जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 82/2011 तक्रार दाखल तारीख –01/07/2011
निकाल तारीख – 03 /02/2012
रामकिसन पि.बाजीराव गडदे
वय 42 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.मोरफळी ता.धारुर जि.बीड
विरुध्द
1. व्यवस्थापक, आय.सी.आय.सी.लोंबांर्ड जनरल
इन्शुरन्स कंपनी लि., हॉटेल व्यंकटेशा,
दुसरा मजला, औसा रोड,लातूर
2. व्यवस्थापक,
श्रीराम अँटोमोबाईल्स, शिवाजी रोड,बीड .सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.बी.धांडे
सामनेवाला 1 तर्फे :- अँड.आर.बी.नवले
सामनेवाला 2 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार व्यवसायाने शेतकरी आहे. तक्रारदारानी सदर व्यवसायासाठी व वैयक्तीक वापरासाठी महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीची बोलेरो एक्स.एल. ही गाडी खरेदी केली. तिचा नोंदणी क्र.एम.एच.-44-बी-1152 आहे.
तक्रारदारांनी सदर वाहनाचा विमा सामनेवाला क्र.1 कडे घेतला आहे. त्यांचा विमा पत्र नंबर3001/55729/445/00/000 व त्याची वैधता दि.22.12.2008 ते 21.12.2009 पर्यत होती. सदर वाहनाचा दि.14.6.2009 रोजी अपघात झाला. दि.14.6.2009 रोजी तक्रारदाराचा ड्रायव्हर राम बाबुराव शिनगारे हा वरील वाहनात मोरफळी ते अंबेजोगाई जात असताना केंद्रेवाडी शिवारातील खडी सेंटर जवळ आला असता रात्री 11.30 वाजता समोरुन येणा-या वाहनास साईड देत असताना रस्त्याच्या डाव्या बाजूला तक्रारदाराची गाडी पलटी झाली. त्यात वाहनाचे मोठयाप्रमाणात नूकसान झाले. नूकसानीचा तपशील सामनेवाला क्र.2 यांनी दिलेल्या कोटेशन प्रमाणे आहे.
अपघात घडल्यानंतर तक्रारदारानी दि.16.6.2009 रोजी सदरची अपघातग्रस्त वाहन कंपनीचे अधिकृत दूरुस्ती केंद्र सामनेवाला क्र.2 कडे आणले. त्यानी दूरुस्तीचा खर्च रु.3,69,736/- चे कोटेशन दि.16.6.2009 रोजी दिले.
सामनेवाला क्र.2 यांनी दिलेल्या कोटेशप्रमाणे सामनेवाला क्र.1 कडे विमा रककम मिळाल्या बाबत दावा नंबर एमओटीओ 1157498 ने दाखल कले. नंतर सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.20.1.2010 रोजी पत्र पाठवून कळविले की, तक्रारदाराचे वाहनाचे विम्याची रक्कम रु.3,51,050/- पैकी रु.2,14,969/- एवढा दावा मंजूर करुन तक्रारदारांना चेक पाठविला आहे. हा सर्व प्रकार चालू असताना तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 कडे रु.3,41,992/- एवढी रक्कम जमा करुन वाहन दूरुस्त करुन दि.27.1.2010 रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी दि.7.4.2010 रोजी तक्रारदारास मंजूर केलेल्या रक्कमे पेक्षा कमी म्हणजे रु.2,08,938/- चा चेक पाठविला. परंतु सामनेवाला क्र.2 यांनी सदर वाहन दूरुस्ती करिता रु.3,51,050/- इतका खर्च येत असताना प्रत्यक्षात रु.2,08,938/- एवढया रक्कमेचा चेक पाठविला. सामनेवाला क्र.1 चा व्यवसाय कायदयात बसत नाही. तक्रारदारानी त्यांचेकडे अद्यापपर्यत वारंवार फोन करुन स्वतः जाऊन विम्याच्या फरकाची रक्क्मेची मागणी केली परंतु सामनेवाला क्र.1 यांनी अद्यापपर्यत तफावत रक्कम परत दिली नाही.त्यामुळे तक्रारदाराचे अतोनात नूकसान झाले.सामनेवाला क्र.1 यांनी जबाबदारी टाळली. नूकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार हक्कदार आहेत. तक्रारदाराची सामनेवाला क्र.1 कडून येणारी रक्कम खालील प्रमाणे,
1. विम्याची रक्कम रु.1,42,112/-
2. सदर वाहन सहा महिने बंद असल्यामुळे तक्रारदार रु.60,000/-
यास दुस-या वाहनाकरिता झालेला खर्च
3. मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.25,000/-
4. तक्रारीचा खर्च रु.5,000/-
एकूण रु.2,32,112/-
अशा त-हेने सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केला.
