तक्रार क्र. CC/ 12/ 74 दाखल दि. 28.09.2012
आदेश दि. 10.09.2014
तक्रारकर्ता :- श्रीमती निलम निलेश चकोले
वय – 35 वर्षे, धंदा - घरकाम
रा. रामाजी दिवटे यांचे घरी, मैदा मिलचे मागे
समृध्दी नगर, तकीया वॉर्ड, भंडारा
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. आय.सी.आय.सी.आया लंबार्ड जनरल इन्शुरन्स
कंपनी लिमीटेड, आय.सी.आय.सी.आय.टॉवर
बांद्रा, कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा(पुर्व),मुंबई
मार्फत मॅनेजर.
2. आय.सी.आय.सी.आया लंबार्ड जनरल इन्शुरन्स
कंपनी लिमीटेड, 301,तिसरा मजला,
भुवन टॉवर्स,91,एस.डी.रोड,सिकंदराबाद 500025
मार्फत मॅनेजर.
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.बावणे
वि.प. तर्फे अॅड.लिंगे
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्तीचे पती निलेश लक्ष्मण चकोले यांच्या अपघात विमा दाव्याची रक्कम विरुध्द पक्ष यांनी न दिल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्तीचे पती निलेश चकोले यांचा अपघाती मृत्यु दिनांक 6/6/2008 ला देव्हाडी गावाजवळ ता.तुमसर जि.भंडारा येथे झाला. विरुध्द पक्ष हे विमा कंपनी असून तक्रारकर्तीच्या पतीने विरुध्द पक्ष क्र.2 यांचे कडून Two Wheeler Package policy हा विमा काढला होता. तक्रारकर्तीच्या पतीने Two Wheeler Package policy दिनांक 27/5/2008 ते 26/5/2009 या कालावधीकरीता काढला होती. सदरहू पॉलीसीचा क्रमांक 3005/2010021289/0000000229 असा आहे.
तक्रारकर्तीचे पती अपघातात मरण पावल्यानंतर तक्रारकर्तीने अपघाती मृत्यु विमा दावा मिळण्यासाठी विरुध्द पक्षाकडे अर्ज केला. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्तीस दिनांक 28/2/2009 ला पत्र पाठवून मृतकाची मुळ पॉलीसी व वारस प्रमाणपत्र विरुध्द पक्षास देण्याची मागणी केली. तक्रारकर्ती व मृतकाचे आईचे संबंध चांगले नसल्यामुळे तक्रारकर्ती मृतकाचे आईचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करु शकली नाही.
त्यानंतर तक्रारकर्तीने न्यायमंचात तक्रार क्र.52/2010 ही तक्रार दाखल केली व विमा दावा मिळण्याची मागणी केली. परंतु न्याय मंचाने दिनांक 15/7/2010 ला वारसाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे व ते देणे बंधनकारक असल्यामुळे ते नाहरकत प्रमाणपत्र तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास दयावे व विरुध्द पक्षाने विमा दावा निकाली काढण्याकरीता पुढील कार्यवाही करावी, असा आदेश पारित केला.
3. तक्रारकर्तीने मुळ पॉलीसी विरुध्द पक्षाला अगोदरच दिलेली होती तसेच तक्रारकर्तीने न्यायमंचाच्या आदेशाप्रमाणे दिनांक 13/5/2011 ला पत्राद्वारे मृतकाचे आईचे नोटरी केलेले संमती प्रमाणपत्र विरुध्द पक्षास पाठविले. हे प्रमाणपत्र विरुध्द पक्षास दिनांक 19/5/2011 ला मिळाले. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार रुपये 1,00,000/-(एक लाख) विमा दाव्याचे मिळण्यासाठी व रुपये 20,000/-(वीस हजार) मानसिक त्रासापोटी व्याजासह व खर्चासाठी मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केलेले आहे.
4. तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 28/9/2012 ला नोटीस काढण्यात आल्या.
5. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपला जबाब दिनांक 13/3/2013 ला दाखल केला.
