रोजी गैरअर्जदार यांना अर्ज देवुन वरील पॉलिसीची रक्कम वर्ग करुन दुहेरी विमा रक्कम भरण्यात आलेली परत करण्यात यावी अशी विनंती केली असता त्यांनी दंड वजा जाता रु.1,467/- परत केली. दि.15/03/2007 रोजी बँकेकडे अर्ज करुन चुकीच्या नांवाने विमा काढल्याबद्यल विम्याची रक्कम परत मिळण्यावी या करीता विनंती केली परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अर्जदाराची विनंती आहे की, अर्जदाराच्या नांवे भरलेली चुकीची विमा रक्कम रु.3,855/- व्याजासह रु.5,000/- मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल रु.5,000/- आणि सेवेत निष्काळजीपण केल्याबद्यल रु.5,000/- इतर खर्च रु.1,500/- असे एकुण रु.16,500/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. सदरील प्रकणांत गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, माधव शंकर कल्हाळे हेच मुख्य कर्जदार आहेत तसेच त्यांचे सोबत उध्दव कल्हाळे हे सुध्दा कर्जदार आहेत. गैरअर्जदारास विम्याची रक्कम परत देणेबाबत दिलेली माहीती मान्य आहे. सदर प्रकरण अर्जदार/कर्जदार यांनी केले असल्यामुळे व बँकेने कर्ज संयुक्तरित्या दिले असल्यामुळे ती दोघांनी दाखल करणे आवश्यक आहे. सबब ही तक्रार आवश्यक व्यक्तिस पार्टी न केल्यामुळे खारीज करावी. अर्जदार स्वतःचे पगारीतुन महीना हप्ता भरण्याचे आश्वासन देऊन ऑटो घेण्या करीता संयुक्तरित्या अर्ज केला त्यानंतर बँकेने अर्जदारास स्वतःच्या नांवे ऑटो घेण्या करीता कर्ज मंजुर केले. त्यानंतर अर्जदाराने बँकेस न कळविता ऑटो उध्दव कल्हाळे यांचे नांवे खरेदी केला. बँकेच्या नियमानुसार वाहन खरेदी केल्यानंतर सदरील वाहनाचा विमा अर्जदाराने स्वतः काढुन बँकेत देणे क्रमप्राप्त असतांना अर्जदाराने तसे केले नाही. त्यामुळे बँकेने तीची जोखीम म्हणुन बँकेच्या तरतुदीनुसार सदरील वाहनाचा विमा अर्जदार हा बॅकेचे कर्जदार असल्यामुळे काढला. अर्जदाराने बँकेस त्रास देण्याचे हेतुने सदरील प्रकरण दाखल केलेले आहे. सदरील विम्याची रक्कम एक वर्षाची बॅकेने विमा कंपनीशी तडजोड करुन परत केली आहे. तसेच अर्जदाराचे नांवे काढलेली पॉलिसी त्यांच्या म्हणण्यानुसार उध्दव पाटील यांचे नांवे बदलुन सुध्दा दिली आहे. आता अर्जदार मागील दोन वर्षाखालील रक्कम मागत आहेत, तो विमा कंपनीकडुन मागु शकतो. अर्जदाराच्या नांवे आर.सी.बुक नाही तो गाडीचा मालक नाही तर त्याला प्रस्तुत तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही. अर्जदाराने स्वतः पॉलिसी काढली नसुन ती उध्दव पाटील यांनी काढलेल्या पॉलिसीबद्यल अर्जदाराची तक्रार बेकायदेशिर होते. अर्जदाराने न कळवल्यामुळे बँकेने दिलेले कर्ज सुरक्षीत रहावे म्हणुन सदर वाहनाचे ईन्शुरन्स काढले होते ज्या वेळेस अर्जदाराने कळवले त्यावेळेस ताबडतोब सदरील रक्कम बॅकेने अर्जदारास परत केली आहे. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की,अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचा तर्फे नोटीस पाठविण्यात आली. त्यांनी नोटीस घेण्यास इन्कार केल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन पुढे चालविण्यत आले. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत यादीप्रमाणे कागपत्र,शपथपत्र दाखल केलेले आहेत. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी अर्जासोबत अर्ज त्यांचे कर्ज खाते उतारा दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये अर्जदारांच्या अर्जातील ग्राहक असल्याचे बाब अमान्य केलेले नाही याचा विचार होता व अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - अर्जदार यांच्या अर्जातील कथनानुसार उध्दव शंकरराव पाटील हे कर्जदार असुन अर्जदार हे सहकर्जदार आहेत. गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन कर्ज घेऊन उध्दव शंकरराव पाटील यांचे नांवे बजाज थ्री व्हिलर पॅसेंजर ऑटो दि.20/11/2003 रोजी खरेदी केलेला आहे. त्याप्रमाणे आर.सी.बुकावर त्याची नोंद आहे. आर.सी.बुकावर असणा-या नोंदीप्रमाणे विमा पॉलिसी उध्दव शंकरराव पाटील यांच्या नांवे काढण्यात आली होती. गैरअर्जदार क्र. 1 यांनी सन 2004-05, 2005-06, 2006-07 या कालावधीसाठी निष्काळजीपणाने आर.सी. बुकाप्रमाणे गाडी मालकाच्या नांवे विमा काढण्या ऐवजी अर्जदार यांच्या नांवे काढलेला आहे ही बाब अर्जदार यांनी दाखल केलेल्या विमा पॉलिसीवरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना याबाबत विचारणा केले वरुन गैरअर्जदार क्र. 2 यांनी सन 2006-07, ची विम्याची रक्कम दंड वजा जाता रु.1,467/- परत दिलेली आहे, ही बाब गैरअर्जदार क्र.1 यांच्या दि.11/09/2007 चे पत्रावरुन स्पष्ट होत आहे, याचा विचार होता गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांचे नांवे सन 2004-05, 2005-06, 2006-07 या कालावधी करीता चुकीचा विमा उतरविलेला होता, ही बाब स्पष्ट झालेली आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांनी तसे अर्जदारांना पत्रावरुन कळविलेले आहे ते पत्र अर्जदाराने या अर्जासोबत मंचामध्ये दाखल केलेले आहे म्हणजे गैरअर्जदार क्र. 1 यांनी सेवा देण्यामध्ये अर्जदारांना त्रुटी केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञालेख, गैरअर्जदारा तर्फे अड. आर.एन.कनकदंडे यांनी केलेला युक्तीवाद, गैरअर्जदारांचा लेखी म्हणणे, शपथपत्र त्यांचा युक्तीवाद याचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश आजपासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकत्रीतरित्या व वैयक्तिकरित्या अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा द्यावेत. 1. विमा पोटी घेतलेली रक्कम रु.3,885/- द्यावेत. सदर रक्कमेवर दि.19/11/2005 प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत 9 टक्के व्याज दराने द्यावे. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.1,500/- व दावा खर्चाबद्यल रु.1,000/- द्यावे. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) गो.प.निलमवार. लघुलेखक. |