::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक-20 मार्च, 2014 ) 01. तक्रारकर्तीने कायदेशीर वारसदार या नात्याने तिचे मृतक पती श्री राजू माणिकराव पाटील यांचे पॉलिसी संबधाने देय विमा दावा रक्कम रुपये-1,00,000/- व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून मिळावी व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्तीचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे- तक्रारकर्तीचे पती श्री राजू माणिकराव पाटील हे सहकारी कायद्दाखाली नोंदणीकृत असलेल्या इस्पात इंडस्ट्रीज एम्प्लाईज क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, कळमेश्वर, जिल्हा नागपूर या सहकारी पतसंस्थेचे सदस्य होते व ते इस्पात इंडस्ट्रीज कळमेश्वर येथे नौकरीत होते. (इस्पात इंडस्ट्रीज एम्प्लाईज क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड याचा उल्लेख सोईचे दृष्टीने निकालपत्रात “कर्मचारी पतसंस्था” असा करण्यात येईल) सदर कर्मचारी पतसंस्थेनी तिचे सदस्यां करीता विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून ग्रुप पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत एकूण 764 सदस्यां करीता विमा पॉलिसी काढली होती व त्यानुसार संबधित सदस्यां कडून विमा हप्त्याची कपात करण्यात आली होती. विमा पॉलिसीचा क्रं-4005/61084746/00/000 असा असून विम्याचा कालावधी हा दि.04.09.2010 ते 03.09.2011 असा होता. तक्रारकर्तीचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांचा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे यादी मधील अनुक्रमांक-465 व इन्शुअर्ड क्रं-2530 होता. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांचा रस्त्यावरील अपघातात दि.11.10.2011 रोजी मृत्यू झाला. मृत्यू प्रमाणपत्रा वरुन मृत्यू दि.11.10.2010 असल्याचे स्पष्ट होते. त.क. ने पुढे असे नमुद केले की, पतीचे मृत्यू नंतर विमा दाव्याची रक्कम विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून मिळावी म्हणून तक्रारकर्तीने विमा दावा पतसंस्थेचे मार्फतीने दाखल केला होता. तसेच आवश्यक दस्तऐवज प्राप्त करुन गैरअर्जदार कंपनीतील अधिकारी श्री रवि चिखले व श्री आदित्य भाबडा यांचे जवळ नोव्हेंबर, 2011 मध्ये (सदर दिनांक नोव्हेंबर, 2011 चुकीने नमुद केल्याचे दिसून येते, तो नाव्हेंबर, 2010 असल्याचे दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते) देण्यात आले होते. त्यापूर्वी दि.12.11.2011 रोजी (सदर दि.12.11.2011 हा चुकीचा नमुद केला असून त्या ऐवजी तो दि.12.11.2010 असल्याचे दस्तऐवजा वरुन स्पष्ट होते) वि.प.विमा कंपनीचे नागपूर येथील कार्यालयाला दुरध्वनीव्दारे मृत्यू संबधी माहिती दिल्याने वि.प.विमा कंपनीचे अधिकारी श्री रवि चिखले व श्री आदित्या भाबडा यांनी तक्रारकर्तीस भेटून विमा दावा रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासित केले होते. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-2 तर्फे दि.04.02.2011 रोजीचे पत्रान्वये दस्तऐवजाची मागणी करण्यात आली, त्यानुसार संपूर्ण दस्तऐवज पुरविण्यात आले असताना सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.16.07.2011 रोजीचे पत्रान्वये मृतक श्री राजू माणिकराव पाटील यांचा विमा दावा हा 100 दिवसा नंतर दाखल केल्याचे कारणा वरुन फेटाळला. पतसंस्थेने त्याचे स्पष्टीकरण दि.04.08.2012 रोजीचे ईमेल व्दारे करुन विमा दावा रक्कम देण्यास विनंती केली, त्यास विरुध्दपक्ष विमा कंपनीने उत्तर देऊन ग्राहक सेवा व्यवस्थापक यांचेकडे