( मंचाचे निर्णयान्वये - श्री.मिलिंद केदार - सदस्य.) //- आदेश -// (पारित दिनांक – 05/08/2010) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तिच्याकडे असलेला ट्रक क्र. MH 31/AP 2748 हा दि.19/03/2009 ते 18/03/2010 या कालावधीकरीता तिने गैरअर्जदाराकडून पॉलिसी क्र.3003/56431616/00/800 अन्वये विमाकृत केला होता. सदर ट्रक हा दि.26.04.2009 रोजी देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत असतांना रस्त्यावर विद्युत तार ट्रकच्या केबिनला लागल्यामुळे ट्रकला आग लागून ट्रकमधील संपूर्ण धान व ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याबाबतची सुचना गैरअर्जदार यांना दिली व नंतर कागदपत्रासह विमा दावा दाखल करण्यात आला. गैरअर्जदाराच्या सुचनेनुसार सदर अपघातग्रस्त ट्रकचे भंगाराकरीता चौकीदार नेमण्यात आला. गैरअर्जदाराच्या सर्व्हेयरने अंतिम अहवाल दाखल केला. परंतू गैरअर्जदाराने सदर दावा कुठलेही नाकारण्याचे उचित कारण न देता नामंजूर केला, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन व्याजासह विमा दाव्याची रक्कम, वाहनाचे भंगाराबाबत आदेश द्यावे, चौकीदारीचे भाडे, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत भरपाई, तक्रारीचा खर्च इ. मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला. गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दस्तऐवजासह दाखल केले. 3. गैरअर्जदाराने सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन तक्रारकर्तीची पॉलिसी मान्य करुन अपघातग्रस्त वाहनाच्या विमा दाव्याबाबत नमूद केलेल्या सर्व बाबी नाकारलेल्या आहेत व तक्रारकर्तीने सदर दावा अवाजवी व अकारण दावा दाखल केल्याने तो खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रार युक्तीवादाकरीता दि.12.07.2010 रोजी मंचासमोर आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात त्यांनी तक्रारकर्तीला विमा पॉलिसी तिचे वाहन ट्रक क्र. MH 31/AP 2748 करीता दि.19/03/2009 ते 18/03/2010 या कालावधीकरीता दिली असल्याचे मान्य केलेले आहे, म्हणून तक्रारकर्ती ही गैरअर्जदाराची ग्राहक ठरते असे मंचाचे मत आहे. 6. गैरअर्जदाराने पुढे असेही नमूद केले आहे की, सदर ट्रकमध्ये प्रादेशिक परीवहन कार्यालयाने परवानगी दिलेल्या मर्यादेच्या आत वाहन भरलेले नव्हते. तसेच वाहन चालन हा खाली लोंबकळत असलेली विद्युत तार पाहू न शकल्याने सदर वाहनात असलेल्या कोरडया गवताला आग लागली हे तक्रारकर्तीचे म्हणणेही गैरअर्जदाराने नाकारलेले आहे. तसेच विमा दावा नाकारणा-या पत्रातसुध्दा याच बाबीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतू खरोखरच वाहनात भरण्यात आलेल्या गवताची उंची 3.8 मिटरपेक्षा जास्त होती असे गैरअर्जदाराने व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या कुठल्याच दस्तऐवजावरुन सिध्द होत नसल्याने मंच गैरअर्जदाराचे सदर म्हणणे नाकारीत आहे. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार सदर विमा दावा हा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार मान्य केल्या जाऊ शकत नाही. परंतू सदर बाब सिध्द करण्याकरीता कोणतेही दस्तऐवज किंवा पॉलिसीची अट जिच्यामुळे दावा नाकारण्यात आला ते दाखल केले नाही. त्यामुळे दावा नाकारण्याचे कारण कागदोपत्री पुराव्यानीशी सिध्द न केल्याने मंचाचे मते गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा सदर प्रकरणी विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्तीच्या वाहनाला आग लागल्याने ते जळालेले आहे. तसेच भंगार वगळता त्याचे संपूर्ण नुकसान झालेले आहे हे दाखल छायाचित्रावरुन स्पष्ट होते. तसेच गैरअर्जदाराने अंतिम सर्व्हेयर हा अपघात झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने नियुक्त करुन अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे अंतिम सर्व्हेयरचा अहवाल हा कितपत सत्य परिस्थितीवर अवलंबून आहे हे अनाकलनीय आहे, म्हणून मंचाचे मते गैरअर्जदाराच्या सर्व्हेयरने दाखल केलेल्या अंतिम अहवालाला ग्राह्य मानणे उचित ठरणार नाही. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने 2010 NCJ 71 (SC) New India Assurance Company Limited Vs. Pradeep Kumar या प्रकरणामध्ये दिलेल्या निवाडयानुसार सर्व्हेयरच्या अहवालाला अंतिम व शेवटचा मानणे अयोग्य आहे. कारण हा केवळ दाव्याच्या समझोत्याकरीता असतो, तो उभय पक्षांना बांधील नसतो. उपरोक्त मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडयानुसार सदर प्रकरणी सर्व्हेयरचा अहवाल अंतिम व शेवटचा ग्राह्य न धरता तक्रारकर्तीच्या वाहनाचे संपूर्णतः नुकसान झाल्याने व गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा रास्त दावा नाकरुन सेवेत निष्काळजीपणा केल्याने तिला विमा पॉलिसीनुसार रु.5,15,759/- मिळणे न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. तसेच विमा दावा उचित कारणाशिवाय नाकारल्याने तक्रारकर्ती सदर रकमेवर व्याजही मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सदर वाहनाचे भंगार हे गैरअर्जदाराने ठेवावे व तशी तक्रारकर्तीला पोचपावती द्यावी. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम म्हणून रु.5,15,759/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावे. सदर रकमेवर गैरअर्जदाराने दावा नाकारल्याच्या दि.04.06.2009 पासून तर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज द्यावे. 3) गैरअर्जदार क्र. 1 ने वाहनाचे भंगार हे तक्रारकर्तीच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत घ्यावे व तक्रारकर्तीस तशी पावती द्यावी. 4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे. 5) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे. |