(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारित दिनांक-05 जुलै, 2017)
01. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल करुन तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा राशी मिळावी या मुख्य मागणीसह दाखल केली.
02. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे पती श्री वामन बापुराव बुधबावरे यांचे मालकीची मौजा लखमापूर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे भूमापन क्रं-18 शेती होती व ते शेती करुन कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. तक्रारकर्तीचे पती हे दिनांक-05/04/2006 रोजी ऑटोमधून जात असताना तो उलटल्याने ते जख्मी झाले आणि वैद्दकीय उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिने तिचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी, हिंगणा, जिल्हा नागपूर यांचेकडे विमा दावा अर्ज दिनांक-27/05/2007 रोजी आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला व पुढे मागणीनुसार वेळोवेळी दस्तऐवजांची पुर्तता केली. परंतु विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तिच्या विम्या दाव्या संबधाने दहा वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही तो विमा दावा मंजूर केला अथवा नामंजूर केला या बद्दल तिला काहीही कळविलेले नाही. म्हणून तिने विरुध्दपक्ष क्रं 1) ते 3) यांना वकीलाचे मार्फतीने दिनांक-13/10/2015 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीसला उत्तर सुध्दा देण्यात आले नाही, अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं तिला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द मागणी केली की, तिला विमा दावा रक्कम रुपये-1,00,000/- विमा दावा दाखल दिनांक-27/05/2007 पासून द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याजासह देण्याचे तसेच झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानी बद्दल रुपये-30,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-15,000/- अशा रकमा विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे एकत्रित लेखी उत्तर अभिलेखावर सादर करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीने ग्राहक मंचाची दिशाभूल करुन बेकायदेशीर लाभ मिळविण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र शासन आणि विरुध्दपक्ष कंपनी यांचेतील त्रिपक्षीय करारा प्रमाणे शेतक-यांसाठी अपघात विमा योजना राबविली जाते. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीचे पती श्री वामन बापुराव बुधबावरे यांचे मालकीची मौजा लखमापूर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे भूमापन क्रं 18 ही शेतजमीन होती, ते शेतीचा व्यवसाय करुन कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत होते या बाबी नाकबुल करण्यात आल्यात. विमा करारा नुसार महाराष्ट्र शासनाचे वतीने विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिका-यां मार्फत आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा विहित मुदतीत 90 दिवसांचे आत दाखल करणे बंधनकारक आहे आणि विमा करारातील नमुद कारणा व्यतिरिक्त जर मृत्यू झाला तर लाभार्थी विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र राहत नाही.
विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीचे पतीचा दिनांक-05/04/2006 रोजी वाहन अपघातात इजा होऊन मृत्यू झाल्याची बाब नाकबुल करण्यात आली. तसेच हे म्हणणे सुध्दा नाकबुल करण्यात आले की, तक्रारकर्तीने आवश्यक दस्तऐवजांसह विमा दावा दिनांक-27.05.2007 रोजी दाखल केला होता. विरुध्दपक्ष विमा कंपनीने तिला विमा दाव्याचे मंजूरी संबधाने काहीही कळविले नसल्याची बाब सुध्दा नाकबुल केली. तिने विरुध्दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविल्याची बाब नाकबुल केली. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला विमा दावा व दस्तऐवज कधीच प्राप्त झालेले नाहीत. तिने विमा दावा विलंबाने सादर करण्याचे कारण देण्याचे टाळले.
विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, विमा दावा विमा अटी व शर्ती नुसार नामंजूर करणे म्हणजे सेवेतील त्रृटी म्हणता येणार नाही. मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी विमा दाव्या संबधीच्या अशा प्रकरणां मध्ये दिनांक-15.04.2013 पर्यंत दस्तऐवज सादर करुन निर्णय घेण्याचे निर्देशित केले होते व त्या अनुषंगाने जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांनी तक्रारकर्तीला दिनांक-25.03.2013 रोजीचे पत्र पाठवून त्याव्दारे दिनांक-15.04.2013 पर्यंत दस्तऐवज सादर करण्यास सुचित केले होते परंतु तिने असे दस्तऐवज सादर केले नाहीत. तिचा विमा दावा दिनांक-31.01.2006 रोजी बंद करण्यात आला व तिला सुचित करुनही तिने विहित मुदतीत व त्यानंतरही आवश्यक दस्तऐवज सादर केलेले नाहीत व मुदती नंतर सत्य वस्तुस्थिती दडवून ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केली. ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदींचा गैरवापर करुन अनुचित लाभ उकळण्याचे दृष्टीने तिने ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार मुदतबाहय असून ग्राहक मंचाचे प्रादेशिक अधिकारक्षेत्रा बाहेर असल्याने ती ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार दंडासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, हिंगणा यांनी त्यांचे लेखी उत्तर सादर केले. त्यांनी लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ती ही त्यांची ग्राहक होऊ शकत नाही. तक्रारकर्तीचा विमा दावा देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी विमा कंपनीची आहे. तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्ताव त्यांचे कार्यालयास कधीच प्राप्त झालेला नाही, त्यामुळे तो अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर या त्यांचे वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारकर्तीचे पतीचा वाहन अपघातात दिनांक-05/04/2006 रोजी मृत्यू झाला. जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयीन पत्र क्रं-1676 दिनांक-25.03.2013 अनुसार मृतकाचे वयाचा दाखला आणि इलेक्शन कॉर्डची झेरॉक्स प्रत मागविण्यात आली होती त्यानुसार त्यांनी सदर दस्तऐवजाच्या प्रती कार्यालयीन पत्र क्रं -777, दिनांक-12/04/2013 अन्वये पाठविण्यात आल्या होत्या. त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही सबब त्यांची मुक्तता करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून सोबत दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना परिपत्रक, विमा दावा प्रपत्र, मृतकाचे नावाचा 7/12 चा उतारा, गावनमुना 6 पत्रक, एफआयआर प्रत, इन्क्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनाम, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, निवडणूक ओळखपत्र, विरुध्दपक्षांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, माहिती अधिकाराती अर्ज अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद आणि मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांच्या प्रती दाखल केल्यात.
06. विरुध्दपक्ष क्रं-1) क्रं-2) विमा कंपनी तर्फे त्यांचे उत्तरालाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल करण्यात आली.
07. तक्रारकर्तीची तक्रार, लेखी दस्तऐवज आणि विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीचे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी यांचे उत्तर व दाखल दस्तऐवज तसेच उभय पक्षांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
08. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या गाव नमुना 7/12 वर्ष-97-98 चे उता-याचे प्रतीवरुन मौजा लखमापूर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथील भूमापन क्रं-18 या शेतीचे मालकी हक्का मध्ये तक्रारकर्तीचे मृतक पती श्री वामन बापूराव बुधबावरे यांचे नावाची नोंद आहे, त्यावरुन तक्रारकर्तीचे पती हे अपघाताचे वेळी शेतकरी होते, ही बाब सिध्द होते. तक्रारकर्तीचे पतीचे मालकीची शेती असल्याची बाब विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे उत्तरात जरी नाकारण्यात आली असली तरी दाखल दस्तऐवजी पुराव्या वरुन अपघाताचे वेळी मृतकाचे मालकीची शेती असल्याची बाब सिध्द होते.
09. दाखल पोलीस स्टेशन सेलू यांचे एफ.आय. आर. प्रतीवरुन मृतक श्री वामनराव बापूराव बुधबावरे यांचा ऑटोमध्ये असताना तो उलटून दिनांक-05.04.2006 रोजी मृत्यू झाल्याचे नमुद असून आरोपी अज्ञात ऑटोचालका विरुध्द गुन्हा नोंद केलेला आहे. पोलीस स्टेशन सेलू यांचे घटनास्थळ पंचनाम्या वरुन मृतकाचा केळझर रेस्ट हाऊस समोरील भागात क्षतीग्रस्त ऑटोमुळे मृत्यू झाल्याचे नमुद आहे. ग्रामीण रुग्णालय सेलू यांचे शवविच्छेदन अहवाला मध्ये मृत्यूचे कारण हे अपघातामुळे रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू असे नमुद केलेले आहे. यावरुन मृतकाचा अपघाती मृत्यू झाल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. भारत सरकार निवडणूक ओळखपत्रा वरुन दिनांक-01.01.94 रोजी मृतकाचे वय-46 वर्ष असल्याची नोंद आहे.
10. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा मुख्य विवाद असा आहे की, तक्रारकर्तीने मागणी करुनही मृतकाचा वयाचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र, ग्राम पंचायत दाखला, इलेक्शन कॉर्डची झेरॉक्स प्रत मागूनही ते दस्तऐवज सादर केले नाही त्यामुळे तिचा विमा दावा दिनांक-31.01.2006 रोजी बंद करण्यात आला व तसे तक्रारकर्तीला सुचित करण्यात आल्याचे नमुद केलेले आहे.
11. अभिलेखावर दाखल जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयीन पत्र क्रं-1676 दिनांक-25.03.2013 अनुसार तक्रारकर्तीला वयाचा दाखला,शाळेचे प्रमाणत्र, ग्राम पंचायत दाखला आणि इलेक्शन कॉर्डची झेरॉक्स प्रत दिनांक-15 एप्रिल, 2013 पर्यंत सादर करण्यास सुचित केले होते, सदर पत्राची प्रत तालुका कृषी अधिकारी हिंगणा, जिल्हा नागपूर यांना सुध्दा पाठविण्यात आली होती. तालुका कृषी अधिकारी यांचे उत्तरा नुसार त्यानुसार त्यांनी सदर दस्तऐवजाच्या प्रती कार्यालयीन पत्र क्रं -777, दिनांक-12/04/2013 अन्वये पाठविण्यात आल्याचे नमुद केले, आपल्या या कथनाचे समर्थनार्थ त्यांनी वामन बापूराव बुधबावरे याने तो हयात असताना त्याचे जन्म तारखे संबधाने दिनांक-06/09/1988 रोजी करुन दिलेल्या प्रतिज्ञालेखाची प्रत दाखल केली, ज्यामध्ये त्याने जन्म तारखेचा दाखल काढलेला नसून त्याची जन्मतारीख ही 02.05.1944 असल्याचे नमुद केलेले आहे. सरपंच ग्राम पंचायत खडकी, पंचायत समिती हिंगणा, जिल्हा नागपूर यांचे प्रमाण्पत्रात सुध्दा मृतकाची जन्मतारीख-02.05.1944 नमुद केलेली आहे. भारत सरकार निवडणूक ओळखपत्रा वरुन दिनांक-01.01.94 रोजी मृतकाचे वय-46 वर्ष असल्याची नोंद आहे. या दस्तऐवजी पुराव्या वरुन तालुका कृषी अधिकारी, हिंगणा, जिल्हा नागपूर यांनी अधिक्षक, कृषी अधिकारी यांचे पत्रा नुसार आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता केल्याची बाब सिध्द होते. मृतका जवळ जन्माचा दाखला नसल्या बद्दल त्याने केलेले प्रतिज्ञालेख सुध्दा आहे.
12. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या प्रमाणे तक्रारकर्तीने मागणी करुनही मृतकाचा वयाचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र, ग्राम पंचायत दाखला, इलेक्शन कॉर्डची झेरॉक्स प्रत मागूनही ते दस्तऐवज सादर केले नाही त्यामुळे तिचा विमा दावा दिनांक-31.01.2006 रोजी बंद करण्यात आला व तसे तक्रारकर्तीला सुचित करण्यात आले परंतु असा विमा दावा बंद केल्या बाबत तक्रारकर्तीला सुचना देणा-या पत्राची प्रत त्यांनी पुराव्या दाखल सादर केलेली नाही.
13. तालुका कृषी अधिकारी, हिंगणा जिल्हा नागपूर यांचे उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीने त्यांचेकडे विमा दावा प्रस्ताव सादर केलेला नाही, तर महाराष्ट्र शासनाने तक्रारकर्त्यांचे वतीने शेतकरी अपघात विमा दावा योजने संबधाने एकत्रित विमा दावे मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग, नवि दिल्ली येथे सादर केले होते आणि त्या संबधाने विमा दावा योजनेतील त्रृटींची पुर्तता संबधितां कडून करण्याचे निर्देश मा.राष्ट्रीय ग्राहकाने अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिले होते व त्याप्रमाणे तालुका कृषी अधिकारी यांनी पुर्तता केलेली आहे.