विनंती की, तक्रारीत नमूद केल्यानुसार सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना नूकसान भरपाईपोटी रु.2,32,112/- देण्याचे आदेश व्हावेत, सदर रक्कमेवर तक्रार दाखल दिनांकापासून निकाल लागेपर्यत द.सा.द.शे. 12 टक्के प्रमाणे व्याज देण्याचे आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी जिल्हा मंचाची नोटीस स्विकारली परंतु जिल्हा मंचात हजर झाले नाही व त्यांनी त्यांचा खुलासाही दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.2 हजर झाले परंतु त्यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल केला नाही म्हणून दि.8.11.2011 रोजी अनुक्रमे सामनेवाला क्र.1 विरुध्द एकतर्फा तक्रार चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला व सामनेवाला क्र.2 विरुध्द खुलाशाशिवाय तक्रार चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.धांडे व सामनेवाला क्र.1 यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून बोलेरो एक्स एन. या वाहनाचा विमा घेतला आहे. सदर वाहनास दि.14.6.2009 तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे अपघात झाला. सदर अपघातात झालेल्या नूकसानीचे दूरुस्ती बाबत तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे दूरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक रक्कम रु.3,69,736/- चे घेतले आहे व ते सामनेवाला क्र.1 कडे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा दावा रक्कम रु.,2,14,969/- चा मंजूर केलेले आहे. अंदाजपत्रकातील रक्कम व मिळालेली रक्कम यातील तफावती बाबत तक्रारदाराची तक्रार आहे. या बाबत तक्रारदारांनी तक्रारीत रककम रु.2,14,969/- ऐवजी तक्रारीत रक्कम रु.2,08,938/- चा सामनेवाला क्र.1 यांनी चेक पाठविला असे तक्रारदाराचे विधान आहे.परंतु तक्रारीत सदरचा चेक दाखल नाही. याउलट तक्रारदारांनीच सामनेवाला क्र.1 यांचा दि.20.01.2010 रोजीचे सामनेवाला क्र.2 च्या नांवाचेपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, अंदाजपत्रक रक्कम रु.3,51,050/- च्या बाबत विमा कंपनीची जबाबदारी रक्कम रु.2,14,969/- पर्यत सिमीत केलेली आहे. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांना त्यांनी चेक पाठविला आहे. तसेच सदर पत्रात त्यांनी नमूद केले आहे की,सदरच्या वाहनाची दूरुस्तीच्या खर्चाची फरकाची रक्कम तक्ररदाराकडून घेतल्यानंतर वाहन त्यांचे ताब्यात देण्यात यावे.
यावरुन विमा कंपनीने तक्रारदाराचा दावा मंजूर केलेला आहे व मंजूर दावा रक्कम सामनेवाला क्र.2 यांना पाठविली आहे. सदरची रक्कम कमी मिळाल्या बाबत सामनेवाला क्र.2 चा खुलासा नाही व तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे दि.27.1.2010 रोजीच्या पत्रात नमूद केले आहे की, तक्रारदाराकडून एकूण रक्कम रोख मिळाली आहे परंतु सदर पत्रात त्यांना किती रक्कम मिळाली यांचा कोणताही उल्लेख केलेला नाही.त्यामुळे फरकाची रक्कम तक्रारदार तक्रारीत नमूद करतात त्याप्रमाणे शिल्लक असल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही. मुळात दावा मंजूर झालेला असल्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. सदरची रक्कम तक्रारदारानी तक्रार कायम ठेऊन स्विकारली या बाबतचाही कोणताही पुरावा नाही. तसेच सदरची रक्कम तफावत रक्कम म्हणून वसूल करुन देण्याची तक्रारदाराची मागणी मंजूर करणे उचित होणार नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रदद करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड