(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 23/02/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत मंचात दि.05.08.2010 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द दाखल करुन मागणी केली आहे की, त्यांनी अपघातग्रस्त विमाकृत वाहनाचे दुरुस्ती करीता आलेला खर्च न दिल्यामुळे सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे घोषीत करावे व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ने वाहनाचे दुरुस्ती करीता आलेला खर्च रु.38,276/- वार्षीक 18% व्याजासह द्यावा. शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- नुकसान भरपाई म्हणून व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत...
प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे विमा कंपनीचे मुख्य कार्यालय व शाखा कार्यालय आहे, विरुध्द पक्ष क्र.3 हे मारुती सुझूकी इंडिया लि. कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याने दि.26.11.2009 रोजी मारुती स्वीफ्ट (व्हीडीआय) हे वाहन रु.4,98,178/- ला विरुध्द पक्ष क्र.3 कडून विकत घेतले. विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 मार्फत विमा काढण्याकरीता विमा हप्ता रु.14,624/- स्विकारुन दि.26.11.2009 ते 25.11.2010 या कालावधीचा विमा काढला व विमापत्र तक्रारकर्त्यास दिले.
3. तक्रारकर्ता कुटूंबीयांसह अमरावतीवरुन नागपूर येथे दि.08.01.2010 रोजी येत असतांना रात्री 8.00 ते 8.30 चे दरम्यान अजनी टोल नाक्याजवळ अपघात झाला व वाहन बंद पडले. अपघाताची माहिती तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 यांना दुरध्वनीव्दारे दिले व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना कळविण्यांस सांगितले. तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, विरुध्द पक्षांनी अपघातग्रस्त वाहन सोडून नागपूर येथे येण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 ची भेट घेऊन वाहन उचलून आणण्याची विनंती केली असता त्यांनी भाडे स्विकारुन वाहन आणण्याची संमती दिली त्यानुसार त्यांनी दि.09.01.2010 रोजी त्यांचे कार्यशाळेत वाहन दुरुस्ती करीता आणले.
4. विरुध्द पक्ष क्र.3 ने तक्रारकर्त्याचे विनंतीनुसार प्रथम दि.12.01.2010 रोजी दुरुस्तीबाबतचे अंदाजपत्रक रु.14.350/- चे दिले. तसेच पुन्हा वाहनात दुरुस्ती करणे गरजेचे असल्यामुळे दि.22.01.2010 रोजी वाहनाचे दुरुस्तीबाबत रु.40,890/- चे अंदाजपत्रक दिले. विरुध्द पक्ष क्र.3 ने वाहन दुरुस्तीनंतर आलेला खर्चाबाबत दि.12.01.2010 चे रु.14,350/- व दि.12.02.2010 चे रु.36,635/- चे देयक दिले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे प्रथम देयक दि.12.01.2010 चा एकूण खर्च रु.14,350/- पैकी रु.12,709/- विरुध्द पक्ष क्र.3 ला धनादेशाव्दारे दिले. परंतु उर्वरित रक्कम रु.1,641/- तक्रारकर्त्याकडून घेण्याचे सुचविले. विरुध्द पक्ष क्र.3 ने तक्रारकर्त्यास सुचविले की, दुरुस्त वाहन घ्यावयाचे असल्यास दोन्ही देयके मिळून एकूण रु.38,276/- देण्याबाबत मागणी केली. तक्रारकर्त्यास वाहनाची गरज असल्यामुळे त्याने वरील रक्कम रोख स्वरुपात विरुध्द पक्ष क्र.3 यांना देऊन वाहन ताब्यात घेतले. सदर रकमांचा दावा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकडे दि.29.03.2010 रोजी नोंदणीकृत डाकेव्दारे पाठविला. परंतु सदर नोंदणीकृत पत्र विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चा पत्ता लागला नाही या शे-यासह परत आले. हे विरुध्द पक्ष क्र.1 व 3 ची कृति हेतुपूरस्सर असुन सेवेतील त्रुटी आहे असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने वाहन दुरुस्ती खर्चाचा विमा दावा दि.10.04.2010 रोजी परस्पर विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे पाठवला तो त्यांना प्राप्त झाला, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे.
5. तक्रारकर्त्यानुसार अपघातग्रस्त वाहनास विमा सुरक्षा प्राप्त असतांना सुध्दा एकूण खर्च रु.38,276/- पैकी रु.12,709/- एगळून उर्वरित रकमेच दावा मंजूरही केला नाही वा खारिज केला नाही, त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 शी हातमिळवणी केल्याचे दिसुन येते.
6. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ निशाणी क्र.3 वर एकूण 13 दस्तावेज दाखल केले असुन ते पृ.क्र. 11 ते 23 वर आहेत...
7. मंचामार्फत गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस बजावण्यांत आली असता ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
विरुध्द पक्ष क्र.3 ने तक्रारकर्त्याने खरेदी केलेली गाडी, दिलेली रक्कम व विमा हप्त्याची रक्कम, विमा अवधी इत्यादी म्हणणे मान्य केले आहे. विरुध्द पक्ष क्र.3 ने वाहनाचा घटनाक्रम नाकारुन त्याने प्रति किलोमीटर भाडे आकारुन तक्रारकर्त्याचे विनंतीनुसार अपघातग्रस्त वाहन त्याचे कार्यशाळेत दुरुस्तीकरीता आणले. विरुध्द पक्ष क्र.3 ने तक्रारीच्या परिच्छेद क्र.4 व 5 मधील म्हणणे मान्य केले असुन विरुध्द पक्ष क्र.3 ने म्हटले आहे की, दिलेल्या अंदाजपत्राप्रमाणे दुरुस्ती करुन दिले असतांना तक्रारकर्त्याने परस्पर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना दुरुस्ती करीता करण्यांत आलेला खर्चाबाबत कळवावयास पाहिजे होते. कारण सदर वाहनाचा विमा हा विरुध्द पक्ष क्र.1 कडून काढण्यांत आलेला होता. त्यामुळे विमा दाव्याबाबतची विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांना करावयाची होती व त्याकरीता विरुध्द पक्ष क्र.3 जबाबदार नाही. तसेच तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे नाकारुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे.
8. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरात ते विम्याचा हप्ता, अवधी, अटी व शर्तींसह तक्रारकर्त्याला विमा पॉलिसी दिल्याचे मान्य केलेले आहे, तसेच वाहनाचे मुल्य हे रु.4,98,178/- नसुन रु.4,73,270/- इतक्या घोषीत मुल्याकरीता वाहन विमाकृत केले असल्याचे मान्य केले आहे. तक्रारीच्या परिच्छेद क्र.3 चा काही भाग नाकारुन हे मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर अपघातग्रस्त वाहन हे विरुध्द पक्ष क्र.3 चे वर्कशॉपमधे दि.09.01.2010 रोजी आणले होते. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ने म्हटले आहे की, त्यांनी दि.12.01.2010 ला दुरुस्ती करीता आलेला खर्च रु.12,709/- विरुध्द पक्ष क्र.3 यांना दिला. विरुध्द पक्षाने नाकारले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 यांचेमार्फत दि.29.03.2010 रोजी नोंदणीकृत डाकेव्दारा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडे रु.38,276/- ची मागणी केली व सदर पत्र परत आले, तसेच इतर बाबी नाकाल्या. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी म्हटले आहे की, तक्रारकर्त्यातर्फे पाठविण्यांत आलेला दावा अर्ज विरुध्द पक्ष क्र.1 यांचे नावे होता, पण पत्ता बरोबर नव्हता म्हणून ते परत आले. तक्रारकर्त्याने दुरुस्तीचा दावा अर्ज विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे पाठविला होता, परंतु त्यावर अद्याप पावेतो कारवाई करण्यांत आली नसुन इतर बाबी नाकारल्या, तसेच त्यांचे सेवेत त्रुटी असल्याबाबतची बाब नाकारली.
9. तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेख दाखल करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चे म्हणणे कसे अयोग्य स्वरुपाचे असुन खोटे आहे व अपघातग्रस्त वाहनास रु.38,276/- चा दावा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कायदेशिररित्या देण्यांस जबाबदार आहे, असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखासोबत अनुक्रमे पृ.क्र.55,58,59 व 60 वर त्यांना पाठविण्यांत आलेल्या पोच पावत्या दाखल केलेल्या आहेत.
10. प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दि.25.01.2012 रोजी युक्तिवादाकरीता आली असता मंचाने तक्रारकर्त्याचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला, विरुध्द पक्ष गैरहजर. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
11. तक्रारकर्त्याने उपरोक्त अपघातग्रस्त वाहन हे दि.26.11.2009 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 कडून विकत घेतले होते, तसेच विरुध्द पक्ष क्र.3 ने रु.14,624/-चा विमा हप्ता स्विकारुन स्वतःच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे विमा पॉलिसी तक्रारकर्त्यास दिली, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 चा ‘ग्राहक’ ठरतो.