पाठपुरावा करावा व संपूर्ण दस्तऐवज त्यांचेकडे पाठविले असल्याचे सांगितले. त्यानुसार ग्राहक सेवा व्यवस्थापकांशी संपर्क साधण्यात आला परंतु उपयोग झाला नाही म्हणून तक्रारकर्तीने दि.09.04.2012 रोजी विरुध्दपक्षांना वकीला मार्फतीने नोटीस पाठवून विमा दावा रकमेची मागणी केली परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे उत्तर देण्यात आले नाही वा विमा दावा रक्कम देण्यात आली नाही. म्हणून तक्रारकर्तीने मंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द खालील प्रमाणे मागणी केली- तक्रारकर्तीची प्रार्थना- 1) तक्रारकर्तीचे विमाधारक पती श्री राजू माणिकराव पाटील यांचे मृत्यू संबधाने विमा विमा दावा रक्कम रुपये-1,00,000/- त्यांचा मृत्यू दिनांक-11/10/2011 पासून द.सा.द.शे.21% व्याजासह त.क.ला वि.प.विमा कंपनीने देण्याचे आदेशित व्हावे. 2) तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई देण्याचे वि.प.विमा कंपनीने त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 3) प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीने त.क.ला देण्याचे आदेशित व्हावे. 03. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 विमा कंपनी तर्फे श्री इद्रीस खानवाला, लिगल मॅनेजर वि.प.क्रं 1 विमा कंपनी यांनी प्रतिज्ञालेखावरील उत्तर मंचा समक्ष सादर केले. वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्तीने मंचा समक्ष सत्य वस्तुस्थिती लपवून ठेऊन चुकीची तक्रार केल्याने ती खारीज होण्यास पात्र आहे. त्यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दाचे अधिकार क्षेत्रात येत नसल्याने खारीज व्हावी. विरुध्दपक्ष विमा कंपनीने पतसंस्थेच्या सदस्यांचा विमा काढल्याची बाब मान्य केली परंतु सदर विमा हा विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार काढण्यात आला होता. विमा पॉलिसीचा क्रं-4005/61084746/00/000 असा असून विम्याचा कालावधी हा दि.04.09.2010 ते 03.09.2011 असल्याची बाब मान्य केली. सदर विमा पॉलिसीव्दारे एकूण 764 सदस्यांचा विमा काढला होता आणि अपघाती मृत्यू आल्यास प्रती सदस्य रुपये-1,00,000/- विमा रकमेची जोखीम स्विकारण्यात आल्याची बाब मान्य केली. पॉलिसी स्विकारल्यानंतर पॉलिसीची प्रत त्यातील अटी व शर्तीसह पतसंस्थेस पुरविण्यात आली होती. तक्रारकर्तीचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांचा रस्ता अपघातात दि.10.11.2010 रोजी मृत्यू झाल्याची बाब मान्य केली. मात्र विमाधारक श्री राजू पाटील यांचे मृत्यू नंतर दुसरे दिवशी विमा कंपनीचे अधिकारी श्री रवि चिखले आणि श्री आदित्य भाबडा यांना अपघाती मृत्यूची सूचना दिल्याची बाब विशेषत्वाने नाकबुल केली तसेच विमा प्रस्ताव नोव्हेंबर-2010 मध्ये आवश्यक दस्तऐवजांसह सादर करण्यात आला होता ही बाब नाकबुल केली. वि.प.विमा कंपनीचे अधिका-यानीं तक्रारकर्तीस नोव्हेंबर-2010 मध्ये विमा दाव्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कळविण्यात आल्याची बाब नाकबुल केली. वि.प.विमा कंपनीने दि.04.02.2011 रोजीचे पत्रानुसार तक्रारकर्ती कडून दस्तऐवजाची मागणी केली होती ही बाब
