निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* आदेश 1. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांनी नेमलेले विमा निरीक्षक आहेत. तक्रारदार भ्रमणध्वनीसंच विक्री करण्याचा व्यवसाय करतात व त्यांचे बांद्रा पूर्व येथे दुकान आहे. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडून विमा पॉलीसी विकत घेतली होती व त्यामध्ये तक्रारदारांचे दुकानातील भ्रमाध्वनीसंचाचा साठा विमा करारात अंतर्भुत होता. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे दि.26 जुलै, 2005 रोजी मुंबई येथे अतिवृष्टी झाली व त्यामध्ये दुकानामध्ये पावसाचे पाणी भरले व तक्रारदारांचे दुकानाची एक भित पडून भ्रमणध्वनीसंचाचा दुकानातील साठा व कागदपत्रे व रजिस्ट्रर्स वाहून गेले. तक्रारदारांचे याप्रमाणे रु.5,35,800/- चे नुकसान झाले. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे दिनांक 30.7.2005 रोजी विमा करारा प्रमाणे नुकसान भरपाई मिळणेकामी आपले मागणीपत्र दाखल केले व रु.5 लाखाची नुकसानभरपाईची मागणी केली. 3. सा.वाले विमा कंपनी यांनी सा.वाले क्र.2 विमा निरीक्षक यांची नेमणूक केली. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे दुकानाला भेट दिली, साक्षीदारांचे जाब जबाब घेतले, जागेची पहाणी केली व त्यावरुन तक्रारदारांची मागणी खोटी व गैर आहे असा अहवाल सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांचेकडे दिला. त्या अहवालाप्रमाणे सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 4 जानेवारी 2006 प्रमाणे तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले क्र.1 यांचेकडून भ्रमणध्वनी साठयाची किंमत रक्कम रु.3 लाख व मानसिक त्रास दिल्याबद्दल नुकसान भरपाई रु.2 लाख अशी एकंदर रु.5 लाखाची मागणी केली. 4. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी आपली कैफियत दाखल केली व तक्रारदारांनी विमा करार हा वाणीज्य व्यवसायाकामी उतरविलेला असल्यामुळे ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. असा पवित्रा घेतला. तसेच सा.वाले क्र.1 यांनी नेमलेल्या विमा निरीक्षकांनी दिलेला अहवाल सुस्पष्ट असल्याने व विमा निरीक्षकांनी तक्रारदारांचे मागणीतील खोटेपणा आपल्या अहवालात दाखविल्याने तक्रारदारांना नुकसान भरपाई देय नाही असे कथन केले. 5. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. सा.वाले यांनी त्यांचे विमा निरीखक, यांनी दिलेल्या अहवालाची प्रत हजर केली. तर तक्रारदारांनी वेगवेगळया कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या. प्रसतुत मंचाने तक्रार, कैफियत तसेच शपथपत्रे व कागदपत्रे यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. . | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा केली नाही व सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार हे सा.वाले यांचे नुकसान भरपाईची रक्कम वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाहीत. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 6 सा.वाले यांनी आपल्या कैफियतमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी विम्याचा करार हा त्यांचे वाणीज्य व्यावसायाकामी केला असल्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (ड) (ii ) प्रमाणे तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. या संदर्भात मा.राष्ट्रय आयोगाचा हर्सोलिया मोटर्स विरुध्द नॅशनल इंनश्युरन्स कंपनी लिमिटेड I (2005) CPJ 27 (NC) दि.3.12.2004 या प्रकरणातील निवाडा सुस्पष्ट असून विमा कराराचे संदर्भात वाणीज्य व्यवसाया संबंधीचे वरील तरतुदीमधील परंतूक लागू होत नाही. व विमा करार करणारे ग्राहक या संज्ञेत येतात. 7. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दुकानातील साठयाचे संदर्भात विमा घेतला होता ही बाब मान्य आहे. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे दिनांक 26 जुलै, 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या दुकानाची भिंत कोसळली व दुकानामध्ये असलेला भ्रमणध्वसंचाचा साठा, झेरॉक्स मशिन वाहून गेले व त्यांचे प्रचंड नुकसान झाले. तक्रारदारांनी आपले तक्रारीचे पृष्ठ क्र.22 वर तपशिलाचे परिशिष्ठ जोडले आहे त्यामध्ये एकूण नुकसानीचा आकडा रु.5,35,800/- असा दाखविला आहे. 8. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 यांचेकडे मागणीपत्र सादर केल्यानंतर सा.वाले क्र.1 सा.वाले क्र.2 यांचे विमा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली व सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांचे दकानास भेट देवून,साक्षीदारांचे जाब जबाब घेवून व संपूर्ण चौकशी करुन आपला अहवाल सा.वाले क्र.1 यांचेकडे दाखल केला त्याची प्रत सा.वाले क्र.1 यांनी दाखल केली आहे. त्या अहवालाचे प्रस्तुत मंचाने काळजीपूर्वक वाचन केले आहे. त्या अहवालावरुन असे दिसते की, तक्रारदारांना सा.वाले क्र.2 विमा निरीक्षक यांनी भ्रमणध्वनी संचाचे खरेदीचे संदर्भात काही कागदपत्र, बिले, पावत्या व साठा रजिस्ट्रारमधील नोंदी याची मागणी केली होती. दुकानामध्ये काही रजिस्ट्रर उपलब्ध होती परंतु ती संबंधित व्यवहाराची नव्हती असे तक्रारदारांनी सांगीतले व एकूणच भ्रमणध्वनीचे खरेदीचे संदर्भात तसेच साठयाचे संदर्भात कुठलीही कागदपत्र हजर करण्यास असमर्थता दर्शविली. येथे एक बाब नमुद करणे आवश्यक आहे की, तक्रारदारांनी पृष्ठ क्र.22 वर मालाचे नुकसानी बद्दलचा तपशिल दिला आहे त्यामध्ये पावसाचे पाण्यामध्ये भिंत पडल्यानंतर रजिस्ट्रदेखील वाहून गेली असा उल्लेख नाही. हा अहवाल/परिशिष्ठ दिनांक 30.7.2005 म्हणजे घटनेनंतर चारच दिवसात तंयार करण्यात आला आहे. यावरुन असे दिसते की, भ्रमणध्वनी संचाची खरेदीची कागदपत्रं, पावत्या व रजिस्ट्रर पावसाचे पाण्यामध्ये वाहून गेले हे तक्रारदारांचे कथन पश्चात बुध्दीचे आहे. 9. विमा निरीखकांचे अहवालावरुन असे दिसते की, तकारदारांनी विमा निरीक्षाकडे अशी माहीती दिली की तक्रारदारांनी भ्रमणध्वनीसंच हे श्री.एन.एन.असोशियेटस्, कापडीया नगर, कुर्ला (पश्चिम) यांचेकडून विकत घेतले होते. येवढेच नव्हे तर तक्रारदारांनी श्री.एन.एन.असोशियेटस् यांनी त्या संबंधी दिलेले प्रमाणपत्र तक्रारदारांनी हजर केले. तथापी विमा निरीक्षकांनी श्री.एन.एन.असोशियेटस् यांनी दिलेल्या पंत्यावर जेव्हा भेट दिली तेव्हा तिथे कुठलेही कार्यालय नसून श्री.एन.एन.काझी नावाचे इसम राहात आहेत अशी माहिती मिळाली. त्याबद्दल विमा निरीक्षकांनी त्या इमारतीतील सुरक्षा कर्मचा-याचा लबाब घेतला त्याचा उल्लेख विमा अहवालाचे पृष्ठ क्र.7 (संचिकेचे 19) वर आहे. विमा निरीक्षकांनी कंपनी नोंदणीचे कार्यालय यामध्ये चौकशी केली असताना त्यांना अशी माहिती मिळाली की, श्री.एन.एन.असोशियेटस् या नावाची कंपनी अस्तीत्वातच नाही. यावरुन तक्रारदारांनी सा.वाले यांचे विमा निरीक्षक यांना श्री.एन.एन.असोशियेटस् यांचे कडून भ्रमणध्वनीसंच विकत घेण्यात आले होते अशी खोटी माहिती दिली असे दिसून येते. 