द्वारा- मा.श्री.शां.रा.सानप, सदस्य 1. तक्रारदाराने ही तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारदाराचे वडील नामे कै. तुकाराम नाना नांगरे हे मौजे जोगेश्वरवाडी ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील शेतजमीन गट क्र. 1430,212,216 चे मालक होते. महसूल नोंदीनूसार त्यांचे नाव 7/12 व 8(अ) च्या उता-यात शेतकरी म्हणून नोंदलेले होते. शासनाने शेतक-याचा विमा सामनेवाले विमा कंपनीकडे उतरविला आहे. दिनांक 21/05/2005 रोजी तक्रारदाराचे वडील विहीरीत पडून जखमी झाले त्यामुळे ते मयत झाले. त्यांना भागीरथी हॉस्पीटल अहमदनगर येथे भरती केले. उपचार चालू असतांना ते दिनांक 26/05/2005 रोजी मयत झाले. त्यांना सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर नेण्यात आले व त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेची खबर पोलीस स्टेशन, कर्जत येथे देण्यात आली व पोलीसांनी अ.मृ.र.नं.23/2005 प्रमाणे नोंद केली. पोलीसानी घटना स्थळाला भेट देऊन पंचनामा केला. तक्रारदार हा मयत शेतक-याचा मुलगा असल्यामुळे नियमानुसार तो सामनेवाले विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा करुनही सामनेवाले यांनी तक्रारदाराला नुकसान भरपाई दिलेली नाही म्हणून तक्रारदारांनी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या योजने अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले यांच्या कडून विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह देण्यात यावे तसेच नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व खर्च म्हणून रु.15,000/- देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे. 2. तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे तक्रारदाराने विलंब माफी करण्याकरिता अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर सामनेवाले यांचे म्हणने एैकण्यात आले. उभयपक्षाचा युक्तीवाद ऐकून तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज या मंचाने दिनांक 04/04/2016 रोजी मंजूर करुन सामनेवाले यांना लेखी कैफीयत दाखल करण्यासाठी अवधी दिला. सामनेवाले यांना पुरेसा अवधी देऊनही सामनेवाले यांनी आपली लेखी कैफीयत दाखल केली नाही म्हणून ही तक्रार सामनेवालेचे लेखी कैफीयती शिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. 3. तक्रारदाराने आपले तक्रारीच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र दाखल केले तसेच महसुल नोंदीचे कागदपत्र, घटनास्थळाचा पंचनामा, सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, अकस्मात मृत्यू सुचना (कलम 174 जा.फौ.), तहसीलदार, कर्जत यांना सादर केलेला प्रस्ताव, तहसील कार्यालय, कर्जत यांनी सामनेवाले यांना पाठविलेला प्रस्ताव इत्यादी कागदपत्रांच्या नकला सादर केल्या. उलट सामनेवाले यांनी कोणतेही कागदपत्र अथवा पुरावा सादर केलेला नाही. 4. तक्रारदार यांनी सादर केलेल्या महसूल नोंदीवरुन हे स्पष्ट होते की, मयत हे तक्रारदाराचे वडील व शेतकरी होते. ते अपघाताने विहीरीत पडून जखमी होऊन मयत झाले. तक्रारदाराने विमा प्रस्ताव तहसीलदार कार्यालय, कर्जत यांना सादर केला. तहसील कार्यालय, कर्जत यांनी सदर प्रस्ताव सामनेवाले विमा कंपनी यांच्याकडे तत्काळ सादर केला. सामनेवाले यांनी या प्रस्तावास कोणतेही उत्तर दिले नाही. तक्रारदाराने सदर प्रस्ताव वडीलांच्या निधनानंतर लवकरच नियमानुसार सादर केलेला होता म्हणून तक्रारदार हा नियमानुसार ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या योजने अंतर्गत लाभास पात्र आहे. तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्याचे सामनेवाले यांनी खंडन केले नाही म्हणून तक्रारदाराने सादर केलेला पुरावा ग्राहय धरण्यात येऊन तक्रारदाराचा दावा मंजूर करण्यात येतो व खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. आ दे श 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारास रु.1,00,000/- (एक लक्ष फक्त) द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह तक्रार दाखल तारखे पासून म्हणजेच दिनांक 19/01/2016 पासून देण्यात यावे. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारास दावा खर्च म्हणून रु.3,000/- (तीन हजार फक्त) दयावेत. 4. वरील आदेशाची पुर्तता आजपासून दोन महिन्याच्या आत करावी. 5. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात याव्या. दिनांकः 07/06/2017 |