6. विरुध्द पक्षाने आपल्या जबाबात तक्रारकर्तीच्या तक्रारीचे खंडन केले आहे.
7. विरुध्द पक्षाने आपले जबाबात म्हटले आहे की तक्रारकर्तीने विरुध्द पक्षालान्यायमंचाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक कागदपत्रे देण्यास 10 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला. त्यामुळे विरुध्द पक्षास तक्रारकर्तीचे प्रकरण चौकशीकरीता पाठविण्यास विलंब झाला. विरुध्द पक्षाच्या चौकशी अधिका-यांनी चौकशी केली असता मृतक हा अपघातावेळी वाहन क्र.MH-36, E-1906 हे वाहन स्वतः चालवित होता व अपघाताच्या वेळी त्या वाहनातून 3 व्यक्ती प्रवास करीत असल्यामुळे मृतकाने 2 व्यक्तीचे परमीट असलेल्या दुचाकी वाहनाच्या नियमाचे उल्लंघन केले असल्यामुळे हा विमा कायदयाचा व कराराचा भंग असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत पॅकेज पॉलीसी पान नं.16 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे कागदपत्रे दाखल करण्याचे प्रपत्र पान नं.17 वर दाखल केले आहे. कागदपत्रासंबंधी विरुध्द पक्षाने दिलेले स्मरणपत्र पान नं.19 वर दाखल केले आहे. तसेच तक्रार क्र.52/2010 मधील आदेश पान नं.15 वर दाखल केला आहे. Consent Letter of all Legal Hairs पान नं.19 ते 24 वर दाखल केले आहे. तक्रारकर्तीचा दावा निकाली काढण्याबद्दलचे दिनांक 10/8/2011 चे पत्र पान नं.34 वर व पोचपावती पान नं.35 वर दाखल केली आहे. तक्रारकर्तीने वकीलामार्फत पाठविलेली नोटीस पान नं. 42 वर दाखल केली आहे.
9. तक्रारकर्तीचे वकील अॅड.जयेश बोरकर यांनी युक्तीवाद केला की न्यायमंचाने तक्रार क्र.52/2010 मध्ये दिलेल्या आदेशानुसार तक्रारकर्तीने Legal Heir चे नाहरकत प्रमाणपत्र विरुध्द पक्षाला सादर केले व ते सदरहू प्रकरणात सुध्दा दाखल केलेले आहे. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास संपुर्ण कागदपत्रे देवून सुध्दा दिनांक 13/5/2011 ला तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली काढण्याबद्दल विनंती करुन सुध्दा विरुध्द पक्षाने दावा निकाली न काढणे म्हणजे सेवेतील त्रृटी आहे. तक्रारकर्तीने दिनांक 16/4/2012 ला विरुध्द पक्षाला कागदपत्रांची पुर्तता केली असून विरुध्द पक्षाला दावा निकाली काढण्याबाबत नोटीस सुध्दा पाठविली. विरुध्द पक्षाला नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाने सदरहू प्रकरण दाखल करेपर्यंत तक्रारकर्तीचा दावा निकाली न काढल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत व न्यायोचित असून ती मंजुर करण्यात यावी, असा युक्तीवाद केला.
10. विरुध्द पक्षाचे वकील अॅड.विनय लिंगे यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्तीने Legal Heir Consent Letter विरुध्द पक्षास 10 महिन्याच्या कालावधीनंतर दिले तसेच तक्रारकर्तीच्या पतीची दुचाकी वाहनावर 2 व्यक्ती नेण्याची परवानगी असतांना सुध्दा तक्रारकर्तीच्या पतीने अपघाताच्या वेळी 3 व्यक्तींना बसविले असल्यामुळे Motor Vehicle कायदयाच्या कलम 128 व विमा कराराचे उल्लंघन असल्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ही मंजुर होण्यास पात्र नसून विरुध्द पक्ष तक्रारकर्तीस तक्रार खारीज करण्याचे पत्र पाठविणार होते, परंतु त्याआधीच तक्रारकर्तीने सदरहू तक्रार दाखल केली आहे, परंतु ती मंजुर होण्यास पात्र नसल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी.