अभिलेखाचा भाग असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने वि.प.विमा कंपनीचे मागणी नुसार संपूर्ण दस्तऐवज पुरविल्याची बाब नाकबुल केली. दि.16.07.2011 रोजीचे पत्रान्वये वि.प.विमा कंपनीने पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार तक्रारकर्तीचा विमा दावा योग्य कारणास्तव फेटाळला. तक्रारकर्तीचा विमा दावा विहित मुदतीत वि.प.विमा कंपनीस सुचना दिली नसल्याने 100 दिवसाचे नंतर विमा दावा सादर केल्याचे कारणा वरुन फेटाळला. पतसंस्थेने दि.04.08.2012 रोजी पाठविलेल्या ईमेल ला विरुध्दपक्ष विमा कंपनीने उत्तर दिले आहे. तक्रारकर्तीने दि.09.04.2012 रोजी वि.प.विमा कंपनीस कायदेशीर नोटीस पाठविल्याची बाब अमान्य केली. विरुध्दपक्ष विमा कंपनीने पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला. तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.विमा कंपनीने केली. 04. तक्रारकर्तीने तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर केली. सोबत दस्तऐवज यादी नुसार आममुखत्यारपत्र, वि.प.विमा कंपनीचे विमा दावा फेटाळल्या बाबत दि.16 जुलै, 2011 चे पत्र, वि.प.विमा कंपनीने दि.04.02.2011 रोजी पतसंस्थेस पाठविलेले अतिरिक्त दस्तऐवज मागणी पत्र, त्यावर पतसंस्थेने ईमेल व्दारे दिलेले दि.04 ऑगस्ट, 2011 रोजीचे उत्तर, वि.प.विमा कंपनीने दि.08 ऑगस्ट, 2011 रोजी पतसंस्थेस पाठविलेला ईमेल, वि.प.विमा कंपनीचे दि.21.09.2010 चे पतसंस्थेस विमा जोखीम स्विकारल्याचे पत्र, ग्रुप पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी शेडयुल, विमा सदस्यांची यादी, क्लेम फॉर्म, त.क.चे वकीलांनी वि.प.विमा कंपनीस दि.09.04.2012 रोजीची पाठविलेली कायदेशीर नोटीस, वि.प.विमा कंपनीस कायदेशीर नोटीस मिळाल्या बाबत पोस्टाच्या पावत्या, पोच पावत्या, मृतक विमाधारकाचा अंतिम अहवाल नमुना, मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तसेच प्रतीउत्तरा दाखल प्रतिज्ञालेख व लेखी युक्तीवाद सादर केला.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील उत्तर सादर केले. अन्य दस्तऐवज सादर केले नाहीत. 6. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे अधिवक्ता श्री सुधीर धुर्वे तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे अधिवक्ता श्री जयस्वाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 07. तक्रारकर्तीची तक्रार, वि.प.विमा कंपनीचे लेखी उत्तर, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत- मुद्दा उत्तर (1) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?...................................................होय. (2) अंतिम आदेश काय ?................................ तक्रार अंशतः मंजूर ::कारण मिमांसा:: मु्द्दा क्रं 1 व 2 बाबत- 08. मंचाचे मते तक्रारकर्तीचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांची ग्रुप पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी ते कार्यरत असलेल्या इस्पात इंडस्ट्रीज एम्प्लाईज क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, कळमेश्वर, जिल्हा नागपूर मार्फतीने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून काढण्यात आली होती. ग्रुप पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसीचा क्रं-4005/61084746/00/000 असा असून विम्याचा कालावधी हा दि.04.09.2010 ते 03.09.2011 असा होता. सदर विमा पॉलिसीव्दारे पतसंस्थेतील एकूण 764 सदस्यांचा विमा काढला होता आणि अपघाती मृत्यू आल्यास प्रती सदस्य रुपये-1,00,000/- विमा रकमेची जोखीम वि.प.