(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 08 फेब्रुवारी, 2018)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये, ही तक्रार विमा कंपनी विरुध्द तक्रारकर्त्याचा चोरी गेलेल्या वाहनाचा विमा मंजुर न केल्यासंबंधी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. विरुध्दपक्ष हे आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कंपनी हे मुंबई आणि नागपुर येथील कार्यालय आहेत. तक्रारकर्ता हा ट्रक नंबर MH 04 –H- 3032 चा मालक असून त्याने तो ट्रक इंडिया बुल्स फायनांशियल सर्व्हीसेस कडून अर्थ सहाय्य घेऊन विकत घेतला होता. हे अर्थ सहाय्य देणा-या कंपनीला विरुध्दपक्ष क्र.3 म्हणून तक्रारीत सामील केले होते, परंतु पुढे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.3 ला वगळले. तो ट्रक विरुध्दपक्ष क्र.2 कडून दिनांक 20.6.2008 ला विमाकृत करण्यात आला होता. तक्रारकर्त्याने तो ट्रक चालविण्यास चालकाची नियुक्ती केली होती. दिनांक 25.5.2009 ला ट्रक चालकाने तो ट्रक चांदुररेल्वे येथे माल भरण्यास नेला असतांना मांजरखेडा गावांजवळ ट्रकचे ब्रेक निष्कामी झाले. त्यावेळी, त्याने तक्रारकर्त्याला ताबडतोब कळविले असता, तक्रारकर्त्याने चालकाला तो ट्रक तेथेच उभा करुन अमरावतीला जाऊन मेकॅनिक घेवून येण्यास सांगितले. त्यानुसार, ट्रक चालक रात्रीच अमरावतीला गेला आणि दुस-या दिवशी मेकॅनिकसह तो घटनास्थळी आला, परंतु त्याला त्याठिकाणी ट्रक दिसून आला नाही, त्याने त्याची सुचना तक्रारकर्त्याला दिली. तक्रारकर्ता चांदुररेल्वेला गेला आणि ट्रक चालकाच्या साहाय्याने त्याने ट्रक शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रक मिळून न आल्याने शवेटी चांदुररेल्वे पोलीस स्टेशनला त्याने ट्रक चोरीची सुचना दिली. परंतु, पोलीसांनी त्याला काही दिवस ट्रकचा शोध घेण्यास सांगितले आणि त्यानंतरही मिळून न आल्यास चोरीची रिपोर्ट देण्यास सांगितले. परंतु, ट्रक शेवट पर्यंत मिळून न आल्याने तक्रारकर्त्याने शेवटी दिनांक 1.6.2009 ला ट्रक चोरीची रिपोर्ट दिली, परंतु, पोलीसांनी ती नोंदवून घेतली नाही. त्यानंतर, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला सुध्दा ट्रक चोरीची सुचना दिली आणि ट्रकची विमा राशी मागण्यासाठी दावा दाखल केला. त्यावेळी, विरुध्दपक्षाने त्याल पोलीस रिपोर्ट आणि इतर दस्ताऐवजांची मागणी केली. त्यावेळी तक्रारकर्त्याने पोलीसांना एफ.आय.आर. ची प्रत मागितली परंतु पोलीसांनी ती दिली नाही, त्यामुळे त्याने विरुध्दपक्षाला तसे कळविले. तक्रारकर्त्याने शेवटी वरीष्ठ पोलीस अधिका-यांना तक्रार केली असता, शेवटी एफ.आय.आर. ची नोंद दिनांक 27.6.2010 ला करण्यात आली. एफ.आय.आर. ची प्रत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 ला नंतर दिली. परंतु, त्याचा विमा दावा दिनांक 7.4.2011 ला एफ.आय.आर. ची प्रत विलंबाने दिल्यामुळे खारीज करण्यात आला. म्हणून, तक्रारकर्त्याने अशी विनंती केली आहे की, विरुध्दपक्षाने रुपये 2,25,000/- व्याजासह इंडिया बुल्स फायनांन्स कंपनीला द्यावे आणि त्याला रुपये 1,00,000/- ची नुकसान भरपाई द्यावी.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार, विरुध्दपक्षाने तक्रारीला लेखीउत्तर सादर करुन ट्रकचा विमा काढल्याचे कबुल केले. विम्याचा अवधी दिनांक 19.6.2008 ते 18.6.2009 असा होता. ट्रक चोरी गेल्याची बाब नाकबुल केली. पुढे असे नमूद केले आहे की, तो ट्रक रस्त्यावर कुठलिही खबरदारी किंवा सुरक्षा उपाय न करता उभा केला होता, ज्यामुळे विमा अटींचा भंग झाला. एफ.आय.आर. पोलीसांनी नोंदवून घेतला नाही हे तक्रारकर्त्याचे म्हणणे खोटे असून, पुढे असे नमूद केले की ट्रक चोरीची सुचना विरुध्दक्षाला ताबडतोब देण्यात आली नव्हती. परंतु, तक्रारकर्त्याने विमा दावा केला होता आणि त्याला एफ.आय.आर. ची प्रत सादर करण्यास सांगण्यात आले होते, परंतु अनेकदा स्मरणपत्र देवून सुध्दा तक्रारकर्त्याने प्रत पुरविली नाही. तक्रारकर्त्याने ट्रक चोरीची खबर घटनेच्या एका वर्षानंतर पोलीसांना दिली आणि इतक्या दिवसानंतर तो ट्रक मिळून येण्याची शक्यता नव्हती. सबब, विमा दावा योग्य कारणास्तव खारीज करण्यात आला. अशाप्रकारे, तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
