::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार ही मयत मधुकर पिते किसन कोवे पत्नी असून अर्जदाराच्या पतीचे दिनांक ०६.०१.२०१५ रोजी हिरो होंडा प्लेझर क्रमांक एमएच ३४ ए आर ९०३३ या गाडीने येत असताना बल्कर ट्रक क्रमांक एम.पी.- ५३/जे-०१३८ ने जोरदार धडक दिल्यामुळे ते घटनास्थळावर मयत झाले. अपघाताच्या वेळी अर्जदार बाईच्या पतीजवळ वाहन चालवण्याचा कायदेशीर परवाना होता आणि सदर वाहनाचा इन्शुरन्स गैरअर्जदार क्रमांक १ कडून काढलेला होता. सदर इन्शुरन्सचा मुदतीचा कालावधी दिनांक ०९.०५.२०१४ ते ०८.०५.२०१५ पर्यंत आहे. तसेच अर्जदाराचे पतीने सदर पॉलीसी विमा हप्त्याचा एकमुस्त भरणा केला होता व त्या रकमेत रुपये 50/- वैयक्तिक अपघाता करता भरणा केलेला आहे. या पॉलिसीच्या अटीनुसार जर चालक मालक किंवा कोणत्याही व्यक्ती जो गाडी चालवित आहे गाडी चालवण्याचा परवाना आहे त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि त्या अपघातात ते व्यक्ती मयत झाल्यास अथवा शारीरिक दुखापत झाल्यास त्या व्यक्तीला रक्कम रु. १,००,०००/- मिळतील अशी अट आहे. अर्जदाराच्या वतीने सदर गाडीचे एकूण प्रीमियम रक्कम रु. १४५४/- भरलेल्या होता त्या ५०/- हा वैयक्तिक विमा म्हणून भरलेला होता. अपघाताच्या घटनेचा रिपोर्ट दिनांक ०६.०१.२०१५ रोजी घुग्घूस येथे पोलिस स्टेशनला दिला. अर्जदार मयताची कायदेशीर पत्नी असल्यामुळे मोटार अपघातात अर्जदाराच्या पतीचे निधन झाल्यामुळे व सदर मृत्यू हा पॉलिसीच्या कालावधीत झाला असल्यामुळे गैर अर्जदाराने रक्कम रु. १,००,०००/- त्वरीत अर्जदाराला द्यायला पाहिजे होते. परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराला विम्याची रक्कम दिली नाही. अर्जदार बाईने पॉलिसीची रक्कम मिळावी म्हणून अर्जासह दिनांक २३.०२.२०१५ रोजी आवश्यक कागदपत्रे गैरअर्जदाराकडे देऊन सुद्धा गैरअर्जदाराने अर्जदाराला समाधानकारक उत्तर दिले नाही. सबब अर्जदारांनी वकीलामार्फत दिनांक १८.०७.२०१६ रोजी नोटीस पाठवली व रक्कम रु. १,००,०००/- १२% द.सा.द.शे. अर्जदारास द्यावे असे कळविले. परंतु नोटीस मिळवून सुद्धा गैरअर्जदाराने प्रतीउत्तर न दिल्याने अर्जदाराने सदर तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करून गैरअर्जदार क्र. १ व २ यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वकिलामार्फत memo of appearance देऊन लेखी उत्तर दाखल करण्यास परवानगी मागितली. परंतु गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सदर प्रकरणात लेखी उत्तर मुदतीत दाखल न केल्यामुळे सदर प्रकरण गैरअर्जदार क्र. १ व २ यांचे लेखी म्हणण्याशिवाय पुढे चालविण्यात येते असे आदेश मंचाने दिनांक ०९.०६.२०१७ रोजी पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत. अर्जदाराने दाखल केलेल्या वरील तक्रारीवरून मंच खालील कारणे व निष्कर्ष काढले आहेत.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद याचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी तक्रारदारास विमा
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन
अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार क्र. १ व २ तक्रारदारास नुकसानभरपाई
अदा करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :
५. अर्जदाराने प्रकरणात शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्ज व दाखल दस्ताऐवजाचे निरीक्षण केले असता अस स्पष्ट होते कि, अर्जदाराच्या पतीने दिनांक ०९.०५.२०१४ रोजी प्रकरणात नमूद गाडी घेतली होती. सदर गाडीचा विमा गैरअर्जदार क्र.१ कडुन काढलेला होता. अर्जदाराच्या मयत पतीच्या गाडीचा दिनांक ०६.०१.२०१५ रोजी अपघात झाल्यामुळे अर्जदाराचे पतीचा मृत्यू झाला ही बाब दाखल दस्ताऐवजवरुन तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट, पहिली खबर यावरून स्पष्ट होत आहे. तसेच अर्जदारांनी सदर गाडीची इन्शुरन्स पॉलिसी हे दस्तावेज दाखल केलेले आहेत. त्यावरून सदर गाडीचा सदर इन्शुरन्स तिच्या कालावधी दिनांक ०९.०५.२०१४ ते ०८.०५.२०१५ पर्यंत होता व सदर विमाचा एक मुस्त भरणा अर्जदारांनी केलेला आहे. तसेच वैयक्तिक अपघाताकरीता विमा संरक्षण म्हणुन रक्कम रु. ५०/- भरणा अर्जदाराच्या पतीने केला आहे. अर्जदारच्या पतीचा अपघात दिनांक ०६.०१.२०१५ रोजी झाला असल्यामुळे विमाकरार वैध असून अर्जदाराने अपघात विमा मिळण्यासाठी गैरअर्जदार क्र.१ यांचेकडे अर्जासह दस्ताऐवज दाखल केले असून सदर अर्ज व दस्तावेज गैरअर्जदारांना प्राप्त झाले आहेत ही बाब दाखल केलेल्या दस्ता-ऐवजांवरून सिध्द होते. तरीही गैरअर्जदार कमांक १ व २ यांनी त्याबाबत काहीही कारवाई केली नाही व विमा लाभ मिळणे पासून अर्जदाराला वंचित ठेवले. अर्जदाराचे पती सदर अपघातात मरण पावल्यामुळे अर्जदारला सदर रकमेचा खूप आधार मिळाला असता. सर्वसामान्य माणस विमा इन्शुरन्स एकमेव उद्देशाने काढत असतात. कारण तो विमा उपयोगी पडावा, परंतु सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी विमा पॉलिसी मुदतीत असताना अपघात झालेला असून सुद्धा त्याचा लाभ अर्जदाराला दिला नाही ही बाब गंभीर स्वरूपाची असून सेवेत त्रुटी देणारी आहे व विमा पॉलिसी मुदतीत असून लाभ न देणे ही अनुचित व्यापार पद्धती गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अवलंबलेली आहे असे स्पष्ट होत आहे. अर्जदार बाईने विमा रक्कम मिळण्याकरता वकिलामार्फत नोटीस पाठविलेली आहे. तरी त्याची दखल गैरअर्जदार क्रमांक १ व २ यांनी घेतली नाही. तसेच मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊन वकिलामार्फत memo of appearance देऊन गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी मंचासमोर त्यांचे लेखी उत्तर दाखल करण्यास वेळ मागितला परंतु लेखी उत्तर मुदतीत दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द लेखी म्हणण्याशिवाय तकार पुढे चालविण्याचा आदेश मंचाने प्रकरणात केलेला आहे यावरून गैरअर्जदार क्रमांक १ व २ यांची ग्राहकाबाबतची नकारात्मक मानसिकता दिसून येत असुन गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदाराप्रती सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केलाआहे हे सिद्ध झाल्यामुळे गैरअर्जदार कमांक १ व २ यांनी अर्जदाराच्या वाहनाचा इन्शुरन्स अपघात विमा रक्कम रु.१,००,००/- अर्जदाराला द्यावी व त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून ९ टक्के दराने व्याज द्यावे. या निर्णयाप्रती मंच आले आहे. तसेच अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी रुपये १०,०००/- आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत अर्जदाराला मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १०३/२०१६ अंशतः मंजूर करण्यात येते.
२. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे अर्जदारास विमा
कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे पॉलिसीची रक्कम
रु.१,००,०००/- व त्यावर दिनांक ०६.०१.२०१५ पासुन अदा करेपर्यंत
द.सा.द.से.९% व्याजासह अदा करावी..
४. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे मानसिक व शारीरिक
त्रास व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.१०,०००/- अर्जदारास आदेश प्राप्त
दिनांकापासुन ३० दिवसाच्या आत अदा करावे.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)