विमा कंपनीव्दारे स्विकारण्यात आली होती व त्यामध्ये श्री राजू माणिकराव पाटील यांचे नावाचा समावेश होता या बाबी उभय पक्षांना मान्य आहेत व सदर बाबी अभिलेखावर दाखल पॉलिसीची प्रत, शेडयुल प्रत यावरुन सिध्द होतात. प्रकरणातील उपलब्ध अंतिम अहवाल नमुना, मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल या दस्तऐवजांच्या प्रतीवरुन तक्रारकर्तीचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांचा रस्त्यावरील अपघाताने दि.11.10.2010 रोजी मृत्यू झाल्याची बाब सिध्द होते. दि.12.10.2010 रोजीचे शवविच्छेदन अहवाला मध्ये मृतक विमाधारक श्री राजू माणिकराव पाटील यांचे मृत्यूचे कारण हेड इन्ज्युरी असे नमुद केलेले आहे. पतसंस्थेच्या विमाधारक सदस्यांचे यादीमध्ये तक्रारकर्तीचे पतीचा अनुक्रमांक-465 दर्शविला असून इन्शुअर्ड क्रं-2530 नमुद असल्याचे दिसून येते. थोडक्यात विमाधारकाचा पॉलिसीचे कालावधीत झालेला अपघाती मृत्यू ही बाब विरुध्दपक्ष विमा कंपनीस मान्य आहे, त्या बाबत विवाद नाही. 09. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा संक्षीप्त विवाद असा आहे की, यातील विमाधारक श्री राजू पाटील यांचा अपघाती मृत्यू दि.11 ऑक्टोंबर, 2010 रोजीचा असून, विरुध्दपक्ष विमा कंपनीस त्याची सूचना 19 जानेवारी, 2011 रोजी देण्यात आली. सदरची सूचना घटनेच्या 100 दिवसा नंतर दिलेली आहे. पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार विमा दावा हा घटना घडल्या पासून 03 महिन्याचे आत सादर न केल्यास विमा रक्कम देय नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीने वरील कारणास्तव तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळल्याचे पत्र पतसंस्थेस दि.16 जुलै, 2011 रोजीचे पाठविले.
10. या संदर्भात मंचाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचे मृतक पती सदस्य असलेल्या इस्पात इंडस्ट्रीज एम्प्लाईज को-ऑप. क्रेडीट सोसायटीस दि.04.02.2011 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत तक्रारकर्तीने दाखल केली, ज्यामध्ये एफ.आय.आर, शवविच्छेदन अहवाल, आणि मालकाचे कव्हरींग लेटर अशा अतिरिक्त दस्तऐवजाची मागणी करण्यात आल्याचे दिसून येते. पतसंस्थे तर्फे दि.04 ऑगस्ट, 2011 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीस जो ईमेल पाठविण्यात आला त्याची प्रत तक्रारकर्तीने दाखल केली. सदर ईमेल मध्ये तक्रारकर्तीचा विमा दावा हा घटना घडल्या पासून 100 दिवसाचे नंतर सुचना दिल्याचे कारणावरुन फेटाळण्यात आल्याची बाब पतसंस्थे तर्फे संपूर्णपणे नाकारण्यात आली आणि ईमेल मध्ये पुढे पतसंस्थे तर्फे नमुद करण्यात आले की, श्री राजू पाटील यांचे दि.11.10.2010 रोजीचे मृत्यू नंतर लगेच दुसरे दिवशी दुरध्वनी वरुन सूचना वि.प.विमा कंपनीचे अधिकारी श्री रवि चिखले आणि श्री आदित्य भाबडा यांना देण्यात आली तसेच मृत्यू दाव्या संबधीचे आवश्यक दस्तऐवज वि.प.विमा कंपनीचे अधिकारी श्री रवि चिखले आणि श्री आदित्य भाबडा यांचे जवळ नोव्हेंबर, 2010 मध्ये देण्यात आले. तसेच ईमेल मध्ये पतसंस्थे व्दारे असेही नमुद केलेले आहे की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.04.02.2011 रोजी दस्तऐवज मागणी पत्रात मागणी केल्या नुसार विहित मुदतीत दस्तऐवज सादर केले आणि या सर्व बाबी मंचा समक्ष प्रकरणातील दाखल ईमेलचे प्रतीवरुन सिध्द होतात. पतसंस्थेचे ईमेलचे अनुषंगाने विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.08 ऑगस्ट, 2011 रोजी ईमेल व्दारे उत्तर पाठवून त्यात नमुद केले की, तुमची विनंती संबधित टिम कडे पाठविण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हास पुढे कळवू. 11. मंचाचे मते पतसंस्थेव्दारे दि.04 ऑगस्ट, 2011 रोजी वि.प.विमा कंपनीस पाठविलेल्या ईमेल मधील मजकूर वि.प.विमा कंपनीने नाकारलेला
