नि. 17
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.अमोल देशपांडे
मा.सदस्य : श्री कमलाकांत कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र.2352/09
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 31/12/2009
तक्रार दाखल तारीख : 2/1/2010
निकाल तारीख : 01/3/2013
-------------------------------------------
श्रीमती सुरैय्या युसूफ नंदूर
वय वर्षे – 32, व्यवसाय – घरकाम व शेती
रा. उटगी, ता.जत, जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
महालक्ष्मी, मुंबई नं.34
2. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
101, शिवाजी नगर, 3 रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – 411005
3. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एम.एन. शेटे
जाबदारक्र.1 ते 3 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री.कमलाकांत कुबल
1. प्रस्तुत प्रकरणात जाबदार यांचेविरुध्द अशी तक्रार आहे की, जाबदार यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार विम्याची रक्कम नाकारली आहे. सदर रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारदार यांनी या मंचासमोर तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. सदर प्रकरणात तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.1 विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला होता. तक्रारदार यांचे पती कै. युसूफ हैदर नंदूर हे शेतकरी होते व त्यांचा दि.14/11/2005 रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला. तक्रारदार या त्यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारसदार आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गाव कामगार तलाठी उटगी यांचेकडे जानेवारी 2005 मध्ये प्रस्ताव दाखल केला. गांवकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार जत यांचेकडे पाठविला. तहसिलदार जत यांनी सदरचा प्रस्ताव जाबदार क्र.3 मार्फत योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविला. सर्व पूर्तता करुन ही जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा देण्याचे टाळलेले आहे त्यामुळे तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळण्यासाठी तसेच शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाचा खर्च मिळण्यासाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.5 चे यादीने सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र.1 ते 3 यांचेवर मंचाच्या नोटीशीची बजावणी होवून देखील ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत किंवा आपले लेखी म्हणणे सादर केलेले नाही.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता जाबदार प्रस्तुत प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी मंचासमोर हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे मंचाने नि.3 वर जाबदार क्र.1 ते 3 यांना नोटीसा लागू झाल्या असून देखील ते ब-याच काळापासून गैरहजर, म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा प्रकरण चालविण्याचा आदेश पारीत केला आहे.
6. सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.1 यांचेबरोबर विमा करार केला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी व त्यांचे वारस हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो, त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र. 1 यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
7. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी नि. 15/3 वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये विम्याचा कालावधी दि.10/4/2005 ते 9/4/2006 असा असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू दि.14/11/2005 रोजी म्हणजे विमा मुदतीत झाला आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी दाखल केलेल्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाचे वतीने जाबदार क्र.1 यांच्या बरोबर राज्यातील शेतक-यांसाठी विमा योजना राबविण्यात आली असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.15/3 चे पॉलिसीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय 10 ते 75 वयोगटातील असणे आवश्यक आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे वय 35 असे नमूद आहे. अपघातग्रस्त व्यक्ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी सात-बारा उतारा व खाते उतारा याकामी दाखल केला आहे. सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे पती हे शेतकरी आहेत ही बाब समोर येते.
8. तक्रारदाराने सर्व कागदपत्रे दाखल करुनही सदरचा विमादावा जाबदार क्र.1 यांनी अद्यापही मंजूर केलेला नाही अथवा फेटाळलेला नाही ही सेवेतील त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत मंच आला असल्याने तक्रारदार हे रक्कम रु. 1 लाख व सदर रकमेवर विमा दावा मागणी केल्याचे तारखेपासून म्हणजे दि.29/12/2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणेबाबत आदेश करणे न्याय्य होईल असे मंचाचे मत झालेले आहे.
9. तक्रारदार याने शारिरिक मानसिक त्रासापोटीद नुकसान भ्रपाई व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे ती अंशतः मान्य करण्यात येत आहे.
10. यातील जाबदार क्र.3 हे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.2 यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. विम्याचे संरक्षण देण्याची जबाबदारी व करार जाबदार क्र.1 यांचेबरोबर झालेला आहे त्यामूळे सदरचा आदेश जाबदार क्र.1 यांचेविरुध्द करणेत येतो.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना जाबदार नं.1 यांनी विमा दाव्यापोटी रक्कम रुपये 1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख माञ) दि.29/12/2009 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह अदा करावेत.
3. तक्रारदार यांना जाबदार क्र.1 यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार नं.1 यांनी दिनांक 12/4/2013 पर्यंत करणेची आहे.
5. जाबदार नं.1 यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 01/03/2013
(कमलाकांत कुबल ) (अमोल देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.