(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 17/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.06.06.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार तो चार्टड अकाऊंटन्ट म्हणून कार्यरत आहे व त्याची पत्नी युनायटेड वेस्टर्न बँक लिमीटेड, धरमपेठ शाखेमधे दि.23.04.2004 पासुन संयुक्बत बचत खातेधारक होते. सन 2009 साली सदर बँकेचे आय.डी.बी.आय. बँक लिमीटेड बरोबर विलीनीकरण झाले त्यामुळे सदर बँकेचे सर्व खाते आय.डी.बी.आय. बँकेला हस्तांतरण करण्यांत आले. त्यानंतर आय.डी.बी.आय.बँक लिमीटेड, धरमपेठ शाखेने तक्रारकर्त्याच्या नवीन बचत खात्याचा नवीन क्र.54310010015361 निर्गमीत केला.
3. तक्रारकर्ता क्र.1 यांनी आपल्या नागपूर सहकारी बँक लिमीटेड, धरमपेठ शाखा, नागपूर येथील खात्याचा रु.75,000/- चा धनादेश क्र.163853 स्वतःचे नावे निर्गमीत करुन गैरअर्जदार क्र.2 बँकेमधे जमा केला. सदर धनादेशाची रक्कम दि.23.02.2010 तक्रारकर्त्याच्या सदर खात्यात जमा झाला, त्या दिवशी एकूण जमा रक्कम रु.77,061/- एवढी होती.
4. तक्रारकर्त्याने त्याचे नियमीत प्रिमीयम भरण्याकरीता गैरअर्जदारांकडे असलेल्या खात्याचे रु.25,000/- चे दोन धनादेश अनुक्रमे 085981 आणि 085982, LIC of India च्या नावाने निर्गमीत केले. तक्रारकर्त्याला त्याचे एजंट कडून सदरचे धनादेश अनादरीत झाल्याचे कळले. तक्रारकर्त्याने संबंधीत बाबींविषयी गैरअर्जदारांशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलेही समाधानकारक माहिती दिली नाही. गैरअर्जदारांच्या कृतिचा विचार करता विचार करुन तक्रारकर्त्यांनी दि.19.03.2010 रोजी आपल्या खात्यातून रु.75,000/- उचलुन घेतले. त्यातील LIC of India यांनी दि.16.03.2010 रोजीच्या पत्रान्वये गैरअर्जदारांनी सदरचे धनादेश “Dormant a/c” या कारणास्तव अनादरित केल्याची सुचना दि.26.08.2010 रोजी तक्रारकर्त्याला देऊन धनादेश परत केले व त्यांच्या सुचनेनुसार तक्रारकर्त्याने रु.330/- बँक चार्जेसपोटी LIC of India कडे भरले.
5. वास्तविक सदरचे धनादेश गैरअर्जदार क्र.2 कडे दिले त्यावेळी तकारकर्त्याच्या बचत खात्यात रु.77,061/- एवढी रक्कम जमा होती असे असतांना देखिल गैरअर्जदार क्र.2 यांनी धनादेश अनादरीत केले. त्यामुळे तक्रारकर्त्याला विनाकारण रु.330/- चा भुर्दंड सोसावा लागला, खात्यात पुरेशी रक्कम असतांना धनादेश अनादरीत करुन पाठविले त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर बँकेचे खातेपुस्तक अद्यावत (अपडेट) करुन घेतले, तेव्हा त्यात सदर धनादेशाची नोंद मिळाली नाही. वास्तविक धनादेश प्राप्त झाल्याची व अनादरीत झाल्याची त्यात माहिती असणे आवश्यक आहे. गैरअर्जदारांची वरील कृति सेवेतील कमतरता आहे व त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थीक नुकसान तर झाले त्याचबरोबर अब्रुला सुध्दा धक्का पोहचला म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 ने त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे घोषीत करावे, बँक चार्जेसपोटी रु.330/- दि.31.03.2010 पासुन 18% व्याजासह मिळावे, मानसिक,शारीरिक व आर्थीक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.15,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
6. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 6 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदारायांचे कथनानुसार सदरची तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात नाही, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे सदरचे खाते त्यांचेकडे असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य केलेले आहे, परंतु तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. वास्तविक सदर बाबींची चौकशी करुन त्या संबंधात योग्य तो निर्णय घेऊन तो तक्रारकर्त्यास कळविण्यांत येईल असे त्यास सांगण्यात आलेले होते. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी “Dormant A/c”, झाला तो जाणुनबुजून केलेला नसुन तो आर.बी.आय.च्या गाईड लाईन्सनुसार ठरविण्यांत आला. तक्रारकर्त्याला रु.365/- ची नुकसान भरपाई देण्यांस तयार असल्याचे गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्त्यास सांमुनही तक्रारकर्त्याने वेगळी भुमिका घेऊन सदरची तक्रार या मंचात दाखल केली. वास्तविक “Dormant A/c”, आर.बी.आय.च्या गाईड लाईन्स् प्रमाणे मार्क असुन ही सेवेची त्रुटी आहे, असे मानण्यात येत नाही. तरीही गैरअर्जदार तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई दाखल रु.365/- देण्यांस तयार आहे.
