तक्रार दाखल दिनांकः 22/07/2009 आदेश पारित दिनांकः 23/11/2009 कोर्ट विद्यमान मा.अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार क्र. : 512/2009 तक्रारकर्ता : श्रीमती सुनिता तेजराम देवतळे, रा. प्लॉट नं.48-ब, एस.डी.हॉस्पीटलचे मागे, गणेश नगर, नागपूर-09. //- विरुध्द -// गैरअर्जदार :1. अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक, आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड, आय.डी.बी.आय.टॉवर, डब्ल्यू.टी.सी.कॉम्प्लेक्स, कॅम्प परेड, मुंबई-400 005. 2. शाखा व्यवस्थापक, आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड, रीटेल असेट सेंटर, गुप्ता हाऊस, तिसरा माळा, सिविल लाईन्स, नागपूर-440 001. तक्रारकर्त्यातर्फे : ऍड. श्री. सुरेश ढोले. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे : ऍड. श्री. अजय आंबेगावकर. गणपूर्ती : 1. श्री. नलिन मजिठीया - अध्यक्ष. 2. श्री.मिलिंद केदार - सदस्य. ( मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलिंद केदार - सदस्य) //- आदेश -// (पारित दिनांक – 23/11/2009) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.कास.च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराने केलेल्या सेवेतील त्रुटीकरीता व तक्रारकर्तीला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीकरीता दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत असे नमूद केले आहे की, तिने गैरअर्जदाराकडून रु.4,00,000/- कर्जाकरीता अर्ज केला व गैरअर्जदाराने तो मंजूर केला. सदर कर्ज तक्रारकर्तीने रॉय उद्योग लिमि. यांच्या गणेशनगर येथील गाळा खरेदी करण्याकरीता घेतले होते. दि.20.02.2005 रोजी प्रथम हप्ता रु.3,00,000/- प्राप्त झाला. ती सदर कर्जाची नियमितपणे परतफेड करीत होती. त्याशिवाय एकमुस्त रक्कमही कर्ज खात्यात भरली असून तक्रारकर्तीकडे 14.05.2009 रोजी रु.22,893/- रक्कम देय होती. पुढे नमूद केले आहे की, सदर कर्ज गैरअर्जदाराने विक्रीच्या करारापोटी दिले होते. सदर विक्रीपत्र गैरअर्जदाराकडे गहाण होते व त्याबाबतसुध्दा तक्रारकर्तीने गैरअर्जदाराना कळविले. परंतू कोणतीही छाननी न करता गैरअर्जदाराने चुकीची नोटीस दि.26.06.2008 रोजी पाठविली. त्यास दि.04.07.2008 रोजी सविस्तर उत्तर पाठविल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गैरअर्जदार तक्रारकर्तीला कारण नसतांना पत्र पाठवित असल्यामुळे तक्रारकर्तीने 04.07.2008 रोजी एक पत्र पाठवून बँकेच्या असभ्य वर्तणुकीबद्दल व खाते बंद करण्याची इच्छा व्यक्त केली. सदर पत्राला गैरअर्जदार बँकेने कधीच उत्तर दिले नसल्याचे तक्रारकर्तीने नमूद केले. पुढे असे नमूद केले की, तिने कंटाळून जेव्हा गैरअर्जदार बँकेस भेट दिली, तेव्हा ‘स्नेहल’ नावाच्या एका स्त्री अधिका-याने खाते बंद करा व रु.22,893/- रक्कम भरा असे सांगितले. बँकेच्या कर्मचा-याने आपले पूर्ण नावाचे ओळख ठेवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिने कर्जाचा भरणा करण्याकरीता शिक्षक सहकारी बँकेचा रु.22,893/- चा धनादेश गैरअर्जदार बँकेस दिला व त्याची पावती घेतली. तक्रारकर्तीने संपूर्ण रक्कम दिल्यानंतरसुध्दा तक्रारकर्तीने जमा केलेले कागदपत्र व धनादेश तिला वेळेवर दिल्या गेला नाही व गैरअर्जदार बँकेच्या कर्मचा-याने तक्रारकर्तीसोबत उध्दट व्यवहार केला, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे व मागणी केली आहे की, कागदपत्रे मिळविण्यासाठी लागलेला खर्च रु.370/-, मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.5,000/-, तसेच अतिरिक्त वसुल केलेले व्याज मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आली असता त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे म्हणणे नाकारले असून बँकेच्या सेवेत कुठलीच त्रुटी नसून बँकेचे कर्मचारी/अधिकारी स्नेहल यांनी अपमानास्पद वागणूक दिली नसल्याचे म्हटले आहे. 4. सदर तक्रार मंचासमोर दि.11.11.2009 रोजी युक्तीवादाकरीता आली असता युक्तीवादाचेवेळी तक्रारकर्ता व त्यांचे वकील गैरहजर होते. गैरअर्जदारातर्फे त्याचे वकील हजर. मंचाने युक्तीवाद ऐकला व कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडून गृहकर्ज घेतले होते हे उभय पक्षाच्या कथनावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक ठरते असे मंचाचे मत आहे. 6. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडून घेतलेले गृहकर्जाची संपूर्ण रक्कम त्यांना परत केल्याचे गैरअर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज पृष्ठ क्र. 30 वरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ती गैरअर्जदारांकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम परत केल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 6 वरुन सुध्दा तक्रारकर्तीचे कर्ज खाते 29 मे 2009 रोजी बंद केल्याचे स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्तीने घेतलेली गृहकर्जाची रक्कम परतफेड केल्याचे स्पष्ट होते. 7. तक्रारकर्तीने तिच्यासोबत बँकेचे अधिकारी स्नेहल यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. गैरअर्जदारांनी अशी कोणत्याही प्रकारची वागणूक तक्रारकर्तीला दिली नसल्याचे म्हटले आहे. परंतू मंचाचे असे मत आहे की, कोणताही ग्राहक हा विनाकारण गैरअर्जदाराच्या अधिका-याविरुध्द अशी तक्रार दाखल करणार नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी आपल्या अधिका-यांना व कर्मचा-यांचा समज द्यावी व ग्राहकांशी सन्मानपूर्वक वागावे असे सांगावे. 7. 8. तक्रारकर्तीने तक्रारीमध्ये मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व इतर खर्च असे एकूण रु.5,370/- ही रक्कम व 2 टक्के अतिरिक्त घेतलेल्या व्याजाची मागणी केली आहे. परंतू सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे व तक्रारकर्तीने तक्रारीत घेतलेल्या आक्षेपामुळे तक्रारकर्तीला मानसिक त्रास होणे संभव आहे. त्याकरीता रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आपल्या अधिकारी/कर्मचारी वर्गाला आदेश द्यावा की ग्राहकांसोबत सन्मानपूर्वक वागावे. 3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला मानसिक त्रासाच्या नुकसान भरपाईकरीता रु.1,000/- अदा करावे. 4) तक्रारीचा खर्च उभय पक्षांनी सोसावा. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावे. (मिलिंद केदार) (नलिन मजिठीया) सदस्य अध्यक्ष |