( मंचाचे निर्णयान्वये - श्री. रामलाल सोमाणी, प्रभारी अध्यक्ष.) //- आदेश -// (पारित दिनांक – 05/08/2010) तक्रार क्र.-718/2009 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये दाखल केलेली असून सदर दोन्ही तक्रारीतील तक्रारकर्तीने सदर विवादित वाहन ट्रक क्र. MH 31/CB 4358 TATA 909 हे श्री. अतुल अशोकराव उगले यांचेकडून विकत घेतलेले आहे व ते आधीचे वाहनाचे मालक आहेत. सदर वाहनाचे विमामुल्य हे पॉलिसी क्र. 3003/52815175/00/000 अन्वये रु.5,20,801/- काढण्यात आले होते. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तिच्याकडे असलेला ट्रक क्र. MH 31/CB 4358 TATA 909 या वाहनाचा दि.01.01.2008 रोजी अपघात होऊन त्यामध्ये श्रीमती अंजू सेलोकर (तक्रारकर्ती) यांचे पती मरण पावले व वाहन हे क्षतिग्रस्त झाले. गैरअर्जदार विमा कंपनीने सदर अपघातग्रस्त वाहनाचे सर्वेक्षण करण्याकरीता सर्व्हेयर नेमला. टोटल लॉस या बेसवर विमा दावा देण्याचे ठरले. याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. तसेच पूर्वीचे वाहनाचे मालक श्री. अतुल अशोकराव उगले यांनी व श्रीमती अंजू सेलोकर (तक्रारकर्ती) यांनी गैरअर्जदार विमा कंपनीला उभयतांपैकी कोणच्याही नावावर विमा दाव्याची रक्कम दिल्यास हरकत नाही असे शपथपत्र दिल्यावरही गैरअर्जदार विमा कंपनीने सदर विमा दाव्याची फाईल बंद केली असे तक्रारकर्त्यांना सांगितले. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी विमा कंपनीला वारंवार विचारणा केल्यावर व त्याची प्रतिपूर्ती केल्यावरही त्यांनी काहीही न कळविता तक्रारकर्तीच्या विमा दाव्याची फाईल बंद केली, म्हणून तक्रारकर्तीने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन वाहनाचे टोटल लॉस विमा दाव्याची रक्कम व्याजासह मागितलेली आहे. 2. सदर तक्रारी मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला असता गैरअर्जदार यांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारीस लेखी उत्तर सादर करतांना त्यांचेविरुध्द सर्व आक्षेप फेटाळले व नमूद केले आहे की, त्यांचेकडे विमा धारकाने कधीच विमा दावा दाखल केलेला नाही, त्यामुळे विमा दाव्याचा विचार करणे किंवा तो नाकारणे याबाबत भाष्य करणे अयोग्य आहे. तक्रारकर्त्याने कोणत्याच प्रकारचा विमा दावा गैरअर्जदाराकडे दाखल केलेला नाही, त्यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचे कारण उद्भवलेच नाही असेही लेखी उत्तरात नमूद केले आहे. तक्रारकर्त्याची तक्रार ही क्षुल्लक व निराधार असून ती खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार विमा कंपनीने केलेली आहे. तक्रार क्र.-801/2009 4. सदर तक्रारीतील तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू हा गैरअर्जदार क्र. 2 यांचे वाहन ट्रक क्र. MH 31/CB 4358 TATA 909 चालवित असतांना दि.01.01.2008 रोजी औरंगाबाद ते नागपूर रोडवर अपघात होऊन झाला. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे व गैरअर्जदार क्र. 1 कंपनीच्या नियमानुसार अपघाताची माहीती कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावरुन कंपनीला दिली व त्यांना नंतर वैयक्तीकरीत्या भेटले असता त्यांनीही टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करावयास सांगितले व कंपनी घरपोच रक्कम देईल असेही सांगितले. परंतू आजतागायत विमा दाव्याची रक्कम रु.2,00,000/- तक्रारकर्तीस दिली नाही, म्हणून तक्रारकर्तीने तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम ही व्याजासह देण्याची मागणी केलेली आहे. 5. गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने सदर तक्रारीस उत्तर दाखल करुन नमूद केले आहे की, सदर पॉलिसी अंतर्गत मालक हा अपघाताच्यावेळेस वाहन चालवित होता अशा चालकाला अपघात विमा लाभ उपलब्ध आहे आणि मृतक हा वाहन मालक नसल्याने सदर दाव्यांतर्गत रक्कम तक्रारकर्तीला मिळू शकत नाही. तक्रारीतील इतर सर्व बाबी गैरअर्जदार क्र. 1 ने अमान्य केलेल्या आहेत. 6. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्त झाला व ते मंचासमोर हजर होऊन त्यांनी लेखी उत्तराकरीता मंचास वेळ मागितला असता मंचाने वारंवार लेखी उत्तर दाखल करण्याची संधी देऊनही गैरअर्जदार क्र. 2 ने उत्तर दाखल न केल्याने मंचाने दि.17.06.2010 रोजी त्यांचेविरुध्द उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 7. सदर दोन्ही प्रकरणे दि.03.08.2010 रोजी मंचासमोर युक्तीवादाकरीता आली असता मंचाने उभय पक्षकारांचा युक्तीवाद त्यांच्या वकील प्रतिनीधींमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षकारांकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 8. उपरोक्त दोन्ही प्रकरणातील वाद हा एकाच पॉलिसीसंदर्भात असल्याने मंच सदर तक्रारी या संयुक्तपणे निकाली काढीत आहे. तक्रारकर्तीने क्षतिग्रस्त वाहनाच्या विम्याबाबत व तिच्या मृतक पतीच्या विम्याबाबत सदर दोन प्रकरणे मंचासमोर दाखल केलेली आहेत. सदर प्रकरणातील उभय पक्षाचे कथनाचा तपशिल तपासला असता गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे मंचाला रास्त वाटते, कारण गैरअर्जदार विमा कंपनीकडे उभय तक्रारकर्त्यांनी कधीही कोणत्याही विम्याकरीता दावा दाखल केलेला नाही. जेणेकरुन गैरअर्जदार विमा कंपनीद्वारे तक्रारकर्त्यांचा विमा दावा निकाली काढता आला असता. युक्तीवादादरम्यान तक्रारकर्त्याने गैरअर्जदार विमा कंपनीकडे केलेल्या दाव्याचा डॉकेट क्रमांक तोंडी सांगितला ते गैरअर्जदार विमा कंपनीने अमान्य केले आहे. युक्तीवादादरम्यान ग्ैरअर्जदाराने नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचे दोन्ही दावे दाखल नसल्याने ते फेटाळले नाही, म्हणून तक्रारीला कोणतेही कारण उद्भवलेले नाही. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे विहित नमुन्यात कागदपत्रांसह दावे दाखल केलेले नाही, त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनी ही त्यावर निर्णय घेऊ शकलेली नाही. 9. तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विनंती केली की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा दावा पुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी स्विकारुन योग्य तो निर्णय द्यावा असे झाल्यास तक्रारकर्ते गैरअर्जदार विमा कंपनीकडे पुन्हा आपला दावा सादर करण्यास तयार आहेत. गैरअर्जदाराचे वकिलांनी याबद्दल कोणतेही ठाम आक्षेप घेतलेला नाही. मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे दावा सादर केलेला नाही. नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीने व उभय पक्षांना आपआपली बाजू मांडण्याची व निर्णय घेण्याची संधी मिळावी या हेतूने मंच आदेशीत करते की, तक्रारकर्त्यांनी सदर वाहन क्र. MH 31/CB 4358 TATA 909 संबंधिचा विमा दावा व वाहन चालकाच्या मृत्युसंबंधीचा विमा दावा संपूर्ण कागदपत्रासह विमा कंपनीकडे सादर करावा आणि विमा कंपनीने सदर दावा प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत निकाली काढावा. सद्यस्थितीत मंचाद्वारे सदर तक्रार गुणवत्तेच्या आधारावर निकाली काढता येत नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीकोनातून व त्यांचे ग्राहक हिताची बांधीलकी पाहता योग्य व सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा व तसे तक्रारकर्त्याला कळवावे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे वाहन क्र. MH 31/CB 4358 TATA 909 संबंधिचा विमा दावा व वाहन चालकाच्या मृत्युसंबंधीचा विमा दावा संपूर्ण कागदपत्रासह विमा कंपनीकडे सादर करावा आणि गैरअर्जदार विमा कंपनीने सदर दावा प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत निकाली काढावा. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा. 3) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे. |