न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी स्वतःच्या वापराकरिता एमएच-09-एफएफ-1237 हे दुचाकी वाहन खरेदी केले होते. सदर वाहनाचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेला होता. तक्रारदार यांच्या वाहनाची वि.प. यांचेकडे पॉलिसी सुरु असताना सदर वाहनास अपघात झाला असून तक्रारदार यांच्या मोटरसायकलची मोडतोड होवून नुकसान झाले. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे सदर पॉलिसी कालावधीमध्ये वाहनाचे नुकसान झालेने नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारदार यांना सदर वाहनाबाबत ड्रीम होंडा कंपनीने रक्कम रु.47,000/- चे कोटेशन दिले. तक्रारदार यांनी सदरचे वाहन माय ड्रीम होंडा या वाहनाच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीकरिता सुपूर्त केले. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांनी जास्त रकमेच्या खर्चाचे इस्टीमेट दिलेले आहे असा आक्षेप घेवून वाहनाचे मूल्यांकन चुकीच्या पध्दतीने रु.39,000/- इतके करुन तक्रारदार यांचा नुकसान भरपाईचा क्लेम देणेचे नाकारले. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. सबब, वाहनाच्या अपघातामुळे झालेल्या नुकसानीची रक्कम रु. 47,000/- मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/-, नुकसानीपोटी रु. 25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत पॉलिसीचे कागदपत्रे, तक्रारदारांचा वाहन चालविण्याचा परवाना, अपघातग्रस्त वाहनाचे फोटो, तक्रारदार यांचा अर्ज, वाहन दुरुस्तीचे एस्टिमेट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. यांना आयोगाची नोटीस लागू होवून देखील ते याकामी हजर झाले नाहीत. सबब त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आल.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार यांनी स्वतःच्या वापराकरिता एमएच-09-एफएफ-1237 हे दुचाकी वाहन खरेदी केले होते. सदर वाहनाचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेला होता. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ता. 17/6/2022 रोजीचे पॉलिसीबाबतचे कागदपत्रे दाखल केलेली असून सदरच्या पॉलिसीचा कालावधी दि. 18/6/22 ते 17/6/23 असा नमूद असून सदरची पॉलिसी वि.प. यांनी आयोगामध्ये हजर होवून नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे रक्कम रु.1,069/- इतक्या रकमेचा विमा उतरविलेला असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांच्या वाहनाची वि.प. यांचेकडे पॉलिसी सुरु असताना सदर वाहनास अपघात झाला असून तक्रारदार यांच्या मोटरसायकलची मोडतोड होवून नुकसान झाले. तक्रारदार यांनी वि.प. विमा कंपनीकडे सदर पॉलिसी कालावधीमध्ये वाहनाचे नुकसान झालेने नुकसान भरपाईची मागणी केली. तक्रारदार यांना सदर वाहनाबाबत ड्रीम होंडा कंपनीने रक्कम रु.47,000/- चे कोटेशन दिले. तक्रारदार यांनी सदरचे वाहन माय ड्रीम होंडा या वाहनाच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीकरिता सुपूर्त केले. तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांनी जास्त रकमेच्या खर्चाचे इस्टीमेट दिलेले आहे असा आक्षेप घेवून वाहनाचे मूल्यांकन चुकीच्या पध्दतीने रु.39,000/- इतके करुन तक्रारदार यांचा नुकसान भरपाईचा क्लेम देणेचे नाकारले. सबब, वि.प. यांनी वादातील वाहनाचा अपघात झालेला असताना सुध्दा तसेच सदर वाहनाचा विमा वि.प. कंपनी यांचेकडे उतरविलेला असताना देखील अपघातग्रस्त वाहनाची नुकसान भरपाई अद्याप तक्रारदार यांना न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनाचे आर.सी.टी.सी. दाखल केलेले आहे. तसेच अ.क्र.4 ला वादातील वाहनाचे अपघातग्रस्त फोटो दाखल केलेले आहेत. सदरचे फोटो व तक्रारदार यांचे वाहन चालविण्याचा परवाना आणि आर.सी.टी.सी. वि.प. यांनी आयोगामध्ये हजर होवून नाकारलेला नाही. अ.क्र.4 ला ता. 2/8/22 रोजी तक्रारदार यांनी माय ड्रीम होंडा शोरुम, शाखा कोल्हापूर यांना सदर वाहनाचे योग्य ते पार्टस ठेवून इन्शुरन्स कंपनीस इस्टेट कोटेशन कमी करुन द्यावे असे पत्र दाखल केलेले आहे. तसेच अ.क्र.5 ला तक्रारदार यांनी माय ड्रीम होंडा कंपनीचे वादातील वाहनाबाबतचे इस्टिमेट दाखल केलेले आहे. प्रस्तुतकामी वि.प. यांना संधी असताना देखील आयोगाची नोटीस लागू होवून देखील हजर होवून तक्रारदारांची तक्रार अथवा त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. तक्रारदार यांनी ता. 8/12/22 रोजी तक्रारीसोबतचे शपथपत्र हे याकामी शाबीतीकरिता वाचावे अशी पुरसिसि दिली आहे. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी वादातील वाहनाचा अपघात झाल्याचे कथन केलेले आहे. सदरचा अपघात वि.प. यांनी नाकारलेला नाही. तसेच सदरची पॉलिसी देखील नाकारलेली नाही. तक्रारदार यांनी वादातील वाहनाचा अपघात सदरचे पॉलिसी कालावधीत झालेला असलेचे पुराव्याचे शपथपत्रावर कथन केले आहे. या कारणाने सदरच्या वाहनाचे अपघाताच्या नुकसान भरपाईची रक्कम वि.प. यांनी तक्रारदार यांना अदा करणे वि.प. यांचेवर बंधनकारक होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना वाहनाची कोणतीही नुकसान भरपाई न देवून तक्रारदारांचा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये अपघातग्रस्त वाहनामुळे झालेल्या नुकसानीपोटी रक्कम 47,000/- ची मागणी आयेागामध्ये केली आहे. तथापि त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्याकारणाने तक्रारदार हे सदरची रक्कम रु. 47,000/- मिळणेस अपात्र आहेत. परंतु तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वि.प. यांच्या पॉलिसीचे अवलोकन करता सदर वाहनाची आय.डी.व्ही. रु.39,000/- असलेचे दिसून येते. तथापि तक्रारदार यांच्या वाहनाचे अपघातामध्ये नुकसान झालेची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानीच्या अनुषंगाने माय ड्रीम होंडा यांचेकडे वाहनाचे नुकसानीबाबतचे एस्टिमेट दाखल केले आहे. सदरच्या एस्टीमेटचे अवलोकन करता सदरच्या एस्टिमेटवर रक्कम रु.27,674/- इतकी रक्कम नमूद आहे. सदरचे एस्टिमेट वि.प. यांनी संधी असतानादेखील नाकारलेले नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचेकडून अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 27,674/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 18/08/22 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
8. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना वाहन नुकसान भरपाईची रक्कम रु. 27674/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 18/08/2022 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|