निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हा फोर्ड कंपनीचा फिगो 1.4 या कारचा मालक आहे. सदर कारचा रजि.क्रमांक एमएच 32 सी.पी.एल. 5333 असा आहे. सदर कारची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.14142/- प्रिमियम भरुन घेतलेली आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दिनांक 24.02.2011 ते दिनांक 23.02.2012 असा आहे.
दिनांक 08.09.2011 रोजी अर्जदार संगारेडडी येथून नांदेड येथे कारने येत असतांना, शंकरनगर/नर्सी रोडवर ट्रकने दिलेल्या धडकेमुळे अर्जदाराचे कारला अपघात झाला व त्यात कारचे खुप नुकसान झाले. रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने सदर कार अर्जदाराने कसेबसे हळू चालवत फोर्ड शोरुमला नेऊन लावली व गैरअर्जदारास त्याची माहिती दिली. गैरअर्जदार यांचे प्रतिनीधी यांनी सदर कारची पाहणी केली व विमा रक्कम देण्याचे वचन दिले. अर्जदारास सदर कार दुरुस्तीसाठी रक्कम रु.181,309/- खर्च आला. सदर खर्चाचे बील अर्जदाराने गैरअर्जदारास देऊन रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदार यांनी फक्त रक्कम रु.28,939/- चा चेक दिला. सदर रक्कम खर्चाच्या मानाने अत्यल्प असल्याने अर्जदाराने तो चेक परत केला. दिनांक 15.12.2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास नोटीस पाठवून रक्कम रु.181,309/- ची मागणी केली. सदर नोटीस गैरअर्जदार यांना दिनांक 20.12.2011 रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांचे प्रतिनीधी यांनी अर्जदाराची भेट घेऊन पुर्ण रक्कम देण्याविषयी सांगितले व त्यास 5-6 महिने लागतील असे सांगितले. परंतु गैरअर्जदार यांनी रक्कम दिली नाही. शेवटी जुन 2013 मध्ये रक्कम मागणी केल्यानंतर गैरअर्जदार यांनी रक्कम देण्यास साफ नकार दिला. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा व अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रु.181,309/- अर्जदारास गैरअर्जदार यांचेकडून देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त होऊन ते तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराची तक्रार ही खोटी असल्यामुळे फेटाळण्यात यावी. गैरअर्जदारास हे मान्य आहे की, त्यांनी अर्जदारास दिनांक 24.02.2011 ते दिनांक 23.02.2012 या कालावधीसाठी पॉलिसी क्रमांक 3001/63565/22/00/000 दिली होती. अर्जदाराचे वाहनास अपघात झाल्यानंतर सदर वाहनाचा सर्व्हे करणेसाठी सर्व्हेअर नेमला होता. सर्व्हेअर यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट दिल्यानंतर सदर सर्व्हे रिपोर्टमध्ये नमुद केल्याप्रमाणे रक्कम रु.28,959/- चा चेक अर्जदारास दिलेला होता. त्यामुळे गैरअर्जदाराने कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. अर्जदाराने रक्कम रु.181,309/- ची बीले दाखल केलेली नाहीत. यावरुन अर्जदाराने तेवढी रक्कम त्यांचे कारचे दुरुस्तीसाठी खर्च केलेली नाही. अर्जदाराची तक्रार ही मुदतीत नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार रक्कम रु.10,000/- च्या खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार विमा कंपनी यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. गैरअर्जदारास हेही मान्य आहे की, त्यानी अर्जदाराच्या वाहनाचा विमा उतरविला होता व त्याचा पॉलिसी क्रमांक 3001/63565/22/00/000 असा असून त्याचा कालावधी दिनांक 24.02.2011 ते दिनांक 23.02.2012 असा होता. गैरअर्जदार यांना हेही मान्य आहे की, अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करणेसाठी सर्व्हेअरची नियुक्ती केली होती. सदर सर्व्हेअरने दिलेल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये अर्जदाराचे झालेल्या नुकसानीची रक्कम रु.28,959/- अर्जदारास दिलेली होती. अर्जदार यांनी सदरची रक्कम नाकारलेली आहे. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअरचा रिपोर्ट(अहवाल) दाखल केलेला आहे. सदर अहवालाचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होत आहेः-
सदर सर्व्हेअरच्या असेसमेंट शिटमध्ये सर्व्हेअर यांनी प्रत्येक पार्टच्या Invoice value वरुन असेसड व्हॅल्यु काढलेली आहे. परंतु invoice मध्ये दर्शविलेली अ.क्र. 5 7S6Q6006AA Service Engine Asy जीची किंमत सर्वात जास्त म्हणजे रक्कम रु.1,20,108.43/- एवढी दर्शविलेली आहे ती रक्कम असेसमेंट शिटमध्ये दिसून येत नाही, सदर आयटेमचा उल्लेख सर्व्हेअर यांनी त्यांचे असेसमेंट शिटमध्ये का अंतर्भुत केलेला नाही किंवा त्याची किंमत हिशोबात का घेतली नाही याबद्दल काहीच उल्लेख सदर सर्व्हे रिपोर्टमध्ये नाही. तसेच गैरअर्जदार यांच्या लेखी जबाबामध्येही सदर आयटेम सर्व्हेअरने हिशोबात का धरले नाही याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. यावरुन सदर सर्व्हे रिपोर्ट हा परिपूर्ण नाही व त्यात गंभीर त्रुटी आहे असे दिसते. सर्व्हेअरचे शपथपत्र देखील दाखल केलेले नाही. अर्जदार हा सदर आयटेमची किंमत मिळणेस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सर्व्हेअरचा रिपोर्ट हा दोषपूर्ण असून तो गैरअर्जदाराने स्विकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे असे दिसते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु.1,20,108.43/- आणि सर्व्हेअरच्या अहवालातील रक्कम रु.28,959/- अशी एकूण रक्कम रु.1,49,067.43/-आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.