14. दाखल दस्तऐवजांच्या प्रती वरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्तीने तालुका कृषी अधिका-यांकडे विमा दाव्या संबधाने आवश्यक दस्तऐवजांची मागणी प्रमाणे पुर्तता केली व त्यानुसार तालुका कृषी अधिकारी यांनी सदर दस्तऐवजाच्या प्रती त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं -777, दिनांक-12/04/2013 अन्वये अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांना पाठविल्याची बाब सिध्द झालेली आहे. परंतु त्या नंतरही विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा मंजूर वा नामंजूर केलेला नाही व त्या प्रमाणे तक्रारकर्तीला काहीही कळविलेले नाही आणि ही विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे.
15. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीने विहित मुदतीत ग्राहक मंचा समक्ष तक्रार दाखल केली नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र असल्याचे उत्तरात नमुद केले आहे.
मुदतीचे या आक्षेपाचे संदर्भात वि.ग्राहक मंच खालील निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे-
NATIONAL INSURANCE CO.LTD.-Versus-ASHA JAMDAR PRASAD”- I (2009) CPJ-147 या प्रकरणा मध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोग, मुंबई यांनी मुदती संबधी खालील प्रमाणे भाष्य केलेले आहे-
आदरणीय महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोग यांनी दिलेल्या उपरोक्त नमुद निवाडया मध्ये विलंबाचे कारणास्तव विमा दावा फेटाळण्यात आला होता, तक्रारकर्तीला विलंबाच्या कारणाचे स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली नव्हती आणि ती पतीच्या मृत्यू नंतर शोकमग्न होती, अशा परिस्थितीत तिने ताबडतोब विमा कंपनीकडे दावा दाखल करणे अपेक्षीत नाही, सबब तिचा विमा दावा मंजूर करण्यात आला होता.
आमचे समोरील प्रस्तुत प्रकरणात सुध्दा तालुका कृषी अधिकारी यांनी सदर दस्तऐवजाच्या प्रती त्यांचे कार्यालयीन पत्र क्रं -777, दिनांक-12/04/2013 अन्वये अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांना पाठविल्याची बाब सिध्द झालेली आहे. परंतु त्या नंतरही विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा मंजूर वा नामंजूर केलेला नाही व तसे तक्रारकर्तीला कळविलेले नाही त्यामुळे तक्रारीचे कारण हे सतत घडत असल्याने त्यास मुदतीची बाधा येत नाही.
16. तक्रारकर्ती तर्फे तिच्या वकीलानीं खालील मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवली-
(01) “PRAVEEN SHEKH-VERSUS-LIC & ANR.”—I (2006)
CPJ-53 (NC)
या प्रकरणा मध्ये विमा दावा खारीज केल्याचे पत्र अभिलेखावर दाखल केलेले नव्हते तसेच त्या पत्राची प्रत तक्रारकर्तीला मिळाल्याचे पण सिध्द झाले नव्हते परंतु तरीही जिल्हा ग्राहक मंचाने ती तक्रार खारीज केली होती, जिल्हा मंचाचा तो निर्णय मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रद्दबातल ठरविला आणि तक्रार ही मुदतीत असल्याचे नमुद केले.
हातातील प्रकरणात सुध्दा तक्रारकर्तीचा विमा दावा खारीज केल्या संबधीचे पत्र तक्रारकर्तीला मिळाल्याचा कोणताही पुरावा अभिलेखावर नाही आणि म्हणून तक्रार दाखल करण्यास कारण हे सतत घडत असल्याने ही तक्रार मुदतबाहय होत नाही.
