(मंचाचे निर्णयान्वये - श्री.मिलिंद केदार, सदस्य) - आदेश - (पारित दिनांक – 02/08/2010) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्रा.सं.का.च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्र. 2 कडून वित्त सहाय्य घेऊन गैरअर्जदार क्र. 3 कडून टोयोटा इनोव्हा 2.5 एलजी-4 हे वाहन विकत घेतले व सदर वाहन हे गैरअर्जदार क्र. 1 कडून दि.16.10.2008 ते 15.10.2009 या कालावधीकरीता विमाकृत करण्यात आले होते. सदर वाहन मध्यप्रदेश येथील खवासा या गावाजवळ दि.06.02.2009 रोजी अपघातग्रस्त झाल्याने पोलीस स्टेशन कुरई येथे अपघाताची सुचना देण्यात आली. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ला या संदर्भात माहिती देण्यात आली. गैरअर्जदार क्र. 1 ने सर्व्हेयर नेमून वाहनाचे निरीक्षण केले. परंतू सदर अहवाल तक्रारकर्त्याला दिला नाही. तक्रारकर्त्याने अपघातग्रस्त वाहन गैरअर्जदार क्र. 3 च्या कार्यशाळेत आणून दुरुस्तीकरीता येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक काढून गैरअर्जदार क्र. 1 कडे त्याबाबत विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी दि.02.05.2009 च्या पत्रानुसार तक्रारकर्त्याने चुकीची माहिती विमा अर्जात भरुन व चुकीच्या पध्दतीने विमा दावा दाखल केल्याने विमा दावा नाकारल्याचे कळविले. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे सद्य स्थितीत वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च हा वाहनाच्या मूळ किमतीच्या जवळपास येत असल्याने गैरअर्जदार क्र. 1 ने वाहन पूर्णपणे निकामी झाल्याचे मान्य करुन विमाकृत मुल्याएवढी रक्कम तक्रारकर्त्याला द्यावी व वाहन त्यांनी ताब्यात घ्यावे. गैरअर्जदार क्र. 2 यांना वाहनाच्या नादुस्तीची माहिती असतांनाही कर्जाबाबत लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केल्याचे घोषित करावे अशी विनंती मंचाला केलेली आहे. पॉलिसीप्रमाणे देय रक्कम व्याजासह द्यावी, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. सदर तक्रारीसोबत तक्रारकर्त्याने एकूण 13 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 यांना नोटीस मिळूनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही किंवा ते मंचासमोर उपस्थितही झाले नाही, म्हणून मंचाने त्याच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.03.12.2009 रोजी पारित केला. 3. गैरअर्जदार क्र. 1 ने सदर तक्रारीस दाखल केलेल्या लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने वाहनाची काढलेली पॉलिसी मान्य करुन तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही नाकारलेली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी उत्तरामध्ये तक्रारीवर प्राथमिक आक्षेप उपस्थित करुन सदर व्यवहार हा व्यापारीक व्यवहार असल्याचे, तक्रारकर्ता ग्राहक नसल्याचे व मंचाचे कार्यक्षेत्राबाहेरची तक्रार असल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याला तक्रार करण्याचे कोणतेही कारण उद्भवले नसल्याने सदर तक्रार दंडासह खर्च आकारुन खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमोर दि.09.07.2010 रोजी युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्ता, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. गैरअर्जदार क्र. 3 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेली कागदपत्रांचे सुक्ष्म निरीक्षण केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. सदर प्रकरणी गैरअर्जदार क्र. 1 कडे तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी काढली होती, वाहन खरेदीकरीता गैरअर्जदार क्र. 2 कडून वित्त सहाय्य घेतले होते व गैरअर्जदार क्र. 3 यांच्याकडे वाहन नोंदणीकृत केल्याने तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. मंचाने उभय पक्षांचे कथन व दस्तऐवज यांची तपासणी केली असता मंचाचे असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्याच्या वाहनाला दि.06.02.2009 रोजी अपघात झाला होता व सदर अपघाताची सुचना तक्रारकर्त्याने संबंधित पोलीस स्टेशनला देऊन गैरअर्जदार क्र. 1 कडेही याबाबत माहिती दिली. गैरअर्जदार क्र. 1 ने सर्व्हेयर नेमून अपघातग्रस्त वाहनाचे निरीक्षण केले. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने दावा हा नाकारतांना कुठलेही सबळ कारण न दर्शविता केवळ चुकीची माहिती विमा दावा अर्जात दिली आहे असे नमूद केले आहे व त्यामुळे दावा नाकारण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतू सदर चुकीची माहिती कोणती याबाबत कोणताच खुलासा त्यात केलेला नाही किंवा सदर पत्रासोबत सहपत्र देऊन विमा दावा अर्जातील चुकीची माहिती कोणती हे नमूद केलेले नाही. तसेच दस्तऐवज व सविस्तर सर्वेक्षणावर आधारावर विमा दावा नाकारल्याचे नमूद केले आहे. परंतू यातील कोणत्या बाबी किंवा कारणे विमा दावा नाकारण्याकरीता उपस्थित झाली होती हे स्पष्ट न केल्याने गैरअर्जदार क्र. 1 चे सदर म्हणणे मंच नाकारीत आहे. केवळ विमा दावा नाकारण्यात आला हे सबळ कारणे न देता नमूद करणे योग्य नाही, त्यापुष्टयर्थ संबंधित दस्तऐवज व कारणे दाखल करावयास पाहिजे होती. तसेच वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले किंवा किती प्रमाणात झाले याबाबतचा कुठलाही उल्लेख गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या लेखी उत्तरात केलेला नाही किंवा असे कुठलेही दस्तऐवज दाखल केले नाही की, ज्यावरुन हे सिध्द होईल की, तक्रारकर्त्याने वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले आहे वा वाहन संपूर्ण क्षतिग्रस्त होऊन निकामी झाले आहे हे म्हणणे फेटाळता येईल. केवळ लेखी उत्तरात विमा दावा अर्जात चुकीची माहिती भरली असे नमूद करुन विमा दावा नाकारणे ही गैरअर्जदाराची सदर कृती सेवेतील त्रुटी दर्शविते असे मंचाचे मत आहे. मंचाचे मते गैरअर्जदार क्र. 1 ने दस्तऐवजाअभावी व पॉलिसीच्या शर्ती व अटी नमूद न करता दावा नाकारुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रमाणपत्राच्या प्रतीचे अवलोकन केले असता अपघातग्रस्त वाहनाचे मुल्यांकन हे रु.9,12,654/- दर्शविण्यात आले आहे. मंचाचे मते गैरअर्जदार क्र. 1 ने वाहन संपूर्णतः क्षतिग्रस्त झाले व निकामी झाले ही बाब नाकारलेली नसल्याने तक्रारकर्ता सदर वाहनाच्या मुल्यांकनाची रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने दावा नाकारल्याच्या दि.02 मे 2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने रु.9,12,654/- ही रक्कम तक्रारकर्त्यास द्यावी. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ने क्षुल्लक कारण दर्शवून तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्याने तक्रारकर्त्याला मंचासमोर येऊन तक्रार दाखल करावी लागली, म्हणून तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यास द्यावे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्याची सदर मागणी ही दस्तऐवजाअभावी अमान्य करण्यात येत आहे. 7. गैरअर्जदार क्र. 2 ही वित्त सहाय्य करणारे असल्याने व गैरअर्जदार क्र. 3 हे वाहन निर्माता/वितरक असल्याने त्यांचा सदर विमा दावा नाकारण्याच्या वादाशी संबंध येत नाही, म्हणून गैरअर्जदार क्र. 2 व 3 चा सदर विमा दाव्याबाबत असलेल्या वादाशी संबंध नसल्याने त्यांच्याविरुध्द असलेली तक्रार खारीज करण्यात येते. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदार क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, त्याने दावा नाकारल्याच्या दि.02 मे 2009 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने रु.9,12,654/- ही रक्कम तक्रारकर्त्यास द्यावी. 3) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यास द्यावे. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. 5) गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 6) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे. |