11. तक्रारकर्तीचा तक्रार अर्ज व संबंधित कागदपत्रे, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
12. तक्रारकर्तीने मृतकाच्या आईचे संमतीपत्र जे पान नं.22 ते 24 वर दाखल केले आहे. ते विरुध्द पक्षास रजिस्टर पोस्टाने विद्यमान नयायमंचाच्या तक्रार क्र.52/2010 मधील दिनांक 15/7/2010 च्या आदेशाप्रमाणे पाठविले. विरुध्द पक्षास ते संमतीपत्र पोस्ट मास्टर,भंडारा यांच्या पाठविलेल्या पत्रानुसार विरुध्द पक्षास दिनांक 19/5/2011 ला मिळाले. तक्रारकर्तीने दिनांक 10/8/2011 ला विरुध्द पक्षाला रजिस्टर पोस्टाने विमा दावा त्वरित निकाली काढावा असे विनंतीपत्र पाठविले व सदरहू पत्र विरुध्द पक्षास दिनांक 16/8/2011 ला मिळाल्याचे पोस्टाच्या कागदपत्रावरुन सिध्द् होते. तक्रारकर्त्याने संपुर्ण कागदपत्रे विरुध्द पक्षास देवून सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रार दाखल करेपर्यंत मंचास दिनांक 28/9/2012 पर्यंत तक्रारकर्तीचा दावा निकाली न काढणे म्हणजेच विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी होय. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचे पती हे अपघाताच्या वेळी 2 पेक्षा जास्त व्यक्तींना मोटर सायकलवर घेवून जात होता याबद्दल प्रतिज्ञापत्राद्वारे विरुध्द पक्षाचे व्यवस्थापकांनी तसेच संबंधित चौकशी अधिका-यांनी प्रमाणपत्राद्वारे
सदरहू प्रकरणात दाखल केलेले नाही. जर एखादया पक्षाला त्याचे मुद्दयावर निर्णय अपेक्षित असल्यास ती बाब सक्षम पुराव्याद्वारे सिध्द करण्याची जबाबदारी ही त्या पक्षाची असते. विरुध्द पक्ष ही बाब सदरहू प्रकरणात सिध्द करु शकलेला नाही.
‘‘Burden Of Proof is not validly discharged by cogent and qualitative evidence as per Procedural Law not brought on record by N.A. in this case’’. Hence N.A.is jointly & Severaly laible to Pay Compensation.
13. पोलीस स्टेशन,तुमसर जि.भंडारा यांचे प्राथमिक रिपोर्ट 125/08 नुसार पोलीस अधिकारी,तुमसर यांनी तक्रारकर्तीच्या पतीच्या गाडीला जीप क्र.MH-40, 2006 च्या चालकाने निष्काळजीपणे त्याचे वाहन चालवून धडक दिली. यावरुन त्या चालकाविरुध्द भा.द.वि.279,338 नुसार गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे पोलीस स्टेशनमधील सकृतदर्शनी पुराव्यावरुन तक्रारकर्तीच्या पतीच्या अपघातास जीपचा चालक हा दोषी असल्याचे आढळून येते. त्यामुळे सदरहू अपघातामध्ये सकृतदर्शनीतक्रारकर्तीच्या पतीचा दोष नसल्यामुळे तक्रारकर्ती विमा दाव्याचे पैसे मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे, करीता खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस मृत्यु दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख हजार) ही सदरहू तक्रार दाखल झाल्याच्या दिनांका पासून म्हणजेच दिनांक 28/9/2012 पासून ते संपुर्ण रक्कम मिळेपर्यंत द.शा.द.शे.10 टक्के व्याजदराने तक्रारकर्तीस दयावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस नुकसान भरपाई म्हणून 20,000/- (वीस हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- (दहा हजार) दयावे.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आंत करावी.
6. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्तीस सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.