नाही. जर मृतक विमाधारकाचे मृत्यू दाव्याची सूचना आवश्यक दस्तऐवजांसह वि.प.विमा कंपनीस मिळाली नसती आणि जर वि.प.विमा कंपनीचे दि.04.02.2011 रोजीचे मागणी पत्रा नुसार अतिरिक्त दस्तऐवज पतसंस्थे कडून मिळाले नसते तर त्या संबधाने वि.प. विमा कंपनीने पुढेही पत्रव्यवहार पतसंस्थे कडे केला असता किंवा पतसंस्थेचा ईमेल संदेश प्राप्त झाल्या नंतर तशा प्रकारचा उजर/आक्षेप त्याचवेळी नोंदविला असता परंतु तशा प्रकारची कोणतीही कृती विरुध्दपक्ष विमा कंपनीने केलेली नाही. तक्रारकर्तीचे मृतक पती श्री राजू माणिकराव पाटील यांचा मृत्यू संबधीचा विमा दावा न देण्या करीता शोधलेली ही एक पळवाट आहे असे मंचाचे मत आहे. 12. मंचाचे मते ज्याअर्थी विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.04.02.2011 रोजीचे पत्राव्दारे अतिरिक्त दस्तऐवजाची मागणी केली त्याअर्थी या तारखेचे पूर्वीच विरुध्दपक्ष विमा कंपनीस विमाधारक श्री राजू माणिकराव पाटील यांचे मृत्यू दाव्या संबधीचे आवश्यक दस्तऐवज पतसंस्थे कडून प्राप्त झालेले होते आणि त्यावरुनच विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.04.02.2011 रोजीचे पत्राव्दारे अतिरिक्त दस्तऐवजाची मागणी पतसंस्थेकडे केलेली आहे ही बाब सिध्द होते. उपरोक्त नमुद सर्व घटनाक्रमा वरुन व प्रकरणातील उपलब्ध पत्रव्यवहारा वरुन तक्रारकर्तीचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांचा विमा कालावधीत अपघाती मृत्यू झालेला असताना व त्याची सूचना मृत्यू नंतर लगेच दुस-या दिवशी पतसंस्थे कडून विरुध्दपक्ष विमा कंपनीस दुरध्वनी वरुन मिळालेली असताना तसेच मागणी नुसार विहित मुदतीचे आत विमा दाव्या संबधाने अतिरिक्त दस्तऐवज पतसंस्थेनी सादर केलेले असताना तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारणे ही विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीस दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे मत आहे. 13. मंचाचे मते तक्रारकर्ती ही तिचे मृतक पती विमाधारक श्री राजू माणिकराव पाटील यांचे विमा पॉलिसी संबधाने विमा रक्कम रुपये-1,00,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनी विमा दावा नाकारल्याचा दिनांक-16 जुलै, 2011 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष विमा
कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारखर्चा बद्दल रुपये-5000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहे. 14. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे प्रकरणात आदेश पारीत करीत आहे- ::आदेश:: 1) तक्रारकर्ती श्रीमती विमल राजू पाटील तर्फे इस्पात इंडस्ट्रीज एम्प्लॉईज को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी, कळमेश्वर, जिल्हा नागपूर यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्ष विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार पतसंस्थेव्दारे तक्रारकर्तीस तिचे पती श्री राजू माणिकराव पाटील यांचे ग्रुप पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी क्रं- 4005/61084746/00/000 अनुषंगाने अपघाती मृत्यू देय विमा रक्कम रुपये-1,00,000/-(अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) विमा दावा नाकारल्याचा दि.-16 जुलै, 2011 पासून द.सा.द.शे.12% व्याजासह द्दावी. 3) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष विमा कंपनीने त.क.ला द्दावेत. 4) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारखर्च म्हणून रु.-5000 /-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) त.क.ला द्दावेत. 5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.. 6) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |