::निकालपत्र::
( निकालीपत्र पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक –22 मे, 2012 )
1. अर्जदार/तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली प्रस्तूत तक्रार विरुध्दपक्ष/गैरअर्जदार यांचे विरुध्द न्याय मंचा समक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदार/तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने आपले कुटूंबाचे उदरनिर्वाहा करीता विरुध्दपक्ष क्रं 3 कडून अर्थ सहाय घेऊन टाटा-909 मॉडेलचा ट्रक विकत घेतला, ज्याचा नोंदणी क्रं-MH-40-N-494 असा आहे. त.क.ने डाऊन पेमेंट पोटी रुपये-1,25,000/- एवढी रक्कम दिली आणि उर्वरीत रक्कम रुपये-6,49,000/- एवढया रकमेचे कर्ज वि.प.क्रं 3 कडून घेतले. सदर वाहनाचा विमा त.क.ने वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून काढला.
3. त.क.चे पुढे असे म्हणणे आहे की, विमा कालावधी वैध असतानाचे काळात विमाकृत ट्रक, त.क.चा भाऊ विष्णू लक्ष्मण सावरकर याने
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
दिनांक 02.11.2009 रोजी रात्री 11.00 वाजता एम.आय.डी.सी.इंडोरामा बुटीबोरी येथील गॅरेज समोर ठेवला. कारण यापूर्वी बरेच कालावधीपासून सदर ट्रक त.क. तेथे ठेवित होता. परंतु दुसरे दिवशी म्हणजे दि.03.11.2009 रोजी सकाळी सदर ट्रक बघितला असता, ट्रक दिसून आला नाही. ट्रकसाठी बराच शोध घेऊनही तो न सापडल्याने बुटीबोरी पोलीस स्टेशन नागपूर येथे रिपोर्ट देण्यास गेले असता पोलीसांनी पुन्हा शोध घेण्यास सांगितले परंतु शोध लागला नाही म्हणून दि.12.11.2009 रोजी पोलीस रिपोर्ट दिला. परंतु एफ.आय.आर.पोलीसांनी नोंदविला नव्हता. त्यानंतर त.क.चे विनंती वरुन पोलीसांनी एफ.आय.आर. दि.12.01.2010 रोजी नोंदविला.
4. पुढे त.क.ने असे नमुद केले की, उपरोक्त कार्यवाही नंतर त.क.ने वाहनाची किंमत म्हणून विमा दावा रक्कम रुपये-7,64,000/- वि.प.क्रं 1 कडे सादर केला असता, क्लेम लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. परंतु वि.प.क्रं 1 व 2 यांनी दि.07.06.2010 रोजीचे पत्रान्वये त.क.चा विमा क्लेम फेटाळला व तो फेटाळण्याचे कारण ट्रक चोरीची घटना ही दि.03.11.2009 असताना, नोंदविलेला एफ.आय.आर. हा 12.01.2010 रोजीचा आहे. परंतु त.क.ची ट्रक चोरी संबधीची पोलीस स्टेशनला केलेली मूळ तक्रार ही 12.11.2009 ची आहे व त्याची पोच प्रत तक्रारी सोबत जोडण्यात येत आहे. परंतु पोलीसांनी लेखी तक्रार देऊनही त्यावेळी एफ.आय.आर.नोंदविला नाही. सदर वाहन चोरीस गेल्यामुळे त.क. हा वि.प.क्रं 3 चे कर्जाचे परतफेडीचे हप्ते सुध्दा भरु शकत नाही व वि.प.क्रं 3 कायदेशीर कारवाई करण्यास धमकावित आहे.
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
5. त.क.ने असेही नमुद केले की, या सर्व प्रकारामुळे त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त.क.ने असेही नमुद केले की, प्रस्तुत तक्रार ही मुदतीचे आत दाखल केलेली आहे परंतु विलंब झाला असल्यास तो माफ करण्यात यावा आणि प्रस्तुत तक्रार गुणवत्तेवर काढण्यात यावी.
6. म्हणून त.क.ने गैरअर्जदार विरुध्द प्रस्तुत तक्रार न्यायमंचा समक्ष दाखल करुन तीद्वारे त.क.ला वाहनाचे विमा दाव्यापोटी रुपये- 7,50,000/- एवढी रक्कम वि.प. क्रं 1 व 2 कडून मिळावी. तसेच त.क.ला झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासा बद्यल रुपये-60,000/- वि.प.क्रं 1 व 2 कडून मिळावे. तसेच वि.प.क्रं 1 व 2 कडून विमा दाव्याची रक्कम मिळे पर्यंत, वि.प.क्रं 3 ने त.क. विरुध्द कोणतीही कारवाई करु नये असे आदेशित व्हावे अशी मागणी तक्रारीद्वारे केली.
