मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार , सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 14/10/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याचेकडे CG-04/CR 6315 क्रमांकाचे वाहन असून त्याचा विमा त्याने रु.25,430/- प्रीमीयम भरुन 24.11.2007 ते 23.11.2008 या कालावधीकरीता पॉलिसी क्र. 3003/52930950/00/000 अन्वये गैरअर्जदाराकडे विमाकृत करण्यात आली होती. सदर वाहनास दि.29.11.2007 रोजी रात्री पोलीस स्टेशन, जलालखेडा, जि.नागपूर येथे अपघात झाला. सदर घटनेची सुचना गैरअर्जदारास देण्यात आली. सदर अपघाताची निरीक्षण करण्याकरीता सर्व्हेयरची नेमणूक करण्यात आली. त्यांनी कारवाई करुन तक्रारकर्त्याला वाहन हे दुरुस्तीकरीता व मुल्यांकनाकरीता वाहून नेण्याविषयी सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने सदर वाहन 13 कि.मी. माईलस्टोन, भंडारा रोड येथे रु.8,000/- खर्च करुन आणले व आवश्यक कागदपत्रासह तपासणी व दावा निश्चितीकरीता दावा अर्ज गैरअर्जदाराकडे सादर केला. वाहन हे अतिशय क्षतिग्रस्त झाले असल्याने व दुरुस्तीला रु.1,80,000/- पेक्षा जास्त खर्च येत असल्याने तक्रारकर्त्याने सर्व्हेयरला कॅशलेश रीपेयर्सकरीता विनंती केली आणि वाहन हे मे. जयका मोटर्स लिमिटेडकडे दुरुस्तीस पाठविले. त्यांनी रु.1,04,344/- देयक तक्रारकर्त्याला देऊन रक्कम अदा करण्यास सांगितले. तक्रारकर्त्यांने सदर दस्तऐवज गैरअर्जदाराकडे दाखल केले. परंतू आजतागायत तक्रारकर्त्याच्या वाहनाचा विमा दावा गैरअर्जदाराने निकाली काढला नाही व विम्याची रक्कम अदा केलेली नसल्याने तक्रारकर्त्याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन वाहन दुरुस्तीची रक्कम ही व्याजासह व गॅरेज चार्जेससह मिळावी, फायनांसरला देण्याची रक्कम, रोड टॅक्सची रक्कम, शारीरीक व मानसिक त्रासाकरीता नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्यात आला असता गैरअर्जदारांनी दस्तऐवजांसह तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व तक्रारीतील पॉलिसी, प्रीमीयम मान्य करुन तक्रारीतील इतर बाबी अमान्य केलेल्या आहेत. तक्रारकर्त्याचा दावा दि.31.01.2008 रोजी नाकारण्यात आलेला असून त्यांची सेवेत कुठलीही त्रुटी नसून, तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाह्य असल्याचे नमूद केलेले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असून ती खारीज करण्याची मागणी गैरअर्जदाराने केलेली आहे. 3. सदर तक्रार युक्तीवादाकरीता दि.04.10.2010 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याने CG-04/CR 6315 या वाहनाचा विमा गैरअर्जदाराकडे उतरविला होता ही बाब तक्रारकर्त्याने केलेले कथन व दाखल केलेली पृष्ठ क्र. 8 वरील पॉलिसीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे स्पष्ट होते. 5. तक्रारकर्त्याच्या वाहनाला दि.29.12.2007 रोजी अपघात झाला होता ही बाब पोलिसांनी केलेल्या घटनास्थळ पंचनाम्यावरुन स्पष्ट होते. सदर अपघातानंतर वाहन हे मे. जयका मोटर्स येथे दुरुस्तीकरीता कमलेश फ्रेट कॅरीयरद्वारे आणल्या गेले. सदर बाब दस्तऐवज क्र.14 वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघातामध्ये क्षती झाल्यामुळे नुकसान झाले होते व त्याकरीता अंदाजित दुरुस्ती खर्च रु.1,80,000/- मे. जयका मोटर्स यांनी काढला होता. पृष्ठ क्र. 19 वरुन दुरुस्तीचा खर्च हा रु.1,04,344/- आला असल्याचे निदर्शनास येते. 6. तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर ते मे. जयका मोटर्स येथे आणले व गैरअर्जदाराला सुचित केल्यामुळे गैरअर्जदाराच्या सर्व्हेयरने तेथे येऊन सर्व्हे केला. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराच्या सर्व्हेयरला कॅशलेस रीपेयर्सकरीता विनंती केली. गैरअर्जदाराच्या अंतिम सर्व्हेयरने रु.63,552/- नुकसानीचे मुल्यांकन केले तसा अहवाल दिलेला आहे. गैरअर्जदाराने इन्व्हेस्टीगेटर नियुक्त करुन त्यांनी दिलेल्या अहवालावरुन व लेखी उत्तरासोबत दाखल केलेल्या दि.31.08.2008 नुसार तक्रारकर्त्याचा दावा नाकारण्यात आला. मंचासमक्ष असलेल्या सर्व दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याच्या वाहनाला अपघात दि.29.11.2007 रोजी झाला असतांना दावा नाकारल्यासंबंधीचे पत्र गैरअर्जदाराचे 31.01.2008 चे आहे. म्हणजेच सदर दावा निकाली काढीत असतांना गेरअर्जदाराने विलंब केलेला आहे. तसेच तक्रारकर्त्याला सदर दावा निकाली काढल्यासंबंधीचे कोणतेही पत्र गैरअर्जदाराने पाठविले नाही असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 7 वरुनही तक्रारकर्त्याला सदर दावा खारीज केल्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्याचे स्पष्ट होत नाही. सदर पत्र तक्रारकर्त्याला पाठविल्याचे पत्र वा त्याची पोच किंवा इतर कुठलेही दस्तऐवज मंचासमोर गैरअर्जदाराने दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे दस्तऐवज क्र. 7 वरील दस्तऐवज विश्वासार्ह वाटत नाही. तसेच सदर पत्रामध्ये दिलेल्या मजकुराचे अवलोकन केले असता अपघाताचेवेळी वाहन चालविणारी व्यक्ती व विमा दावा दाखल करीत असतांना दिलेले नाव यामध्ये तफावत असल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. परंतू सदर बाब स्पष्ट करणारा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच गैरअर्जदाराने सर्व्हेयर व इन्व्हेस्टीगेटरचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे I (2003) CPJ 50 (NC), SENIOR DIVISIONAL MANAGER, LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA & ORS. Vs. SMT. J. VINAYA या निवाडयात लपवून ठेवलेली माहिती ही रास्त पुराव्याअभावी जर विमा कंपनीने सिध्द केली नसेल तर विमा दावा नाकारता येत नाही. गैरअर्जदार दावा नाकारण्यासंबंधीचे तथ्य स्पष्ट करु शकला नाही. त्यामुळे सदर निवाडयानुसार तक्रारकर्ता विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्तीचा खर्च रु.1,04,344/- आला ही बाब जयका मोटर्सने दिलेल्या इस्टीमेटवरुन स्पष्ट होते. सदर दिलेले ईस्टीमेट किंवा अधिकृत गॅरेजमार्फत दिलेला खर्च हा चुकीचा आहे ही बाब गैरअर्जदाराने सिध्द केलेली नाही. त्यामुळे मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या Oriental Insurance Co. Ltd. Vs. Mehar Chand (R.P.No.3499/2009) 2010 (1) CPC नुसार तक्रारकर्ता हा सदर खर्चाची संपूर्ण रक्कम मिळण्यास पात्र ठरतो. तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली काढतांना गैरअर्जदाराने स्वतःहून विलंब केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास पार्किंग चार्जेस रु.76,200/- आल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. सदर पृष्ठ क्र. 19 वरील पत्रावरुन व्याज रु.39,210/- जयका मोटर्सने लावलेले आहे हे स्पष्ट होते. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे तक्रारकर्त्याला सदर भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे सदर रक्कमसुध्दा गैरअर्जदाराने द्यावी असे मंचाचे मत आहे. त्याकरीता मंच मा. राष्ट्रीय आयोगाचा 1986-2005 CONSUMER 9673 (NS), The Oriental Insurance Co. Ltd. Vs. Anil Kumar Dhope या निवाडयाचा आधार घेत आहे. 8. तक्रारकर्त्याने शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता हा रु.15,000/- मिळण्यास पात्र ठरतो. तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला वाहन क्र. CG- 04/CR 6315 ची दुरुस्तीची रक्कम, गैरअर्जदारांनी लावलेले पार्किंग चार्जेस व व्याज असे एकूण रु.2,19,755/- तक्रार दाखल दिनांकापासून 02.03.2010 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी. सदर रक्कम आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत अदा न केल्यास सदर रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाऐवज द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देय राहील. 3) गैरअर्जदाराने मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून तक्रारकर्त्याला रु.15,000/- द्यावे. 4) गैरअर्जदाराने तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 6) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |