(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराची आई ही शेतकरी व शेतकरी अपघात विमा योजनेची लाभधारक होती. दिनांक 31/12/2005 रोजी घराला आग लागून त्यामध्ये ती भाजली व त्यातच तिचे निधन झाले. त्यानंतर घटनास्थळपंचनामा, इन्क्वेटपंचनामा, पी एम करण्यात आले. तहसिलदार पैठण यांनी जी कागदपत्रे मागितली त्यासहीत क्लेमफॉर्म दिनांक 3/2/2006 रोजी तहसिलदाराकडे देण्यात आला. तहलिदार पैठण यांनी क्लेमफॉर्म व कागदपत्रे आयसीआयीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे पाठवून दिला. त्यानंतर, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीनी तक्रारदाराकडे पत्र पाठविले नाही. गैरअर्जदार, तहसिलदार याच्याकडूनही क्लेमच्या रकमेबद्दल कुठलीही माहिती देण्यात आली नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 1 लाख 18 टक्के व्याजदराने, रु 1 लाख नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने, आयसीआयसीआय लोंबार्ड यांच्या विरुध्द मा. राष्ट्रीय आयोगात तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे सदरील तक्रार,Resjudicata याबाबीमुळे मंचात चालणार नाही. इन्शुरन्स कंपनीने अतिरिक्त लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 28/4/2006 रोजी त्यांनी तक्रारदारास पत्र पाठवून काही आवश्यक ती कागदपत्रे मागविली होती. जसे वयाचा दाखला, फेरफार फॉर्म, 8 ए फॉर्म, पीएम रिपोर्ट , या कागदपत्राशिवाय तक्रारदाराचा क्लेम सेटल होऊ शकत नाही. तक्रारदारानी मयताच्या नावावर फेरफार झालेले दाखल केले नाही. सदरील तक्रार ही प्रीमॅच्युअर आहे म्हणून नामंजूर करावी अशी मागणी करतात. गैरअर्जदारानी कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 तहसिलदार पैठण, यांच्याविरुध्द मंचानी एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित केला. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी तहसिलदार पैठण यांना क्लेमफॉर्म सर्व कागदपत्राहीत दिनांक 3/2/2006 रोजी दिल्याचा पुरावा दाखल केला आहे. त्यामध्ये जवळ जवळ 1 ते 8कागदपत्रे दाखल केल्याचे दिसून येते. 7/12, 8 अ, पीएम रिपोर्टचाही समावेश आहे. इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, क्लेम सेटल करण्यास आणखीन कांही कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी दिनांक 28/4/2006 रोजी पत्र पाठविले होते. ती कागदपत्रे तक्रारदारानी पाठविली नाहीत. परंतू हे पत्र तक्रारदारास पाठविल्याचा पुरावा त्यांनी मंचात दाखल केला नाही. तक्रारदारही हे पत्र मिळाल्याचे म्हणत नाहीत आणि तसेही क्लेमफॉर्मसोबत, 8 अ, 7/12 व पीएम रिपोर्ट पाठविले होते. फक्त फेरफारचा कागद आवश्यक होता. त्यासाठी तहसिलदारामार्फत पत्र पाठविले असते तरी झाले असते. वास्तविक पाहता, शेतकरी अपघात विमा योजनेनुसार ही सर्व कागदपत्रे,तलाठी/कृषी अधिका-यानीच जमा करुन घ्यावयाची असतात. असे असतानाही,इन्शुरन्स कंपनीने तथाकथित पत्र पाठवून ही कागदपत्रे मागविली म्हणतात हे अयोग्य आहे. तक्रारदारानी मंचात ही सर्व कागदपत्रे 7/12 चा उतारा (सन 2005-06) दाखल केला आहे. त्यावरुन,मयत कस्तुरीबाई दादा राखे हया शेतकरी होत्या हे स्पष्ट होते. पॉलिसीप्रमाणे त्यांच्या वारसांना ही रक्कम मिळायला पाहिजे ती रक्कम देणे इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनीस असा आदेश देतो की, त्यांनी क्लेमची रक्कम रु 1 लाख दिनांक 3/2/2006 रोजी पासून 9 टक्के व्याजदराने व तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा, गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास रक्कम रु 1 लाख दिनांक 3/2/2006 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने द्यावेत तसेच तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) ( श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |