निकाल
(घोषित दि. 03.03.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याने एम.एच.21 ए.एम. 1231 या नंबरची हिरो होंडा मोटार सायकल खरेदी केली. सदर मोटार सायकलचा विमा गैरअर्जदार यांच्याकडे दि.24 ऑक्टोबर 2015 ते 23 ऑक्टोबर 2016 पर्यंत काढला. दि.21.11.2015 रोजी मार्केट कमिटीच्या ऑफीस समोरच्या रोडवर सदर गाडी उभी केली होती. त्या ठिकाणाहून सदर गाडी चोरीला गेली. सदर गाडीचा बराच शोध घेतला परंतू गाडी मिळून आली नाही. म्हणून तक्रारदार याने दि.28.11.2015 रोजी 379 भा.द.वि. कलम याप्रमाणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भोकरदन यांच्याकडे रितसर तक्रार दिली, परंतू तक्रारदाराची गाडी सापडली नाही. त्यानंतर तक्रारदार याने गैरअर्जदार यांच्याकडे वेळोवेळी गाडी चोरीला गेली त्याबाबत विमा नुकसान भरपाई मिळावी म्हणून मागणी केली. परंतू कंपनीने दि.22.07.2016 रोजी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केला. तक्रारदार याने गैरअर्जदार कंपनीकडे विमा पॉलीसीची व गाडी खरेदीची पावती तसेच गाडीच्या संदर्भातील आर.टी.ओ.चे रेकॉर्ड इत्यादी आवश्यक कागदपत्र पाठविले होते. तरीही विमा कंपनीने त्याचा दावा नामंजूर केला. तक्रारदार यास नेहमीच सदर गाडीचा वापर त्याच्या महत्वाच्या कामाकरता करावा लागतो. परंतू गाडी चोरीला गेल्यामुळे त्याची अतिशय गैरसाय होत आहे. तक्रारदार याने विमा रक्कम मागणीचा दावा मुदतीच्या आत केला होता, परंतू त्याच्या मागणीस विमा कंपनीने नकार दिला. त्यामुळे ग्राहक न्यायालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार याचे म्हणण्याप्रमाणे त्याची तक्रार मागणी नुसार मान्य करावी.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत घटनास्थळाचा पंचनामा, खबरी रिपोर्ट, विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, विमा कंपनीच्या पत्राची नक्कल, आर.टी.ओ.चे कागदपत्र, विमा कंपनीकडून मागणी करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या यादी बाबतची दोन पत्रे व विमा दावा फेटाळल्याबाबतचे पत्र इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहेत.
गैरअर्जदार विमा कंपनीने वकीलामार्फत लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीकडून मोटार सायकलचा विमा घेतला होता, परंतू मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर 7 दिवसांनी मोटार सायकलच्या चोरी बाबतचा प्रथम खबरी रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला. सदर बाब विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग करणारी आहे. त्याच कारणावरुन तक्रारदार यांचा विमा दावा फेटाळण्यात आलेला आहे. गाडी चोरीला जाता क्षणीच तात्काळ व विनाविलंब सदर गाडीच्या चोरीबाबतची माहिती विमा कंपनीस लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक होते, परंतू तसे तक्रारदार याने केलेले नाही. वरील कारणास्तव तक्रारदार याचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले. त्याप्रमाणे गैरअर्जदार यांच्या प्रतिनिधीने पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले.
आम्ही दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. तसेच मंचासमोर दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक परीक्षण केले. या प्रकरणात तक्रारदार याच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच.21 ए.एम. 1231 होती. सदर गाडीचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे दि.24 ऑक्टोबर 2015 ते 23 ऑक्टोबर 2016 पर्यंत काढला होता या गोष्टी उभयपक्षी मान्य आहेत. तक्रारदार याचे असे कथन आहे की, त्याचीमोटार सायकल दि.21.11.2015 रोजी मार्केट कमिटी भोकरदनच्या आवारातून चोरीला गेली. त्यांनी सदर गाडीचा शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी दि.28.11.2015 रोजी मोटार सायकल चोरीची रितसर तक्रार पोलीस ठाणे भोकरदन येथे दिली. याचाच अर्थ असा की, तक्रारदाराची मोटार सायकल दि.21.12.2015 रोजी चोरीला गेली. तरी तक्रारदार यांनी बराचसा कालावधी सदर मोटार सायकलचा तपास करण्यात घालवला. त्यांनी तात्काळ सदर मोटार सायकलच्या चोरीची खबर पोलीस स्टेशन भोकरदन येथे नोंदविली नाही. त्यामुळेच गाडी चोरीची तारीख 21.11.2015 व चोरीची फिर्याद नोंदविलेली तारीख 28.11.2015 यामध्ये अंदाजे 7 दिवसाचे अंतर आहे.
मोटार सायकलचा विमा उतरवतेवेळी तक्रारदार व गैरअर्जदार या दोन्ही पार्टीनी विमा कराराच्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक होते. जर मोटार सायकल चोरीला गेल्यावर लगेचच तक्रारदार याने त्याबाबतची लेखी सुचना विमा कंपनीकडे केली असती तसेच लेखी फिर्याद भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये दिली असती तर सदर चोरीला गेलेल्या मोटार सायकलचा योग्यरितीने तपास करुन त्याबाबतचा महत्वाचा पुरावा मिळविणे विमा कंपनीस व पोलीस यंत्रणेस सोईस्कर झाले असते. परंतू तक्रार नोंदविण्यास 7 दिवस विलंब झाल्यामुळे मोटार सायकलच्या चोरीच्या प्रकरणातील महत्वाचा पुरावा नष्ट झाला असल्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर ती शोधून काढणे अशक्यप्राय झाले. नियमानुसार मोटार सायकल चोरीला गेल्यानंतर त्याची तात्काळ लेखी सुचना विमा कंपनीस देणे तक्रारदार याचेवर बंधनकारक होते, त्याने तसे करणे अत्यावश्यक होते. त्याशिवाय विमा कराराचे तक्रारदार याचेकडून योग्य पालन झाले असे म्हणता येणार नाही. या मुद्यावर राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली यांच्या महत्वाच्या निकालपत्रामधील निरीक्षणे अत्यंत महत्वाची आहेत. सदर निकालपत्र पहिले अपील 321/2005 न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुध्द त्रीलोचन जानी यांचे प्रकरणातील दि.09.12.2009 च्या निकालपत्रात आहे. सदर निकालपत्र मा.न्यायमुर्ती अशोक भान अध्यक्ष, राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेला आहे. सदर निकालपत्रात In our view, the State Commission erred in holding that the respondent/complainant had reported the theft of the vehicle to the appellant-Insurance Company within a reasonable time, We are not going into the other Question regarding violation of Condition no.5 of the Insurance Policy as we have non-suited the respondent/complainant on the first ground.
For the reasons stated above, the Appeal is accepted. Order under challenge is set aside and the Complaint is ordered to be dismissed leaving the parties to bear their own costs.
मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांचे निरीक्षणाप्रमाणे वाहन चोरीची तक्रार ही विनाविलंब दाखल करणे आवश्यकआहे. सदर अट ही तक्रारदार यांनी कोणतेही कारण न देता पाळणे कायद्याला अभिप्रेत आहे. जर सदर अटीचा भंग झाला तर तक्रारदार हा विम्याची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहात नाही. वरील सर्व कारणास्तव आम्ही असे गृहीत धरतो की, गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना