जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/266 प्रकरण दाखल तारीख - 27/10/2010 प्रकरण निकाल तारीख– 04/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मारोती पुंजाराम पुसंडे, वय 48 धंदा व्यापार, रा.हदगांव ता.हदगांव, नांदेड. अर्जदार. विरुध्द. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड, गैरअर्जदार जनरल इन्शरन्स कं.लि. तर्फे मॅनेजर,ऑफिस पत्ता –बसस्टॅण्डजवळ, अक्सीस बँकेच्यावर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अनिल आर.पंजोल. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.अजय व्यास. . निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हा व्यापारी असून हदगांव येथे कायमचे राहत आहे. दि.17/11/2009 रोजी अर्जदाराने श्री.नरोत्तम प्रभुदास गणात्रा रा. सिव्हील लाईन यवतमाळ यांच्या मालकी व ताब्यातील स्वीफट मारुती कार क्र. एम.एच. – 29 आर 171 विकत घेतली. त्या बाबतची नोंद आर.टी.ओ. ऑफीस नांदेड यांनी घेतली आहे. सदर कारचे इंशुरन्स पुर्वी पासुनच गैरअर्जदाराकडे असल्याने दि.18/02/2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे लेखी अर्ज देऊन कारचे इंशुरन्स सर्टिफीकेटवर आपले नांव नोंदणी केली. सदर इंशुरन्स पॉलिसीचे नं. एमआर 10210559 असून त्याची मुदत दि.21/06/2009 ते 20/06/2010 आहे. सदर कारची दि.23/02/2010 रोजी पलटी होऊन अपघात झाल्याने कारचे बरेच नुकसान झाले. सदर अपघात हा पोलिस स्टेशन बाळापूरच्या हद्यीत भाटेगांव शिवारात पुलाच्या वळणावर झाला. सदर अपघाताची माहीती कारचे ड्रायव्हरने पोलिस स्टेशन आ.बाळापूर येथे दिल्याने सदर अपघाताची नोंद होऊन सदर पोलिसांनी रितसर पंचनामा त्याच दिवशी केला. सदर कारच्या ड्रायव्हरचे नांव भुमया बालया फुलेवार असे आहे. त्यानंतर अर्जदाराने अपघातांसंबंधी कागदपत्र तसेच कारच्या मालकीचे कागदपत्र इंशुरन्ससह तसेच ड्रायव्हरचे लायसंस सोबत जोडून सदर कारचे सर्व्हेक्शन कंपनीच्या निवडक इंजिनीयर यांच्याकडुन पाहणी करुन झालेल्या नुकसानाचे इंशुरन्स पॉलिसी प्रमाणे खर्चाचे दि.29/03/2010 मागणी केली. त्यानंतर अर्जदाराने सदर कारचे सर्वेक्शन तज्ञ श्री.प्रशांत विजयकुमार तांदळे यांच्याकडुन केले तसेच कारचे दुरुस्तीचे खर्च देऊन सदर कार दुरुस्त करुन घेतली. इंशुरन्स पॉलिसीप्रमाणे तसेच वरील सर्वेअरच्या रिपोर्ट प्रमाणे कारला लागलेला नवीन सुटे भागाचा खर्च तसेच लेबर खर्च मिळुन रु.1,17,616.85 एवढे आहे. अर्जदाराने पॉलिसीसंबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून तसेच पॉसिसी अग्रीमेंट प्रमाणे कुठलीही त्रुटी नसतांना गैरअर्जदाराने जाणुन बूजून अर्जदाराचा क्लेम नामंजुर करुन अर्जदाराचे रु.1,17,616.85 तसेच सर्व्हेअर फीस रु.2,640/- आर्थीक नुकसान केले व सेवेमध्ये त्रुटी केली म्हणुन वरील रु.1,20,256.85 व्याजासह मंजुर करण्यात यावे व रु.50,000/- सेवेतील त्रुटीबद्यल नुकसान भरपाई म्हणुन व दावा खर्च म्हणून रु.3,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे. 2. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी लेखी जबाब दाखल केला. अर्जदाराची तक्रार त्यांना मान्य नाही कारण अर्जदार हा व्यापारी आहे?. हे मान्य नाही की, दि.23/02/2010 रोजी वाहनाचा अपघात झाला व त्यात वाहनाचे नुकसान झाले?. अर्जदार यांना स्वतःची तक्रार सिध्द करायची आहे. त्यांच्या सर्व्हेअरने वाहनाचा सर्व्हे केला व सर्व्हे रिपोर्ट दिलेला आहे. हे त्यांना मान्य नाही की, अर्जदार यांनी श्री. तांदळे सर्व्हेअर नेमला व त्यांच्याकडुन सर्व्हे केला. अर्जदार यांनी वाहनाची दुरुस्ती केली व त्याबद्यल रु.1,17,616/- हे त्यांना मान्य नाही. अर्जदार हे कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडले नाही?. अर्जदार यांनी अपघाताची दि.15/02/2010 व दि.23/02/2010 असे दोन्ही दाखवलेले आहे?. सर्व्हेअर यांनी रु.1,36,959/- चा सर्व्हे रिपोर्ट दिलेला आहे. गैरअर्जदार यांच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी नसून अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी, असे म्हटले आहे. 3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व दोन्ही पक्षकारा तर्फेचा युक्तीवाद ऐकुन घेऊन जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तरे 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय? होय. 2. अर्जदारांनी गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी सिध्द केली आहे काय? होय. 3. अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन सदरील कारचे एकुण दुरुस्ती खर्च इ. रु.1,20,256/- वसुल करण्यास पात्र आहेत काय? होय. 4. अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन इतर नुकसान भरपाई रु.50,000/- मिळण्यास पात्र आहेत काय? नाही. 5. काय आदेश.? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – 4. गैरअर्जदाराचे म्हणणे वाचल्यानंतर असे दिसते की, गैरअर्जदारांनी पदोपदी त्यांची नैतीक व कायदेशीर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण फिरुन का होईना, त्यांचेकडे अर्जदाराचे सदरील स्वीफट कार क्र.एमएच-29 आर-171 चा विमा काढले असल्याबद्यलचे कबुल केले आहे व विमाची पॉलिसी म्णुन एमएआर -10210559 याची मुदत दि.21/06/2009 ते 20/06/2010 पर्यंत असल्याचे व ती पॉलिसी पॅकेज पॉलिसी असल्याचे कबुल केले आहे. अर्जदाराने सदरील पॉलिसीबद्यचे कागदपत्र दाखल केलेले आहे, त्याच प्रमाणे त्यांचा ड्रायव्हर भुमया बालया फुलेवार यांचेकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे आर.टी.ओ.चे पत्रही दाखल केले आहे. एकंदरीत कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदाराने सदरील कार मुळ मालक श्री.नारोत्तम प्रभुदास गणात्रा यांचेकडुन विकत घेतल्यानंतर त्यांनी ती पॉलिसी त्यांच्या स्वतःच्या नांवे गैरअर्जदाराकडुन दि.18/02/2010 रोजी करुन घेतलेला आहे. पॉलिसीचा प्रकार पॅकेज पॉलिसी आहे व अर्जदाराच्या नांवे ती पॉलिसी दि.18/02/2010 ते दि.20/06/2010 पर्यंत असल्याचे कागदपत्रावरुन दिसते. अर्जदाराचे शपथपत्र व सदरील कागदोपत्री पुरावा पहाता असे दिसते की, अर्जदार हे गैरअर्जदारा यांचे ग्राहक आहेत म्हणुन मुद्या क्र.1 चे उत्तर सकारात्क देण्यात येते. मुद्या क्र.2 व 3 5. हे दोन्ही मुद्ये एकमेकाशी पुरक असल्यामुळे ते येथे एकत्रित चर्चीण्यास घेण्यात आले आहे.अर्जदाराने त्यांच्या अर्जासोबत जे कागदपत्र दाखल केले आहे त्यामध्ये गाडी त्यांच्या नांवे केल्याचे व इंशुरन्स पॉलिसी त्यांचे नांवे केल्याचे कागदपत्र तर दिलेले आहेतच त्या शिवाय अर्जदाराने त्यांचा ड्रायव्हर भुमया बालया फुलेवार यांनी पोलिस स्टेशन आखाडा बाळापूर येथे सदरील घटेनेबद्यल दिलेली फिर्याद दि.23/02/2010 ची नक्कल दाखल केलेली आहे. त्याच प्रमाणे अर्जदाराने आखाडा बाळापुर येथील पोलिसानी केलेले घटनास्थळ पंचनामाची सत्यप्रत दाखल केलेली आहे. सदरील पोलिस पंचनामा व फिर्यादीचे अवलोकन करता असे दिसते की, सदरील अपघात हा दि.23/02/2010 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरकडा ते वारंगा दरम्यान जाणा-या राज्य रास्त्यावर भाटेगांव शिवारात पुलाच्या वळणावर गाडी पलटी होऊन अपघात झाल्याचे जानवते. सदरील पोलिसाचे रेकॉर्ड पहाता तो अपघात दि.23/02/2010 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळवर घडला व त्या अनुषंगाने पोलिसानी घटनास्थळाचा पंचनामा दोन पंचा समक्ष त्याच दिवसी म्हणजे दि.23/02/2010 रोजी 4.45 दरम्यान केला यावरुन एक गोष्ट निश्चितपणे सिध्द होते की, तो अपघात दि.23/02/2010 रोजी झाला होता. 6. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, तो अपघात दि.15/02/2010 रोजी झाला होता? त्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ त्यांनी एक झेरॉक्सप्रत दाखल केलेली आहे ज्यावर अगोदारची तारीख बदलून नंतर त्यावर दि.15/02/2010 हा आकडा लिहील्याचे दिसते?. घटनेच्या वेळेतही अनेक बदल केल्याचे जाणवते?. बारीकीने पाहीले असता, असे दिसते की, त्यावर मुळ तारीख दि.23/02/2010 लिहीले होते व नंतर परत ती तारीख बदलून त्या ठिकाणी दि.15/02/2010 लिहीण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते? ही तफावत नंतर कोणी केली? याबद्यलचा खुलासा गैरअर्जदारा तर्फे आलेला नाही. त्यामुळे व पोलिसांचा रेकॉर्ड स्वच्छ असतांना गैरअर्जदारांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. वर सांगीतल्याप्रमाणे असे दिसते की, हा गैरअरर्जदाराची जबाबदारी टाळण्याची केवीलवाणा प्रकार असावा असे वाटते? गैरअर्जदाराचे असेही म्हणण्याचा प्रयत्न केला की, अर्जदार हा एक शेतकरी आहे व त्यांच्या जवळ सहा एकर जमीन आहे त्या शिवाय इतर व्यवसाय करीत नाही.? या उलट त्यांचेच CHARTERHOUES Detective services च्या प्रतीनीधीने दिलेल्या रेकॉर्डवरुन असे दिसते की, अर्जदाराकडे सहा एकर शेती आहे व त्या शिवाय त्यांचा यादगीरी हॉटेल अण्ड बार हे सदरील भुमया फुलेवार यांच्याकडुन भाडे तत्वावर चालविण्यास घेतले आहे व त्या पासुन अर्जदारास वर्षाला उत्पन्न रु.2,00,000/- मिळते? असे दिसते की, सदरील मुळ हॉटेल व बार मालकाने ते हॉटेल अर्जदारास भाडे तत्वावर दिल्यानंतर सदरील भुमया फुलेवार हे अर्जदाराची गाडी चालविण्याचा व्यवसाय करत असावा? अशा प्रकारे गैरअर्जदाराने विनाकारण इतर गैरवाजवी गोष्टीला महत्व देऊन अर्जदाराचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. गैरअर्जदाराने त्यांचे सदरील गैरवाजवी म्हणण्याच्या पुष्टयार्थ कोणताही रितसर कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही व त्या अनुषंगाने कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही त्यामुळे त्यांचेवर सदरील पोकळ विश्वास ठेवता येणार नाही, असे या मंचाचे मत झाले आहे. 7. कागदपत्रावरुन अगदी स्वच्छ होते की, अर्जदाराने सदरील सेंकसंड हॅण्ड कार विकत घेतल्यानंतर ती रितसर त्यांच्या नांवावर करुन घेतली व त्यानंतर सदरील इशुरन्स पॉलिसी देखील त्यांनी त्यांच्या नांवावर दि.18/02/2010 रोजी करुन घेतले व त्यानंतर दुर्दैवाने तो अपघात दि.23/02/2010 रोजी दुपारी 3.30 वाजता घडला, त्याबद्यल पोलिस पेपर दुजोरा देतात. सदरील अपघात हा पॉलिसी कालावधी मुदतीच्या आतच झालेले असल्यामुळे गैरअर्जदार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. अर्जदाराचे म्हणणेप्रमाणे व गैरअर्जदारांनी स्पेसीफिक नकार न दिल्यामुळे असे सिध्द होते की, गैरअर्जदारांनी त्यांचे सर्व्हेअर नेमले होते, याप्रमाणे त्यांच्या सर्व्हेअरने सविस्तर चौकशी करुन अहवाल दाखल केला होता, ज्याची नक्कल रेकॉर्डवर दाखल आहे. सदरील