श्री.नरेश बनसोड, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/12/2011)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार विरुध्द दाखल केलेली असून, मागणी केली आहे की, अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन रक्कम कपात केली असे घोषित करावे, बेकायदेशीरपणे कपात केलेली रक्कम मिळावी, मानसिक त्रासापोटी भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा.
2. गैरअर्जदार क्र. 1 ही गैरअर्जदार क्र. 2 ची मुख्य शाखा आहे. युनायटेड वेस्टर्न बँक लिमि. ही गैरअर्जदार बँकेत 30 सप्टेंबर 2006 पासून विलीन झालेली आहे. तक्रारकर्तीचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते क्र. 58410010008347 असून सदर खात्यातून गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस न कळविता बेकायदेशीररीत्या दि.13.05.2009 पासून 10.07.2010 पर्यंत एकूण रु.3,063/- कपात केले. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिच्या खात्यात रु.500/- चे वर रक्कम असतांनाही व तिने धनादेश पुस्तिका घेतलेली नसतांना तिला लेखी सूचना न देता, सदर कपात करण्यात आलेली आहे. गैरअर्जदाराचे म्हणण्याप्रमाणे जानेवारी 2008 मध्ये ग्राहकांना वैयक्तीक माहिती देण्यात आली होती व 28.01.2008 ते 30.06.2008 पर्यंत बँकेत सुचनापत्र प्रदर्शित केल्याचे म्हटले आहे. ज्या ग्राहकांनी 29.02.2008 पर्यंत गैरअर्जदार बँकेला योग्य प्रतिसाद दिला नाही, त्यांचे खाते Sabka A/c (AQB Rs.500/-) or super saving A/c (AQB eqial to or above Rs.5000/-) मध्ये स्थानांतरीत केल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे, परंतू तक्रारकर्तीला पूर्वसुचना देऊन, त्याबाबत समजावून सांगणे गरजेचे होते. गैरअर्जदारांनी तसे न करता सरळ बचत खात्यातून रक्कम कपात केली आहे. तक्रारकर्त्याने याबाबत गैरअर्जदारांना पत्राद्वारे विचारणा केली असता, दिलेल्या उत्तरासोबत नविन माहितीचे विवरण जोडून त्यासोबत डिक्लेरेशन फॉर्म पाठवून, त्यावर तक्रारकर्तीने सही करुन पाठविण्याबाबत विनंती केली. जेणेकरुन, तिचे खाते ते अपग्रेड व डाऊनग्रेड करतील. तक्रारकर्तीच्या मते गैरअर्जदार बँक, रीझर्व बँक ऑफ इंडिया यांनी जाहिर केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करीत आहे व ग्राहकांना त्रुटीपूर्ण सेवा देत आहे. आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्तीने एकूण 5 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
3. गैरअर्जदारांना सदर तक्रारीची नोटीस पाठविण्यात आली असता, त्यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने दि.25.08.2011 रोजी गैरअर्जदाराविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला व सदर प्रकरण युक्तीवादाकरीता ठेवण्यात आले असता तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांमार्फत ऐकण्यात आला. तसेच प्रकरणात दाखल दस्तऐवजांचे मंचाने सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. तक्रारकर्तीचे गैरअर्जदार बँकेत बचत खाते असल्यामुळे ती त्यांची ग्राहक ठरते. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त होऊनसुध्दा, ते गैरहजर राहीले व लेखी उत्तरसुध्दा दाखल केले नाही व 25.08.2011 ला पुकारा केला असता गैरअर्जदार गैरहजर असल्यामुळे तक्रारीमध्ये एकतर्फी कारवाई चालविण्यात आली.
5. तक्रारकर्तीचे विस्तृत कथन हे गैरअर्जदारास मान्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदाराने 01.04.2011 चे पत्राद्वारे युनायटेड वेस्टर्न बँक लिमि. ही गैरअर्जदार बँकेत 30 सप्टेंबर 2006 पासून विलीन झालेली आहे मान्य केले आहे. ही वस्तूस्थिती असतांना गैरअर्जदाराने 28.01.2008 ते 30.06.2008 पर्यंत सुचनापत्र प्रदर्शित केल्याचे नमूद केले आहे. जे की, पूर्णतः खोडसाळ स्वरुपाचे व असंयुक्तीक आहे. कारण बँक 30.09.2006 ला विलीन झाल्यानंतर व त्यानंतर त्वरितच सदर बाब तक्रारकर्तीच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. गैरअर्जदाराने नमूद केले कि, 28.01.2008 ते 30.06.2008 पर्यंत सुचनापत्र प्रदर्शित केले असे म्हटले, परंतू 01.04.2011 च्या पत्रासोबत सुचनापत्राची प्रत दाखल केली नाही. त्यामुळे गैरअर्जदाराच्या पत्रातील कथन पूर्णतः खोळसाळ स्वरुपाचे ठरते. गैरअर्जदाराने 28.01.2008 ते 30.06.2008 पर्यंत सुचनापत्र प्रदर्शित केल्याचे नमूद केले असून, ज्या ग्राहकांनी 29.08.2008 पर्यंत गैरअर्जदारास प्रतिसाद दिला नाही, त्याचे खाते Sabka A/c (AQB Rs.500/-) or super saving A/c (AQB eqial to or above Rs.5000/-) मध्ये स्थानांतरीत केल्याचे गैरअर्जदाराचे म्हटले आहे. हेसुध्दा गैरअर्जदाराचे पत्रातील कथन पूर्णतः खोडसाळ स्वरुपाचे आहे, कारण की, गैरअर्जदाराने सुचनापत्र 30.06.2008 पर्यंत दाखल केल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदारास त्याच्या पत्रातील नमूद केल्याप्रमाणे बचत खाते एकतर Sabka A/c (AQB Rs.500/-) मध्ये स्थानांतरीत केल्याचे नमूद होते. तक्रारकर्तीचे खाते super saving A/c (AQB eqial to or above Rs.5000/-) मध्ये स्थानांतरीत का केले व Sabka A/c (AQB Rs.500/-) मध्ये का स्थानांतरीत केले नाही याचे काहीही स्पष्टीकरण 01.04.2011 चे पत्रात आढळून येत नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारीचे परिच्छेद क्र. 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीचे खात्यातील रु.3,063/- ची कपात करण्यात आली आहे व ती गैरकायदेशीर असल्यामुळे कपात केल्याचे तारखेपासून तक्रारकर्तीचे खात्यात जमा करेपर्यंत बचत खात्यास लागू असलेल्या व्याज दरानुसार तक्रारकर्त्याचे खात्यात जमा करणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
6. गैरअर्जदाराने 01.04.2011 पत्रासोबत महत्वाचे विवरण देऊन डिक्लेरेशन फॉर्मवर स्वाक्षरी करुन पाठविण्याची विनंती केली. त्यावरुन गैरअर्जदाराद्वारे केलेली कपात योग्य होती असे गृहित धरता येत नाही आणि त्यावरुन मागिल कृतीची पुष्टी होत नाही. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट झाले की, तक्रारकर्तीचा काही दोष नसतांना गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटीमुळे व अवलंबिलेली अनुचित व्यापार प्रथेमुळे तक्रारकर्तीस मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्तीस रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहें.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीची बचत खात्यातील कपात केलेली रक्कम रु.3,063/- ही कपात केल्याचे तारखेपासून तक्रारकर्तीचे खात्यात जमा करेपर्यंत बचत खात्यास लागू असलेल्या व्याज दरानुसार तक्रारकर्तीचे खात्यात जमा करावी.
3) तक्रारकर्तीस गैरअर्जदाराने मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्तीस रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे एक महिन्याचे आत करावी.