10. तक्रारदारांनी या संदर्भात कुठलीही कागदपत्र किंवा पावत्या किंवा बिले हजर केली नाहीत. 11. विमा निरीक्षक यांनी काही साक्षीदारांचे जबाब घेतले व त्यांना असे दिसून आले की, पावसाचे पाणी दुकानात साठल्यानंतर दुकानाकडे दोन तिन व्यक्ती लोखंडी हंत्यारे घेऊन आल्या व त्यांनी दुकानाची भिंत पाडली व साठलेल्या पाण्याला वाट करुन दिली. यावरुन असे दिसते की, तक्रारदारांचे हे कथन की, दुकानाची भिंत पावसाने पडली व त्यामध्ये सर्व रजिस्ट्रर व कागदपत्रे वाहून गेली यात तथ्य नाही. 12. विमा निरीक्षकांनी असेही मत नोंदविले की, चौकशीकामी तक्रारदारांना विचारपुस केली असताना तकारदार हे असंबदध उत्तरे देत होते. साहाजीकच तक्रारदारांची मागणी खोटी असल्याने तक्रारदार विमा निरीक्षकासमक्ष एकही कागदपत्र हजर करु शकले नाहीत व कागदपत्र रजिस्टर नष्ठ झाल्याबद्दल समाधानकारक खुलासा करु शकले नाहीत. येवढेच नव्हेतर प्रस्तुत मंचाचे समक्ष व प्रस्तुत तक्रारीचे चौकशीचे दरम्यानदेखील तक्रारदार भ्रमणध्वनीसंचाचे खरेदीचे संदर्भात अथवा साठयाचे संदर्भात समाधानकारक पुरावा दाखल करु शकले नाहीत. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीसोबत नुकसानीचे तपशिलाचे परिशिष्ठ पृष्ठ क्र.22 वर दाखल केलेले आहेत ते तक्रारदारांचे स्वतःचे सहीचे आहे. त्यास जास्त महत्व देणे शक्य नाही. तक्रारदाराने ठाणे अंमलदार वांद्रा कुर्ला कॉप्लेक्स यांनी दिलेले प्रमाणपत्र दि.30.7.2005 दाखल केलेले आहे परंतु ते प्रमाणपत्र तक्रारदारांनी स्वतःहून दिलेल्या माहितीच्या आधारे होते त्यास देखील विशेष महत्व देता येणार नाही. सदरील प्रमाणपत्राचे व्यतिरिक्त तक्रारदारांनी कुठलेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. तक्रारदारांनी तक्रारीचे पृष्ठ क्र.33 वर श्री.एन.एन.असोशियेटस् यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये श्री.एन.एन.असोशियेटस् यांनी तक्रारदारांना वेगवेगळया कंपनीचे भ्रमणध्वनीसंच दि.20.7.2005 पुरविले होते असे नमुद केलेले आहे. या संदर्भात विमा निरीक्षकांचे अहवालामध्ये अभिप्राय नोंदविला असून विमा निरक्षकांनी चौकशी अंती या नावाची कंपनी अस्तीत्वातच नव्हती असा अहवाल सादर केलेला आहे. त्यावरुन श्री.एन.एन.असोशियेटसचे प्रमाणपत्रास अजिबात महत्वा देता येत नाही. 13. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी सा.वाले क्र.2 विमा निरीखक यांच्या अहवालावर आधारीत तक्रारदारांची मागणी फेटाळलेली आहे. विमा निरीक्षक यांना संपूर्ण चौकशी करण्याचे अधिकार होते व त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही केली. विमा निरीक्षकाचा अहवाल हा विमा कंपनीवर जरी बंधनकारक नसला तरीही विमा करारावरुन नुकसान भरपाई मागण्याचे संदर्भात तो महत्वाचा पुरावा ठरतो. या संदर्भात मा. ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी तक्रार क्र.410/1998 श्री.नागराज कलुरामजी सकारीया विरुध्द युनायटेड इंडिया इनश्युरन्स कंपनी लि. व इतर, निकाल दिनांक 27.1.2009 या प्रकरणात असा अभिप्राय नोंदविला आहे की, विमा निरीक्षक हे त्रयस्त व्यक्ती असल्याने व संपूर्ण चौकशीवर आधारीत त्याचा अहवाल असल्याने त्यांचे निष्कर्षास महत्व देणे योग्य ठरते. 14. वरील निष्कर्षावरुन तक्रारदार हे सा.वाले विमा कंपनी यांनी तक्रारदारांची मागणी नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. सबब तक्रारदार सा.वाले यांचेविरुध्द कुठलीही दाद मिळण्यास पात्र नाहीत. 15. वरील परिस्थिती पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 242/2007 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबद्दल काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |