नि.क्र. २४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र.९७७/२००८
-------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २९/०८/२००८
तक्रार दाखल तारीख : ०८/०९/२००८
निकाल तारीख : ३०/११/२०११
-----------------------------------------
१. श्रीमती पुष्पांजली राजेंद्र वाले
वय वर्षे – ३०, व्यवसाय – घरकाम
रा.नांद्रे, ता.मिरज, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स
कंपनी लि., झेनिथ हाऊस, केशवराव खाडे मार्ग,
महालक्ष्मी, मुंबई नं.३४
२. महाराष्ट्र शासन तर्फे जिल्हाधिकारी सांगली
३. श्रीमती वैशाली चेतन चव्हाण,
वय – सज्ञान, व्यवसाय – नोकरी,
सध्या तहसिलदार, वाई, ता.वाई जि. सातारा
(नोटीसची बजावणी विभागीय महसूल आयुक्त,
कौन्सिल हॉल, पुणे यांचेमार्फत करावी)
(नि.१ वरील दि.२९/११/११ चे आदेशान्वये वगळणेत आले) ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. सौ एस.एम.पवार,श्रीएम.एन. शेटे
जाबदारक्र.१ तर्फे :+ìb÷. सचिन ताम्हणकर
जाबदारक्र.२ : एकतर्फा
जाबदारक्र.३ : वगळले
नि का ल प त्र
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती राजेंद्र वाले हे शेतकरी होते. त्यांना दि.३०/०४/२००५ रोजी मोटार अपघात झाला त्यामुळे त्यांचा दि.१२/६/२००५ रोजी मृत्यु झाला. तक्रारदार या मयत राजेंद्र वाले याच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी यांचेकडे प्रस्ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार मिरज यांचेकडे जुलै २००५ मध्ये पाठविला. तहसिलदार मिरज यांनी सदरचा प्रस्ताव योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचे विमा दाव्याबाबत तक्रारदार यांना काही कळविले नाही. जाबदार क्र.३ यांनी दि.७/४/२००६ च्या पत्राने तक्रारदार यांचा विमादावा त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नसताना फेटाळला. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.१२ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचे पती हे शेतकरी असल्याबाबतचे कथन जाबदार यांनी नाकारले आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत अपघाताबाबतची कोणतीही कागदपत्रे दाखल केली नाहीत तसेच पोस्ट मॉर्टेम अहवाल दाखल केला नाही. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांचेकडे केव्हाही दाखल करण्यात आला नाही त्यामुळे तक्रारदार यांचे विमादाव्याबाबत कोणताही निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे. जाबदार यांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१३ ला शपथपत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१४ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.१५ ला प्रतिउत्तराचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१६ ला लेखी युक्तिवाद व नि.१८ चे यादीने १ कागद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.१९ वर जाबदार क्र.३ यांना सामील करणेसाठी अर्ज केला आहे. तसेच नि.२० च्या यादीने २ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.२१ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सदरचा युक्तिवाद विचारात घेणेत येत नाही असा आदेश करण्यात आला आहे. तक्रारदार अथवा जाबदार यांचे विधिज्ञ युक्तिवादासाठी उपस्थित न राहिलेने प्रस्तुत प्रकरण अंतिम निर्णयासाठी ठेवणेत आले.
५. जाबदार नं.२ यांनी याकामी आपले म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला. जाबदार क्र.३ यांना वैयक्तिकरित्या सामील करणेची तक्रारदार यांची नि.१९ वरील अर्जातील विनंती फेटाळणेत येवूनही तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ यांना वैयक्तिकरित्या सामील केले असलेने त्यांना वगळणेत आलेचा आदेश नि.१ वर करणेत आला.
६. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व दाखल कागदपञांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे, त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
७. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. जाबदार क्र.२ यांनी नि.१८/१ वर पॉलिसीच्या अटी व शर्तींची प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय १५ ते ७० वयोगटातील असणे आवश्यक आहे. पुराव्यासाठी सादर करण्याच्या कागदपत्रांमध्ये प्रथम माहिती अहवाल, स्थळपंचनामा, चौकशी अहवाल, मृत्यू विश्लेषण अहवाल या बाबी पाठविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी सदरची कागदपत्रे तलाठयामार्फत पाठविली असल्याचे नमूद केले नाही व तक्रारअर्जासोबतही अपघाताबाबत वर्दी रिपोर्ट, शवविच्छेदन अहवाल ही कागदपत्रे दाखल नाहीत. यावरुन तक्रारदार यांनी योग्य ती कागदपत्रे तलाठयामार्फत जाबदार यांचेकडे पाठविली ही बाब पुराव्यानिशी शाबीत केलेली नाही. तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ यांचेकडे विमादावा पाठविला हे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांचा विमादावा योग्य ती कागदपत्रे नसल्यामुळे जाबदार क्र.३ यांनी नामंजूर केल्याचे तक्रारदार यांनी दुरुस्ती करुन नमूद केले आहे. यावरुन तक्रारदार यांचा विमादावा जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला नसल्याचे दिसून येते. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अथवा विमादावा मंजूर होणेसाठी वर्दी जबाब, शवविच्छेदन अहवाल, ही कागदपत्रे तक्रारदार यांचेकडे असल्याचे दिसून येत नाही. यावरुनही तक्रारदार यांचा विमादावा व तक्रारअर्ज मंजूर होणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
२. खर्चाबाबत आदेश नाही.
सांगली
दि. ३०/११/२०११
(गीता घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११