12. तक्रारकर्त्याचे वाहन दि.08.01.2010 रोजी अमरावती-नागपूर रोडवर अपघातग्रस्त झाल्यानंतर तक्रारकर्त्याचे विनंतीवरुन व शुल्क दिल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.3 ने सदर वाहन त्यांचे वर्कशॉपमधे दुरुस्तीकरीता आणले. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 मार्फत वाहन विमाकृत केले होते व ते विरुध्द पक्ष क्र.1 चे अधिकृत एजंट म्हणून सुध्दा कार्य करीत होते हे अनुक्रमे पृ.क्र.13 वरील विमा पॉलिसीचे सुक्ष्म अवलोकन केले असता स्पष्ट होते. त्यामुळे साहजिकच तक्रारकर्त्याची अशी धारणा होती की, विरुध्द पक्ष क्र.3 ला सुचना केल्यानंतर ते विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना अपघातग्रस्त वाहनाबाबत सुचित करेल. विरुध्द पक्ष क्र.3 ने वाहन दुरुस्तीकरीता आलेल्या खर्चापोटी दि.12.01.2010 चे पत्रानुसार रु.14,350/- व दि.22.01.2010 चे पत्रानुसार रु.40,890/- चे अंदाजपत्रक दिले. विरुध्द पक्ष क्र.3 ने वाहन दुरुस्ती केल्यानंतर दि.12.01.2010 रोजी रु.14,350/- च्या बिलापैकी रु12,709/- परस्पर विरुध्द पक्ष क्र.3 ला धनादेशाव्दारे दिले. परंतु दि.12.02.2010 चे देयक रु.36,635/- बाबत विरुध्द पक्षाने कुठलीही कारवाई केलेली नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन हे स्पष्ट होते की, अनुक्रमे पृ.क्र.20 व 21 वरुन तक्रारकर्त्याने विमा दाव्याबाबतचे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चे नावे असलेले पत्र दि.21.03.2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.3 चे पत्त्यावर पाठविले, परंतु सदर पत्र पत्ता लागत नाही या कारणास्तव परत आले. जेव्हा की, विरुध्द पक्ष क्र.3 हे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चे अधिकृत प्रतिनिधी आहेत, त्यामुळे निश्चितच तक्रारकर्त्यास शंका झाली की, विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 सोबत हात मिळवणी करुन तक्रारकर्त्याचे दाव्यासंबंधीचे पत्र परत केले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 ला दि.10.04.2010 रोजी नोंदणीकृत डाकेव्दारे पत्र पाठवले असुन ते त्यांना प्राप्त झाले हे अनुक्रमे पृ क्रृ22 व 60 वरील दस्तावेजांवरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे विमा दाव्यापेक्षा कपात केलेली रक्कम रु.1,641/- व दि.12.02.2010 च्या देयकाची रक्कम रु.36,635/- अशी एकत्रीत येणारी रक्कम रु.38,276/- चा दावा विरुध्द पक्ष क्र.2 ला पाठवुन सुध्दा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ने दि.10.04.2010 पासुन तक्रार प्रलंबीत असतांना विमा दाव्याचे काय झाले किंवा विमा दावा मंजूर झाला किंवा नाही याबाबत कुठलेही स्पष्ट विधान केलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अनिश्चित काळापर्यंत तक्रारकर्त्याचा विमा दावा प्रलंबीत ठेवणे ही त्यांचे सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी असुन त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता विमा दाव्याची रक्कम रु.25,567/-(38,276 – 12,709) विमा दावा दाखल केल्याचा दि.10.04.2010 पासुन तक्रारकर्त्याचे हाती पडे पर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
13. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 च्या गैरकायदेशिर कृत्याबद्दल व विरुध्द पक्ष क्र.3 ने विमा दावा निकाली काढण्याकरता सहकार्य न केल्यामुळे निश्चितच तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 हे नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- देण्यांस बाध्य आहेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
करीता खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी विमा दाव्याची रक्कम रु.25,567/- (38,276 – 12,709) विमा दावा दाखल केल्याचा दि.10.04.2010 पासुन तक्रारकर्त्याचे हाती पडे पर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी
3. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी त्यांच्या बेकायदेशिर कृतिमुळे व सहकार्य न केल्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी 30 दिवसांचे आंत करावी अन्यथा आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.12% प्रमाणे व्याज देय राहील.