::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 01.04.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे माध्यमातून अनुक्रमे पॉलिसी क्र.17471246 रुपये 55,000/-, पॉलिसी क्र.17471566 रुपये 55,000/- व पॉलिसी क्र.17633323 रुपये 58,800/- असे एकूण रुपये 1,68,800/- रकमेच्या पॉलिस्या काढल्या होत्या. पॉलिसी काढतावेळी सदर पॉलिस्यांमध्ये महिण्याला पेन्शन मिळेल व नवीन पॉलिसीचे वार्षीक हप्ते राहतील असे गैरअर्जदार क्र.2 चे एजन्टने फोनवरुन सांगीतले होते. परंतु, अर्जदारास त्या पॉलिस्यांमधून कुठलेही पेंशन व कसलाही लाभ पहिली किस्त भरल्यापासून मिळालेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी पॉलिस्या काढतांना अर्जदाराला सेवेत न्युनता निर्माण केली आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, त्यामुळे अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे माध्यमातून काढलेल्या तिनही पॉलिसीची एकूण रक्कम रुपये1,68,800/- ही दिनांक 27.3.2013 पासून 12 टक्के व्याजासह अर्जदाराला देण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटीचा खर्च व तक्रारीचा खर्च गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून देण्याचा आदेश व्हावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र. 11 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार यांनी लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने त्यांचेवर तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार कलम 26 ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने Free Look Period मध्ये गैरअर्जदाराला वादातील पॉलिसी रद्द करण्याबाबत संपर्क साधला नव्हता. गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास पॉलिसीचे सर्व दस्ताऐवज पाठविलेले होते. सदर पॉलिसीवर अर्जदाराचे जीवन विमा काढण्यात आलेला होता व त्या कालावधीकरीता अर्जदाराने प्रिमीयमची रक्कम भरणा केलेली होती. अर्जदार हा शिक्षीत असून त्यांनी पॉलिसी संदर्भात सर्व शर्ती व अटी वाचून प्रस्तावावर स्वाक्षरी केली असेल व त्यानंतर गैरअर्जदार कंपनीला प्रस्ताव मिळाल्यानंतर गैरअर्जदार कंपनीव्दारे अर्जदाराला फोनव्दारे पॉलिसी घेण्याबाबत विचारणा केली होती. अर्जदाराने एक विमा हप्ता भरल्यानंतर इतर विमा हप्ते न भरल्यावर गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराला वारंवार लेखी सुचनाही दिली. त्यानंतर अर्जदाराचे विमा पॉलिसी रद्द करण्यात आली म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनतम सेवा किंवा अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नसून अर्जदाराची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे व तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ? : होय
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची : होय
अवलंबना केली आहे काय ?
4) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे माध्यमातून अनुक्रमे पॉलिसी क्र.17471246 रुपये 55,000/-, पॉलिसी क्र.17471566 रुपये 55,000/- व पॉलिसी क्र.17633323 रुपये 58,800/- असे एकूण रुपये 1,68,800/- रकमेच्या पॉलिस्या काढल्या होत्या. ही बाब, अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने त्यांचे बचाव पक्षात असे कथन केले आहे की, अर्जदाराने वादातील पॉलिसींचे विमा हप्ते न भरल्यामुळे अर्जदाराचे वादातील विमा पॉलिस्या, पॉलिस्यांचे शर्ती व अटी प्रमाणे रद्द झाले. अर्जदाराने निशाणी क्र. 4 वर दस्त क्र.अ-6 व 7 ची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर पॉलिसीबाबत तक्रार केली होती व पॉलिसी बंद करण्याबाबत विनंतीही केली होती. गैरअर्जदाराने निशाणी क्र.13 वर दस्त क्र. ब-5 ची पडताळणी करतांना असे दिसले की, अर्जदाराने गैरअर्जदास दिनांक 6.11.2013 रोजी पॉलिसींबाबत तक्रार केली होती व ती तक्रार गैरअर्जदार कंपनीला दिनांक 13.11.2013 रोजी मिळाली होती. गैरअर्जदाराने त्यांचे जबाबात दाखल तपशिलावरुन असे दिसून येते की, अर्जदाराची पॉलिस्या दिनांक 14.2.2014, 14.2.2014 व 27.3.2014 रद्द झाली. अर्जदाराने त्याची पॉलिसी रद्द करुन घेण्याचे पूर्वी पॉलिसीबाबत उद्भवीत असलेला ग्राहकवाद गैरअर्जदार कंपनी समक्ष तक्रारीव्दारे ठेवला. परंतु, गैरअर्जदार कंपनीने त्यावर कोणतेही कार्यवाही न करता अर्जदाराची पॉलिसी वरील नमूद असलेल्या दिनांकास रद्द केली. म्हणून गैरअर्जदाराने बचाव पक्षात मांडलेले कथन अर्जदाराने विमा हप्ता न भरल्यास पॉलिसी रद्द करण्यात आली ग्राह्रय धरण्यासारखे नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले उत्तर अर्जदारास पाठविण्यात आले किंवा नाही याबाबत गैरअर्जदाराने कोणतेही पोष्टाची पावती किंवा साक्षी पुरावा प्रकरणात दाखल केलला नाही. अर्जदाराला पॉलिसी देतांना दिशाभूल करण्यात आली होती व अर्जदाराने त्याबाबत गैरअर्जदाराकडे तक्रार नोंदवून सुध्दा त्यावर कोणतीही कार्यवाही न करता अर्जदाराने भरलेली रक्कम परत केली नाही म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनतम् सेवा दर्शविली आहे व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन अर्जदार खालील अंतिम आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी व्यक्तीगत किंवा संयुक्तरित्याने अर्जदाराचे तीन्ही पॉलिसींमध्ये जमा असलेली एकूण रक्कम रुपये 1,68,800/- अर्जदारास आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत द्यावे.
3) अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी गैरअर्जदाराने व्यक्तीगत किंवा संयुक्तरित्याने अर्जदारास रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत द्यावे.
4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 01/04/2016