वरील सर्व बाबी लक्षात घेता तक्रारकर्त्यानी विनाकारण तक्रार दाखल केली म्हणून ती दंडासह खारिज करावी अशी गैरअर्जदारांनी मंचास विनंती केलेली आहे.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.18.02.2012 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर, मंचाने उभय पक्षांचा त्यांचे वकीलामार्फत युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
8. वरीष्ठ न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निवाडयांचा विचार करता सदरची तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार आहे. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती पाहता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 कडे असलेल्या खात्यचातुन रु.25,000/- चे 04.03.2010 रोजीचे दोन धनादेश क्र.085981 आणि 085982 LIC of India यांचे नावे निर्गमीत करण्यांत आले होते. तसेच दस्तावेज क्र. 3 व 4 वरुन हे ही निदर्शनास येते की, सदरचे धनादेश अनादरीत झाले होते. LIC of India ने दि.26.03.2010 रोजी तक्रारकर्त्यास पाठविलेल्या पत्रामधे सदरचे धनादेश “Dormant A/c”, या शे-यासह परत आल्याचे नमुद केलेले आहे. वास्तविक पाहता तक्रारकर्त्याने दस्तावेज क्र. 2 वर दाखल केलेल्या खाते पुस्तिकेच्या विवरणावरुन तक्रारकर्त्याच्या खात्यात सदर दिवशी रु.77,061/- एवढी रक्कम जमा होती असे असतांना देखील गैरअर्जदारांनी सदरचे धनादेश अनादरीत केले, त्याचप्रमाणे दाखल दस्तावेजावरुन हे ही दिसुन येते की, सदरचे धनादेश अनादरीत झाल्यामुळे तक्रारकर्त्यास LIC of India ला बँक चार्जेसपोटी रु330/- अदा करावे लागले. गैरअर्जदारांनी सुध्दा आपल्या जबाबात “Dormant A/c”, झाल्याचे म्हणणे मान्य केले. परंतु सदर बाब आर.बी.आय.च्या गाईड लाईन्स् नुसार ठरविण्यांत आल्याचे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सदर बँक चार्जेसचे रु.365/- देण्याचे मान्य केले, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आपली चुक कबुल केल्याचे दिसुन येते. वास्तविक पर्याप्त रक्कम असतांना गैरअर्जदारांनी सदरचे धनादेश अनादरीत केले एवढेच नव्हे तर सदरचे धनादेश प्राप्त झाल्याचे व ते अनादरीत झाल्याची नोंद देखील गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे खाते पुस्तिकेत केली नाही. गैरअर्जदारांच्या सदरच्या कृतिमुळे तक्रारकर्त्यास विनाकारण बँक चार्जेसपोटी रु.330/- इतकी रक्कम LIC of India ला अदा करावी लागली. गैरअर्जदारांच्या या सदरच्या कृतिमुळे निश्चितच तक्रारकर्त्या मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला, या करीता सर्वस्वी गैरअर्जदार जबाबदार आहे, करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास रु.330/- परत करावे, सदर रकमेवर दि.31.03.2010 पासुन ते रक्कम अदा होई पर्यंत द.सा.द.शे.12% व्याह द्यावे.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.