न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी त्यांचे शेतीचे मशागतीसाठी जॉन डीअर कंपनीचा 5045डी या मॉडेलचा ट्रॅक्टर सन 2020 मध्ये खरेदी केला होता. त्याचा नोंदणी क्र. एमएच-11-सीडब्ल्यू-1472 असा आहे. सदर ट्रॅक्टरचा विमा तक्रारदार यांनी जाबदार विमा कंपनीकडे उतरविला असून त्याचा विमा पॉलिसी क्र. 3008/267155121/00/B00 असा आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दि. 7/11/2022 ते दि. 6/11/2023 असा आहे. सदर ट्रॅक्टरची IDV किंमत रु.6,24,000/- इतकी पॉलिसीवर नमूद केलेली आहे. दि. 24/3/2023 रोजी तक्रारदार हे मौजे खिंडवाडी ता.जि.सातारा येथे शेतीचे काम करुन जकातवाडी येथे परत येत असताना सदर ट्रॅक्टरला अपघात होवून ट्रॅक्टरचे पूर्ण नुकसान झाले. सदर अपघातात तक्रारदार यांचा ट्रॅक्टर पूर्णपणे डॅमेज झाला. म्हणून तक्रारदारांनी जाबदार कंपनीस याची सूचना दिली. तदनंतर जाबदार विमा कंपनीने अधिकृत सर्व्हेअर व इन्व्हेस्टीगेटर यांनी सदर वाहनाचे अपघाताची व नुकसानीची माहिती घेतलेली आहे. सर्व्हेअर यांनी सर्व्हे रिपोर्ट तयार करुन जाबदार कंपनीस सादर केला असून इनव्हेस्टीगेटर यांनीही त्यांचा अहवाल जाबदार कंपनीस दिलेला आहे. परंतु वेळोवेळी मागणी करुनही जाबदार कंपनीने तक्रारदार यांना विमा दावा अदा केलेला नाही. जाबदार विमा कंपनीने दि. 26/6/2023 चे पत्राने Misrepresentation of facts (Causes of loss not justified with existing damages on vehicle and try to hide material facts about loss). Claimed damages are not concurrent, not matching with loss description mentioned in the claim form असे कारण देवून तक्रारदाराचा विमादावा फेटाळला आहे. जाबदार विमा कंपनीने चुकीचे कारण देवून तक्रारदाराचा विमा दावा फेटाळला असून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून पॉलिसीची रक्कम रु.6,24,000/- मिळावी, सदर रकमेवर दि. 26/6/2023 पासून द.सा.द.शे. 15 टक्के दराने व्याज मिळावे, दंडापोटी रु.3,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- व अर्जाचा खर्च रु.25,000/- मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत विमा पॉलिसीची प्रत, तक्रारदाराचे वाहनाचे आर.सी.बुकची प्रत, तक्रारदार यांचे वाहन चालकाचे लायसेन्सची प्रत, तक्रारदार यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्याद व जबाबाची प्रत, विमादावा नाकारलेचे पत्र, तक्रारदार यांचे उपचाराचे वैद्यकीय कागदपत्रे, क्रेन सर्व्हिसच्या पावत्या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र, जादा पुरावा शपथपत्र व श्रीराम ट्रेडर्स यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्र दाखल केले आहे.