7. वि.प.क्रं 1 व 2 ने एकत्रितरित्या मंचा समक्ष पान क्रं 52 ते 57 वर आपला लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर सादर केला. वि.प.क्रं 1 व 2 ने नमुद केले की, त.क.ची तक्रार ही चुकीची व खोटी आहे. त.क. यांनी केलेली अन्य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. वाहन चोरी गेल्या संबधीची त.क.ची संपूर्ण विधाने पूर्णपणे नाकबुल केलीत जसे पोलीसांनी एफ.आय.आर. नोंदविला नाही व वाहन शोधा असे सांगितले व त्यानंतर एफ.आय.आर.नोंदविला ही त.क.ची विधाने नाकबुल केलीत. एफ.आय.आर हा दिनांक 12/01/2010 रोजी नोंदविला हा रेकॉर्डचा भाग असल्याचे नमुद केले. त.क.चेवाहन दिनांक 03.11.2009 रोजी चोरीस गेले आणि पोलीस रिपोर्ट
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
दिनांक 12.01.2010 रोजी नोंदविला, जो, 67 दिवसा नंतर नोंदविला आणि तो पॉलिसीचे अटी व शर्तीचे विरुध्द आहे. वि.प.क्रं 1 व 2 ने असे नमुद केले की, पॉलिसीचे अटी व शर्ती प्रमाणे विमाकृत वाहनाचा अपघात होऊन वाहन क्षतीग्रस्त झाल्यास विमा दावा हा त्वरीत लेखी स्वरुपात घटना घडल्यावर करावयास पाहिजे असे शर्तीमध्ये स्पष्ट नमुद आहे. त्यामुळे त्यांनी त.क.चा विमा क्लेम फेटाळण्याची कृती योग्य आहे. त्यांनी त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचास चालविण्यास कोणतेही कार्यक्षेत्र/अधिकारक्षेत्र येत नाही. तसेच प्रस्तुत तक्रार ही मुदतीत येत नाही. त.क.च्या तक्रारीतील संपूर्ण मागण्या या अमान्य करण्यात येत असल्याचे नमुद केले. सबब तक्रार दंडासह खारीज व्हावी, असा उजर वि.प.क्रं 1 व क्रं 2 यांनी घेतला.
8. वि.प.क्रं 3 वित्तीय कंपनीने आपला लेखी जबाब पान क्रं 38 ते 46 वर प्रतिज्ञालेखावर दाखल केला. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, त्यांची कंपनी ही कंपनी कायदया प्रमाणे स्थापन झालेली आहे आणि रिर्झव्ह बँकेचे नियंत्रण आहे. त.क. आणि त्यांचे मध्ये कर्जा संबधाने करार झालेला आहे. कर्ज पुरवठा करणा-यास त्यांचे कर्जा संबधाने विमा कंपनी कडून काही रक्कम प्राप्त होत असल्यास ती घेण्याचे अधिकार आहेत. त.क.ने करारा नुसार वाहन हे त्यांचेकडे गहाण करुन दिलेले होते, त्यामुळे वाहनाचे विम्या संबधीची रक्कम मिळण्यास वि.प.क्रं 3 लाभधारी आहेत, या संबधाने वि.प.क्रं 3 ने मा.वरीष्ठ न्यायालयाचे निकालावर आपली भिस्त ठेवली. त.क.ने कर्ज परतफेडीचे हप्ते नियमित भरलेले
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
नाहीत. त.क.वर दि.05.07.2011 रोजी कर्ज संबधाने रुपये-9,51,340/- एवढी रक्कम थकीत होती आणि सदर रक्कम कायदेशीररित्या वसूल करण्याचे वि.प.क्रं 3 ला अधिकार आहेत. त्यांनी यासंबधाने अनेकदा त.क.ला जाणीव करुन दिली परंतु काहीही फायदा झालेला नाही. कर्ज करारा प्रमाणे, कर्ज घेणारा व्यक्ती हा कर्ज परतफेडीचे हप्ते कोणत्याही कारणामुळे थांबवू शकत नाही. त.क. हा विम्याची रक्कम घेण्यास पात्र नाही कारण सदर विमाकृत वाहन हे वि.प.क्रं 3 कडे गहाण आहे आणि जो पर्यंत त.क. पूर्णपणे कर्जाची परतफेड करत नाही, तो पर्यंत त.क.ला ते वाहन उपयोग करता येणार नाही. मा.वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडयां वरुन सुध्दा वि.प.क्रं 3 ला विमा दाव्याची रक्कम मिळणे आवश्यक आहे आणि त्यामुळे वि.प. क्रं 1 व 2 ला तसे निर्देश देण्यात यावे अशी विनंती वि.प.क्रं 3 वित्तीय कंपनी तर्फे करण्यात आली.
10. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रमांक 9 निशाणी क्रमांक-3 वरील यादी नुसार एकूण 05 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये आर.टी.ओ.कार्यालयाचे दस्तऐवज, पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे केलेली तक्रार, पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे नोंद केलेली पहिली खबर व घटनास्थळ पंचनामा, वि.प.क्रं 3 तर्फे पोलीस स्टेशन बुटीबोरीला दिलेले पत्र, वि.प.क्रं 1 व 2 कंपनी तर्फे त.क.ला पाठविलेल्या पत्राची प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
11. वि.प. विमा कंपनी तर्फे वि.प.क्रं-1 व 2 ने एकत्रितरित्या आपले लेखी उत्तर पान क्रं 52 ते 57 वर प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल केले.
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
12. वि.प.क्रं 3 वित्तीय कंपनीने आपले लेखी उत्तर पान क्रं 38 ते 47 नुसार प्रतिज्ञालेखावर न्यायमंचा समक्ष दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत.
13. प्रस्तुत प्रकरणात वि.प.क्रं 1 व 2 चे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. मौखीक युक्तीवादाचे वेळी युक्तीवादासाठी संधी देऊनही त.क. चे वकील अनुपस्थित होते.
14. सर्व पक्षांचे लेखी निवेदन, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
15. यातील तक्रारकर्त्याचे वाहन चोरीला गेले, या संबधी त्याने त्वरीत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, ही तक्रार पोलीस निरिक्षकांना प्राप्त झाल्या बाबत दिनांक-12.11.2009 रोजीची पोच त्या तक्रारीवरच दिल्याचे दिसून येते.
16. पोलीसांनी त्यानंतर दि.12.01.2010 रोजी जर प्रथम माहिती (एफ.आय.आर.) नोंदविली असेल तर ती पोलीसांची चुक व हलगर्जीपणा आहे आणि त्यास तक्रारकर्त्यास जबाबदार धरता येऊ शकणार नाही. याच कृती वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने नमुद केल्या प्रमाणे त्याचे विमाकृत वाहन चोरीस गेल्या नंतर पोलीस स्टेशनला दि.03.11.2009 रोजी सुचना दिली असताना मात्र पोलीसांनी त्यास वाहन शोधा, असे सांगून परत पाठविले, या तक्रारकर्त्याच्या प्रतिज्ञालेखावरील
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
कथनाला बळ मिळते. या कारणा वरुन वि.प.विमा कंपनी तर्फे गैरअर्जदार क्रं-1 व 2 यांनी, तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारणे हीच मूळात त्यांचे सेवेतील त्रृटी आहे.
17. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, न्यायमंच खालीलप्रमाणे प्रकरणात आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1) तक्रारकर्त्याचीतक्रार गैरअर्जदार/वि.प. आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड
जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे गै.अ.क्रं 1 व 2 यांचे विरुध्द वैयक्तिक आणि
संयुक्तिक स्वरुपात अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार/वि.प.क्रं-1 व 2 यांनी, तक्रारकर्त्यास त्याचे मालकीचे विमाकृत
मॉडेल टाटा-909 ट्रक नोंदणी क्रं-MH-40-N-494 चे पॉलिसी मध्ये घोषीत
केलेली वाहन मुल्याची रक्कम आणि त्यामधून 10% घसारा रक्कम वगळून
येणारी रक्कम विमा नाकारल्याचा दि. दि.07.06.2010 पासून ते रकमेच्या
प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह मिळून येणारी
रक्कम सदर आदेश प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत द्यावी.
विहित मुदतीत रक्कम न दिल्यास देय विमा रक्कम द.सा.द.शे.9% दरा
ऐवजी द.सा.द.शे.12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्त्यास देण्यास
गैरअर्जदार क्रं 1 व 2 जबाबदार राहतील.
3) गैरअर्जदार/वि.प.क्रं-1 व 2 यांनी, तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व
शारीरिक त्रासापोटी रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त ) आणि
तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) सदर
आदेश प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
ग्राहक तक्रार क्र: 719/2010
4) गैरअर्जदार/वि.प.क्रं-1 व 2 यांनी विमाकृत वाहनाची देय रक्कम
तक्रारकर्त्याला देण्यासाठी न्यायमंचात जमा करावी. त्यानंतर
गैरअर्जदार/वि.प.क्रं 3 ने वाहन चोरीचे दिनांकास म्हणजे दि.02.11.2009
रोजी तक्रारकर्त्याकडून विमाकृत वाहन कर्जा संबधी घेणे असलेल्या रकमे
संबधी हिशोब देणारा कर्ज खात्याचा उतारा न्यायमंचात दाखल करावा व
वि.प.क्रं-3 ला त.क.चे विमाकृत वाहनाचे कर्जा संबधाने घेणे असलेल्या
रकमे संबधीची मागणी न्यायमंचात करावी. त्यानंतर वाहनाचे कर्जा संबधीचे
रकमे बाबत योग्य ते आदेश यथावकाश न्यायमंचा मार्फत निर्गमित
करण्यात येतील.
5) गैरअर्जदार/वि.प.क्रं 3 यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात येते.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.