(02) “LAXMIBAI & OTHERS-VERSUS –ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO.LTD”- III (2011) CPJ 507 (NC)
उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाचे निकालांचे आम्ही काळजीपूर्वक वाचन केले, उपरोक्त नमुद निकालापैकी श्रीमती लक्ष्मीबाई विरुध्द आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनी या निकालपत्रात मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, जो पर्यंत विमा कंपनी विमा दाव्या संबधाने निर्णय घेत नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत असते, मृत्यूचे दिनांका पासून 02 वर्षाचे आतच तक्रार ग्राहक मंचात दाखल करता येते या कारणास्तव ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याचे अधिकार रोखता येणार नाहीत असे स्पष्ट नमुद केलेले आहे, आणि हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती या प्रकरणातील वस्तुस्थितीशी जवळपास सारखीच आहे त्यामुळे सदर निकालपत्र येथे तंतोतंत लागू पडते.
17. ग्राहक मंचा तर्फे खालील मा. सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रावर भिस्त ठेवण्यात येते-
“KANDIMALLA RAGHAVAIAH & CO.-VERSUS-NATIONAL INSURANCE COMPANY LTD.& ANR.”-III (2009) CPJ- 75 (SC)
या निकालपत्रात मा.सर्वोच्च न्यायालयाने असे नमुद केलेले आहे की, तक्रारीचे कारण जो पर्यंत विमा दाव्या संबधीचा निर्णय संबधिताला विमा कंपनी तर्फे कळविल्या जात नाही तो पर्यंत सतत घडत असते. आमचे समोरील प्रकरणात विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी ही तक्रारकर्तीला त्यांचे कार्यालयीन पत्र दिनांक-25/01/2010 चे पत्रान्वये विमा दावा फेटाळल्या बाबत सुचित केले असल्याचे जरी म्हणत असली तरी तक्रारकर्तीने सत्यापनावर असे नमुद केले आहे की, तिला विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे तिचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केल्या बाबत काहीही कळविलेले नाही तसेच सदर विमा दावा फेटाळल्या बाबत पत्र पाठविल्या बाबत पुरावा म्हणून पोस्टाची पावती प्रत व पोच विरुध्दपक्ष विमा कंपनीने पुराव्या दाखल दाखल केलेली नाही त्यामुळे जो पर्यंत विरुध्दपक्ष विमा कंपनी विमा दावा मंजूरी अथवा नामंजूरी बाबत कळवित नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडणारे असते असे जे मा.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नमुद केलेले आहे, तीच परिस्थिती आमचे समोरील प्रकरणाला सुध्दा लागू पडते, त्यामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाचे हे निकालपत्र आमचे समोरील प्रकरणात तंतोतंत लागू पडते.
18. प्रकरणातील पोलीस दस्तऐवज, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र यावरुन मृतक श्री वामन बापूराव बुधबावरे याचा मृत्यू हा अपघातामुळे झाल्याची बाब दाखल दस्तऐवजी पुराव्यां वरुन सिध्द होते. एवढे सर्व एकमेकाशीं पुरक दस्तऐवज असताना आणि दस्तऐवजी पुराव्यां वरुन सत्य वस्तुस्थिती विषद होत असताना विरुध्दपक्ष विमा कंपनीने निष्कारण तक्रारकर्तीचा विमा दावा योग्य असूनही (Genuine Claim) नामंजूर करुन तिला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते आणि त्यामुळे तिला निष्कारण शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी कडून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा राशी रुपये-1,00,000/- आणि त्यावर तालुका कृषी अधिकारी, हिंगणा, जिल्हा नागपूर यांचे मार्फतीने विमा दावा निश्चीती संबधाने मागणी केलेल्या दस्तऐवजी पुर्तता केल्याचा दिनांक-12/04/2013 नंतर विमा दावा निश्चीतीसाठीचा कालावधी 02 महिने सोडून म्हणजे दिनांक-12/06/2013 ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे, त्यावरुन ग्राहक मंच तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्ती श्रीमती सुशिलाबाई वामन बुधबावरे यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, विभागीय कार्यालय रामदास पेठ, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-2) आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे चेअरपर्सन, मुंबई यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) आणि त्यावर दिनांक-12/06/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम द्दावी.
(03) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्तीस द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) विमा कंपनी तर्फे संबधित अधिका-यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) विरुध्दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, हिंगणा, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर यांनी त्यांचे कार्य व्यवस्थित पार पाडल्याने त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश नाहीत त्यांना या तक्रारीतून मुक्त करण्यात येते.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.