श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने चार चाकी वाहन वॅगन-आर एलएक्सआय डीयुओ बीएस-III (इमोबिलायझरसह), नोंदणी क्र. एम एच 31 सीएस 2248, गैरअर्जदार क्र. 4 कडून रु.3,54,899/- मध्ये खरेदी केले. सदर वाहनाच्या विम्यापोटी गैरअर्जदार क्र. 4 ने रु.11,347/- रक्कम तक्रारकर्त्याकडून घेतली व 9 एप्रिल 2009 रोजी प्रमाणपत्र व पॉलिसी अनुसूची गैरअर्जदारांकडून जारी करण्यात आली. सदर पॉलिसीप्रमाणे वाहनाचे विमा मुल्य रु.3,37,668/- होते. वाहनामध्ये इमोबीलायझर होते, ज्यामुळे, “इमोबीलायझर कारमधील एक यंत्र असून, त्यामुळे कोणालाही कारची चोरी करता येऊ नये, म्हणून विशिष्ट किल्ली असल्याशिवाय सुरु होण्यास अटकाव होतो”. तक्रारकर्ता सदर वाहन नंदनवन रोड येथील जीममध्ये जाण्याकरीता रस्त्यावर उभे केले. जीममध्ये व्यायाम करुन परत आल्यावर वाहन हे चोरीस गेल्याचे तक्रारकर्त्यांचे निदर्शनास आले. जीममधील सदर वाहनाच्या किल्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन, त्या किल्यांच्या साहाय्याने वाहन चोरुन नेले. याबाबत जीमच्या परिचराकडे चौकशी केली, परंतू शोध लागला नाही. पोलिस स्टेशन सक्करदरा येथे भा.दं.वि.369 अंतर्गत 01.10.2009 रोजी त्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. 22.12.2009 पर्यंत पोलिसांनी प्रयत्न करुनही वाहनाचा शोध न लागल्याने समरी केस क्र. 78/2010 नोंदविण्यात आली असून न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी, न्यायालय क्र. 1 यांचेकडे प्रलंबित आहे. वाहनाच्या चोरीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली. वाहन बेकायदेशीरपणे रस्त्यावर ठेवले असल्यास आयुक्त, म.न.पा.नागपूर यांचेकडे त्याबाबत माहिती मागविली असता त्यांनी वाहन उचलले नाही अशा आशयाचे पत्र दिले. तसेच वित्त सहाय्य करणा-या कंपनीला अशीच विचारणा करण्यात आली असता त्यांनी वाहन उचलले नाही अशा आशयाचे पत्र दिले.
2. सदर वाहनाचा विमा गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी क्र. 3001/56597677/00/000 अंतर्गत असल्याने, एप्रिल 2010 मध्ये दावा क्र. मोटो 1279732 दाखल केला. परंतू गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने अर्थहीन सबबीवरुन दाव्याचे निराकरण करण्यास नकार दिला व लोकायुक्त (ऑम्बुड्स) द्वारा निवारण करण्याकरीता कळविले. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदारांनी सेवा देण्यात निष्काळजीपणा केलेला आहे. गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम व्याजासह द्यावी, झालेल्या मानसिक त्रासाकरीता भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. मंचाने गैरअर्जदार क्र. 1 ते 4 ला नोटीस पाठविली. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व नमूद केले की, तक्रारकर्त्याने रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन उभे केले होते व त्याच्याच ताब्यातून वाहनाच्या किल्या चोरीस गेल्या आहेत. पॉलिसी क्र., तिचा कालावधी, दाखल दावा या अभिलेखावरील बाबी आहेत. 12 एप्रिल 2010 च्या पत्रातील कथने ही पॉलिसीच्या अटी व शर्तीवर आधारित आहे. तक्रारकर्त्याची तक्रार ही केवळ गृहितकावर आधारित आहे. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचा निष्काळजीपणा सिध्द केलेला नाही. तसेच तक्रार मुदतीचे आत नाही व मंचाला ती चालविण्याचा क्षेत्राधिकार नाही. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती मंचाला केली.
3. गैरअर्जदार क्र. 4 ने लेखी उत्तर दाखल केले. त्यात गाडीची खरेदी, विमा इ. बाबी मान्य केल्या व त्यांचे संबंधित नसलेल्या बाबी नाकारल्या. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आपल्या लेखी उत्तरात विमा घोषीत मुल्य, विमा हप्त्याची रक्कम व विमा इ. बाबी मान्य केल्या. परिच्छेद क्र. 4 हा दस्तऐवजाचा भाग असल्यामुळे तक्रारीस उत्तर देण्याची आवश्यकता नाही असे म्हटले. गैरअर्जदाराने तक्रारीचे परिच्छेद क्र. 5 ला दिलेल्या उत्तरात तक्रारकर्त्यावर आरोप केले की, तक्रारकर्त्याने सदर वाहन पार्किंग झोनमध्ये पार्क केले नव्हते. रोडवर काळजीपूर्वक ठेवले नव्हते व इतर तक्रारकर्त्याचे कथन नाकारले. गैरअर्जदाराने तक्रारीचे परिच्छेद क्र. 15, 16 ला दिलेल्या उत्तरात म्हटले की, 12.04.2010 चे पत्रव्यवहार अन्वये विमा दावा मंजूर करण्यात आला नाही व गैरअर्जदाराची कृती ही पॉलिसीच्या अटी व शर्तीच्या अधीन येत असून गैरअर्जदाराने विमा दावा नाकारलेला आहे व तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांनी मंचाला पाठविलेला नोटीस प्राप्त होऊन, 09.06.2011 ला पूकारा केला असता गैरअर्जदार गैरहजर, म्हणून तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. तसेच प्रकरण युक्तीवादाकरीता ठेवण्यात आले.
5. मंचाने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्र. 3 व 4 गैरहजर. मंचाने तक्रारीसोबत असलेल्या दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. तक्रारकर्त्यांचा विमा दावा नाकारतेवेळी 12.04.2010 चे पत्रातील परिच्छेद क्र. 1 व 2 नुसार विमा दावा नाकारलेला आहे. पत्राचे परिच्छेद क्र. 2 मध्ये इन्व्हेस्टीगेशन रीपोर्टचा उल्लेख आढळून येतो. परंतू इन्व्हेस्टीगेशन रीपोर्ट अभावी गैरअर्जदाराचे त्या परिच्छेदातील म्हणणे तथ्यहीन ठरते. गैरअर्जदाराने 12.04.2010 चे पत्रात वरीलप्रमाणे परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने अटी व शर्तीचे उल्लंघन केलेले आहे व सदर वाहन चोरी जाण्यास तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरासोबत पॉलिसीच्या अटी व शर्ती अंतर्गत तक्रारकर्त्याने कोणत्या पॉलिसीच्या अटीचे उल्लंघन केले, तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती मंचासमोर योग्य निवाडयाकरीता दाखल केल्या नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याने दाखल केलेला विमा दावा त्याच्या ताब्यात असलेली विम्याची प्रत, अटी व शर्ती मंचासमोर दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार मंचापासून वस्तूस्थिती दडवून ठेवीत आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द adverse inference काढणे मंचास योग्य वाटते. तक्रारकर्त्याचे शपथपत्रावरील कथन, तसेच पृष्ठ 18 ते 21 वरील दस्तऐवजावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने वाहन हे 31.09.2009 ला जीममध्ये ठेवलेल्या चाबीची चोरी झाल्यामुळे तक्रारकर्त्याचे वाहन चोरीला गेलेले आहे हे सिध्द होते. तक्रारकर्त्याने दस्तऐवजाद्वारे हेसुध्दा सिध्द केले की, तक्रारकर्त्याचे वाहन हे अतिक्रमणे निर्मूलन विभागाने उचलून नेलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने आर.सी.बुकमध्ये वाहन चोरी केल्याबाबतची नोंदसुध्दा करुन घेतली आहे. वरील परिच्छेदावरुन हे स्पष्ट झालेले असतांना तक्रारकर्त्याचा न्यायोचित विमा दावा हा अर्थहीन कारणासाठी नाकारला ही गैरअर्जदाराची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती अभावी गैरअर्जदार अटी व शर्तीचे उल्लंघन केले या सबबीखालीसुध्दा विमा दावा नाकारणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून गैरअर्जदारा क्र. 1 व 2 चोरी गेलेल्या वाहनाचे विमा घोषीत मुल्य रु.3,37,668/- तक्रार दाखल दि.01.09.2010 पासून तक्रारकर्त्याचे हातात रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने द्यावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला त्याचे चोरी गेलेल्या वाहनाचे विमा घोषीत मुल्य रु.3,37,668/-, तक्रार दाखल दि.30.09.2010 पासून तक्रारकर्त्याचे हातात रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावे.
3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला, शारिरीक व मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.