4. तक्रारकर्ता तर्फे सुनावणीच्या दरम्यान कोणीही हजर झाले नाही. हे प्रकरण ऑगष्ट 2017 पासून सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने आणि तक्रारकर्ता तर्फे कोणीही हजर होत नसल्याने आम्हीं शेवटी विरुध्दपक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. अभिलेखावर दाखल दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद वाचून त्याचे आधारे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. तक्रारीवरुन ही बाब स्पष्ट होते की, ज्यावेळी ट्रकचे ब्रेक निष्कामी झाले होते त्यावेळी रात्र झाली होती आणि ट्रक तेथेच सोडून त्याचा चालक अमरावतीला मेकॅनिक शोधण्यास गेला होता. त्यावेळी त्या ट्रक जवळ त्याला सुरक्षीत ठेवण्यास इतर कोणीही इसम नव्हता आणि तो ट्रक तसेच बेवारस अवस्थेत सोडून चालक अमरावतीला निघून गेला होता, ट्रक चालक दुस-या दिवशी घटनास्थळी परत आला. याप्रमाणे तो ट्रक रात्रभर रस्त्यावर असुरक्षित अवस्थेत उभा होता, यावरुन हे दिसून येते की ट्रकच्या सुरक्षितते विषयी कुठलिही वाजवी खबरदारी घेतली नव्हती. विमा पॉलिसीच्या अटीनुसार विमाकृत वाहन चोरी जाऊ नये किंवा त्याला नुकसान होऊ नये या दृष्टीने योग्य ती वाजवी खबरदारी घेणे जरुरी असते. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने विमा अटींचा भंग केला हे दिसून येते.
6. ट्रक चोरीची रिपोर्ट पोलीसांना ब-याच विलंबानंतर देण्यात आली, याबद्दल वाद नाही. घटना दिनांक 25 आणि 26 मे 2009 च्या रात्रीला घडली आणि एफ.आय.आर. दिनांक 27.6.2010 ला म्हणजे एका वर्षानंतर दाखल करण्यात आली. चोरीची प्रथम खबर देण्यासाठी हा विलंब फार मोठा आहे. तक्रारकर्त्याने हे स्पष्ट केले नाही की त्याने विमा दावा केंव्हा दाखल केला, परंतु हे निश्चित आहे की विमा दावा एफ.आय.आर. दाखल केला गेल्या नंतरच केला गेला असावा. त्यामुळे, विरुध्दपक्षाला सुध्दा ट्रक चोरीची सुचना ब-याच कालावधीनंतर देण्यात आली. विमा अटीनुसार जर विमाकृत वाहनाचे नुकसान झाले असेल तर किंवा वाहन चोरी झाले असेल तर त्याची ताबडतोब सुचना विरुध्दपक्षाला देणे आवश्यक असते. ज्याअर्थी, तक्रारकर्त्याकडून अशी सुचना देण्यास विलंब झाला, त्याअर्थी या विमा अटींचा सुध्दा भंग केला आहे.
7. तक्रारकर्त्याने पोलीस स्टेशन चांदुररेल्वे येथे केलेल्या चोरीच्या तक्रारीची प्रत दाखल केली आहे, ज्यावरुन असे दिसते की ती तक्रार दिनांक 1.6.2009 ला दिली होती, त्यावर पोलीस स्टेशनचा शिक्का आहे. त्यावरुन असे ग्राह्य धरता येईल की, ट्रक चोरीची तक्रार ताबडतोब पोलीसांना देण्यात आली होती, परंतु ज्याअर्थी एफ.आय.आर. दाखल करण्यात आली नाही तेंव्हा तक्रारकर्त्याने त्यासंबंधी कोणते पाऊल उचलले किंवा कोणती कार्यवाही केली, यासंबंधी कुठलाही पुरावा त्याने दाखल केला नाही. कारण एका वर्षाचा काळ हा फार मोठा अवधी आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने एका वर्षापर्यंत एफ.आय.आर. दाखल करण्याची वाट कां बघितली, यासंबंधी पुरावा म्हणून त्याने काहीच दाखल केलेले नाही. त्यादिवशी ट्रक चोरीची सुचना विरुध्दपक्षाला ताबडतोब देण्यापासून त्याला कोणी रोखले नव्हते, परंतु तरी सुध्दा विरुध्दपक्षाला सुध्दा घटनेची सुचना ताबडतोब दिली नव्हती. अशाप्रकारे विरुध्दपक्षाला घटनेची ताबडतोब सुचना न देवून त्याने विमा अटींचा भंग केला आहे.
8. अशाप्रकारे, वरील वस्तुस्थिती आणि दाखल दस्ताऐवजांवरुन दिसून येते की, विरुध्दपक्षाने विमा दावा नाकारुन कुठलीही चुक केलेली नाही आणि म्हणून तक्रार खारीज होण्या लायक आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
दिनांक :- 08/02/2018