4. सदरकामी जाबदार यांना नोटीसची बजावणी होवूनही ते हजर न झालेने जाबदार यांचेविरुध्द दि. 13/10/2023 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तदनंतर दि. 25/10/2023 रोजी जाबदार हजर झाले व त्यांनी परवानगी अर्जासोबत त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले. परंतु जाबदार यांचेविरुध्द दि. 13/10/2023 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेला असलेने जाबदार यांचा म्हणणे दाखल करुन घेणेबाबतचा परवानगी अर्ज नामंजूर करण्यात आला. सबब, जाबदार यांनी दाखल केलेले म्हणणे व शपथपत्र याकामी विचारात घेण्यात आले नाही.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, पुरावा, युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदारांचा विमादावा नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार यांनी त्यांचे मालकीच्या जॉन डीअर कंपनीचा 5045डी या मॉडेलच्या ट्रॅक्टर नोंदणी क्र. एमएच-11-सीडब्ल्यू-1472 चा विमा जाबदार विमा कंपनीकडे उतरविला असून त्याचा विमा पॉलिसी क्र. 3008/267155121/00/B00 असा आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दि. 7/11/2022 ते दि. 6/11/2023 असा आहे. सदर ट्रॅक्टरची IDV किंमत रु.6,24,000/- इतकी पॉलिसीवर नमूद केलेली आहे. जाबदार यांनी सदरची बाब नाकारलेली नाही. सदर विमा पॉलिसीची प्रत तक्रारदार यांनी याकामी दाखल केली आहे. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 व 3
7. सदरकामी तक्रारदार यांनी जाबदार यांचे क्लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. सदर पत्राचे अवलोकन करता जाबदार यांनी खालील कारणास्तव तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्याचे दिसून येते.
“Misrepresentation of facts (causes of loss not justified with existing damages on vehicle and try to hide material facts about loss). Claimed damages are not concurrent, not matching with loss description mentioned in claim form.”
8. जाबदार यांचे क्लेम नाकारलेचे पत्राचे अनुषंगाने तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीची व जबाबाची प्रत दाखल केली आहे. तसेच क्रेन सर्व्हिसच्या पावत्या दाखल केल्या आहेत. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे वाहनाचे निश्चित किती नुकसान झाले याचा कोणताही बोध होत नाही. तसेच तक्रारदारांनी श्रीराम ट्रेडर्स यांचे दि. 12/1/2024 चे पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये तक्रारदाराच्या ट्रॅक्टरचे पूर्णतः नुकसान झालेचे नमूद केले आहे. परंतु सदरचे पत्र हे कोणत्याही तज्ञ व्यक्तीने दिलेले पत्र नाही. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
9. तक्रारदार यांचे तक्रारीतील कथनानुसार, जाबदार विमा कंपनीचे अधिकृत सर्व्हेअर यांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टरची पाहणी करुन त्याचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला आहे. तसेच इन्व्हेस्टीगेटर यांनी तपास करुन इन्व्हेसटीगेशन रिपोर्ट तयार केला व तो जाबदार विमा कंपनीकडे जमा केला आहे. तथापि हे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही.
10. तसेच तक्रारदार यांनी वेळोवेळी मागणी करुनही जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना सर्व्हे रिपोर्ट व इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट दिला नाही या कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने जाबदार कंपनीकडे त्यांनी दिलेला कोणताही मागणी अर्ज दाखल केलेला नाही.
11. तक्रारदाराने त्यांचे वाहनाचे झालेल्या नुकसानीबाबत कोणताही सुस्पष्ट पुरावा दाखल केलेला नाही. वाहनाच्या झालेल्या नुकसानीचा संपूर्ण तपशील तज्ञ व्यक्तीमार्फत मिळविण्याची तक्रारदारास पुरेशी संधी होती. परंतु तक्रारदाराने तसा कोणताही प्रयत्न केल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. तक्रारदार यांचे कथनानुसार तक्रारदार यांचा अपघातग्रस्त ट्रॅक्टर सन 2020 मध्ये खरेदी केला आहे. सदर ट्रॅक्टरचा अपघात हा दि. 24/3/2023 रोजी म्हणजेच खरेदीनंतर 3 वर्षांनी झालेला आहे. असे असताना अपघातावेळी ट्रॅक्टरची किंमत किती होती हे दाखविणारा कोणताही तज्ञाचा अहवाल तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही.
12. तक्रारदाराने त्यांचे तक्रारअर्जात वाहनाचे पूर्णतः नुकसान झालेचे कथन केले आहे. परंतु सदरची कथने ही मोघम स्वरुपाची कथने आहेत. सदर कथनांचे पुष्ठयर्थ कोणताही ठोस पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब, जाबदारांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली ही बाब योग्य त्या ठोस पुराव्यानिशी तक्रारदारांनी शाबीत केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे व तक्रारदार हे कोणतीही नुकसान भरपाई जाबदार यांचेकडून मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी दिले आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.