कागदपत्रावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरने एकुण गाडीची नुकसानीची देय रक्कम रु.1,36,959/- दर्शविलेली दिसते म्हणजे गैरअर्जदाराच्या सर्व्हेअरने अर्जदाराच्या मागणी पेक्षा जास्तीची रक्कम त्यांना देणे लागतो असे म्हटले आहे? त्या अनुषंगाने विचार करता अर्जदाराने त्यांची मागणी रु.1,20,256/- करुन अतीशय वाजवी असल्याचेच सिध्द केले आहे. रेकॉर्डवरुन गाडीचे नुकसान झाल्याचे फोटोग्राफस दाखल केलेले आहे, त्यावरुन असे दिसते की, गाडीचे बरेच नुकसान झालेले होते व त्यानंतर अर्जदाराने त्या गाडीची दुरुस्ती करुन घेतली व त्यासाठी त्यांनी सर्व्हेअर देखील नेमला होता. वर सांगीतल्याप्रमाणे गैरअर्जदाराने सदरील जबाबदारी टाळण्याचा पदोपदी प्रयत्न केला व शिवाय त्यांनी अर्जदाराची मागणी विनाकारण नामंजुर केली, ज्यामुळे त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत आहे. एकंदरीत कागदपत्रावरुन असे दिसते की, अर्जदाराची मागणी ही अतीशय रास्त आहे. वरील कारणामुळे अधिकचा वायफळ उहापोह न करता या मंचाचे असे मत झाले आहे की, गैरअर्जदार हे अर्जदाराच्या कारची नुकसान भरपाई म्हणुन एकुण रु.1,20,256/- देण्यास बाध्य आहेत. ते पैसे अर्जदारास न देऊन त्यांनी त्यांचे सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. वरील कारणामुळे हे दोन्ही मुद्ये सकारात्मक उत्तरे देऊन निकाली काढण्यात येते. मुद्या क्र. 4 8. वरील चर्चेवरुन असे की, अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन अर्जदाराने दुरुस्त केलेला एकुण खर्च व त्यांचा सर्व्हेअरची फि देखील वसुल करण्यास गैरअर्जदाराकडुन पात्र असतांना ते इतर नुकसान म्हणुन रु.50,000/- मागण्यास मुळीच पात्र नाही असे आम्हाला वाटते. अर्जदाराने ही रु.50,000/- ची मागणी कशाच्या आधारावर केली? तेच समजून येत नाही? जेंव्हा गैरअर्जदारावर वरील संपुर्ण दुरुस्ती खर्च देण्याची जबाबदारी टाकण्यात येत आहे तेंव्हा अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन इतर रु.50,000/- मागु शकणार नाही असे आम्हाला वाटते म्हणुन मुद्या क्र. 4 चे उत्तर नाकारात्मक देऊन निकाली काढण्यात येते. 9. वरील चर्चेवरुन अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन फक्त गाडीचे नुकसानी प्रित्यर्थ रु.1,20,256/- गैरअर्जदाराकडुन वसुल करु शकतो. गैरअर्जदाराने सदरील रक्कम देण्याचे विनाकारण नाकारल्यामुळे अर्जदार हे वरील रक्कमेवर तक्रार दाखल केलेल्या तारखे पासुन म्हणजे दि.27/10/2010 पासुन 9 टक्के व्याजही वसुल करण्यास पात्र आहे. त्याच बरोबर या केसचा खर्च म्हणुन रु.2,000/- देखील गैरअर्जदाराकडुन वसुल करण्यास पात्र आहेत. वरील चर्चेवरुन आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत. 10. आदेश. अ. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येते. ब. गैरअर्जदार यांनी हा निकाल कळाल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदाराला कारच्या नुकसानी पोटी म्हणुन रु.1,20,256/- (रु.एक लक्ष विस हजार दोनशे छपन्न फक्त) व त्यावर तक्रार दाखल केलेली तारीखे पासुन म्हणजे दि.27/10/10 पासुन 9 टक्के व्याजासह द्यावेत. तसे न केल्यास अर्जदार वरील रक्कम 12 टक्के व्याजाने वसुल करण्यास पात्र राहतील. क. गैरअर्जदार यांनी अर्जदारास या केसचा खर्च रु.2,000/- देखील निकाल कळाल्या पासुन 30 दिवसांच्या आंत द्यावेत व त्यांनी या केसचा त्यांचा खर्च त्यांनी सोसावा. (श्री.बी.टी.नरवाड पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |