द्वारा-मा.श्री.बी.एस.वासेकर, अध्यक्ष
1. तक्रारदाराने ही तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारदाराचा मुलगा नामे कै. नितीन शांताराम फापाळे हे मौजे लिंगदेव ता.अकोले जिल्हा अहमदनगर येथील शेतजमीन गट क्र. 35 चा मालक होता. महसूल नोंदीनूसार त्यांचे नाव 7/12 व 8(अ) च्या उता-यात शेतकरी म्हणून नोंदलेले होते. शासनाने शेतक-याचा विमा सामनेवाले विमा कंपनीकडे उतरविला आहे. दिनांक 03/09/2005 रोजी सकाळी 08.00 वाजता तक्रारदाराचा मुलगा बैल धुण्यासाठी तलावावर गेला असता पाण्यात बुडून मयत झाला. त्याला कॉटेज हॉस्पीटल संगमनेर येथे नेण्यात आले व त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेची खबर पोलीस स्टेशन, संगमनेर येथे देण्यात आली व पोलीसांनी अ.मृ.र.नं.81/2005 प्रमाणे नोंद केली. पोलीसानी घटना स्थळाला भेट देऊन पंचनामा केला. तक्रारदार हे मयत शेतक-याचे वडील असल्यामुळे नियमानुसार ते सामनेवाले विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा करुनही सामनेवाले यांनी तक्रारदाराला नुकसान भरपाई दिलेली नाही म्हणून तक्रारदारांनी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या योजने अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले यांच्या कडून विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह देण्यात यावे तसेच नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- व खर्च म्हणून रु.15,000/- देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे.
2. तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्यामुळे तक्रारदाराने विलंब माफी करण्याकरिता अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर सामनेवाले यांचे म्हणने एैकण्यात आले. उभयपक्षाचा युक्तीवाद ऐकून तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज या मंचाने दिनांक 04/04/2016 रोजी मंजूर करुन सामनेवाले यांना लेखी कैफीयत दाखल करण्यासाठी अवधी दिला. सामनेवाले यांना पुरेसा अवधी देऊनही सामनेवाले यांनी आपली लेखी कैफीयत दाखल केली नाही म्हणून ही तक्रार सामनेवालेचे लेखी कैफीयती शिवाय पुढे चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
3. तक्रारदाराने आपले तक्रारीच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र दाखल केले तसेच महसुल नोंदीचे कागदपत्र, घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनाचा अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, अकस्मात मृत्यू सुचना (कलम 174 जा.फौ.), तहसीलदार, संगमनेर यांना सादर केलेला प्रस्ताव, तहसील कार्यालय, संगमनेर यांनी सामनेवाले यांना पाठविलेला प्रस्ताव इत्यादी कागदपत्रांच्या नकला सादर केल्या. उलट सामनेवाले यांनी कोणतेही कागदपत्र अथवा पुरावा सादर केलेला नाही.
4. तक्रारदार यांनी सादर केलेल्या महसूल नोंदीवरुन हे स्पष्ट होते की, मयत हा तक्रारदाराचा मुलगा व शेतकरी होता. तो पाण्यात बुडून मयत झाला. तक्रारदाराने विमा प्रस्ताव तहसीलदार कार्यालय, संगमनेर यांना सादर केला. तहसील कार्यालय, संगमनेर यांनी सदर प्रस्ताव सामनेवाले विमा कंपनी यांच्याकडे तत्काळ सादर केला. सामनेवाले यांनी या प्रस्तावास कोणतेही उत्तर दिले नाही. तक्रारदाराने सदर प्रस्ताव मुलाच्या निधनानंतर लवकरच नियमानुसार सादर केलेला होता म्हणून तक्रारदार हे नियमानुसार ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ या योजने अंतर्गत लाभास पात्र आहे. तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्याचे सामनेवाले यांनी खंडन केले नाही म्हणून तक्रारदाराने सादर केलेला पुरावा ग्राहय धरण्यात येऊन तक्रारदाराचा दावा मंजूर करण्यात येतो व खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास रु.1,00,000/- (एक लक्ष फक्त) द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह तक्रार दाखल तारखे पासून म्हणजेच दिनांक 19/01/2016 पासून देण्यात यावे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारास दावा खर्च म्हणून रु.3,000/- (तीन हजार फक्त) दयावेत.
4. वरील आदेशाची पुर्तता आजपासून दोन महिन्याच्या आत करावी.
5. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात याव्या.
दिनांकः 07/06/2017