नि. क्र. १८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र.२३५३/२००९
-------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३१/१२/२००९
तक्रार दाखल तारीख : २/१/२०१०
निकाल तारीख : २३/०८/२०११
------------------------------------------
श्रीमती सुमंगला सुभाष बिरादार,
वय वर्षे – ३५, व्यवसाय – शेती व घरकाम
रा. बोगी खुर्द ता.जत, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स
कंपनी लि., महालक्ष्मी, मुंबई नं.३४
२. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
१०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – ४११००५
३. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. एम.एन. शेटे
जाबदारक्र.१ ते ३ : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दाखल केला आहे.
२. प्रस्तुत तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे – जाबदार नं.१ ही विमा कंपनी आहे. तसेच यातील जाबदार क्र. २ हे जाबदार क्र.३ यांचे सल्लागार आहेत. जाबदार क्र.३ हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत जाबदार नं.३ यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांना अपघातासंदर्भात विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार नं.१ यांच्याबरोबर विमा करार केला आहे. तक्रारदार यांचे पती सुभाष गौंडाप्पा बिरादार हे शेतकरी होते. त्यांचा दिनांक ०९/०३/२००६ रोजी अपघाती मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील शेतक-याच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार जाबदार क्र. १ यांचेकडे उतरवलेल्या विमा पॉलिसीनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळणेसाठी तहसिलदार कार्यालय, जत यांचेमार्फत फॉर्म भरुन विमा क्लेम दाखल केला परंतू जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामूळे विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेले आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ ते ३ यांना याकामी नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
४. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व दाखल कागदपञांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार १ यांचेबरोबर विमा करार केला आहे त्यामुळे मयत शेतकरी व त्यांचे कुटुंबिय हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो, त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
५. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी नि.१७/१ वर सदर पॉलिसीबाबतचे करारपञ हजर केले आहे. तसेच नि.१७/३ वर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक हजर केले आहे. सदर करारपञानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासन व जाबदार नं.१ यांचेमध्ये महाराष्ट्रातील शेतक-यांना अपघातापासून विमा संरक्षण मिळणेसाठी करार करण्यात आल्याचे दिसून येते. सदर विमा पॉलिसीनुसार विम्याचा कालावधी हा दि.१०/४/२००५ ते ९/४/२००६ असे असल्याचे दिसून येते. सदर पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार मयत झालेली व्यक्तीही शेतकरी असणे गरजेचे आहे व मृत्यूसमयीचे वय १५ ते ७० वयोगटातील असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये मयत शेतक-यांच्या नावे सात बारा उतारा व खाते उतारा असल्याबाबत व त्यानंतर तक्रारदार यांची सातबारा सदरी नावे लागल्याचा पुरावा तक्रारदार यांनी या कामी दाखल केला आहे. तक्रारदार यांचे पुर्व हक्कदार अपघातात मयत झाल्याबाबत वर्दीजबाब व पंचनाम्याची प्रत दाखल केली आहे. यावरुन तक्रारदारांचे पुर्व हक्कदार हे अपघातात मयत झाले याबाबत पुरावा मंचासमोर आला आहे. प्रस्तुत प्रकरणांमध्ये इंक्वेस्ट पंचनामा नि.५/४ वर दाखल आहे त्यामध्ये सुभाष बिरादार यांचे वय मृत्यूसमयी ३५ वर्षे एवढे नमूद आहे. या सर्व पुराव्यावरुन तक्रारदार यांचे पुर्व हक्कदार मयत व्यक्ती या १५ ते ७० वयोगटातील शेतकरी होते व त्यांचा अपघाती मृत्यु विमामुदतीत झाला ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज तक्रारअर्जाचे पृष्ठयर्थ योग्य ते शपथपत्र दाखल केले आहे व आवश्यक ती कागदपत्रे सादर केली आहेत. जाबदार यांनी याकामी हजर होवून त्यांचे म्हणणे न दिलेने त्यांचेविरुध्द प्रतिकूल निष्कर्ष काढून सदरचे तक्रारदार हे मयताचे कायदेशीर वारस व लाभार्थी असल्याने विमा करारानुसार रक्कम रु. १,००,०००/- मिळणेस पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
६. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत काय निर्णय घेतला हे जाबदार यांनी तक्रारदार यांना कळविले नाही व तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर केला नाही अथवा तक्रारदारांना विम्याची रक्कम अदा केली नाही त्यामूळे तक्रारदार यांना निश्चितच मानसिक ञासास सामोरे जावे लागले व या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
७. यातील जाबदार क्र.३ हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत व जाबदार क्र.२ हे सल्लागार आहेत. विम्याचे संरक्षण देण्याची जबाबदारी व करार जाबदार क्र. १ यांचेबरोबर झालेला आहे त्यामूळे सदरचा आदेश जाबदार नं.१ यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहे.
२. तक्रारदार यांना जाबदार नं.१ यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये १,००,०००/-(अक्षरी रुपये एक
लाख माञ) व सदर रकमेवर तक्रार अर्ज नोंदविले तारखेपासून म्हणजे दि.३१/१२/२००९ पासून
द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत.
३. तक्रारदार यांना जाबदार क्र.१ यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पांच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.१ यांनी दिनांक ७/१०/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार नं.१ यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक
संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. २३/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११