द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 15 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांना जाबदेणार क्र.3 – कडा सहकारी साखर कारखाना लि. यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांचा धनादेश क्र. 103814 दिनांक 30/9/2000 रक्कम रुपये 11,500/- दिला होता. तक्रारदारांनी सदरहू धनादेश युनायटेड वेस्टर्न बँक, पुणे शाखा वर्ग झाल्यानंतर आय डी बी आय बँकेत दिनांक 9/10/2000 रोजी भरला. परंतू धनादेशाची रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा झाली नाही. जाबदेणार क्र.1 यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांना दिनांक 13/12/2000 रोजी पत्र पाठविले, तसेच तक्रारदारांना दिनांक 20/3/2001 रोजी पत्र पाठविले. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.3 यांना दिनांक 30/3/2001 रोजी पत्र पाठवून डिमांड ड्राफट ची मागणी करुनही उपयोग झाला नाही. दिनांक 30/3/2001 च्या पत्रान्वये तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांना पत्र पाठवून मुळ धनादेश परत मिळण्याची विनंती केली अथवा रुपये 11,500/- व्याजासह मिळावेत अशी मागणी केली. जाबदेणार 2 – प्रोफेशनल कुरिअर यांनी नमूद धनादेश टपाल प्रवासात गहाळ झाल्याचे दिनांक 12/4/2001 च्या पत्रान्वये जाबदेणार क्र.1 यांना कळविले. जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 17/4/2001 च्या पत्रान्वये तक्रारदारांच्या निदर्शनास सदरहू बाब आणली. नंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वारंवार धनादेशासंदर्भात पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून धनादेशाची रक्कम रुपये 11,500/-, व्याजापोटी रुपये 5865/-, पुढील 18 टक्के व्याज, नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/-, नुकसानीपोटी रुपये 3,40,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश मंचाने पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार क्र.1 यांच्या दिनांक 20/3/2001 पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांच्याबँकेत बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा भरलेला धनादेश, जाबदेणार क्र.1 यांनी प्रोफेशनल कुरिअर-जाबदेणार क्र.2 मार्फत दिनांक 11/10/2000 रोजी सदर बँकेकडे पाठविला होता. यासदंर्भात जाबदेणार क्र.1 यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिनांक 23/11 व 13/12/2000 रोजी स्मरणपत्रे देखील पाठविली होती, तथापि धनादेशाची वसूली झालेली नसल्याचे तक्रारदारांना कळविण्यात आले होते असे निदर्शनास येते. जाबदेणार क्र.2 यांनी जाबदेणार क्र.1 यांना पाठविलेल्या दिनांक 12/4/2001 च्या पत्राचे अवलोकन केले असता त्यात “Con. No.172649, dt. 9/10/2000 Consignee- M/s. Beed Dis. Co.Op. Bank Ltd. Koda Branch, Dis. Beed—We are extremely sorry to submit that your consignment sent from our Pune Office for delivery is presumed to be missing during transit.” असे नमूद केल्याचे निदर्शनास येते. जाबदेणार क्र.2 यांनी सदरहू धनादेश त्यांच्याकडून गहाळ झाल्याचे मान्य केलेले आहे. जाबदेणार क्र.1 ही एक अग्रगण्य बँक असून धनादेश क्लिअरिंग साठी पाठवितांना त्यांनी आवश्यक ती काळजी घेतलेली नसल्याचे स्पष्ट होते. तसेच जाबदेणार क्र.2 यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेली कन्साईनमेंट डिलीव्हर करतांना निष्काळजीपणा केलेला दिसून येतो. जाबदेणार क्र.3 यांच्याकडे तक्रारदारांना उपरोक्त धनादेशाची रक्कम प्राप्त न झाल्याचे कळवून देखील त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीची दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. यासर्वांवरुन जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांच्या सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा सिध्द होतो. तक्रारदारांना यामुळे निश्चितच शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 15000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून व्याजापोटी रुपये 5,865/- व पुढील 18 टक्के दराने व्याजाची मागणी केलेली आहे, तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व रुपये 3,40,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू ही मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा 2000 DGLS 1448 चरणसिंह विरुध्द हिलींग टच हॉस्पिटल चा आधार घेतला. सदरहू निवाडयात नमूद केल्याप्रमाणे “It is for the Consumer Forum to grant compensation to the extent it finds it reasonable, fair and proper in the facts and circumstances of a given case according to established judicial standards where the claimant is able to establish his charge.”
तक्रारदारांनी दाखल केलेल्या मा. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग, नवी दिल्ली यांच्या तक्रार क्र.82/2006 अतूल नंदा व इतर विरुध्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा निवाडा प्रस्तूत प्रकरणी लागू पडतो असे मंचाचे मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.