द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 30 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार किरकोळ गुंतवणूकदार आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या पत्नीच्या नावे रुपये 50,000/- ची पॉलिसी क्र. 5802236 जाबदेणार यांच्याकडून 2007 मध्ये घेतली होती. लॉकिंग कालावधीतील पहिले तीन हप्ते तक्रारदारांनी भरले. परंतु शेअर बाजारात फारशी तेजी नसल्यामुळे फंड व्हॅल्यु मध्ये वाढ होणार नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले, तशा प्रकारचा सल्लाही तक्रारदारांना श्री. रणजित पंडया यांच्याकडून मिळाला. त्यामुळे तक्रारदारांनी ही रक्कम काढून डायनेमिक फंडात पत्नीच्या नावे गुंतविली, पॉलिसी देण्यात आली. तक्रारदारांनी त्यांच्या रिडीम पॉलिसीमध्ये रुपये 1,50,000/- गुंतविले होते त्याचे त्यांना रुपये 1,71,935.99 खात्यात जमा करण्यात आले, परंतू ही रक्कम कशी काढण्यात आली याची माहिती जाबदेणार यांना मागूनही त्यांनी दिली नाही. तक्रारदारांनी ऑगस्ट 2010 मध्ये परत रुपये 40,000/- स्वत:च्या नावे गुंतविले. रुपये 40,000/- चा धनादेश दिनांक 12/8/2010 चा जाबदेणार यांना दिला. तक्रारदारांना पॉलिसी कागदपत्रे प्राप्त झाली. धनादेश दिनांक 12/8/2010 चा असतांनाही जाबदेणार यांनी दिनांक 26/8/2010 रोजी मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. धनादेश दिनांक 28/8/2010 रोजी क्लिअर झाला होता. असे असतांनाही जाबदेणार यांनी दिनांक 21/9/2010 रोजी पॉलिसी इश्यु केली होती. तक्रारदार 3746.212 युनिट्स मिळण्यास पात्र असतांनाही 3467.06736 युनिट्स तक्रारदारांना मिळाले होते. तक्रारदारांचे रुपये 3200/- चे नुकसान झाले. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना पत्रे पाठविली. परंतु रिक्वायरमेंट पुर्ण न झाल्यामुळे दिनांक 21/9/2010 रोजी पॉलिसी इश्यु करण्यात आली होती, परंतु रिक्वायरमेंट काय होती याची माहिती तक्रारदारांना नाही. जाबदेणार यांचे चिफ फंड मॅनेजर श्री. सुमित अग्रवाल यांनी दुरध्वनीवरुन तक्रारदारांना सांगितले की जुलै 2010 मध्ये फंड व्हॅल्यु मधून 20 टक्के एजंट कमिशन कापण्यात आले होते. तसेच दोन्ही पॉलिसींच्या मॅच्युरिटी रकमेतून 25 टक्के एजंट कोड असल्यामुळे एजंट कमिशनपोटी कापण्यात येतील. तक्रारदारांनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही जाबदेणार यांनी तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून ज्या दिवशी कंपनीला रक्कम प्राप्त झाली त्यादिवशी जो इश्यु रेट होता त्या दराने युनिट्स इश्यु करुन देण्याचे आदेश मागतात, त्याप्रमाणे पॉलिसी शेडयुलमध्ये दुरुस्ती करुन मागतात, जो चेक तक्रारदारांना प्राप्त झालेला नाही, जर चेक इश्यु झालेला असेल तर परत इश्यु करुन मागतात, पॉलिसी क्र.5802236 चे स्टेटमेंट, जाबदेणार कंपनीमध्ये विश्वास नसल्यामुळे जाबदेणार यांच्याकडे गुंतविलेली एकत्रित रक्कम रुपये 1,35,000/- 18 टक्के व्याजासह, नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/-, तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागल्यावर ते वकीलांमार्फत हजर झाले परंतू लेखी जबाब, शपथपत्र दाखल केले नाही म्हणून त्यांच्याविरुध्द नो से आदेश मंचाने पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली असता त्यातील जाबदेणार यांनी दिलेल्या फर्स्ट प्रिमीअम रिसीट अॅन्ड स्टेटमेंट ऑफ अकाऊंट, पावती क्र.99262482 चे अवलोकन केले असता त्यात पेमेंट मेथड डिटेल्स मध्ये – चेक डेट 12/08/2010, जनता सहकारी बँक लि., असे नमूद करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 12/08/2010 रोजीचा जनता सहकारी बँक लि. यांचा चेक दिलेला होता. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जाबदेणार यांच्या पॉलिसी सर्टिफिकीटचे अवलोकन केले असता त्यावर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ पॉलिसी 21/09/2010 नमूद करण्यात आलेले आहे. यावरुन तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 12/08/2010 रोजीच चेक दिलेला असतांनाही जाबदेणार यांनी दिनांक 21/09/2010 रोजी तक्रारदारांना पॉलिसी विलंबाने दिल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. या कालावधीत युनिट रेट मध्ये नक्कीच बदल झालेला असणार परंतू यासंदर्भात कोणताही पुरावा मंचासमोर दाखल करण्यात आलेला नाही. जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांनी पॉलिसी शेडयुलमध्ये दुरुस्ती करुन मिळावी ही मागणी केलेली आहे, परंतु ही मागणी नामंजुर करण्यात येत आहे. तक्रारदार पॉलिसीसाठी दिलेला चेक परत मागतात. याबाबत मंचाचे मत असे आहे की तक्रारदारांनी पॉलिसीसाठी चेक दिलेला होता, तक्रारदारांना पॉलिसी मिळालेली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी केलेली मागणी चुकीची आहे . तक्रारदारांनी त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम रुपये 1,35,000/- परत मागतात. यासाठी मंचाचे असे मत आहे की एक वेळेस पॉलिसी घेतल्यानंतर त्यातील अटी व शर्तीनुसार 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी असतो. तक्रारदारांना पॉलिसी पटली नाही तर या कालावधीत पॉलिसी रद्य करता येते. परंतु एकदा पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार रक्कम परत मागता येत नाही. त्यामुळे तक्रारदारांची ही मागणी मंच नामंजुर करीत आहे. जाबदेणार यांनी तक्रारदारांना पॉलिसी क्र.5802236 चे स्टेटमेंट दयावे ही तक्रारदारांची मागणी मंच मंजुर करीत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी तक्रारदारांना पॉलिसी क्र.5802236 चे स्टेटमेंट
आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावे.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रुपये 5,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.