(पारित दिनांक – 12.01.2012)
श्री. विजयसिंह राणे यांचे कथनांन्वये.
1. तक्रारकर्त्यातर्फे त्यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. गैरअर्जदारातर्फे ऍड. श्री. सचिन जैस्वाल यांनी वकीलपत्र दाखल करण्याकरीता व अर्ज करण्याकरीता वेळ मागतात. गैरअर्जदार दि.22.12.2011 च्या आदेशाप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द विना लेखी जवाब कारवाई चालविण्याचा आदेश झालेला आहे. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश झालेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ला पूरेशी संधी देऊनही त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले नाही.
2. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदारांकडे विमाकृत असलेल्या त्याच्या वाहनाचा अपघात झाला व त्याने रु.72,864/- एवढया रकमेचे बिल दुरुस्त करण्याबाबत प्राप्त झाले होते. त्याची मागणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे केली व सर्व्हेयर नियुक्त करण्यात आला व रु.55,000/- मिळू शकतात असे सांगितले. त्यावरुन त्याचे आपसात बोलणे झाले. मात्र गैरअर्जदाराने प्रत्यक्षात रु.55,000/- न देता रु.38,469/- एवढी रक्कम दिली. तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन उर्वरित रक्कम रु.16,531/- जी तडजोडीमध्ये ठरली होती तिची मागणी केली आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना नोटीस दिला, त्यांनी उत्तर दाखल केले नाही. यावरुन तक्रारकर्त्याची शपथपत्रावर असलेली तक्रार व त्यादाखल सादर केलेले दस्तऐवज सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही.
3. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचा विचार करता, गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली आहे. विशेषतः गैरअर्जदाराने आपले उत्तर दाखल केले नाही ही वस्तूस्थिती पाहता ही तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे. यास्तव खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्यांना रु.16,531/- ही रक्कम दि.01.11.2010 पासून रकमेच्या प्रत्यक्ष अदाएगीपावेतो द.सा.द.शे.9 % व्याजासह द्यावी.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावी, अन्यथा गैरअर्जदार 9 % ऐवजी 12 % व्याज देणे लागतील.